Wednesday, 23 August 2023

Text - आकाशवाणी औरंगाबाद, दिनांक : 23.08.2023 रोजीचे सकाळी : 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date : 23 August 2023

Time : 7.10 AM to 7.25 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक : २३ ऑगस्ट  २०२ सकाळी ७.१० मि.

****

ठळक बातम्या

·      भारताचं चांद्रयान आज सायंकाळी चंद्रावर उतरणार;ऐतिहासिक घटनेचं इ्स्रोकडून थेट प्रसारण

·      केंद्र सरकारकडून महाराष्ट्रात दोन लाख मेट्रिक टन कांद्याची नाफेड मार्फत खरेदी सुरू 

·      निर्यात शुल्क रद्द करण्याच्या मागणीवर विरोधक ठाम;नाशिक जिल्ह्यात कांदा लिलाव ठप्प

·      प्रत्येक जिल्हा प्रशासनानं पाण्याचं काटकसरीनं नियोजन करण्याची मुख्यमंत्र्यांची सूचना

·      डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाला इंद्रधनुष्य महोत्सवाचं यजमानपद

·      उस्मानाबादच्या सर्व मंडळांत अग्रीम विमा मिळवून देण्यास प्रयत्नशील-आमदार राणा जगजीतसिंह पाटील

आणि

·      बुद्धिबळ विश्वचषक स्पर्धेच्या पहिल्या डावात भारताच्या प्रज्ञानंदने मॅग्नस कार्लसनला बरोबरीत रोखलं;आज दुसरी फेरी


 

सविस्तर बातम्या

भारताचं चांद्रयान आज सायंकाळी चंद्रावर उतरणार आहे. सर्व परिस्थिती अनुकूल राहिली, तर सायंकाळी सहा वाजून चार मिनिटांनी चांद्रयानातलं लँडर, चंद्राच्या दक्षिण ध्रूवावर उतरेल. अशी कामगिरी करणारा भारत हा जगातला पहिलाच देश ठरणार आहे. यानाच्या सगळ्या यंत्रणा व्यवस्थित काम करत असल्याची घोषणा, भारतीय अवकाश संशोधन संस्था - इस्रोनं केली आहे.

दरम्यान, वातावरणाची स्थिती अनुकूल नसली तर यान चंद्रावर उतरवण्याची प्रक्रिया येत्या सत्तावीस तारखेपर्यंत स्थगित केली जाऊ शकते, अशी माहिती, चांद्रयान तीनचे प्रकल्प निदेशक नीलेश देसाई यांनी दिली आहे. चांद्रयान तीनचं लँडर मॉड्यूल आणि चंद्राची स्थिती पाहूनच, हे लँडर चंद्राच्या पृष्ठभागावर उतरवण्यासंबंधीचा निर्णय घेतला जाणार आहे. मागच्या अनुभवातून समजलेल्या चुका आम्ही टाळल्या आहेत, आणि त्यामुळे चांद्रयान चंद्रावर यशस्वीपणे उतरेल, असा विश्वासही देसाई यांनी व्यक्त केला.

चांद्रयानाच्या चंद्रावर उतरण्याच्या या ऐतिहासिक घटनेचं इस्त्रोचं संकेतस्थळ, यू-ट्यूब चॅनल तसंच फेसबुक पेज यासह दूरदर्शनच्या डीडी नॅशनल या वाहिनीवरून आज सायंकाळी थेट प्रसारण करण्यात येणार आहे.

