Friday, 3 November 2023

TEXT - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 03.11.2023 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजताचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 03 November 2023

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – ०३ नोव्हेंबर २०२३ सायंकाळी ६.१०

****

·      २१ व्या शतकात अन्नसुरक्षा हे महत्त्वाचं आव्हान;वर्ल्‍ड फूड इंडियाच्या उद्‌घाटन सोहळ्यात पंतप्रधानांचं प्रतिपादन

·      नाशिक जिल्ह्यातल्या धरणातून मराठवाड्यासाठी पाणी सोडण्यास विरोध करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल

·      दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागातील जालना ते उस्मानपूर रेल्वेमार्गाचं विद्युतीकरण पूर्ण

आणि

·      एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत नेदरलँडचं अफगाणिस्तानला १८० धावाचं लक्ष्य

****

२१ व्या शतकात अन्नसुरक्षा हे जगासमोर एक महत्त्वाचं आव्हान असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. भारतातल्या समृद्ध खाद्यसंस्कृतीची संपूर्ण जगाला ओळख करून देण्यासाठी आज नवी दिल्लीत वर्ल्‍ड फूड इंडिया २०२३ या प्रदर्शनाचं उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते. भारताची गुंतवणूकदार अनुकूल धोरणे देशाच्या अन्न क्षेत्राला नव्या उंचीवर नेत असून, भारतातली समृद्ध खाद्य संस्कृती ही जगातल्या गुंतवणुकदरांसाठी एक सुवर्णसंधी असल्याचं पंतप्रधान म्हणाले. पाकिटबंद खाद्यपदार्थांना मोठी मागणी असून, देशातले शेतकरी आणि अन्न प्रक्रिया उद्योगानं याच संधीचा लाभ घ्यावा, असं आवाहन त्यांनी केलं. देशातल्या महिलांमध्ये अन्न प्रक्रिया उद्योगाचं नेतृत्व करण्याची नैसर्गिक क्षमता असून, या क्षेत्रात महिला उद्योजक आणि बचत गटांना प्रत्येक स्तरावर प्रोत्साहन दिलं जात असल्याचं त्यांनी सांगितलं. या महोत्सवात ८० हून अधिक देशांतले १२०० पेक्षा जास्त प्रदर्शक सहभागी झाले आहेत. यावेळी एक लाख बचत गटांना बीज भांडवल सहाय्याचं वितरण पंतप्रधानांच्या हस्ते करण्यात आलं.

****

देशभरात निवडणूक साक्षरता आणण्यासाठी निवडणूक आयोगानं आज शिक्षण विभागासोबत सामंजस्य करार केला आहे. या अंतर्गत देशभराततील शाळा आणि महाविद्यालयांमध्ये निवडणूक साक्षरता उपक्रम राबवण्यात येईल. यामध्ये इयत्ता सहावी ते बारावी पर्यंतच्या अभ्यासक्रमात सुशिक्षित मतदार आणि त्यांची निवडणूक साक्षरता यासारख्या घटकांचा समावेश असून राष्ट्रीय शिक्षण संशोधन आणि प्रशिक्षण परिषद-एनसीईआरटी या अभ्यासक्रमाची निर्मिती करणार आहे. अठरा वर्षावरील विद्यार्थ्यांना मतदान ओळखपत्र वितरित करण्यासाठी देखील धोरणात्मक पद्धत निवडणूक आयोगाद्वारे अवलंबली जाणार आहे. नव मतदारांमध्ये निवडणूक साक्षरतेविषयी जागरुकता निर्माण करण्यास, तसंच नवमतदारांचा लोकशाहीतला सहभाग वाढवण्यास यामुळे मदत होणार आहे.

