Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date: 22 September
2023
Time: 7.10
AM to 7.25 AM
Language
Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक: २२ सप्टेंबर २०२३
सकाळी
७.१० मि.
****
ठळक
बातम्या
· महिला
आरक्षण विधेयक राज्यसभेत एकमताने मंजूर;संसदेचं कामकाज अनिश्चित काळासाठी तहकूब
· धनगर
आरक्षणासंदर्भात निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली समिती-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
· ज्येष्ठा-कनिष्ठा
गौरींचं घरोघरी उत्साहात स्वागत-आज गौरीपूजनाचा सोहळा
आणि
· अनेक
दिवसांच्या खंडानंतर मराठवाड्यात बहुतांश ठिकाणी जोरदार पाऊस
सविस्तर
बातम्या
महिला आरक्षणासाठी १२८ सा वी
घटना दुरुस्ती सुचवणारं नारी शक्ती वंदन विधेयक राज्यसभेत काल एकमताने मंजूर झालं.
काल दिवसभर चर्चा झाल्यानंतर रात्री अकरा वाजेच्या सुमारास डिजिटल यंत्रणेवर मतदान
घेण्यात आलं. मतदानावेळी सदनात उपस्थित सर्व २१४ सदस्यांनी विधेयकाच्या समर्थनात मतदान
केलं. लोकसभेत हे विधेयक परवा मंजूर झालं होतं. या विधेयकानुसार लोकसभा तसंच राज्यांच्या
विधानसभांमध्ये महिलांना ३३ टक्के आरक्षण दिलं मिळणार आहे. संसदेत मंजूर झालेल्या या
विधेयकाचं राष्ट्रपतींची संमती मिळाल्यानंतर नारी शक्ती वंदना अधिनियमात रुपांतर होणार
आहे. या विधेयकाला सर्वांची सहमती मिळाल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समाधान
व्यक्त केलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हा महिलांसाठी गौरवाचा क्षण असल्याचं म्हटलं
आहे.
दरम्यान, लोकसभेत काल चांद्रयान ३ च्या यशस्वी
कामगिरीवर चर्चा झाली. त्यानंतर संसदेचं कामकाज अनिश्चित काळासाठी तहकूब करण्यात आलं.
****
धनगर आरक्षणाबाबत शासन सकारात्मक
असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. काल मुंबईत धनगर समाजाच्या शिष्टमंडळासोबत
झालेल्या बैठकीनंतर मुख्यमंत्री माध्यमांशी बोलत होते. आमदार गोपीचंद पडळकर यावेळी
उपस्थित होते. इतर राज्यांनी याबाबत घेतलेल्या निर्णयांचा अभ्यास करण्यात येणार असल्याचं
मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. धनगर आरक्षणासंदर्भात निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली
समिती स्थापन करण्याचे तसंच आरक्षणाचा निर्णय होईपर्यंत आदिवासी समाजाला मिळणारे लाभ
धनगर समाजालाही लागू करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. या
बैठकीत झालेल्या चर्चेबाबत माहिती देताना मुख्यमंत्री म्हणाले..
Byte…
हा
विषय धनगर समाजाच्या आरक्षणाचा आहे, त्यामध्ये रिटायर्ड जस्टीस, रिटायर्ड
न्यायमुर्ती यांच्या अध्यक्षतेखाली आवश्यकतेनुसार एक कमिटी गठीत करण्याची सूचना आली, त्यावर देखील सरकारने निर्णय घेतला. त्यामध्ये धनगर समाजाचा एक प्रतिनिधी घेण्याचा
निर्णय देखील झालेला आहे. त्याच बरोबर आंदोलना दरम्यान ज्या पोलिस केसेस झाल्या, त्या मागे घेण्याबाबत देखील मागणी झाली. त्याच्यावर देखील सरकार सकारात्मक आहे.
त्या योजना, जे लाभ आदिवासी समाजाला देय
आहेत,
मिळत आहेत, ते
लाभ सर्वच्या सर्व धनगर समाजाला मिळाले पाहिजे. आणि त्याच्यावर देखील आम्ही अधिकाऱ्यांना
निर्देश दिलेले आहेत.