****

केंद्र सरकारने महाराष्ट्रात दोन लाख मेट्रिक टन कांद्याची खरेदी करण्यास सुरवात केली आहे. प्रतिक्विंटल दोन हजार ४१० रुपये दरानं नाफेडमार्फत ही खरेदी केली जात आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि केंद्रीय वाणिज्य मंत्री पियूष गोयल यांच्याशी यासंदर्भात चर्चा केली, त्यानंतर त्यांनी एका ट्विट संदेशातून ही माहिती दिली. महाराष्ट्रातल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं हित जपण्यासाठी, नाशिक, लासलगाव आणि अहमदनगर इथं विशेष कांदा खरेदी केंद्रं सुरु करण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला असल्याचं, फडणवीस यांनी सांगितलं. राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनीही काल सकाळी पियूष गोयल यांची यासंदर्भात भेट घेतली, आवश्यकता भासल्यास निर्धारित लक्ष्यापेक्षा जास्त कांदा देखील खरेदी केला जाईल, असं आश्वासन गोयल यांनी यावेळी दिलं. कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी सरकार आवश्यक ती सर्व पावलं उचलत असल्याचं गोयल यांनी सांगितलं.

या निर्णयाबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्र सरकारचे आभार मानले आहेत. काल दुपारी मुंबईत मुख्यमंत्र्यांनी, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह पत्रकार परिषद घेतली, त्यात ते बोलत होते. आवश्यकता वाटली तर निर्यातीसाठी कंटेनरमध्ये भरून तयार असलेला कांदाही केंद्र सरकार खरेदी करेल, अशी माहिती त्यांनी दिली. नाशवंत शेतमालाची साठवणूक क्षमता वाढवण्यासाठी सरकार प्रयत्न करत असून, त्यासाठी अनिल काकोडकर समितीच्या शिफारशींवर काम सुरू असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. कांदा साठवणुकीसंदर्भात ते म्हणाले...

 

Byte…

कांदा चाळी वाढवणं, त्याचं अनुदान वाढवणं त्याचबरोबर मोठ्या प्रमाणावर कोल्ड स्टोअरेजची निर्मिती करणं, आणि ॲडव्हान्स्ड टेक्नॉलॉजी वापरून जास्तीत जास्त ज्या नाशवंत वस्तू आहेत कांद्यासारख्या त्या टीकायला पाहिजेत, यासाठी देखील शासन स्तरावर मोठ्या प्रमाणावर आपण त्याच्यामध्ये निर्णय घेतोय. जेणेकरून शेतकऱ्याला तोषिश कुठेही लागणार नाही. आणि शेतकऱ्याला त्याचा फायदा होईल.

 

केंद्राच्या निर्यात शुल्कासारख्या निर्णयावर राजकारण करू नये, असा सल्ला मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना दिला आहे. निर्यात शुल्काच्या या निर्णयावर पुनर्विचार करण्याची विनंती राज्य सरकारनं केंद्राला केली असल्याचं त्यांनी सांगितलं. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी बोलताना, काल दुपारपासून केंद्र सरकारकडून कांदा खरेदी सुरू झाल्याची माहिती दिली.

****

दरम्यान, नाफेडतर्फे कांदा खरेदी ही दिशाभूल असल्याचा आरोप, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. याऐवजी वाढवलेलं निर्यात शुल्क कमी करावं, असं त्यांनी म्हटलं आहे. तर, सरकारनं दिलेला दर पुरेसा नसून, दर वाढवून चार हजार रुपये प्रति क्विंटल करावा, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली आहे.

विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी कांदा निर्यात शुल्क रद्द करावं, अशी मागणी केली आहे. ते काल मुंबईत पत्रकारांशी बोलत होते. कांद्याला प्रति क्विंटल तीनशे पन्नास रुपये अनुदान देण्याचं सरकारनं विधिमंडळात मान्य केलं होतं, मात्र ते अजूनही मिळालेलं नाही, असं ते म्हणाले.

****

दरम्यान, कांदा निर्यात शुल्क वाढीच्या निषेधार्थ काल सलग दुसऱ्या दिवशी, नाशिक जिल्ह्यातल्या बहुतांश बाजार समित्यांमध्ये कांदा लिलाव बंद होते. नाशिकचे जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी काल कांदा व्यापारी संघटना पदाधिकारी आणि कांदा उत्पादक यांच्या प्रतिनिधींची बैठक घेतली. कांदा उत्पादकांच्या भावना शासनाला कळवू, असं आश्वासन त्यांनी दिल्यानंतरही, व्यापारी आपल्या भूमिकेवर ठाम आहेत.

