▼

Monday, 23 October 2023

Text - आकाशवाणी औरंगाबाद, दिनांक: 23.10.2023 रोजीचे दुपारी: 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date: 23 October 2023

Time: 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक : २३ ऑक्टोबर २०२३ दुपारी १.०० वा.

****

मिजोरम इथं एकाच टप्प्यातील तर छत्‍तीसगडमध्ये पहिल्या टप्प्यासाठी होत असलेल्या विधानसभा  निवडणुकीचे उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत आज संपत आहे. या निवडणूक प्रभागांमध्ये उमेदवारी अर्जांची छाननी प्रक्रिया पूर्ण झाली आहे. मिझोरमच्या सर्व ४० जागांसाठी तर छत्तीसगडच्या ९० पैकी २० जागांसाठी येत्या ७ नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. मध्य प्रदेशातल्या एकाच टप्प्यासाठीच्या आणि छत्तीसगडच्या दुसऱ्या टप्प्यातील निवडणुकीसाठी येत्या ३० तारखेपर्यंत उमेदवारी अर्ज सादर करता येणार आहेत. मध्‍य प्रदेशच्या सर्व २३० जागांसाठी तर छत्तीसगडच्या ७० जागांसाठी येत्या १७ नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे.

****

भारतीय नौसेना १९ ते २७ फेब्रुवारी २०२४ दरम्यान विशाखापट्टणम इथं फ्लॅगशिप कार्यक्रम - मिलन ट्वेन्टी फोर या परिषदेचं अध्यक्षपद  भूषवणार आहे. या हार्बर चरण मिलनमध्ये जहाजं, सामुद्रिक गस्ती विमानं, आणि पाणबुड्यांचा समावेश असेल. जी २० देशांच्या परिषदेचं अध्यक्षपद भूषविलेल्या भारतासोबत या मिलन परिषदेमुळे पन्नासहून अधिक देशांदरम्यान आतापर्यंतचे सर्वात मोठे सामंजस्य करार होण्याची शक्यता आहे.

****

शारदीय नवरात्रोत्सवा निमित्त बीड शहराचं ग्रामदैवत असलेल्या श्री तुळजाभवानी खासबाग देवी मंदिरात आज पहाटे साडेचार वाजता महानवमी निमित्त मंदिर संस्थानच्या पदाधिकाऱ्यांनी महाअभिषेक पूजा केली. उद्या विजयादशमीच्या सीमोल्लंघनासाठी भाविकांची होणारी संभाव्य मोठी गर्दी लक्षात घेऊन संस्थानच्या वतीनं चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. दरम्यान, २८ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या कोजागिरी पौर्णिमेला छबिना पालखी मिरवणूक काढण्यात येणार असल्याचं संस्थानच्या वतीनं सांगण्यात आलं आहे.

****

मराठा आरक्षणाच्या मुद्यावर ठाम असलेल्या मनोज जरांगे पाटील यांनी मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षण द्यायलाच हवे, या आपल्या घोषणेचा पुनरुच्चार केला आहे. सरकारला जरांगे यांनी दिलेली मुदत उद्या संपत आहे. यानंतर कोणतीही मुदत न देता जरांगे यांनी पुन्हा आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. २८ ऑक्टोबरपासून गावागावात साखळी उपोषणही केले जाणार आहे. त्यासोबतच नेत्यांना गावबंदी करण्याची तयारी या आंदोलकांनी केली आहे. सरकारला दिलेली मुदत संपल्यावर कोणत्याही वाटाघाटी केल्या जाणार नाहीत, असंही स्पष्ट करण्यात आलं आहे.

****

मराठा आरक्षणाच्या मुद्यावरुन जरांगे पाटील यांनी राज्यभरात आंदोलन सुरू केलेलं असताना दुसरीकडे मराठा क्रांती मोर्चाने आज पत्रकार परिषद घेऊन आम्हाला घटनात्मक पद्धतीने हिंदू मराठा म्हणूनच आरक्षण मिळाले पाहिजे असे म्हटले आहे. केवळ कुणबी मराठा प्रमाणपत्र देऊन तात्पुरती मलमपट्टी करू नका, असा इशाराही या पत्रकार परिषदेत देण्यात आला आहे. हिंदू मराठा म्हणून आणि ५० टक्क्यांच्या आतच आरक्षण मिळायला हवं, अशी भूमिका मराठा क्रांती मोर्चाने घेतली आहे. मराठा क्रांती मोर्चाच्या या भूमिकेनंतर आरक्षणाच्या मुद्यावर आता दोन वेगवेगळे गट तयार होत असल्याचे दिसून येत आहे.

****

बीड पोलीस अधिक्षकांच्या विशेष महिला पथकानं काल बीड ग्रामीण हद्दीत विना परवाना वाळूने भरलेले ३ हायवा ट्रक जप्त केले. या ट्रकमधून वाळूची अवैध वाहतूक होत असल्याची माहिती समजल्यानंतर पथकानं ही कारवाई केली. या कारवाईत १८ ब्रास अवैध वाळू सह एकूण ५० लाख रुपयांचा माल जप्त करण्यात आला. या प्रकरणी गुन्ह्यांची नोंदही करण्यात आली आहे.

****

चीनमध्ये सुरू असलेल्या चौथ्या पॅरा एशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी दहा पदके जिंकून आपलं विजयी अभियान धडाक्यात सुरू केलं आहे. दहा पदकांमध्ये चार सुवर्ण, तीन रौप्य तर तीन कांस्य पदकांचा समावेश आहे. टी - फोर्टी सेवन उंच उडी स्पर्धेत भारताच्या निशादकुमारनं सुवर्णपदक पटकावलं. पुरुषांच्या टी - सिक्टी थ्री उंच उडी स्पर्धेची तीनही पदकं भारतीय खेळांडूंनी जिंकली आहेत. यात शैलेश कुमारनं सुवर्ण, मरियप्पन थंगवेलूनं रजत आणि रामसिंह पढियार यानं कांस्य पदक पटकावलं. भारताच्या मोनू घंघास याला शॉट पूट स्पर्धेत रौप्य पदक मिळालं. पुरुषांच्या क्लब थ्रो स्पर्धेत भारतानं दोन पदके पटकावली आहे. यात प्रणव सूरमानं सुवर्ण तर धर्मवीर आणि अमीत सिरोहा यांनी रौप्य  पदक प्राप्त केलं आहे.

****

No comments:

Post a Comment