****
तुरुंगात शिक्षा भोगत असलेल्या
गर्भवती महिलांकडे विशेष लक्ष पुरवण्याची शिफारस संसदीय समितीनं केली आहे. सर्वोच्च
न्यायालयाच्या एका निकालाच्या अनुषंगानं ही शिफारस करण्यात आली आहे. महिला कैद्यांच्या
अपत्यांना वयाच्या बाराव्या वर्षापर्यंत आईबरोबर राहण्याची परवानगी द्यावी, अशी शिफारसही समितीनं केली आहे.
****
रेल्वे अपघातानंतर दिल्या जाणाऱ्या
आर्थिक मदतीत रेल्वेनं दहा पटीनं वाढ केली आहे. रेल्वे अपघातात मृत्यू झाल्यास आता
पाच लाख रुपये तर जखमींना अडीच लाख रुपये मदत देण्यात येणार आहे. किरकोळ जखमींना आता
पाच हजारांऐवजी ५० हजार रुपये मोबदला मिळेल. प्रवाशांचा रुग्णालयात उपचाराचा खर्चही
रेल्वे उचलणार आहे. मानवरहित रेल्वे फाटकावर झालेले अपघात, रेल्वेच्या वीजवाहक तारांचा स्पर्श
होऊन मृत्यूमुखी पडलेल्यांना कोणतीही अनुग्रह रक्कम दिली जाणार नाही, असं रेल्वे मंडळानं स्पष्ट केलं आहे.
****
छत्रपती संभाजी नगर आणि लातूर
इथल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि अतिविशेषोपचार रुग्णालयांचं व्यवस्थापन शासकीय
आणि खाजगी भागीदारी तत्वावर होणार आहे. याद्वारे रुग्णांना शासकीय दरामध्ये उपचार मिळणार
आहेत. यासाठी रुग्णालयांमध्ये ५० टक्क्यांपेक्षा जास्त खाटा महात्मा फुले जनआरोग्य
आणि आयुष्मान भारत योजनेतील लाभार्थींसाठी राखीव ठेवण्यात येणार आहेत. वैद्यकीय शिक्षण
आणि विशेष सहाय्य मंत्री हसन मुश्रीफ यांनी ही माहिती दिली. या दवाखान्याजवळच अत्याधुनिक
निदान केंद्रं,
तसंच पॅथॉलॉजी
लॅब भागीदारी तत्वावर सुरू करण्यास शासनानं मान्यता दिली आहे.
****
बदलीच्या आदेशांचं पालन न करणाऱ्या
११ अधिकाऱ्यांना राज्य सरकारच्या महसूल विभागानं निलंबित केलं आहे. यात चार उपजिल्हाधिकारी
आणि सात तहसीलदारांचा समावेश आहे. हे अधिकारी बदली रद्द करण्यासाठी मंत्रालयात फेऱ्या
मारत होते. त्यामुळे शेतकऱ्यांना आणि आपत्तीग्रस्त नागरिकांना मदत मिळण्यात अडथळे येत
असल्यानं, ही कारवाई करण्यात आली.
****
डेक्कन ओडिसी रेल्वेच्या दुसऱ्या
टप्प्यातल्या सेवेला कालपासून प्रारंभ झाला. मुंबईत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस
इथं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि पर्यटन मंत्री गिरीश महाजन यांच्याहस्ते या
रेल्वेला हिरवा झेंडा दाखवण्यात आला. अत्याधुनिक सोयीसुविधांनी युक्त असलेल्या या रेल्वेच्या
सहलींमध्ये महाराष्ट्र व्यतिरिक्त देशातल्या अन्य राज्यांमधल्या पर्यटन स्थळांचाही
समावेश करण्यात आला आहे.
****
तीन दिवसांच्या महालक्ष्मी
अर्थात ज्येष्ठा कनिष्ठा गौरींच्या उत्सवाला कालपासून सर्वत्र प्रारंभ झाला. आज ज्येष्ठा
गौरी पूजनाची तयारी घरोघरी सुरू झाली आहे. गौरी पूजनासाठी निरनिराळी फळं, भाज्या, तसंच हार फुलं घेण्यासाठी बाजारपेठांमधून
नागरिकांची गर्दी दिसून येत आहे. उद्या गौरींचं विसर्जन होणार आहे.
