Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date: 23 August 2023
Time : 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक : २३ ऑगस्ट
२०२३ दुपारी १.०० वा.
****
भारताच्या चांद्रयान तीन मोहिमेतलं लँडर मोड्युल आज संध्याकाळी चंद्राच्या
पृष्ठभागावर उतरणार आहे. यासाठीची उलट गणना सुरू झाली आहे. भारतासह संपूर्ण जगाला या
ऐतिहासिक क्षणांची उत्सुकता आहे. हे चांद्रयान यशस्वीपणे उतरल्यावर, चंद्रावर
यान पाठवणारा भारत जगातला चौथा देश आणि चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सॉफ्ट लँडिंग करणारा
पहिला देश ठरणार आहे. हे यान संध्याकाळी सहा वाजून चार
मिनिटानी चंद्रावर उतरणार असून, भारतीय अंतराळ संशोधन संस्था - इसरो पाच वाजून २० मिनिटांपासून या लँडिंगचं
थेट प्रसारण करणार आहे. दूरदर्शनवरुन देखील हे प्रसारण करण्यात येणार आहे.
चांद्रयान-तीन मोहिमेचे सर्व टप्पे वेळापत्रकानुसार पार पडले असून, यान सध्या
चंद्राभोवती प्रदक्षिणा घालत असल्याचं इस्रोनं काल समाज माध्यमांवर जाहीर केलं. चांद्रयानातील
कॅमेऱ्याने काढलेली चंद्राची अनेक छायाचित्रही इस्रोनं प्रसारित केली आहेत.
****
भारतीय निवडणूक आयोगानं क्रिकेटपटू भारतरत्न सचिन तेंडूलकरची राष्ट्रीय दूत
म्हणून नियुक्ती केली आहे. आज नवी दिल्ली इथं आयोजित कार्यक्रमात, मुख्य
निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांच्या उपस्थितीत, यासंदर्भातल्या सामंजस्य करारावर स्वाक्षरी होणार आहे. मतदारांमध्ये मतदानासंदर्भात
जागृती निर्माण करणं, आणि नागरिकांना आयोगामार्फत राबवल्या जाणाऱ्या उपक्रमासंदर्भात प्रशिक्षित
करणं, या उद्देशानं पुढील तीन वर्षांसाठी, हा करार असेल. पुढील वर्षी होणार्या लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर, युवकांचा
तसंच शहरी मतदारांचा निवडणूक प्रक्रियेतील सहभाग वाढवणं, या उद्देशानं
सचिनची निवड करण्यात आली आहे.
****
जी-20 सांस्कृतिक कार्यगटाची चौथी बैठक आजपासून उत्तर प्रदेशात वाराणसी इथं सुरु
होत आहे. जी - 20 सदस्य देशांचे प्रतिनिधी, निमंत्रित देश आणि विविध आंतरराष्ट्रीय संघटनांचे प्रतिनिधी, या बैठकीत
सहभागी होत आहेत. संस्कृतीला धोरण निर्मितीच्या केंद्रस्थानी ठेवून, कृतीक्षम
निष्कर्ष काढणं हा या बैठकीचा उद्देश आहे. या बैठकीदरम्यान सहभागी प्रतिनिधींना गंगा
नदीच्या तटावर गंगा आरती अनुभवण्याची तसंच सारनाथचा इतिहास जाणून घ्यायची संधीही मिळणार
आहे.
****
राज्यातल्या उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना पुरस्कार देण्याचा निर्णय
राज्य सरकारनं घेतला
आहे. मुंबई, मुंबई उपनगर, पुणे आणि ठाणे या जिल्ह्यांतून प्रत्येकी तीन, तर अन्य जिल्ह्यांतून प्रत्येकी एक, याप्रमाणे एकूण चव्वेचाळीस उत्कृष्ट गणेशोत्सव मंडळांची, यासाठी
निवड करण्यात येणार आहे. यातल्या सर्वोत्कृष्ट गणेशोत्सव मंडळाला पाच लाख रुपयांचं, द्वितीय
क्रमांकाला दोन लाख, तर तृतीय क्रमांकाच्या मंडळाला एक लाख रुपयांचं पारितोषिक देण्यात येईल, शिवाय
उरलेल्या एक्केचाळीस गणेशोत्सव मंडळांना राज्य शासनाकडून, प्रत्येकी
पंचवीस हजार रुपयांचं पारितोषिक दिलं जाईल. या स्पर्धेसंबंधीची सगळी माहिती राज्य शासनाच्या
संकेतस्थळावर उपलब्ध असून, पाच सप्टेंबरपर्यंत अर्ज करता
येतील.
****
नांदेड प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या
वतीनं जिल्ह्यातल्या सगळ्या बस चालकांसाठी मोफत नेत्र तपासणी आणि आरोग्य शिबीरं सुरू
आहेत. नांदेडच्या शासकीय रुग्णालयात सकाळी नऊ ते बारा या वेळात चालकांनी या शिबिरांचा
लाभ घ्यावा, असं आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी शैलेश कामत यांनी केलं आहे.
****
‘शासन
आपल्या दारी’ अभियानांतर्गत परभणी इथं पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा आयोजित करण्यात
आला आहे. येत्या सत्तावीस तारखेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम
होणार आहे. परभणीतल्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातल्या क्रीडा संकुल मैदानावर
हा महारोजगार मेळावा होणार असून, जिल्ह्यातल्या इच्छुक उमेदवारांनी याचा लाभ घ्यावा, असं आवाहन
जिल्हा कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्तांनी केलं आहे.
****
प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेत दक्षिण मध्य रेल्वेनं सप्टेंबर आणि ऑक्टोबर
महिन्यात काही विशेष गाड्यांच्या फे-या वाढवल्या आहेत. यामध्ये तिरुपती-अकोला-तिरुपती, पूर्णा-तिरुपती-पूर्णा
आणि विजयवाडा-नगरसोल-विजयवाडा, या गाड्यांचा समावेश आहे.
****
दुबई इथं सुरु असलेल्या दिव्यांगांच्या भारोत्तोलन स्पर्धेत भारताच्या हनी
डबासनं सुवर्ण, तर राहुल जोगराजियानं रौप्य पदक जिंकलं आहे. डबास यानं ७३ किलो कनिष्ठ गटात सुतवातीला १३२ आणि
नंतर १३५ किलो वजन उचलून देशासाठी पहिलं सुवर्ण पदक जिंकलं. तर राहुल जोगराजियानं याच
वजनी गटात १३२ किलो वजन उचललं.
****
भारत आणि आयर्लंड दरम्यान तीन टी - ट्वेंटी क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतला
तिसरा सामना आज डबलिन इथं खेळला जाणार आहे. भारतीय वेळेनुसार संध्याकाळी साडे सात वाजता
सामन्याला सुरुवात होईल. मालिकेतले पहिले दोन्ही सामने जिंकून भारतानं या
मालिका दोन - शून्य अशी विजयी आघाडी घेतली आहे.
****
No comments:
Post a Comment