Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date: 20 September 2023
Time: 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक : २० सप्टेंबर
२०२३ दुपारी १.०० वा.
****
लोकसभा तसंच विधानसभेत महिलांना ३३ टक्के आरक्षण देणार्या नारी शक्ती वंदन
विधेयकावर आज लोकसभेत चर्चा सुरु झाली. विधेयक सादर करताना केंद्रीय विधी आणि न्याय
मंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी, पुढच्या १५ वर्षांसाठी हे विधेयक लागू असेल, असं सांगितलं. महिला सशक्तिकरणाच्या दिशेनं हे एक महत्वाचं पाऊल असल्याचं ते
म्हणाले.
काँग्रेसच्या खासदार सोनिया गांधी यांनी या चर्चेत सहभागी होत, नारी
शक्ती वंदन विधेयकाला काँग्रेस पक्षाचं समर्थन असल्याचं सांगितलं. हे विधेयक तत्काळ
अंमलात आणावं, मात्र यासोबतच जातनिहाय जनगणना करुन इतर मागासवर्ग आणि अनुसूचित जातीच्या महिलांना
संधी द्यावी, अशी मागणी गांधी यांनी केली.
द्रविड मुनेत्र कळघमच्या कनिमोझी यांनी यावेळी बोलताना, या विधेयकाची
१५ वर्षांची मर्यादा काढून टाकण्याची मागणी केली. महिलांना समान हक्क, समान
संधी पाहिजे असल्याचं त्या म्हणाल्या.
भाजपचे निशिकांत दुबे, तृणमूल काँग्रेसच्या काकोली घोष, वायएसआर काँग्रेस पक्षाच्या गीता वांगा, संयुक्त जनता दलाचे राजीव रंजन सिंग, बीजेडीच्या राजश्री मलिक यांनी या चर्चेत सहभाग घेतला होता.
****
राज्यसभेत आज कामकाजाला प्रारंभ होताच चांद्रयान तीन मोहिम आणि आदित्य एल वन
या सौर मोहिमेची प्रशंसा करत यामध्ये सहभागी असलेल्या वैज्ञानिकांचं अभिनंदन करण्यात
आलं. पोस्ट ऑफिस विधेयक २०२३ वर देखील आज राज्यसभेत चर्चा करण्यात येणार आहे.
****
राज्याच्या आरोग्य विभागाअंतर्गत गट
'क'
आणि गट 'ड' संवर्गातल्या विविध पदांच्या भरतीसाठी अर्ज सादर करण्यास येत्या २२ तारखेपर्यंत
मुदतवाढ देण्यात आली आहे. हे अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख १८ सप्टेंबर होती, मात्र
दुर्गम भागातल्या आणि इतर उमेदवारांना ऑनलाईन अर्ज सादर करण्यास अडचणी निर्माण होत
असल्याचं निदर्शनास आल्यानं आरोग्य विभागानं ही मुदतवाढ दिली आहे.
****
नाशिक जिल्ह्यातल्या कांदा व्यापारी संघटनेनं आज विविध कारणांसाठी लिलाव बंद
आंदोलन सुरू केलं आहे. त्यामुळे जिल्ह्यातल्या १७ बाजार समित्यांमध्ये कांदा लिलावाची
प्रक्रिया ठप्प झाली आहे. केंद्र शासनाने निर्यात शुल्क वाढवून ४० टक्के केल्यानंतर
व्यापाऱ्यांनी आंदोलन केलं होतं. त्यानंतर शेतकऱ्यांची नाराजी दूर करण्यासाठी सरकारने
राष्ट्रीय कृषी आणि सहकारी विपणन संस्था - नाफेड आणि राष्ट्रीय सहकारी ग्राहक संस्था
- एनसीसीएफ मार्फत कांदा खरेदी सुरू केली आहे. मात्र, हा कांदा देशांतर्गत बाजारपेठेत विकला जात असल्यामुळे व्यापाऱ्यांनी खरेदी
केलेल्या कांद्याला कमी भाव मिळतो, त्यामुळे कांदा व्यापाऱ्यांनी आजपासून लिलाव बंद आंदोलन सुरू केल्याची माहिती, नाशिक
जिल्हा कांदा उत्पादक संघटनेचे अध्यक्ष खंडू देवरे यांनी दिली. दरम्यान, पणन मंत्री
अब्दुल सत्तार यांनी
आज व्यापाऱ्यांच्या प्रतिनिधी मंडळाला मुंबईत चर्चेसाठी बोलावलं आहे.
****
दीड दिवसांच्या गणपतींचं आज विसर्जन होत आहे. विशेषत: कोकणात आणि मुंबईत मोठ्या
प्रमाणात दीड दिवसांचा गणोशोत्सव साजरा करण्यात येतो.
****
पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा करून ध्वनी, जल आणि वायू प्रदूषण न करण्याचं आवाहन, नांदेड जिल्हा परिषदेच्या जिल्हा पाणी आणि स्वच्छता मिशनच्या वतीने करण्यात
आलं आहे. जिल्ह्यात स्वच्छता ही सेवा उपक्रमांतर्गत
कचरा मुक्त भारत हे अभियान सुरु असून, या अभियानांतर्गत गाव स्तरावर स्वच्छता मोहीम, ओला आणि सुका कचरा विलगीकरण, प्लास्टिक कचरा संकलन, गाव उघड्यावर शौचापासून मुक्त करण्यासंदर्भात जनजागृती आदी उपक्रम गणेश मंडळांनी
राबवावे, असं आवाहन उप मुख्य कार्यकारी अधिकारी नारायण मिसाळ यांनी केलं आहे.
****
अहमदनगर जिल्ह्यात चोंडी इथं सुरू असलेल्या यशवंत सेनेच्या कार्यकर्त्यांच्या
उपोषणाची दखल घ्यावी, आणि धनगर समाजाला तात्काळ आरक्षण द्यावं, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीनं केली आहे. वंचित बहुजन आघाडीचे उत्तर महाराष्ट्र
उपाध्यक्ष संतोष गलांडे यांच्यासह पक्षाच्या शिष्टमंडळानं काल अहमदनगरचे निवासी उपजिल्हाधिकारी
राजेंद्रकुमार पाटील यांना या मागणीचं निवेदन दिलं.
****
केंद्र शासनाच्या आरोग्य व्यवस्थापन आणि माहिती यंत्रणा या पोर्टलवर विविध
जिल्ह्यांमध्ये आरोग्य विभागाकडून देण्यात येत असलेल्या सेवांबाबतच्या निर्देशांकात
गडचिरोली जिल्ह्यानं राज्यात पहिला क्रमांक पटकावला आहे. या पोर्टलवर शहरी आणि ग्रामीण
भागात देण्यात येत असलेल्या ६३ प्रकारच्या सेवांबाबतची माहिती दर महिन्याला अद्ययावत
केली जाते. गर्भवतींची नोंदणी, त्यांची रक्तचाचणी, प्रसूती, औषधोपचार, गर्भनिरोधक साधनांचा वापर, बालकांचं लसीकरण, किशोरवयीन मुलींना आरोग्य शिक्षण, इत्यादी सेवांचा त्यात समावेश आहे.
****
हवामान
येत्या दोन दिवसात, कोकणात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं
वर्तवली आहे.
****
No comments:
Post a Comment