Saturday, 2 September 2023

TEXT - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 02.09.2023 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजताचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 02 September 2023

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – ०२ सप्टेंबर २०२३ सायंकाळी ६.१०

****

·      भारताच्या सौर मोहिमेतल्या आदित्य एल वन या उपग्रहाचं यशस्वी प्रक्षेपण.

·      जालना लाठीमाराच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं जनतेला शांततेचं आवाहन तर खासदार शरद पवार यांच्याकडून घटनेच्या न्यायालयीन चौकशीची मागणी.

·      जालना बंदला आजही हिंसक वळण; घटनेचे अनेक ठिकाणी पडसाद.

आणि

·      आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत भारत पाकिस्तान सामन्याला प्रारंभ.

****

भारताच्या सौर मोहिमेतल्या आदित्य एल वन या उपग्रहाचं आज यशस्वी प्रक्षेपण झालं. आंध्रप्रदेशच्या श्रीहरिकोटा इथल्या सतीश धवन अंतराळ केंद्रातून पीएसएलव्ही सी सत्तावन या प्रक्षेपकाद्वारे, आदित्य एल वन हा उपग्रह अवकाशात झेपावला.

पृथ्वीपासून पंधरा लाख किलोमीटर अंतरावर, सूर्य आणि पृथ्वीच्या मध्ये लँग्रेंज बिंदूवर हा उपग्रह स्थिर केला जाणार असून, या बिंदूपर्यंत पोहोचायला या उपग्रहाला सुमारे चार महिन्यांचा कालावधी लागणार आहे. आदित्य एल वन मध्ये सात पेलोड्स बसवण्यात आले आहेत. यामधले चार पेलोड्स हे थेट सूर्याचा अभ्यास करणार आहेत, तर उर्वरित तीन पेलोड्स हे वातावरणाचा अभ्यास करतील.

आदित्य एल वन उपग्रहाच्या यशस्वी प्रक्षेपणाबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्रो चे शास्त्रज्ञ आणि अभियंत्यांचं अभिनंदन केलं आहे. आदित्य एल वन चं यशस्वी प्रक्षेपण ही भारताच्या अंतराळ कार्यक्रमाला एक नवी दिशा प्रदान करणारं ऐतिहासिक यश असल्याचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी म्हटलं आहे. अंतराळ आणि खगोलीय घटनांना विस्तृतपणे समजण्यात आदित्य एल वनची मदत होईल असं राष्ट्रपती म्हणाल्या.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या शुभेच्छा संदेशात मानवाच्या कल्याणासाठी ब्रम्हांडाला जाणून घेण्याकरिता भारताचे प्रयत्न अथक सुरु राहतील असं म्हटलं आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी इस्रोच्या शास्त्रज्ञांना शुभेच्छा देताना, भारताने अवकाश संशोधनाच्या इतिहासात सुवर्णअक्षरांत नोंद करून ठेवावी, अशी कामगिरी केली असल्याचं म्हटलं आहे. या मोहीमेमध्ये पुण्यातील 'आयुका' संस्थेचा उपग्रहावरील संशोधन उपकरण निर्मितीत सक्रिय सहभाग असणं, अभिमानास्पद असल्याचा उल्लेखही मुख्यमंत्र्यांनी केला आहे.

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही आदित्य एल वन च्या यशस्वी प्रक्षेपणाबद्दल इस्रोच्या शास्त्रज्ञांचं अभिनंदन केलं आहे.

****

जालना इथं काल झालेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील जाळपोळीच्या, हिंसाचाराच्या घटनांबद्दल चिंता व्यक्त केली असून ह्या घटना थांबवण्यासाठी सहकार्य करण्याचं आवाहन मराठा आंदोलक नेत्यांना तसंच कार्यकर्त्यांना केलं आहे. राज्यातील नागरिकांनीही शांतता पाळून कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी शासनाला सहकार्य करावं, असं आवाहनही अजित पवार यांनी केलं आहे. पोलिसांकडून झालेला लाठीमार, हवेतील गोळीबार, बळाच्या गैरवापरासंबंधी उच्चस्तरीय चौकशीचे आणि दोषी पोलिसांवर कठोर कारवाईचे निर्देश देण्यात आले आहेत. मराठा समाजाच्या नेत्यांसोबत चर्चा करुन या प्रश्नी तोडगा काढण्याची राज्य सरकारची तयारी आहे असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे.