****

नाशिक जिल्ह्यातल्या धरणातून मराठवाड्यासाठी पाणी सोडण्यास विरोध करणारी याचिका नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघाच्या आमदार देवयानी फरांदे यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली आहे. यावर्षी दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झालेली असतांनाही जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांकडून मराठवाड्याला पाणी सोडण्यासंदर्भात सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. गंगापूर आणि दारणा धरणातून पाणी सोडण्याबाबतची अधिसूचना पाटबंधारे विभागाने दोन दिवसांपूर्वी काढली होती. त्यावर आमदार फरांदे यांनी स्थगिती आणली. फरांदे यांच्या या याचिकेवर येत्या सात नोव्हेंबर रोजी मुंबईत सुनावणी होणार आहे. दरम्यान, जायकवाडी धरणात सध्या ४५ पूर्णांक ५६ शतांश टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.

****

लातूर जिल्ह्यातल्या शासकीय अभिलेखांच्या तपासणीत कुणबी नोंद आढळलेल्या कुटुंबांना कुणबी प्रमाणपत्र देण्याची कार्यवाही जलद गतीने करण्याचे आदेश शासनामार्फत देण्यात आले आहेत. त्यानुसार तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी सर्व उपविभागीय अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. त्यानुसार प्रातिनिधिक स्वरुपात भिसे वाघोली इथल्या ग्रामस्थांना कुणबी प्रमाणपत्रांचं वाटप करण्यात आलं आहे.

****

जालना जिल्ह्यातल्या अंतरवाली सराटी इथं १४ ऑक्टोबर रोजी मनोज जरांगे-पाटील यांच्या सभेसाठी नागरिकांच्या लक्षणीय उपस्थितीमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं होतं. या ४४१ बाधित शेतकऱ्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून ३२ लाख रुपये नुकसान भरपाई देण्यात आली आहे. एखाद्या सभेमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई देण्याची ही पहिलीच वेळ आहे. मुख्यमंत्री शिंदे यांच्या या निर्णयाचं शेतकरी बांधवांकडून स्वागत करण्यात येत आहे.

दरम्यान, मराठा आरक्षण आंदोलनावेळी अंतरवाली सराटी इथं झालेल्या लाठीमारात जखमी झालेल्या आंदोलकांवरील उपचारासाठीही मुख्यमंत्री शिंदे यांनी विशेष बाब म्हणून मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून २५ लाखांहून अधिक रुपयांचं अर्थसहाय्य केलं आहे.

****

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनांमुळे लातूर जिल्ह्यातील एसटी बसेस गेल्या पाच दिवसांपासून बंद होत्या. मात्र काल मनोज जरांगे पाटील यांनी आमरण उपोषण स्थगित केल्यानंतर बससेवा आज पूर्ववत झाली. गेल्या पाच दिवसांत दररोजच्या अडीच हजार फेऱ्यातून दिवसाकाठी मिळणारे जवळपास ५० लाख रुपयांचे उत्पन्न बंद झाले होते. त्यामुळे एसटी ला पाच दिवसांत जवळपास अडीच कोटी रुपयांचा तोटा सहन करावा लागला आहे. मात्र आजपासून एसटी सेवा पुन्हा एकदा पुर्ववत झाल्यामुळे दिवाळीच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.

****

दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागातील जालना ते उस्मानपूर या ५३ पूर्णांक चार दशांश किलोमीटरचं विद्युतीकरण पूर्ण झालं आहे. मनमाड - मुदखेड - ढोणे या रेल्वेमार्ग विद्युतीकरणाचा भाग असलेल्या या मार्गावर आता मनमाड ते उस्मानपूर असं एकूण २२८ किलोमीटर रेल्वे मार्गाचं विद्युतीकरण पूर्ण झालं आहे. उर्वरित उस्मानपूर ते धर्माबाद रेल्वेमार्गाचं काम प्रगतीपथावर असून लवकरच ते पूर्ण होईल अशी माहिती दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड जनसंपर्क कार्यालयानं दिली आहे.

****

एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आज लखनौ इथं सुरू असलेल्या सामन्यात नेदरलँडनं अफगाणिस्तानपुढे १८० धावाचं लक्ष्य ठेवलं आहे. नेदरलँडनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेत सत्तेचाळीसाव्या षटकांत सर्वबाद १७९ धावा केल्या. सायब्रँड एंजलब्रेच्टनं सर्वाधिक ५८ धावा केल्या. अफगाणिस्तानच्या मोहम्मद नबीनं सर्वाधिक तीन गडी बाद केले.

