Tuesday, 22 August 2023

Text - आकाशवाणी औरंगाबाद, दिनांक : 22.08.2023 रोजीचे दुपारी : 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date: 22 August 2023

Time : 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक : २२ ऑगस्ट २०२ दुपारी १.०० वा.

****

राज्यातला दोन लाख मेट्रिक टन कांदा, नाफेड मार्फत दोन हजार ४१० रुपये प्रति क्विंटल या दराने खरेदी करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी आज ही घोषणा केली. कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी आज दिल्लीत गोयल यांची भेट घेऊन राज्यातल्या कांदा प्रश्नी चर्चा केली, त्यानंतर मुंडे यांनी ही माहिती दिली. नाशिक आणि अहमदनगर इथं विशेष खरेदी केंद्र सुरू करुन ही खरेदी करण्यात येईल, असं त्यांनी सांगितलं. गोयल यांच्या या निर्णयानंतर तात्काळ राज्यातल्या कांदा खरेदीला सुरुवात झाल्याचं मुंडे यांनी सांगितलं. केंद्र सरकारने निर्यात शुल्काबाबत पुनर्विचार करावा अशी विनंती देखील, गोयल यांच्याकडे केल्याचं ते म्हणाले.

दरम्यान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील गोयल आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी दूरध्वनीवरुन राज्यातल्या कांदा प्रश्नावर चर्चा केली.

****

दरम्यान, राज्यातल्या काही बाजार समित्यांमध्ये कांद्याचे लिलाव बंद असल्यानं, आज मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीतल्या कांदा बटाटा मार्केटमध्ये कांद्याची आवक कमी झाली. आज बाजारात केवळ ५० गाडी कांदा आला, तरी दर मात्र १८ ते २२ रूपये दरम्यान स्थिर असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते आज भारत नवीन कार चाचणी उपक्रम अर्थात भारत एन सी ए पीचं लोकार्पण करण्यात आलं. ही प्रणाली गाड्यांच्या दुर्घटना रोखणाऱ्या सुरक्षा व्यवस्थेचं तुलनात्मक मूल्यमापन करेल. या उपकरणामुळे भारत चार चाकी वाहन दुर्घटना सुरक्षा प्रणालीची अंमलबजावणी करणारा पाचवा देश ठरणार आहे. या प्रणालीनंतर भारतीय कंपन्यांकडून चार चाकी वाहनांची सुरक्षा मानकं, आणि गुणवत्तेत वाढ होण्याची आशा व्यक्त केली जात आहे. याअंतर्गत होणार्या चाचण्यांच्या आधारे वाहनाची लहान मुलांसाठी आणि प्रौढ व्यक्तींसाठी सुरक्षितता निश्चित केली जाईल.

****

भारताच्या चांद्रयान तीन मोहिमेतलं लॅण्डर उद्या सायंकाळी चंद्राच्या पृष्ठभागावर उतरणार आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रोकडून या ऐतिहासिक प्रसंगाचं थेट प्रक्षेपण होणार आहे.

****

राज्यातल्या जनतेला आरोग्य हक्क अर्थात राईट टू हेल्थ मिळावा यासाठी सरकार कटिबद्ध असून, लवकरच याची अंमलबजावणी करण्यात येईल आणि राज्यातल्या १२ कोटी ३० लाख जनतेला त्याचा निश्चित फायदा होईल, असा विश्वास, आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी व्यक्त केला आहे. ते आकाशवाणीला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते. आरोग्य यंत्रणेत सध्या मनुष्यबळाची कमतरता असून, लवकरच सतराशे डॉक्टर आणि सुमारे सहा हजार कर्मचाऱ्यांची भरती करण्यात येणार आहे. सप्टेंबर अखेर हे काम पूर्ण होऊन आरोग्य यंत्रणा आणखी सक्षम होईल, असं सावंत यांनी सांगितलं.

****

राज्यातल्या चित्रपट क्षेत्राला उर्जितावस्था मिळवून देणारं धोरण तयार केलं जाईल, अशी माहिती सांस्कृतिक धोरण पुनर्विलोकन समितीच्या चित्रपटविषयक उपसमितीचे अध्यक्ष गजेंद्र अहिरे यांनी दिली आहे. कोल्हापूर इथं काल सांस्कृतिक धोरण पुनर्विलेकन समितीच्या सदस्यांची बैठक, जिल्हा आणि जवळील चित्रपट निर्मिती व्यवसायिकांबरोबर पार पडली, त्यावेळी ते बोलत होते.

****

वृक्षाचं आच्छादन कमी असलेल्या लातूर जिल्ह्यात वृक्ष लागवडीला चालना मिळावी, यासाठी वृक्षारोपण ही लोकचळवळ बनणं गरजेचं असल्याचं, जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी म्हटलं आहे. यापुढे कोणत्याही स्वागत, सत्काराला बुके ऐवजी पुस्तक किंवा रोपटे स्वीकारण्याचा निर्णय आपण घेतला असून, आता सत्काराला बुकेनको, तर बुक किंवा रोप द्यावं, असं आवाहन त्यांनी केलं आहे. जिल्ह्यातल्या नागरिकांनीही विविध कार्यक्रम आयोजित करताना हा नियम पाळला तर यानिमित्ताने जिल्ह्यात वृक्ष लागवड आणि संगोपनास चालना मिळेल, असं ठाकूर म्हणाल्या.

****

उस्मानामाद जिल्ह्यात पावसाच्या खंडामुळे झालेल्या नुकसानीपोटी २५ टक्के अग्रीम नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी, भारतीय जनता पक्षाच्यावतीने काल करण्यात आली. प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या शासन निर्णयाप्रमाणे पावसातील खंडामुळे उत्पादनात ५० टक्क्याहून अधिक घट दिसून येत असल्यास, २५ टक्के अग्रीम नुकसान भरपाई देण्याची तरतूद आहे, त्यानुसार ही भरपाई दिली जावी असं निवेदन पक्षातर्फे जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलं.

****

भारताचा बुद्धीबळपटू ग्रँण्डमास्टर आर प्रज्ञानंदा यानं फिडे विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश मिळवला आहे. अंतिम फेरीत विजेतेपदासाठी प्रज्ञानानंदची लढत जागतिक क्रमवारीत अग्रस्थानी असलेल्या मॅग्नस कार्लसन यांच्यासोबत होईल. काल झालेल्या उपांत्य फेरीच्या टायब्रेकरच्या अटीतटीच्या लढतीत प्रज्ञानंद यानं अमेरिकच्या फॅबियानो कारुआना याचा पराभव केला.

****

No comments:

Post a Comment