****

मराठा समाजाच्या विषयावर कुणीही पोळी भाजण्याचा प्रयत्न करू नये, असं  आवाहन भाजपचे विधान परिषद गटनेते आमदार प्रविण दरेकर यांनी म्हटलं आहे. जालना इथं काल झालेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर आज आमदार प्रविण दरेकर यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन, स्वतः मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री या सर्व गोष्टींवर बारीक लक्ष ठेवून आहेत. त्यामुळे याचं कुणीही राजकारण करू नये, असं म्हटलं आहे.

****

जालन्यात काल झालेल्या लाठीमाराचं समर्थन कोणी करणार नाही, हा लाठीमार अधिकाऱ्यांच्या सूचनेवरून झाला असेल तर त्यांच्यावर सरकार कारवाई करेल, या संपूर्ण घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे निर्देश गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. आमदार नितेश राणे यांनी आज कणकवलीत पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. मराठा समाजाचे आजवर ५८ मोर्चे शांतपणे निघाले आहेत. निर्दोष मराठा समाज आंदोलकांवर गुन्हे दाखल करू नका अशी मागणी आमदार राणे यांनी यावेळी केली.

****

या प्रकरणी फक्त उच्चस्तरीय चौकशी नव्हे तर न्यायालयीन चौकशी करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी केली आहे. जालना इथं कालच्या घटनेत जखमी झालेल्यांची तसंच आंदोलकांची पवार यांनी आज भेट घेतली, त्यानंतर ते पत्रकार परिषदेत बोलत होते. लाठीहल्ल्याचे आदेश पोलीसांना नेमके कुणी दिले याची देखील सखोल चौकशी करण्यात यावी असं पवार यांनी म्हटलं आहे.

 

केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, जालन्याचे पालकमंत्री अतुल सावे, आमदार नारायण कुचे, आदींनी देखील आज अंबड उपजिल्हा रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस केली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही जालन्यातल्या लाठीमाराचा निषेध केला असून जखमींची भेट घेण्यासाठी आपण जालन्याला जात असल्याचं म्हटलं आहे.

येत्या ८ सप्टेंबरला राज्य सरकारचा 'शासन आपल्या दारी'हा कार्यक्रम जालना जिल्ह्यात नियोजित आहे. सराटी अंतरवाली इथल्या मराठा आरक्षणाच्या आंदोलनाचा आपल्या कार्यक्रमावर विपरित परिणाम होऊ नये, यासाठी हे आंदोलन दाबण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी केला आहे. मराठा आंदोलनावरील लाठीमार प्रकरणी  प्रतिक्रिया देताना मुंबईत आज ते बोलत होते.

****

दरम्यान, जालना शहरातल्या अंबड चौफुलीवर सुरु असलेल्या आंदोलनाला पुन्हा हिंसक वळण लागलं. मराठा आंदोलकांनी आक्रमक होत वाहनांवर दगडफेक केली. एक खाजगी ट्रक जाळण्यात आला. पोलिसांनी आंदोलकांना पांगवण्यासाठी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडत प्लास्टिकच्या गोळ्यांचाही वापर केला. जालना शहरात सर्वत्र  बंदोबस्त वाढवण्यात आला असून, तणावपूर्ण शांतता आहे. दगडफेकीत काही पोलीस कर्मचारी किरकोळ जखमी झाले आहेत. काही आंदोलक तरुणांना पोलीसांनी ताब्यात घेतलं आहे. जालना जिल्हा बंदला आज उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

दरम्यान आंदोलकांनी शांततेच्या मार्गाने आंदोलन करावं, कायदा हातात घेऊ नये असं आवाहन पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी केलं आहे.

****

मराठवाड्यात इतरत्रही या घटनेचे पडसाद उमटले. हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ इथं वने, सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवारा यांना मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकारी आणि मराठा समाज बाधवांच्या वतीनं घोषणाबाजी करत घेराव घालण्यात आला. भाजपाच्या आढावा बैठकीनिमित्त मंत्री सुधीर मुनगंटीवार औंढा इथे आले होते. लाठीमाराची घटना निंदनिय असून, त्याचा  निषेध नोंदवत असल्याचं मंत्री मुनगंटीवार म्हणाले. या घटनेची सखोल चौकशी करून कारवाई केली जाईल, असं आश्वासन त्यांनी यावेळी दिलं.