****

गोव्यामध्ये सुरू असलेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राच्या खेळांडूंची आगेकूच सुरू असून, महाराष्ट्रानं आत्तापर्यंत १६२ पदकांची कमाई करत पदकतालिकेतलं आपलं प्रथम स्थान कायम राखलं आहे. यात ६० सुवर्ण, ४९ रौप्य आणि ५३ कांस्य पदकांचा समावेश आहे. ३८ सुवर्णांसह एकूण ६६ पदकं मिळवत सैन्यदलानं द्वितीय तर ३१ सुवर्णांसह ८९ पदकं मिळवत हरियाणानं तिसरं स्थान कायम राखलं आहे.

****

केंद्र शासनाच्या शिक्षण मंत्रालयाद्वारा संचालित लातूर जिल्ह्यातल्या जवाहर नवोदय विद्यालयात प्रवेश घेण्यासाठी येत्या सात नोव्हेंबर पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. २०२४-२५ या शैक्षणिक वर्षासाठी इयत्ता नववी आणि अकरावीच्या प्रवेशासाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू असून याविषयीची संपूर्ण माहिती संबंधित संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

****

पुस्तकाचं गाव योजनेत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या वेरूळचा समावेश करण्यात आला आहे. वेरुळसह गोंदिया जिल्ह्यातल्या नवेगाव बांध, सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या पोंभूर्ले आणि सांगली जिल्ह्यातल्या अंकलखोप औंदुंबर इथं या योजनेचा विस्तार करण्यास सरकारने मान्यता दिली आहे. याठिकाणी दर्जेदार पुस्तकं उपलब्ध करुन देण्याचे निर्देश मराठी भाषा विभागाचे मंत्री दीपक केसरकर यांनी दिले आहेत.

****

जिल्हा परिषद मार्फत घेण्यात येणाऱ्या गट-क संवर्गातील सरळसेवा भरती परीक्षा सहा नोव्हेंबरला आयोजित करण्यात आली आहे. लातूर जिल्ह्यातील सहा उपकेंद्रांवर ही परीक्षा होणार असून परीक्षा केंद्राच्या शंभर मीटरच्या परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू राहणार आहेत. या सर्व परीक्षा केंद्र परिसरात पाच पेक्षा जास्त व्यक्तींना एकत्रितरित्या प्रवेश करता येणार नाही तसंच परीक्षा केंद्र परिसरात परीक्षार्थी अथवा अन्य व्यक्तींना शांततेस बाधा निर्माण होईल, असं कृत्य करता येणार नाही. हे आदेश परीक्षा केंद्रावरील संबंधित सर्वांना लागू असतील असं अपर जिल्हादंडाधिकारी विजयकुमार ढगे यांनी आदेशाद्वारे कळवलं आहे.

****

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा महानगरपालिका स्तरावरील लोकशाही दिन सोमवारी सहा नोव्हेंबर रोजी राबवण्यात येणार आहे. सकाळी दहा वाजता महानगरपालिकेच्या मुख्य कार्यालयात मनपा आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली लोकशाही दिनाचा आयोजन करण्यात आलं आहे.

बीड जिल्ह्याच्या लोकशाही दिनाचं देखील सोमवारी जिल्हाधिकारी दीपा-मुधोळ मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजन करण्यात आलं आहे.

****

नांदेड जिल्ह्यात परवा पाच नोव्हेंबर रोजी मोफत निदान आणि उपचाराचं आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आलं आहे. या शिबिरात सेवानिवृत ज्येष्ठ नागरिकांना आयुष्यमान भारत प्रमाणपत्राचे वाटपही केले जाणार आहे. सर्व शिबिरार्थींनी या संधीचा लाभ घेत येताना आधार कार्ड, रेशन कार्ड आणि मोबाईल फोन सोबत आणावेत असं आवाहन आयोजक डॉ.हंसराज वैद्य यांनी केलं आहे.

****

No comments:

Post a Comment