Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date : 25 August
2023
Time : 7.10
AM to 7.25 AM
Language
Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक : २५ ऑगस्ट २०२३
सकाळी
७.१० मि.
****
ठळक
बातम्या
·
कांद्याच्या प्रश्नावर राज्य सरकार
शेतकऱ्यांच्या पाठीशी असल्याची मुख्यमंत्र्यांची ग्वाही
·
व्यापाऱ्यांकडून भाव कमी मिळत असल्यानं, नाशिक जिल्ह्यात कांदा उत्पादकांची
निदर्शनं
·
आमदार अपात्रता प्रकरणी शिवसेनेच्या
शिंदे गटाचं सहा हजार पानी लेखी उत्तर सादर
·
६९ वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जाहीर;‘गोदावरी’ ‘एकदा काय झालं’ आणि ‘चंद सांसे’ चित्रपटांना विविध पुरस्कार
·
ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव यांच्या
पार्थिव देहावर मुंबईत अंत्यसंस्कार
·
पावसात सलग २१ दिवसांपेक्षा जास्त खंड
पडलेली महसूल मंडळे २५% अग्रीम विम्यासाठी पात्र
आणि
·
फिडे बुद्धिबळ विश्वचषक स्पर्धेत भारताचा
आर प्रज्ञानंद उपविजेता
सविस्तर
बातम्या
नाफेडच्या १३ खरेदी केंद्रांकडून
कांदा खरेदी सुरु असून, कांद्याच्या प्रश्नावर राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी
असल्याची ग्वाही, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. शेतकऱ्यांकडे
असलेला उपलब्ध कांदा पाहता नाफेडची कांदा खरेदी केंद्रं वाढवण्यासाठी, केंद्रीय कृषी मंत्री तसंच
केंद्रीय वाणिज्य मंत्री यांना विनंती करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. सध्या नाफेडकडून
५०० मेट्रिक टन कांदा खरेदी झाल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे.
****
राज्यातल्या कांदा उत्पादक
शेतकऱ्यांचं हित लक्षात घेऊन राज्य शासनाने केंद्र शासनाकडे निर्यात शुल्काबाबत पुनर्विचार
करण्याची मागणी केली असून, शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यास शासन कटिबद्ध आहे, असं पणन मंत्री अब्दुल सत्तार
यांनी म्हटलं आहे. पुणे इथं काल कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रतिनिधी, व्यापारी आणि कांदा उत्पादक
शेतकरी यांच्यासोबत झालेल्या बैठकीत ते बोलत होते. केंद्र सरकार बाजाराच्या दरापेक्षा
जादा दराने कांदा खरेदी करत असल्याचं सत्तार यांनी सांगितलं.
कांदा खरेदी केल्यानंतर प्रति
क्विंटल २ हजार ४१० रूपये शेतकऱ्यांच्या खात्यात थेट जमा केले जाणार असून, शेतकऱ्यांना नाफेडकडून वेळेवर
पैसे मिळावेत यासाठी प्रयत्न केले जातील, असं त्यांनी सांगितलं. नाफेडला ठरवून
दिलेल्या जिल्ह्यांव्यतिरिक्त इतर कांदा उत्पादन ठिकाणीही खरेदी केंद्रे उभारावी यासाठीही
प्रयत्न केले जातील, असं सत्तार म्हणाले.
****
नाशिक जिल्ह्यातल्या सर्व कृषी
उत्पन्न बाजार समित्यांमध्ये आजपासून नाफेड आणि एनसीसीएफ मार्फत कांदा खरेदी सुरू करण्याचे
आदेश जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी दिले आहेत. त्यामुळे पालकमंत्री दादा भुसे यांच्या
सूचनेनंतर त्यांनी हे आदेश दिले आहेत. या शिवाय ज्या शेतकरी उत्पादक कंपन्यांकडून
बाजार समिती आवारात कांदा खरेदी करणार नाही, त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असा इशारा जिल्हाधिकाऱ्यांनी
दिला आहे. एनसीसीएफ मार्फत दोन लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करण्यात येत असून, नाशिक जिल्ह्यात एकच केंद्र
पिंपळगाव बसवंत इथं सुरू करण्यात आलं आहे.
