Thursday, 2 November 2023

Text - आकाशवाणी औरंगाबाद, दिनांक: 02.11.2023, रोजीचे दुपारी: 01.00, वाजताचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date: 02 November 2023

Time 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक : ०२ नोव्हेंबर २०२ दुपारी १.०० वा.

****

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सर्वपक्षीय आंदोलक आमदारांनी आज तिसऱ्या दिवशी मुंबईत आंदोलन केलं. मंत्रालयासमोर आंदोलक आमदारांना यावेळी पोलिसांनी ताब्यात घेतलं. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आज बीड शहरात प्रशासनाच्या वतीनं मुख्य मार्गावर पथसंचलन करण्यात आलं. नागरिकांना याद्वारे शांतता आणि सुव्यवस्थेचं आवाहन करण्यात आलं. जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे, पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकुर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश पाठक, अतिरिक्त जिल्हाधिकारी त्रिगुण कुलकर्णी यांनी या पथसंचलनाचं नेतृत्त्व केलं.

****

यंदाच्या गोवा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या चित्रपट बाजार विभागासाठी महाराष्ट्र शासनाकडून तीन मराठी चित्रपटांची निवड करण्यात आली आहे. ग्लोबल आडगाव, गिरकी आणि बटरफ्लाय अशी या तीन चित्रपटांची नावं आहेत. राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी याबाबतची घोषणा केली आहे. या चित्रपटांची निवड करण्यासाठी पाच सदस्यांची तज्ज्ञ समिती नेमण्यात आली होती. 

****

आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे आज अंमलबजावणी संचालनालयाच्या चौकशीसाठी हजर राहणार नसल्याचं आम आदमी पक्षातर्फे कळवण्यात आलं आहे. ते आज मध्य प्रदेशात निवडणूक प्रचारासाठी जाणार आहेत. केजरीवाल यांनी अंमलबजावणी संचालनालयाकडे नोटीस मागं घेण्याची मागणी केली आहे. हे सर्व आरोप राजकीय आणि अनधिकृत असल्याचा दावा त्यांनी केला आहे. केजरीवाल यांना मद्य धोरणासंदर्भातल्या गैरव्यवहारांच्या आरोपांवरुन चौकशीसाठी बोलावण्यात आलं आहे.

****

दोन हजार रुपयांच्या ९७ टक्के नोटा रिझर्व बैंकेकडे प्राप्त झाल्या आहेत. दोन हजार रुपयांच्या तीन लाख ५६ हजार कोटी मुल्याच्या नोटांचं चलन बंद करण्यात आलं असून आता दहा हजार कोटी नोटा नागरिकांकडे बाकी असल्याचं रिझर्व बँकेतर्फे कळवण्यात आलं आहे.

****

नाशिक जिल्ह्यात रक्ताचा तुटवडा निर्माण होऊ नये आणि रक्तदानाविषयी जागृती व्हावी यासाठी वाढदिवस रक्तदानानं साजरा करणाऱ्यांचा गट स्थापन करण्यात येत आहे. नाशिकचे जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. चारुदत्त शिंदे यांनी ही माहिती दिली आहे. नागरिकांनी आपला स्वतःचा तसंच परिजनांचा वाढदिवस रक्तदानानं साजरा करण्याचं आवाहन त्यांनी केलं आहे.

****

अखिल विश्वाला शांतीचा संदेश देणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची आज पुण्यतिथी. त्यानिमित्त अमरावती जिल्ह्यात गुरुकुंज मोझरी इथं आज त्यांना दुपारी श्रद्धांजली अर्पण करण्यात येणार आहे.  

****

राज्य परिवहन महामंडळातर्फे दिवाळीनिमित्त भंडारा ते पुणे नविन निमआराम बससेवा सुरू करण्यात येत आहे. ही बससेवा सात ते दहा नोव्हेंबर दरम्यान दुपारी साडे बारा आणि दोन वाजता  भंडारा बसस्थानकातून तर पुणे इथून आठ ते अकरा नोव्हेंबर दरम्यान संध्याकाळी सव्वा पाच आणि सव्वा सहा वाजता सोडण्यात येणार आहे.

****

एकदिवसीय विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आज भारत आणि श्रीलंका संघांदरम्यानचा सामना होणार आहे. मुंबईतल्या वानखेडे मैदानावर दुपारी दोन वाजता हा सामना सुरू होईल. दोन्ही संघांचा या स्पर्धेतला हा सातवा सामना आहे. या स्पर्धेत आतापर्यंतचे सहाही सामने जिंकणारा भारत हा एकमेव संघ असून श्रीलंका संघानं सहापैकी दोन सामन्यांत विजय मिळवला आहे. भारतानं हा सामना जिंकल्यास संघाचं उपांत्य फेरीतलं स्थान आज निश्चित होईल.

****

दक्षिण कोरीयात सुरु आशियाई नेमबाजी स्पर्धेत भारतानं काल आणखी दोन सुवर्णपदकं जिंकली. पन्नास मीटर रायफल प्रकारात तोमर यानं सुवर्ण पदक जिंकलं. तसंच तोमर, स्वप्निल कुसळे आणि अखिल शेओरन यांनी सांघिक रौप्य पदक पटकावलं. ट्रॅप मीश्र सांघिक प्रकारामध्ये पृथ्वीराज तोडयमन आणि मनिषा कीर यांनी भारताला सुवर्णपदक जिंकून दिलं. काल या स्पर्धेच्या अखेरच्या दिवशी भारतानं एकूण चार पदकं मिळवली. यामध्ये भारतानं या स्पर्धेत २१ सुवर्ण, २१ रौप्य आणि १३ कांस्य पदक अशी एकूण ५५ पदकं पटकावली असून, पदक तालिकेत दुसऱं स्थान जिंकलं. 

****

जळगांव जिल्ह्यातल्या एरंडोल नगरपरिषदेनं तेहतीस गुंठ्यांमध्ये पुस्तकांची बाग साकारली आहे. वाचन संस्कृती वाढवण्याच्या दृष्टीनं हा प्रयोग करण्यात आला असून, निसर्गरम्य वातावरणात कथा, कादंबरी, चरित्र, कवितासंग्रह, आणि विविध स्पर्धा परीक्षांची पुस्तकं वाचण्याची सोय या बागेत करण्यात आली आहे.

****

राज्यातलं हवामान आज कोरडं राहील असं हवामान विभागानं म्हटलं आहे.

****

No comments:

Post a Comment