लिलाव बंद ठेवणाऱ्या व्यापाऱ्यांना, त्यांचे परवाने रद्द का करू नयेत, अशा आशयाच्या नोटिसा सहकार खात्याकडून बजावण्यात येणार असल्याची माहिती, नाशिकचे सहकार उपनिबंधक फैय्याज मुलाणी यांनी दिली आहे. बाजार समित्यांमध्ये तीन दिवसांपेक्षा अधिक काळ कांदा लिलाव शेतकऱ्यांनी हेाऊ दिले नाही, तर पर्यायी कांदा खरेदीची व्यवस्था सुरू करण्याचे आदेश दिल्याचंही त्यांनी सांगितलं.

****

स्थानिक परिस्थितीनुसार धरणातला पाणीसाठा लक्षात घेऊन प्रत्येक जिल्हा प्रशासनानं पाण्याचं काटकसरीनं नियोजन करावं, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. राज्यात पावसानं ओढ दिली असून, संभाव्य परिस्थितीच्या उपाययोजनांसाठी, काल झालेल्या बैठकीत ते बोलत होते. राज्यभरातले विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी, दूरदृश्यप्रणालीच्या माध्यमातून या बैठकीत सहभागी झाले होते. जनावरांना चारा उपलब्ध व्हावा यासाठी जिल्हा नियोजन विकास समितीच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून देण्याचे निर्देश, मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. वन विभागानं गवताचा लिलाव न करता ते राखीव ठेवून त्याच्या पेंढ्या कराव्यात, अशा सूचना यावेळी देण्यात आल्या. राज्यात औरंगाबाद आणि लातूरसह नाशिक, पुणे, कोल्हापूर, तसंच अमरावती या विभागांमध्ये पाऊस झालेला नाही, या पार्श्वभूमीवर ही बैठक घेण्यात आली.

****

शालेय शिक्षण विभागातर्फे राबवण्यात येणार असलेल्या लेट्स चेंज म्हणजेच बदल घडवूया, या उपक्रमामध्ये, स्वच्छता मॉनिटर्स बनलेले विद्यार्थी स्वच्छतेच्या बाबतीत आमूलाग्र क्रांती घडवतील, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला आहे. नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत जागृती निर्माण व्हावी, या उद्देशानं लेट्स चेंज हा उपक्रम राबवण्यात येणार असून, यात ६४ हजार शाळांमधले ३८ लाख विद्यार्थी, स्वच्छता राखण्याबाबत नागरिकांची नकळत होणारी चूक दाखवून देणार आहेत. काल मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मुंबईत या उपक्रमाला प्रारंभ झाला.

****

देशात रस्ते अपघातात होणारे मृत्यू कमी करण्याची गरज असून, त्यादृष्टीनं रस्ते बांधणी आणि वाहननिर्मिती क्षेत्रात सुसंवाद प्रस्थापित होण्याची आवश्यकता, केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केली आहे. ते काल नवी दिल्लीत भारत नवीन मोटार मूल्यांकन उपक्रम - एन कॅपचं उद्घाटन करताना बोलत होते. भारत एनकॅप उपक्रमामुळे देशातल्या वाहनांमधली सुरक्षितता आणि गुणवत्ता वाढेल, तसंच सुरक्षित वाहनांच्या निर्मितीत निकोप स्पर्धा निर्माण होईल, असं गडकरी म्हणाले.