दरम्यान, जिल्ह्यात अनेक बाजार समित्यांमध्ये
व्यापाऱ्यांकडून कमी भाव मिळत असल्याच्या कारणावरून कालही शेतकऱ्यांनी कांदा लिलाव
बंद पाडत आंदोलन केलं.
नाफेडने खरेदी केंद्र सुरू
करावे अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
लासलगाव, पिंपळगाव बसवंत, सटाणा इथं लिलाव बंद, येवला आणि चांदवड इथं रास्तारोको
, तर कळवण इथं नाकोडा उपआवारात
प्रवेशद्वारावर ठिय्या आंदोलन करण्यात आलं. चांदवड इथं पोलिसांना वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी
आंदोलकांवर बळाचा वापर करावा लागला. सिन्नर इथं मात्र लिलाव सुरळीत होऊन कांद्याला
प्रतिक्विंटल जास्तीत जास्त २ हजार २९९ रुपये भाव मिळाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं
आहे.
****
दरम्यान, कांद्याच्या निर्यात शुल्का
संबंधी केंद्र सरकारनं घेतलेल्या निर्णयानंतर नाफेड आणि राष्ट्रीय सहकारी ग्राहक महासंघ
- एन सी सी एफ ला प्रत्येकी एक लाख मेट्रिक टन कांदा खरेदीचा आदेश केंद्र सरकारनं दिला
आहे. त्यानंतर नाशिक विभागातल्या एकूण १३ केंद्रांवर गेल्या दोन दिवसांत, एक हजार ३४० मेट्रीक टन कांदा
खरेदी केल्याची माहिती एन सी सी एफ चे अध्यक्ष विशाल सिंग यांनी दिली. ते काल नाशिक
इथं पत्रकार परिषदेत बोलत होते.
****
राज्यातल्या आमदार अपात्रता
प्रकरणी शिवसेना शिंदे गटाच्या १६ आमदारांनी आपलं सहा हजार पानी लेखी उत्तर, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर
यांच्याकडे सादर केलं आहे. या संदर्भात अधिक चर्चा न करता कायदेशीर आणि नियमानुसार
कारवाई केली जाईल, असं नार्वेकर यांनी म्हटलं आहे. गेल्या वर्षी शिवसेनेमध्ये
फूट पडून राज्यात शिंदे-फडणवीस यांचं सरकार स्थापन झालं. त्या विरोधात उद्धव ठाकरे
गटानं सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. एकनाथ शिंदे यांच्यासह १६ आमदारांना अपात्र
करावं, अशी ठाकरे गटाची याचिका होती, त्यावर निर्णय देताना न्यायालयानं, हे प्रकरण विधानसभा अध्यक्षांकडे
वर्ग केलं होतं. गेल्या महिन्यात विधानसभा अध्यक्षांनी ठाकरे आणि शिंदे गटाच्या सर्व
आमदारांना आपलं मत मांडण्यासाठी नोटीस बजावली होती.
****
सध्या राज्यात पावसाने ओढ दिली
असून, भविष्यातल्या पावसाची स्थिती
लक्षात घेता पाणीपुरवठा विभागाने टंचाईग्रस्त गावांमध्ये राबवण्यात येणाऱ्या सर्व योजनांचा
आढावा घेऊन प्रलंबित कामं अभियानस्तरावर सुरू करावीत, अशा सूचना पाणीपुरवठा आणि स्वच्छता
मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिल्या आहेत. ते काल यासंदर्भातल्या आढावा बैठकीत बोलत
होते. सध्या नाशिक, जळगाव, अहमदनगर,
पुणे, सातारा, सांगली, सोलापूर,
औरंगाबाद, जालना आणि बुलडाणा या दहा जिल्ह्यांमधल्या ३५० गावांत
आणि एक हजार ३१९ वाड्यांमध्ये ३६९ टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत आहे.
संभाव्य टंचाई कालावधीत पाण्याची
उपलब्धता होईल, असं योग्य नियोजन करावं, अशी सूचनाही पाटील यांनी संबंधित अधिकाऱ्यांना
यावेळी केली.
