आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त बातमीपत्र
०२ नोव्हेंबर २०२३ सकाळी ११.०० वाजता
****
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन आज कोलंबो इथं भारत - श्रीलंका व्यापार शिखर संमेलनात मार्गदर्शन करणार आहेत. संपर्क वृद्धी-समृद्धीसाठी भागिदारी हा या संमेलनाचा विषय असेल.
****
आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना आज अमलबजावणी संचालनालयानं चौकशीसाठी हजर राहण्याची नोटीस बजावली आहे. मद्य धोरणासंदर्भातल्या गैरव्यवहारांच्या आरोपांवरुन त्यांना चौकशीसाठी बोलावण्यात आलं आहे.
****
राज्यातलं हवामान आज कोरडं राहील असं हवामान विभागानं म्हटलं आहे. कोकणात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यताही हवामान विभागानं वर्तवली आहे.
****
जळगांव जिल्ह्यातल्या एरंडोल नगरपरिषदेनं तेहतीस गुंठ्यांमध्ये पुस्तकांची बाग साकारली आहे. वाचन संस्कृती वाढवण्याच्या दृष्टीनं हा प्रयोग करण्यात आला असून, निसर्गरम्य वातावरणात कथा, कादंबरी, चरित्र, कवितासंग्रह, आणि विविध स्पर्धा परीक्षांची पुस्तकं वाचण्याची सोय या बागेत करण्यात आली आहे.
****
नांदेड जिल्ह्यात संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान राबवण्यात येत आहे. स्वच्छतेमध्ये जिल्ह्यात प्रथम येणाऱ्या गावास सहा लाख रुपयांचं तर राज्यस्तरीय प्रथम येणाऱ्या ग्रामपंचायतीस पन्नास लाख रुपयांचा पुरस्कार मिळणार असून जिल्हा परिषदेतर्फे यात सहभागी होण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
****
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सुरु आंदोलनामुळं लातूर विभागात राज्य परिवहन महामंडळाचं चार दिवसांत सुमारे सव्वा दोन कोटी रुपयांचं नुकसानं झालं आहे. लातूर एसटी आगार प्रमुख बालाजी आडसुळे यांनी ही माहिती दिली आहे.
****
गोवा इथं सुरू ३७व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेमध्ये महाराष्ट्राचं वर्चस्व कायम आहे. महाराष्ट्राच्या संघानं या स्पर्धेत ५६ सुवर्ण पदकांसह १४२ पदकं पटकवली असून सैन्यदल क्रीडा मंडळ दुसऱ्या तर हरयाणा तिसऱ्या स्थानावर आहे.
****
No comments:
Post a Comment