****

इंद्रधनुष्य, या राज्यस्तरीय आंतरविद्यापीठ युवक महोत्सवाचं यजमानपद, औरंगाबादच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाला मिळालं आहे. हे या महोत्सवाचं एकोणिसावं वर्ष आहे. येत्या पाच ते दहा नोव्हेंबरदरम्यान होणार असलेल्या या महोत्सवात, राज्यातल्या तीस विद्यापीठांतले सुमारे बाराशे कलाकार सहभागी होतील. या महोत्सवाचं यजमानपद मिळाल्याचा आनंद असून, अत्यंत नियोजनबद्ध आणि दिमाखदारपणे हा सोहळा करू, अशी प्रतिक्रिया कुलगुरु डॉक्टर प्रमोद येवले यांनी दिली आहे.

दरम्यान, विद्यापीठातर्फे देण्यात येणारा जीवन साधना पुरस्कार प्रख्यात अभिनेत्री, लोककलावंत मधु कांबीकर यांना आज प्रदान करण्यात येणार आहे. राज्याचे निवृत्त मुख्य सचिव जे पी डांगे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान सोहळा होणार आहे.

****


महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत बांबू लागवडीला चालना दिली असून, शेतकऱ्यांनी बांबू लागवडीसाठी पुढे यावं, असं आवाहन, राज्याचे रोजगार हमी योजना आणि फलोत्पादन मंत्री तथा औरंगाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री संदिपान भुमरे यांनी केलं आहे. काल औरंगाबाद इथं, ‘बांबू लागवड, या विषयावर झालेल्या चर्चासत्रात ते बोलत होते. बांबू लागवड समितीचे सदस्य पाशा पटेल, जिल्हाधिकारी अस्तिक कुमार पाण्डेय, यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत सध्या राज्यामध्ये, औरंगाबाद, लातूर आणि सातारा या तीन जिल्ह्याची बांबू लागवडीसाठीच्या पथदर्शी प्रकल्पात निवड झाली आहे. बांबू वृक्ष लागवड समितीचे सदस्य पाशा पटेल तसंच बांबू लागवड क्षेत्रातील तज्ज्ञ संजीव करपे यांनी यावेळी, बांबू लागवड, बाजारपेठ, उत्पादन, आणि उपयोग याबाबत सविस्तर मार्गदर्शन केलं.

****

उस्मानाबाद जिल्ह्यात पावसाने ओढ दिल्याने सर्व मंडळांमध्ये अग्रीम विम्यापोटी प्रती हेक्टरी किमान पाच हजार रुपये मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचं, आमदार राणा जगजीतसिंह पाटील यांनी सांगितलं आहे. काल एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे त्यांनी ही माहिती दिली. जिल्ह्यातल्या ११ महसूल मंडळांचा अहवाल देण्यासाठी समिती गठित करण्यात आली आहे. पावसाच्या २१ दिवसांपेक्षा अधिक खंडाच्या निकषानुसार यामध्ये आणखीन १३ मंडळाची भर पडली आहे. त्यामुळे आता जिल्ह्यातल्या २४ महसूल मंडळातले पंचनामे होऊन, शेतकऱ्यांना २५ टक्के अग्रीम रक्कम देण्यासंदर्भात पाठपुरावा करण्यात येईल, असं पाटील यांनी सांगितलं आहे.

****

अझरबैजान मधल्या बाकू इथं सुरु असलेल्या फिडे बुद्धिबळ विश्वचषक स्पर्धेत भारताचा ग्रँडमास्टर आर प्रज्ञानंद याने काल अंतिम फेरीतल्या पहिल्या क्लासिकल लढतीत नॉर्वेच्या मॅग्नस कार्लसन याला बरोबरीत रोखलं. आज या दोघांमध्ये क्लासिकलची दुसरी फेरी खेळली जरणार आहे.

****


डेन्मार्कमधल्या कोपनहेगन इथं सुरु असलेल्या जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय बॅडमिंटनपटू लक्ष्य सेन आणि एच एस प्रणॉय यांनी पुरुष एकेरीच्या उप -उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. महिला एकेरीच्या दुसऱ्या फेरीत भारताच्या पी व्ही सिंधूचं आव्हान मात्र संपुष्टात आलं आहे.

