Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date: 23 September 2023
Time: 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक : २३ सप्टेंबर
२०२३ दुपारी १.०० वा.
****
विदर्भातील नागपूर, भंडारा आणि गोंदिया या तीन जिल्ह्यांत काल मध्यरात्रीनंतर विजांच्या कडकडाटासह
मुसळधार पाऊस झाला. नागपूर शहरात काल रात्री अवघ्या ४ तासांत १०० मिलीमीटर पेक्षा अधिक
पाऊस झाल्यानं जनजीवन विस्कळीत झालं आहे. शहरातल्या अंबाझरी तलावाची पाणीपातळी वाढल्यामुळे
काही भागात पाणी शिरून पूरस्थिती निर्माण झाली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
यांनी स्थिती नियंत्रणात आणण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या असून, सखल भागात
अडकलेल्या नागरिकांना मदत करण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती निवारण दल आणि राज्य आपत्ती
निवारण दलाचे दोन चमू तैनात करण्यात आले आहेत. शहरातल्या सर्व शाळांना आज सुटी जाहीर
केल्याचं जिल्हाधिकारी डॉक्टर विपीन इटनकर यांनी सांगितलं आहे. महापालिकेतर्फे तत्काळ
मदतीसाठी हेल्पलाईन नंबर जारी करण्यात आल्याचं आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांनी जारी
केलेल्या पत्रकात म्हटलं आहे.
भंडारा व गोंदिया जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात शेती पाण्याखाली गेली असून, अनेक
रस्ते पाणी साचून बंद झाले आहेत. वैनगंगा नदी धोक्याच्या पातळीवरून वाहत असल्यामुळे
गोसीखुर्द धरणाचे सर्व ३३ दरवाजे उघडण्यात आले आहेत.
****
दरम्यान, नाशिक शहरात दोन दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू आहे. गंगापूर धरणाच्या पाणलोट
क्षेत्रात मुसळधार पाऊस झाल्यानं कालपासून तीन टप्प्यांमध्ये विसर्ग वाढवण्यात आला
आहे. काल रात्री गोदावरी पात्रात सहा हजार ७५२ क्युसेक इतका विसर्ग वाढवण्यात आल्याचं
वृत्त आहे.
****
गोव्याची राजधानी पणजी इथल्या अग्वादा किल्ल्यात आज भारतातल्या पहिल्या दीपगृह
महोत्सवाला सुरुवात होत आहे. केंद्रीय बंदरे, जहाजबांधणी, जलमार्ग आणि आयुष मंत्री सर्वानंद सोनवाल यांच्या हस्ते महोत्सवाचं उद्घाटन
होणार असून, हा महोत्सव तीन दिवस चालणार आहे. समुद्रकिनाऱ्यावरील दीपगृहं पर्यटकांच्या
आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरावीत आणि स्थानिकांना उत्पन्नाचा स्रोत निर्माण व्हावा, हा या
महोत्सवाचा उद्देश आहे.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या रविवारी आकाशवाणीवरून प्रसारित होणाऱ्या ‘मन की
बात’ या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. या मासिक कार्यक्रमाचा हा
१०५ वा भाग असून, आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यावरून उद्या सकाळी ११ वाजता हा कार्यक्रम
प्रसारीत होईल. आकाशवाणीचं संकेतस्थळ तसंच न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ॲपवरून हा कार्यक्रम
ऐकता येईल.
****
'नदीष्ट' या कादंबरीला
राष्ट्रीय सन्मान मिळाल्याच्या निमित्तानं मराठवाडा साहित्य परिषदेच्या वतीनं या कादंबरीचे
लेखक मनोज बोरगावकर यांचा सत्कार करण्यात येणार आहे. उद्या संध्याकाळी साडे पाच वाजता
मसापच्या सभागृहात परिषदेचे अध्यक्ष प्राचार्य कौतिकराव ठाले पाटील यांच्या हस्ते बोरगावकरांचा
सन्मान केला जाणार आहे. यावेळी कवी श्रीधर नांदेडकर हे बोरगावकरांच्या साहित्यावर भाष्य
करणार असल्याचं मसापतर्फे कळवण्यात आलं आहे.
****
महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त आयोजित स्वच्छता ही सेवा या मोहिमेत उद्या
नांदेड जिल्ह्यात स्वच्छता रन हा उपक्रम घेतला जाणार आहे. पंचायत समिती आणि जिल्ह्यातल्या
मोठ्या ग्रामपंचायतींमध्ये हा उपक्रम राबवण्याचं आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य
कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी केलं आहे. या उपक्रमात तालुका स्तरावरील सर्व
शासकीय अधिकारी, कर्मचारी, लोकप्रतिनिधी, शिक्षक, विद्यार्थी, महिला बचतगटांनी सहभाग घ्यावा, असं आवाहन त्यांनी केलं आहे.
****
चंबळ खोऱ्यातल्या डाकू पानसिंह तोमर आणि दहशतवादी गाजीबाबा यांना चकमकीत ठार
करणारे आयपीएस अधिकारी विजय रमण यांचं आज पुण्यात निधन झाले. ते ७२ वर्षांचे होते.
रमण हे भारतीय पोलिस सेवेतल्या अधिकाऱ्यांच्या १९७५ च्या तुकडीतील अधिकारी होते. मध्य
प्रदेशातल्या भिंड जिल्ह्यात पोलिस अधीक्षक असताना त्यांनी १९८१ मध्ये तोमर विरुद्ध
२४ तास चाललेल्या चकमकीचं नेतृत्व केलं होतं . रमण
यांचा अनेक दहशतवादविरोधी आणि नक्षलविरोधी अभियानात सहभाग होता.
****
चीनमध्ये सुरू असलेल्या होंगझाऊ आशियाई क्रीडा स्पर्धेत १३ वर्षांच्या विश्रांतीनंतर
बुद्धीबळ स्पर्धेला उद्या सुरुवात होत आहे. ही लढत दोन वेळच्या नियंत्रणांमध्ये पुरुष
आणि महिलांकरिता चार पदकांसाठी असेल. यंदाच्या बुद्धीबळ विश्वचषकामध्ये उपविजेता ठरलेल्या
रमेशबाबू प्रज्ञानंद याच्या कामगिरीवर सर्वांचं लक्ष असणार आहे.
****
No comments:
Post a Comment