****
ग्रामीण भागातल्या जिल्हा परिषद
शाळांच्या इमारतींमध्ये मोकळ्या राहणाऱ्या वर्ग खोल्या अंगणवाडीच्या बालकांसाठी वापरण्याबाबत
धोरण तयार करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत. महिला आणि बाल
विकास विभागाच्या विविध प्रश्नांसंदर्भात उपमुख्यमंत्री पवार यांनी काल मंत्रालयात
बैठक घेतली. अंगणवाड्यांना स्व-मालकीच्या इमारती असण्याबरोबरच वीज, पाणी आदी पायाभूत सुविधा मिळाव्यात, या अनुषंगाने धोरण तयार करण्याची
सूचना पवार यांनी केली.
****
राज्यातल्या इतर मागास प्रवर्गाच्या
उद्योजकांकरता महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाच्या, ‘गट कर्ज व्याज परतावा योजने’च्या ऑनलाईन पोर्टलचं उद्घाटन, इतर मागास बहुजन कल्याण मंत्री
अतुल सावे यांच्या हस्ते काल मंत्रालयात करण्यात आलं. राज्यातल्या इतर मागास प्रवर्गातल्या
तरुण उद्योजकांनी स्वयंस्फूर्तीनं पुढं येऊन या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असं आवाहन सावे यांनी केलं.
वेळेत कर्जाचे हफ्ते भरल्यास जास्तीत जास्त १२ टक्के व्याज दराच्या, आणि १५ लाख रुपये इतक्या रक्कमेच्या
मर्यादेत व्याजाची रक्कम, गटाच्या आधार लिंक बँक खात्यात दरमहा महामंडळाद्वारे जमा
करण्यात येणार असल्याचं, सावे यांनी सांगितलं.
****
६९ व्या राष्ट्रीय चित्रपट
पुरस्कारांची काल घोषणा झाली. आर माधवन दिग्दर्शित ‘रॉकेट्री-द नंबी इफेक्ट’ या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट
चित्रपटाचं सुवर्णकमळ जाहीर झालं असून, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनाचा पुरस्कार निखिल महाजन यांना
‘गोदावरी’ या मराठी चित्रपटासाठी जाहीर
झाला आहे. डॉ. सलील कुलकर्णी दिग्दर्शित ‘एकदा काय झालं’ हा सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट
ठरला आहे.
सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार
अल्लू अर्जुन याला ‘पुष्पा द राईज’ या चित्रपटासाठी, तर सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा
पुरस्कार आलिया भट्ट हिला ‘गंगूबाई काठियावाडी’साठी, आणि क्रिती सेनॉन हिला ‘मिमी’ या चित्रपटासाठी विभागून जाहीर
झाला आहे.
नॉन फिचर फिल्म प्रकारात ‘एक था गाव’ सर्वोत्कृष्ठ चित्रपट ठरला
आहे. पल्लवी जोशी यांना ‘काश्मीर फाईल्स’ या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक
अभिनेत्रीचा तर ‘मिमी’ चित्रपटासाठी पंकज त्रिपाठी यांना सर्वोत्कृष्ट सहाय्यक
अभिनेत्याचा पुरस्कार जाहीर झाला आहे. लोकप्रिय चित्रपटाचा पुरस्कार ‘आरआरआर’ या चित्रपटानं पटकावला आहे.
‘द काश्मीर फाइल्स’ चित्रपटाला राष्ट्रीय एकात्मतेवरील
सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठी नर्गिस दत्त पुरस्कार जाहीर झाला आहे.
पर्यटन, निर्यात, हातमाग आणि उद्योगाचा प्रचार
करणाऱ्या चित्रपट विभागात हेमंत वर्मा दिग्दर्शित ‘वारली आर्ट’
हा चित्रपट
सर्वोत्कृष्ठ ठरला आहे.
प्रतिमा जोशी यांच्या ‘चंद सांसे’ या चित्रपटला कौटुंबिक मूल्य
जपणाऱ्या चित्रपटाचा पुरस्कार जाहीर झाला आहे.