****

भारताच्या कनिष्ठ हॉकी पुरुष संघानं चार देशांच्या हॉकी स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं आहे. काल झालेल्या अंतिम सामन्यात भारतीय संघानं जर्मनीचा सहा - एक असा पराभव केला.

दरम्यान, या स्पर्धेत महिलांच्या गटात भारतीय कनिष्ठ महिला हॉकी संघानं तिसऱ्या सामन्यात स्पेनचा २-१ असा पराभव केला.

****

नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या हद्दीत काही व्यावसायिक वृक्षांचा वापर, खिळे ठोकून जाहिराती किंवा फलक लावण्यासाठी करत असल्याचं निदर्शनाला आलं आहे. वृक्षांना इजा आणि शहराचं विद्रुपीकरण करणारे हे प्रकार तात्काळ थांबवून, येत्या तीन दिवसात अशा जाहिराती आणि फलक काढून टाकावेत, अशी सूचना, महानगरपालिकेच्या उद्यान आयुक्तांनी केली आहे. या मुदतीनंतर असे प्रकार आढळून आल्यास संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

****

नांदेड जिल्ह्यातले ज्येष्ठ नेते विधान परिषदेचे माजी सदस्य किशनराव राठोड यांचं सोमवारी मध्यरात्री पुण्यात निधन झालं, ते ९३ वर्षांचे होते. गेल्या महिन्याभरापासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांच्या पार्थिव देहावर आज सकाळी मुखेड तालुक्यात कमळेवाडी इथं अंत्यसंस्कार होणार आहेत.

****

औरंगाबाद इथं रस्त्याच्या लगत सुरू असलेलं बांधकाम महापालिकेनं जमीनदोस्त केल्याच्या कारणावरुन एका महिलेनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर स्वत:ला पेटवून घेतलं. समिक्षा खंदारे असं या महिलेचं नाव असून, घाटी रुग्णालयात उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. सदर महिला मनोरुग्ण असल्याचं, सांगितलं जात आहे.

****

जालना तालुक्यातल्या इंदेवाडी इथल्या शिवाजी घुगे या तलाठ्याला १७ हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं अटक केली. तक्रारदाराच्या भूखंडांच्या फेरफार नोंदीसाठी त्यानं पंचवीस हजार रुपयांची लाच मागितली होती.

****

सोलापूर जिल्ह्यात लंपी साथरोगाच्या पार्श्वभूमीवर सर्व गायवर्गीय जनावरांचा बाजार सध्या बंद करण्यात आला आहे.जनावरांच्या एकत्रित वाहतूक करण्यावरही बंदी घालण्यात आली आहे. जिल्ह्यातल्या पशुपालकांनी आपल्या गोठ्याची स्वच्छता ठेवावी, आवश्यक त्या औषधाच्या फवारण्या कराव्यात असं आवाहनही प्रशासनानं केलं आहे.

****

लातूर इथं परवा पंचवीस ऑगस्टला जिल्हास्तरीय रानभाजी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. लोकांना रानभाज्यांचं महत्त्व पटवून देणं आणि या भाज्यांसाठी विपणन साखळी तयार करणं, या उद्देशानं हा महोत्सव आयोजित करण्यात येतो. लातूरच्या मुक्ताई मंगल कार्यालयात होणाऱ्या या महोत्सवात रानभाज्या आणि रानफळांचं आरोग्यासाठी महत्त्व आणि पाककृती याबद्दल माहिती देण्यात येणार आहे.

****

शासन आपल्या दारी अभियानांतर्गत परभणी इथं पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे. येत्या सत्तावीस तारखेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे. परभणीतल्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातल्या क्रीडा संकुल मैदानावर हा महारोजगार मेळावा होणार असून, जिल्ह्यातल्या इच्छुक उमेदवारांनी याचा लाभ घ्यावा, असं आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्तांनी केलं आहे.

****

 

No comments:

Post a Comment