Thursday, 24 August 2023

Text - आकाशवाणी औरंगाबाद, दिनांक : 24.08.2023 रोजीचे दुपारी : 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date: 24 August 2023

Time : 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक : २४ ऑगस्ट २०२ दुपारी १.०० वा.

****

चांद्रयान तीनचं चंद्राच्या पृष्ठभागावर यशस्वीरित्या अवतरण केल्या नंतर जागतिक नेत्यांनी भारताला शुभेच्छा दिल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचं आभार मानलं आहे. संयुक्त अरब अमिरातचे राष्ट्रपती शेख मोहम्मद बिन जायद अल नाह्यान, भूतानचे पंतप्रधान लोटे शेरिंग, युरोपीय संघाची अध्‍यक्षा उर्सुला वॅन देर लेयेन यांच्यासही बहुतांश जागतिक नेत्यांनी भारताच्या यशस्वी चांद्रयान तीन मोहीमेचा गौरव केला आहे.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्याचा आज तिसरा आणि अंतिम दिवस आहे. ते आज इराण, मोझांबिक आणि इथोपियाच्या नेत्यांशी द्विपक्षीय चर्चा करणार आहेत. 

****

नाशिक जिल्ह्यात बाजार समित्यांमध्ये व्यापाऱ्यांनी कांदा लिलाव आंदोलन मागं घेतल्यानंतर आजपासून पूर्ववत लिलाव सुरू झाले. मात्र कमी दर मिळाल्यामुळं पिंपळगाव  बसवंत, येवला, लासलगाव कळवण तालुक्यातल्या नाकोडा या बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांनी लिलाव बंद पाडले आहेत. कांदा निर्यात शुल्क चाळीस टक्के केल्यानं व्यापाऱ्यांनी सोमवारपासून बेमुदत कांदा लिलाव बंद केले होते. त्यावर नाशिक आणि अहमदनगर नगर इथं नाफेड मार्फत कांदा खरेदी करण्याचा निर्णय शासनानं घेतला. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्य मंत्री डॉ भारती पवार यांनी काल व्यापाऱ्यांची बैठक घेऊन मध्यस्थी केली होती. दरम्यान, धुळे इथं कांदा लिलाव सुरु असल्याच्या आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****


कृषी उत्पन्न बाजार समितीची कार्यकक्षा वाढवण्यासंदर्भात शासनस्तरावर निर्णय घेण्यात येईल, असं राज्याचे पणन आणि अल्पसंख्याक कल्याण मंत्री अब्दूल सत्तार यांनी म्हटलं आहे. त्यांनी वाशी इथल्या मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीला भेट दिली, त्यावेळी सत्तार बोलत होते. कृषी उत्पन्न बाजार समिती ही शेतकऱ्यांच्या बरोबरच व्यापारी, माथाडी यांच्यासाठीही महत्त्वाची संस्था असल्याचं त्यांनी यावेळी नमुद केलं.

****

मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतल्या ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव यांचं आज सकाळी मुंबईत दीर्घ आजारानं निधन झालं. त्या ८१ वर्षांच्या होत्या. जगाच्या पाठीवर, मोलकरीण, यंदा कर्तव्य आहे, सरस्वतीचंद्र, आनंद, ड्रीम गर्ल, सुवासिनी अशा हिंदी-मराठी चित्रपटांमधील त्यांच्या भूमिका विशेष गाजल्या. त्यांनी ऐंशी पेक्षा अधिक चित्रपटांत काम केलं. चित्रपट सृष्टीत अभिनयाच्या जोरावर आणि प्रेमळ स्वभावानं आदराचं स्थान पटकावणाऱ्या चतुरस्त्र अभिनेत्री सीमा देव यांचं निधन चटका लावून जाणारं आहे, अशा भावना व्यक्त करुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. त्यांच्या निधनानं मराठी, हिन्दी चित्रपटसृष्टीतल्या सुवर्णयुगाचा अंत झाला आहे, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. चित्रपटसृष्टीतला एक सोज्ज्वळ चेहरा हरपला असल्याची भावना व्यक्त करत मंत्री छगन भुजबळ यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. सीमा देव यांच्या निधनानं भारतीय चित्रपटसृष्टीची मोठी हानी झाली असल्याचं मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटलं आहे.

****

महाराष्ट्र विधानमंडळाच्या सदस्य आजपासून चार सप्टेंबर पर्यंत तीन युरोपीय देशांचा अभ्यास दौरा करत आहेत. या अभ्यासदौऱ्यात २२ सदस्य सहभागी झाले असून सहा अभ्यासभेटी, बैठका होणार आहेत. याचं नेतृत्व विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे करत आहेत. जर्मनीत फ्रॅंन्कफर्ट, नेदरलँडमधलं ॲमस्टरडॅम आणि युनायटेड किंग्डममधलं लंडन या शहरांना अभ्यासदौऱ्यात भेट दिली जाणार आहे. एकूण २२ सदस्यांमध्ये अकरा महिला सदस्यांचा या शिष्टमंडळात सहभाग आहे.

****

अझरबैजानमधल्या बाकू इथं झालेल्या आय एस एस एफ जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत, भारतीय नेमबाज अमनप्रीत सिंगनं पुरुषांच्या २५ मीटर स्टँडर्ड पिस्तूल नेमबाजी प्रकारात काल सुवर्णपदक जिंकलं. तर महिलांच्या २५ मीटर स्टँडर्ड पिस्तूल नेमबाजी प्रकारात, तियाना, यशिता शोकीन आणि कृतिका शर्मा यांनी सांघिक कांस्य पदक पटकावलं. या स्पर्धेत भारतानं आतापर्यंत एकूण नऊ पदकांची कमाई केली असून यात पाच सुवर्ण आणि चार कांस्यपदकांचा समावेश आहे.

****

बुद्धिबळ विश्वविजेतेपदासाठी भारताचा आर प्रज्ञानानंद आणि जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेल्या नॉर्वेच्या मॅग्नस कार्लसन दरम्यानचा टायब्रेकर सामना आज खेळवण्यात येणार आहे. अझरबैजानमध्ये बाकू इथं या स्पर्धेत काल प्रज्ञानानंद आणि कार्लसन यांच्यातला दुसरा सामना अनिर्णित संपला. 

****

कोल्हापूर इथं उद्या ऑगस्टला दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगांच्या दारी हे विशेष अभियान राबवण्यात येणार आहे. या शिबीरांतर्गत जिल्हा कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता मार्गदर्शन केंद्रामार्फत दिव्यांग उमेदवारांसाठी पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा होत आहे.

****

No comments:

Post a Comment