Tuesday, 22 August 2023

TEXT - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 22.08.2023 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजताचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 22 August 2023

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – २२ ऑगस्ट २०२३ सायंकाळी ६.१०

****

·      केंद्र सरकारकडून महाराष्ट्रात दोन लाख मेट्रिक टन कांद्याची नाफेड मार्फत खरेदी करण्यास सुरवात.

·      विरोधी पक्ष मात्र निर्यात शुल्क रद्द करण्याच्या मागणीवर कायम;नाशिक जिल्ह्यात कांदा लिलावही ठप्प.

आणि

·      राज्यशासनाच्या उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव पुरस्कार स्पर्धेसाठी पाच सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचं आवाहन.

****

केंद्र सरकारने आजपासून महाराष्ट्रात दोन लाख मेट्रिक टन कांद्याची खरेदी करण्यास सुरवात केली आहे. प्रतिक्विंटल दोन हजार ४१० रुपये दरानं नाफेडमार्फत ही खरेदी केली जात आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि केंद्रीय वाणिज्य मंत्री पियूष गोयल यांच्याशी यासंदर्भात चर्चा केली, आणि त्यानंतर एका ट्विट संदेशातून ही माहिती दिली. महाराष्ट्रातल्या कांदा उत्पादक शेतक़यांचं हित जपण्यासाठी, नाशिक, लासलगाव आणि अहमदनगर इथं विशेष कांदा खरेदी केंद्रं सुरु करण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला असल्याचं फडणवीस यांनी सांगितलं आहे. राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनीही आज सकाळी पियूष गोयल यांची यासंदर्भात भेट घेतली, आवश्यकता भासल्यास निर्धारित लक्ष्यापेक्षा जास्त कांदा देखील खरेदी केला जाईल, असं आश्वासन गोयल यांनी यावेळी दिलं.

केंद्र सरकारच्या या निर्णयाबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्र सरकारचे आभार मानले आहेत. आज दुपारी मुंबईत त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह पत्रकार परिषद घेतली, त्यात ते बोलत होते. आवश्यकता वाटली तर निर्यातीसाठी कंटेनरमध्ये भरून तयार असलेला कांदाही केंद्र सरकार खरेदी करेल, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. केंद्राच्या निर्यात शुल्कासारख्या निर्णयावर राजकारण करू नये, असा सल्ला त्यांनी विरोधकांना दिला. निर्यात शुल्काच्याया निर्णयावर पुनर्विचार करण्याची विनंती राज्य सरकारनं केंद्राला केली आहे, असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. नाशवंत शेतमालाची साठवणूक क्षमता वाढवण्यासाठी सरकार प्रयत्न करत असून, त्यासाठी अनिल काकोडकर समितीच्या शिफारशींवर काम सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी, यावेळी बोलताना, आज दुपारपासून केंद्र सरकारकडून कांदा खरेदी सुरू झाल्याची माहिती दिली.

****

दरम्यान, नाफेडतर्फे कांदा खरेदी ही दिशाभूल आहे, असा आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. याऐवजी वाढवलेलं निर्यात शुल्क कमी करावं, असं पटोले यांनी म्हटलं आहे. तर, सरकारनं दिलेला दर पुरेसा नसून, दर वाढवून चार हजार रुपये प्रति क्विंटल करावा, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली आहे.

विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी कांदा निर्यात शुल्क रद्द करावं, अशी मागणी केली आहे. ते आज मुंबईत पत्रकारांशी बोलत होते. कांद्याला प्रति क्विंटल तीनशे पन्नास रुपये अनुदान देण्याचं सरकारनं विधिमंडळात मान्य केलं होतं, मात्र ते अजूनही मिळालेलं नाही, असं दानवे म्हणाले.

 

दरम्यान, कांदा निर्यात शुल्क वाढीच्या निषेधार्थ आज सलग दुसऱ्या दिवशी नाशिक जिल्ह्यातल्या बहुतांश बाजार समित्यांमध्ये कांदा लिलाव बंद होते. नाशिकचे जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी आज कांदा व्यापारी संघटना पदाधिकारी आणि कांदा उत्पादक यांच्या प्रतिनिधींची बैठक घेतली. कांदा उत्पादकांच्या भावना शासनाला भावना कळवू, असं आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिलं. जिल्हाधिकाऱ्यांनी बैठक घेऊनही व्यापारी आपल्या भूमिकेवर ठाम आहेत.

लिलाव बंद ठेवणाऱ्या व्यापाऱ्यांना, त्यांचे परवाने रद्द का करू नयेत, अशा आशयाच्या नोटिसा सहकार खात्याकडून बजावण्यात येणार असल्याची माहिती नाशिकचे सहकार उपनिबंधक फैय्याज मुलाणी यांनी दिली आहे. बाजार समित्यांमध्ये तीन दिवसांपेक्षा अधिक काळ कांदा लिलाव शेतकऱ्यांनी हेाऊ दिले नाही तर पर्यायी कांदा खरेदीची व्यवस्था सुरू करण्याचे आदेश दिल्याचंही मुलाणी यांनी सांगितलं.