 

औरंगाबाद इथं मराठा समाजाच्या वतीनं शहरात अनेक ठिकाणी निदर्शनं करण्यात आली. शहरात काही भागात बंदही पाळण्यात आला. नागरीकांनी अफवांवर किंवा सामाजिक माध्यमांवरच्या चुकीच्या पोस्ट वर विश्वास ठेऊ नये, असं आवाहन औरंगाबादचे पोलिस आयुक्त मनोज लोहिया यांनी केलं आहे.

 

उस्मानाबाद इथं काही दुकानांवर दगडफेक झाल्याचं वृत्त आहे. जिल्हा पोलीस अधिक्षकांनी आंदोलकांना कोणतीही हानी होऊ नये, अशी काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे. आंदोलकांनी शांतता राखण्याचं आवाहन पोलिस अधिक्षक अतुल कुलकर्णी यांनी केलं आहे. राज्य परिवहन महामंडळाने उस्मानाबाद जिल्ह्यात संपूर्ण बस सेवा आज बंद ठेवली होती.

 

****

आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत आज श्रीलंकेत पल्लेकेले इथं भारत आणि पाकिस्तान संघात सामना सुरू आहे. भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली मात्र, कर्णधार रोहित शर्मा, शुभमन गिल, विराट कोहली आणि श्रेयस अय्यर हे आघाडीचे चारही फलंदाज समाधानकारक कामगिरी करू शकले नाहीत. रोहित ११, शुभमन दहा, विराट चार तर श्रेयस १४ धावांवर तंबूत परतले. अखेरचं वृत्त हाती आलं तेव्हा ईशान किशन ५० तर हार्दिक पांड्या ३७ धावांवर खेळत होते.

****

सनद अर्थात डिग्री आणि अस्थायी प्रमाणपत्रांवर आधार क्रमांक छापण्याची परवानगी नसल्याचं विद्यापीठ अनुदान आयोग युजीसी ने स्पष्ट केलं आहे. विश्वविद्यालयांमार्फत विद्यार्थ्यांना जारी करण्यात येणाऱ्या सनद आणि प्रमाणपत्रांवर संबंधित विद्यार्थ्यांचा संपूर्ण आधार क्रमांक छापण्यासंदर्भात युजीसी विचार करत असल्यासंदर्भात माध्यमांमध्ये येत असलेल्या बातम्यांसंदर्भात युजीसीने हे स्पष्टीकरण दिलं आहे. भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण च्या नियमांचं कठोर पालन करण्याच्या सूचनाही युजीसी ने विश्वविद्यालयांना दिल्या आहेत.

****

हिंगोलीतल्या सेनगाव तहसील कार्यालयाच्या प्रांगणात उभं असलेलं प्रशासकीय वाहन आग लागून खाक झालं. सेनगाव अग्निशामक दल आणि पोलीस कर्मचाऱ्यांच्या मदतीने विझवण्यात आली.  तहसील आवारात असलेल्या शासकीय धान्य गोदामालाही अचानक आग लागली, पोलीस आणि अग्निशमन दलाचं पथक आग विझवण्यासाठी प्रयत्न करत आहेत.

****

मराठवाडा मुक्तिसंग्रामात अठरा पगड जातीच्या लोकांसह स्त्रियांचं प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष लक्षणीय योगदान होतं, असं डॉक्टर प्रभाकर देव यांनी म्हटलं आहे. मराठवाडा मुक्तिसंग्राम अमृत महोत्सवी वर्षानिमित्त नांदेड जिल्ह्यातल्या उमरी इथं देव यांचं विशेष व्याख्यान झालं, त्यावेळी ते बोलत होते. मुक्तीसंग्राम लढ्याचा हा इतिहास पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्याची आवश्यकता देव यांनी व्यक्त केली.

इतिहासाचा हा अनमोल ठेवा इतरांपर्यंत पोहोचावा या उद्देशाने नांदेड जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात कार्यक्रम आयोजित करत असल्याचं जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी यावेळी सांगितलं.

****

No comments:

Post a Comment