****
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात
येत्या गुरुवारपर्यंत डिजे वापरास मनाई करण्याचे आदेश जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय
यांनी जारी केले आहेत. शांतता विभाग म्हणून घोषित करण्यात आलेल्या रुग्णालय, शैक्षणिक संस्था, न्यायालयं,
धार्मिक
स्थळांच्या परिसरात नियमापेक्षा अधिक पातळीचा आवाज होऊ देऊ नये, असं या बाबतच्या आदेशात म्हटलं आहे.
****
जालना जिल्ह्यातल्या बदनापूर
इथल्या मोसंबी संशोधन केंद्रात लागवड करण्यात आलेल्या मोसंबी आणि लिंबूवर्गीय वाणांचा
संग्रह भविष्यात शेतकरी आणि एकूणच देशसाठी हिताचा ठरेल, असा विश्वास ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. सुरेंद्र मलिक यांनी
व्यक्त केला आहे. ते काल बदनापूर इथं मोसंबी संशोधन केंद्रात बोलत होते. या पिकावर
संशोधन करणाऱ्या संशोधकांसाठी हा संग्रह लाभदायक ठरेल, असं केंद्रप्रमुख शास्रज्ञ डॉ. संजय पाटील यांनी यावेळी
सांगितलं.
****
जळगांव जिल्हयातल्या चाळीसगाव
तालुक्याच्या ब्राह्मणशेवगे गावातले संशोधक प्रकाश सुनील पवार यांच्या कृषी संबंधित
संशोधनाला पेटंट मिळालं आहे. या कार्यासाठी त्यांना २० वर्षांसाठी बौध्दिक संपदा अधिकारही
प्राप्त झाले आहेत. पाण्याशिवाय दोन महिने पिके तग धरू शकतील, या त्यांच्या संशोधनाचा शेतकऱ्यांना
मोठा फायदा होणार असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
मराठवाड्याच्या अनेक भागात
काल जोरदार पाऊस झाला. छत्रपती संभाजीनगर शहर परिसरात सायंकाळनंतर पावसाच्या जोरदार
सरी कोसळल्या. जालना जिल्ह्यात भोकरदन,
घनसावंगी, केदारखेडा, गोंदी, हसनाबाद आणि सुखापूरी तालुक्यात मोठा
पाऊस झाला. बीड जिल्ह्याच्या किल्लेधारुर, आष्टी, अंबाजोगाईसह अनेक भागात पावसानं
जोरदार हजेरी लावली. हिंगोली जिल्ह्याच्या अनेक तालुक्यातही काल पाऊस झाला. धाराशिव
शहर आणि परिसरातही काल रात्री पाऊस झाल्यानं नागरिकांना दिलासा मिळाला. अनेक दिवसांच्या
खंडानंतर झालेल्या पावसामुळे दुष्काळ सदृश्य परिस्थितीत थोडाफार बदल होण्याची शक्यता
आहे.
दरम्यान,धाराशिव जिल्ह्यातल्या एकूण
२०६ जलप्रकल्पांमध्ये केवळ १० टक्के जिवंत पाणीसाठा उपलब्ध आहे. पाणीटंचाईची शक्यता
लक्षात घेता जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओम्बासे यांनी सर्व प्रकल्पातील पाणी हे केवळ पिण्याच्या
वापराकरीता आरक्षित करण्याचे निर्देश दिले आहेत.
****
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवांतर्गत
काल नांदेड इथं 'मेरी माटी मेरा देश' अंतर्गत कलश यात्रा काढण्यात आली.
महापालिका आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे यांच्या प्रमुख उपस्थितीत यात्रेची सुरुवात
झाली.
****
बीड इथं काल इतर मागास प्रवर्ग
ओबीसी समाज बांधवांनी आपल्या मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला.
ओबीसींच्या आरक्षणात इतर जातींचा समावेश करू नये यासह इतर मागण्यांचं निवेदन आंदोलकांनी
जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केलं.
****
No comments:
Post a Comment