Monday, 2 October 2023

Text - आकाशवाणी औरंगाबाद, दिनांक: 02.10.2023 रोजीचे दुपारी: 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date: 02 October 2023

Time: 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक : ०२ ऑक्टोबर २०२ दुपारी १.०० वा.

****

राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त त्यांना देशभरातून अभिवादन करण्यात येत आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनखड, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दिल्लीत राजघाटावर राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना आणि विजय घाटावर लालबहादूर शास्त्री यांना श्रद्धांजली वाहिली.

तत्पूर्वी, महात्मा गांधींची कालातीत शिकवण आपला मार्ग उजळत राहाते, तर आव्हानात्मक काळात शास्त्रीजींचं नेतृत्व अनुकरणीय असल्याचं पंतप्रधानांनी टविट संदेशात म्हटलं आहे.

छत्रपती संभाजीनगर इथं निमित्ताने केंद्रीय संचार ब्युरोच्या वतीनं महात्मा गांधी यांच्या जीवन प्रवासावर आधारित चित्रप्रदर्शन भरवण्यात आलं आहे.

महात्मा गांधी आणि लालबहाद्दूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त यवतमाळ मध्ये शांती सलोखा सदभावना रॅली काढण्यात आली. सावित्री ज्योतिराव फुले समाजकार्य महाविद्यालयातून निघालेल्या या रॅलीत सहभागी विद्यार्थ्यांनी 'मजबुती का नाम, महात्मा गांधी' अशा घोषणा दिल्या. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून रॅलीचा समारोप झाला.

गोंदिया जिल्ह्यातल्या भजेपार गावातल्या पर्यावरण दूत युवकांनी ३० किलोमीटर सायकल वारी करून गांधीजींना अभिवादन केलं.

****

आयुष्मान भव मोहिमेअंतर्गत आतापर्यंत ५० हजाराहून अधिक नागरीकांनी अवयवदानाची शपथ घेतली असल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी सांगितलं आहे. आज सामाजिक माध्यमावर दिलेल्या संदेशात त्यांनी, नागरीकांना अवयवदानाची शपथ घेण्याचं आवाहन केलं आहे.

****

येत्या तीन ते चार वर्षांत जगातलं आघाडीचं मोटार उत्पादन केंद्र बनण्याचं भारताचं उद्दिष्ट असल्याचं, केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे. चेक रिपब्लिकची राजधानी प्राग इथं, भारतीय समुदायाशी संवाद साधताना ते काल बोलत होते. गेल्या नऊ वर्षांत ऑटोमोबाईल उद्योगाचा आकार साडेचार लाख कोटी रुपयांवरून साडेबारा लाख कोटी रुपयांपर्यंत वाढला असून, या उद्योगामुळे देशातल्या साडेचार कोटी तरुणांना रोजगार मिळाल्याचं गडकरी यांनी सांगितलं.

****

चीनमध्ये सुरु असलेल्या आशियाई क्रिडा स्पर्धेत आज पुरुषांच्या स्पीड स्केटिंग तीन हजार मीटर रिले शर्यतीत आणि रोलर स्केटिंग मध्ये भारतानं कांस्य पदकं जिंकली.

आज भारताच्या महिला कबड्डी संघाचा सामना चीन शी होणार आहे. टेबल टेनिस मध्ये महिला दुहेरीत उपांत्य फेरीत सुतीर्थ मुखर्जी आणि अहिका मुखर्जी यांचा सामना उत्तर कोरियाच्या खेळाडूंशी होणार आहे. अमलान बोरगोहेन, पुरुषांच्या २०० मीटरमध्ये आणि भारतीय मिश्रित चार बाय ४०० मीटर स्पर्धेत धावणार आहे.

दरम्यान, या स्पर्धेत काल बीडच्या अविनाश साबळेनं तीन हजार मीटर स्टीपलचेस स्पर्धा प्रकारात सुवर्ण पदकावर आपलं नाव कोरलं. बीड जिल्ह्यात सर्व स्तरातून त्यांचं अभिनंदन केलं जात आहे. अविनाशचे वडील मुकुंद साबळे आणि आई वैशाली साबळे यांनी या शब्दात आपला आनंद व्यक्त केला,

काल जी स्पर्धा झाली, त्या स्पर्धेमध्ये सुवर्णपदक त्याने मिळवल्यामुळे मला मोठा भरपूर आनंद वाटतो. आपल्या मुलाने अविनाशने देशात एकदम नाव उंचावले. अविनाशने भरपूर कष्ट करुन या देशामध्ये नाव उंचावले, म्हणून खूप आनंद वाटतोय. भारताला सुवर्णपदक मिळवून दिलंय त्यानी, त्याचा सगळ्यांना आनंद आहे.

****

मनोज जरांगे पाटील यांच्या सुरु असलेल्या मराठा आरक्षण आंदोलनाच्या समर्थनार्थ बीड जिल्ह्यात आज मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं लाक्षणिक आंदोलन सुरू करण्यात आलं आहे. प्रत्येक गावात, तालुक्याच्या ठिकाणी तहसील तसंच जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे आंदोलन केलं जात आहे.

****

प्राथमिक शिक्षकांना देण्यात येणार्या अशैक्षणिक कामांच्या विरोधात महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघातर्फे आज छत्रपती संभाजीनगर इथं महाआक्रोश मोर्चा काढण्यात येत आहे. क्रांती चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा मोर्चा जाणार आहे.

****

बीड इथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनात काल ज्येष्ठ नागरिक दिन साजरा करण्यात आला. यानिमित्त सहायक आयुक्त समाज कल्याण कार्यालयामार्फत कार्यशाळा तसंच ज्येष्ठ नागरिकांची जिल्हा रुग्णालयाच्या वतीनं मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. ज्येष्ठ नागरिक सेवा संघ या सामाजिक संस्थेला प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आलं.

****

बुलढाणा तालुक्यात नांदुरा ते मलकापूर रस्त्याच्या लगत झोपडीत झोपलेल्या मजुरांना एका भरधाव आयशर ट्रकने चिरडल्याची घटना आज पहाटे घडली. यात पाच जणांचा मृत्यू झाला, तर दोन जण जखमी झाले. चिखलदरा तालुक्यातल्या मोरगाव इथले दहा मजूर रोजगाराच्या शोधात भटकंती करत नांदुरा इथं सुरू असलेल्या रस्त्याच्या कामात रुजू झाले होते.

****

चंद्रपूरच्या प्रसिद्ध ताडोबा - अंधारी व्याघ्र प्रकल्पात नव्या पर्यटन हंगामाला कालपासून सुरुवात झाली. गेले तीन महिने पावसाळ्यामुळे व्याघ्र प्रकल्पात पर्यटन बंद ठेवण्यात आलं होतं. प्रकल्प व्यवस्थापनाने आता ऑनलाईन नोंदणी देखील सुरू केली आहे.

****

No comments:

Post a Comment