****
ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव
यांचं काल मुंबईत दीर्घ आजारानं निधन झालं, त्या ८१ वर्षांच्या होत्या. १९५७
सालच्या "आलिया भोगासी" या मराठी चित्रपटाद्वारे, सीमा देव यांनी चित्रपटक्षेत्रात
पदार्पण केलं होतं, २०१० साली प्रदर्शित झालेल्या जेता
या चित्रपटापर्यंत हिंदी तसंच मराठी चित्रपटातून विविध भूमिका साकारल्या. सरस्वतीचंद्र, कोशीश, कश्मकश, कोरा कागज, सुनहरा संसार, नसीब अपना अपना, संसार, यासह जगाच्या पाठीवर, मोलकरीण, सुवासिनी, जानकी, या मराठी चित्रपटांतून त्यांनी
साकारलेल्या भूमिकांचं विशेष कौतुक झालं.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी
त्यांना श्रद्धांजली अर्पण करताना, अभिनयाच्या जोरावर आणि प्रेमळ स्वभावानं आदराचं स्थान पटकावणाऱ्या
चतुरस्त्र अभिनेत्री सीमा देव यांचं निधन चटका लावून जाणारं आहे, अशा भावना व्यक्त केल्या.
सीमा देव यांच्या पार्थिव देहावर
काल सायंकाळी मुंबईत अंत्यसंस्कार करण्यात आले.
****
मनमाड ते नांदगाव हा तिसरा
रेल्वेमार्ग विद्युतीकरणासह यशस्वीपणे सुरू केल्याची घोषणा मध्य रेल्वेनं केली आहे.
१८३ किलोमीटरच्या भुसावळ ते मनमाड रेल्वेमार्गातला हा एक महत्वाचा टप्पा आहे.
****
उस्मानाबाद जिल्ह्यात ज्या
महसूल मंडळामध्ये सलग २१ दिवसांपेक्षा जास्त दिवस पावसात खंड पडला आहे, ती महसूल मंडळे प्रधानमंत्री
पीक विमा योजनेच्या तरतुदीनुसार २५ टक्के अग्रीम मिळण्यास पात्र असल्याची माहिती, जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओम्बासे
यांनी दिली आहे. याअंतर्गत शेतकऱ्यांना २५ टक्के अग्रीम मिळण्याबाबत पुढील कार्यवाही
करण्याकरता जिल्हास्तरीय समितीने आदेश दिले आहेत. कृषी विभागाचे अधिकारी आणि विमा कंपनीच्या
प्रतिनिधीमार्फत एकूण पेरणी क्षेत्राच्या पाच टक्के क्षेत्राचं सर्वेक्षण करण्याचे
काम सुरु आहे. या समितीचा अहवाल प्राप्त होताच अधिसुचना काढण्यात करण्यात येईल, असं जिल्हाधिकार्यांनी सांगितलं.
****
बदली झाल्याबद्दल विना परवानगी
मिरवणूक काढल्याबद्दल जालना इथल्या महावितरणच्या ग्रामीण उपविभाग तीन अंतर्गत कार्यरत
सहायक अभियंता प्रकाश चव्हाण यांना निलंबित करण्यात आलं आहे. अवघ्या तीन महिन्यात रत्नागिरीहून
पुन्हा जालन्यात बदली झाल्यामुळे त्यांच्या समर्थकांनी डिजे लावून फटाके वाजवत मिरवणूक
काढली होती. जमाबंदी आदेशाचं उल्लंघन, तसंच विनापरवाना डिजे वाजवल्याप्रकरणी त्यांच्याविरोधात
गुन्हे नोंदवण्यात आले होते. महावितरणच्या अधीक्षक अभियंत्यांनी या प्रकरणी गंभीर दखल
घेत सहायक अभियंता प्रकाश चव्हाण यांच्या निलंबनाचे आदेश काढले आहेत.
****
अझरबैजान मधल्या बाकू इथं झालेल्या
फिडे बुद्धिबळ विश्वचषक स्पर्धेत भारताच्या आर प्रज्ञानंदला उपविजेतेपदावर समाधान मानावं
लागलं. काल झालेल्या अंतिम फेरीच्या निर्णायक लढतीत, जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर
असलेल्या नॉर्वेच्या मॅग्नस कार्लसनं प्रज्ञानंदचा चुरशीच्या लढतीत १-० असा पराभव
केला. काल झालेल्या टायब्रेकरमध्ये प्रज्ञानानंदला पहिला सामना गमावावा लागला. त्यानं
दुसऱ्या सामन्यात बरोबरी साधली मात्र पहिला सामना
गमावल्यामुळे त्याचा पराभव झाला.