****

जपानमधल्या कोयासन विद्यापीठानं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मानद डॉक्टरेट देण्यात येत असल्याची घोषणा केली आहे. महाराष्ट्रातल्या पायाभूत सुविधा, औद्योगिक विकास, जलयुक्त शिवारसारख्या योजनांच्या माध्यमातून जलसंधारण क्षेत्रात केलेलं कार्य आणि सामाजिक समानतेसाठी केलेले प्रयत्न या उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांना ही मानद डॉक्टरेट जाहीर करण्यात आली आहे. आगामी भारत भेटीत फडणवीस यांना ही पदवी प्रदान करण्यात येईल, असं या विद्यापीठाचे प्रमुख सोएदा सॅन यांनी सांगितलं आहे.

****

चांद्रयान तीनचं लँडर मॉड्यूल आणि चंद्राची स्थिती पाहून चंद्राच्या पृष्ठभागावर उतरण्यासंबंधीचा निर्णय घेतला जाणार आहे. चंद्रयान तीनचे प्रकल्प निदेशक नीलेश देसाई यांनी ही माहिती दिली आहे. वातावरणाची स्थिती अनुकूल नसली तर चंद्रावर उतरण्याची प्रक्रिया येत्या सत्तावीस तारखेपर्यंत स्थगित केली जाऊ शकते, अशी माहितीही नीलेश यांनी दिली. मागच्या अनुभवातून समजलेल्या चुका आम्ही टाळल्या आहेत आणि त्यामुळे चंद्रयान उद्या संध्याकाळी चंद्रावर यशस्वीपणे उतरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. भारताच्या चांद्रयान तीनच्या चंद्रावर उतरण्याची वेळ जवळ येत असताना भारतासोबतच अन्य देशातही उत्सुकता आणि उत्साह वाढत असल्याचं चित्र आहे. यानाच्या सगळ्या यंत्रणा व्यवस्थित काम करत असल्याची घोषणा भारतीय अवकाश संशोधन संस्था इस्रोनं केली आहे.

****

राज्यातल्या उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना पुरस्कार देण्याचा निर्णय राज्य शासनानं घेतला आहे. मुंबई, मुंबई उपनगर, पुणे आणि ठाणे या जिल्ह्यांतून प्रत्येकी तीन तर अन्य जिल्ह्यांतून प्रत्येकी एक याप्रमाणे एकूण चव्वेचाळीस उत्कृष्ट  गणेशोत्सव मंडळांची यासाठी निवड करण्यात येणार आहे. यातल्या सर्वोत्कृष्ट गणेशोत्सव मंडळाला पाच लाख रुपयांचं, द्वितीय क्रमांकाला दोन लाख तर तृतीय क्रमांकाच्या मंडळाला एक लाख रुपयांचं पारितोषिक देण्यात येईल, शिवाय उरलेल्या एक्केचाळीस गणेशोत्सव मंडळांना राज्य शासनाकडून प्रत्येकी पंचवीस हजार रुपयांचं पारितोषिक दिलं जाईल. या स्पर्धेसंबंधीची सगळी माहिती राज्य शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध असून या स्पर्धेसाठी येत्या पाच सप्टेंबरपर्यंत अर्ज करायचे आहेत.

****

नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या हद्दीत काही व्यावसायिक या वृक्षांचा वापर खिळे ठोकून जाहिराती किंवा फलक लावण्यासाठी करत असल्याचं निदर्शनाला आलं आहे. वृक्षांना इजा आणि शहराचं विद्रुपीकरण करणारे हे प्रकार तात्काळ थांबवून येत्या तीन दिवसात अशा जाहिराती आणि फलक काढून टाकावेत, असं आवाहन नांदेड वाघाळा महानगरपालिकेच्या उद्यान आयुक्तांनी केलं आहे. या मुदतीनंतर असे प्रकार आढळून आल्यास संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

****

नांदेड जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते विधान परिषदेचे माजी सदस्य किशनराव राठोड यांचं काल मध्यरात्री पुण्यात निधन झालं. गेल्या महिन्याभरापासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांच्या पार्थिव देहावर उद्या सकाळी मुखेड तालुक्यात कमळेवाडी इथं अंत्यसंस्कार होणार आहेत.

****

औरंगाबाद इथं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एका महिलेनं स्वत:ला पेटवून घेतलं. या महिलेनं रस्त्याच्या लगत सुरू केलेलं बांधकाम महापालिकेनं आज जमीनदोस्त केलं, तसंच साहित्य जप्त केलं, त्यानंतर या महिलेनं हा प्रकार केला. सदर महिलेला जखमी अवस्थेत घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. ही महिला मनोरुग्ण असल्याचं, सांगितलं जात आहे

****

नागपूरच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर परदेशातून तस्करी करून आणलेला अँफेटामाईन नावाचा तीन किलो अंमली पदार्थ जप्त करण्यात आला. या अंमली पदार्थाची किंमत सुमारे चोवीस कोटी रुपये आहे. महसूल गुप्तचर संचालनालयाला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली.केनियामधून हा अंमली पदार्थ आणणाऱ्या एका भारतीयाला या कारवाईमध्ये  अटक करण्यात आली.

****

जालना तालुक्यातल्या इंदेवाडी इथल्या शिवाजी घुगे या तलाठ्याला १७ हजार रुपयांची लाच घेताना आज लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं अटक केली. तक्रारदाराच्या भूखंडांच्या फेरफार नोंदीसाठी घुगे यानं पंचवीस हजार रुपयांची लाच मागितली होती.

****

No comments:

Post a Comment