Saturday, 2 September 2023

Text - आकाशवाणी औरंगाबाद, दिनांक: 02.09.2023, रोजीचे सकाळी: 11.00, वाजताचे मराठी संक्षिप्त बातमीपत्र

 आकाशवाणी औरंगाबाद

संक्षिप्त बातमीपत्र

०२ सप्टेंबर २०२ सकाळी ११.०० वाजता

****

सूर्याचा अभ्यास करण्यासाठी भारताची पहिली सौर मोहिम-आदित्य एल १ सज्ज झाली आहे. हा उपग्रह आज सकाळी ११ वाजून ५० मिनिटांनी आंध्रप्रदेशच्या श्रीहरिकोटा इथल्या सतीश धवन अंतराळ केंद्रातून पीएसएलव्ही सी सत्तावन या प्रक्षेपकाद्वारे, प्रक्षेपित केला जाईल. या मोहिमेतून सूर्याचं वातावरण, पर्यावरण आणि संबंधित बाबींचा अभ्यास केला जाईल.

****

जालना जिल्ह्यातली बस सेवा आज सकाळपासून बंद असल्याची माहिती आमच्या वार्ताहरानं दिली आहे. अंबड तालुक्यातल्या आंतरवाली सराटी इथं मराठा आरक्षण आणि अन्य मागण्यांसाठी सुरू असलेल्या आंदोलनाला, काल हिंसक वळण लागलं. मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्जच्या निषेधार्थ मराठा क्रांती मोर्चानं आज जालना जिल्हा बंदची हाक दिली असून, जालना शहरातल्या अंबड चौफुली आणि चंदनझिरा पोलीस टी पॉईंट इथं रास्ता रोको आंदोलनास सुरुवात झाली आहे.

या घटनेच्या निषेधार्थ औरंगाबाद इथं निदर्शनं करण्यात आली. शहरात काही भागात बंदही पाळण्यात येत आहे.

अहमदनगर जिल्ह्याच्या अकोले तालुक्यातल्या नागरिकांनी या घटनेचा निषेध केला असून, सर्वपक्षीय बंद ठेवण्यात आला आहे.

****

जेट एअरवेज कंपनीचे संस्थापक नरेश गोयल यांना सक्तवसुली संचालनालय - ईडीनं कॅनरा बँकेशी संबंधित ५३८ कोटी रुपयांच्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात अटक केली आहे. मुंबईत ईडी कार्यालयात दीर्घकाळ चौकशी केल्यानंतर त्यांना ताब्यात घेण्यात आलं.

****

दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगांच्या दारी, या उपक्रमाच्या माध्यमातून राज्यातल्या विविध भागातल्या दिव्यांगांपर्यंत पोहोचून त्यांच्या समस्या, अडचणी जाणून घेऊन त्यातून एक सर्वसमावेशक दिव्यांग धोरण तयार करण्यात येईल, असं या अभियानाचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी म्हटलं आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून काल ठाणे जिल्ह्यात लाभ वाटप कार्यक्रम झाला, त्यावेळी ते बोलत होते.

****

औरंगाबाद जिल्ह्यात पैठण इथल्या जायकवाडी धरणाच्या डाव्या कालव्यातून काल ४०० घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाणी सोडण्यात आलं. औरंगाबाद, जालना, परभणी जिल्ह्यातल्या हजारो हेक्टर क्षेत्राला या पाण्याचा लाभ होणार आहे.

****

राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद अर्थात एनसीईआरटी ला अभिमत विद्यापीठाचा दर्जा देण्याची घोषणा शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी केली. लवकरच बाल भवन एनसीईआरटी मध्ये विलीन केलं जाईल, असंही त्यांनी सांगितलं.

****

No comments:

Post a Comment