****
वेळेत निवडणुका न घेतल्याबद्दल
भारतीय कुस्ती महासंघाला, युनायटेड वर्ल्ड रेसलिंग, या जागतिक कुस्ती संघटनेनं निलंबित
केलं आहे. त्यामुळे येत्या १६ सप्टेंबरपासून सुरु होणाऱ्या ऑलिंपिक पात्रता जागतिक
स्पर्धेत भारतीय कुस्तीपटूंना तटस्थ खेळाडू म्हणून भाग घ्यावा लागेल. भारतीय ऑलिंपिक
संघटनेनं २७ एप्रिलला तदर्थ समिती नेमली होती. या समितीनं ४५ दिवसात निवडणुका घेणं
अपेक्षित होतं, मात्र ही कालमर्यादा या समितीला पाळता आली नसल्यानं ही
कारवाई करण्यात आली आहे.
****
‘बालविवाह मुक्त नांदेड’साठी तयार आराखड्याची प्रभावीपणे
अंमलबजावणी अत्यंत आवश्यक असल्याचं, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी म्हटलं आहे. या संदर्भात
नांदेड इथं आयोजित कार्यशाळेत ते काल बोलत होते. या अभियानासाठी सर्व विभागांनी नियुक्त
केलेले प्रतिनिधी गावपातळीवर जबाबदारीनं काम करतील आणि त्यांच्या माध्यमातूनच आपण ‘बालविवाह मुक्त नांदेड’ अशी ओळख निर्माण करू, असा विश्वासही राऊत यांनी व्यक्त
केला.
****
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब
ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गास जोडणाऱ्या जालना-नांदेड द्रुतगती महामार्गाचं
भूसंपादन झालं असून, गंगाखेड उपविभागांतर्गत येणाऱ्या परभणी जिल्ह्यात पूर्णा
तालुक्यातील पाच शेतक-यांना काल मावेजा वाटप करण्यात आला. या शेतकऱ्यांना जिल्हाधिकारी
रघुनाथ गावडे यांच्या हस्ते १ कोटी ६३ लाख ९९ हजार ५६८ रुपयांचा मोबदला देण्यात आला.
****
उस्मानाबाद जिल्ह्यातल्या भूविकास
बँकेच्या सर्व थकीत कर्जदार शेतकरी सभासदांचं संपूर्ण कर्ज माफ झालं असून, शेतकऱ्यांनी सातबारा उताऱ्यावरच्या
भूविकास बँकेच्या कर्जाचा बोजा कमी करुन घ्यावा, असं आवाहन, बँकेचे अवसायक सुनील शिरापूरकर
यांनी केलं आहे. जिल्ह्यातल्या भूविकास बँकेच्या संपूर्ण दोन हजार ब्याऐंशी कर्जदार
शेतकऱ्यांचं, ६२ कोटी २८ लाख ९७ रुपये कर्ज माफ झालं आहे.
****
वीज ग्राहकांना दर्जेदार, गुणवत्तापूर्ण आणि ग्राहकाभिमुख
सेवा देण्यासाठी महावितरण वीजजोडण्यांचे अर्ज झटपट निकाली काढत असून, प्रलंबित वीज जोडण्या देण्यात
औरंगाबाद परिमंडळात वेग आला आहे. या परिमंडळात दोन महिन्यांत सुमारे साडेतेरा हजार
घरगुती ग्राहकांना वीज जोडणी देण्यात आल्याचं मंडळानं सांगितलं आहे.
****
“दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगाच्या
दारी” या उपक्रमांअंतर्गत
नांदेड जिल्ह्यात दिव्यांगांच्या विविध संघटनांना सोबत घेऊन ग्रामपंचायत पातळीपर्यंत
परिपूर्ण सर्वेक्षणासाठी नियोजन केलं आहे. जिल्ह्यातला कोणताही दिव्यांग व्यक्ती सर्वेक्षणापासून
वंचित राहू नये यादृष्टीनं ग्रामीण भागात सर्वेक्षणाचे अर्ज आणि मार्गदर्शक उपलब्ध
करून दिले आहेत. या सर्वेक्षणात जिल्ह्यातील सर्व दिव्यांगानी भाग घेऊन शासनाला सहकार्य
करावं असं आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केलं आहे.
****
No comments:
Post a Comment