Friday, 17 November 2023

TEXT - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 17.11.2023 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजताचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 17 November 2023

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – १८ नोव्हेंबर २०२३ सायंकाळी ६.१०

****

·      राज्यातील शिक्षण संस्थांना समूह विद्यापीठं स्थापन करण्यास शासनाची मान्यता

·      पश्चिम घाटात जमिनीची धूप होण्याच्या प्रमाणात गेल्या २० वर्षात ९४ टक्क्यांनी वाढ

·      मराठा आरक्षण ओबीसीतून देऊ नये-ओबीसी आरक्षण बचाव एल्गार सभेची मागणी

आणि

·      जायकवाडी धरणात पाणी सोडण्याच्या मागणीसाठी मराठवाडा पाणी परिषदेचा आंदोलनाचा इशारा

****

राज्यातील शिक्षण संस्थांना समूह विद्यापीठे स्थापन करण्यास शासनाने मान्यता दिली आहे. मुंबईत आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबतच्या मार्गदर्शक तत्त्वांना मंत्रिमंडळाने आज मान्यता दिली. आर्थिक सल्लागार परिषदेच्या अहवालाचं आज राज्य मंत्रिमंडळासमोर सादरीकरण करण्यात आलं. राज्याला एक ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्थेचं उद्दिष्ट गाठण्यासाठी राज्य आर्थिक सल्लागार परिषदेने या अहवालातून ३४१ शिफारशी केल्या आहेत. दरम्यान, आजच्या बैठकीत विविध विभागांच्या प्रस्तावांनाही मंजुरी देण्यात आली. राज्यातल्या ग्रामपंचायत इमारतीच्या कामांसाठी निधी वाढवण्यात आला असून बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्राम पंचायत योजनेलाही मुदतवाढ देण्याचा निर्यण मंत्रिमंडळाने घेतला आहे. वाशिम जिल्ह्यातल्या मंगरूळपीर इथल्या सत्तर सावंगा बॅरेजला मान्यता देण्यात आली असून या योजनेमुळे १ हजार ३४५ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे.

****

पश्चिम घाटात जमिनीची धूप होण्याचं प्रमाण गेल्या २० वर्षात ९४ टक्क्यांनी वाढल्याचा अहवाल आयआयटी मुंबईनं दिला आहे. पश्चिम घाटात १९९० साली प्रति हेक्टर ३२ टनांहून अधिक माती वाहून गेली होती. २०२० मध्ये हे प्रमाण ६२ टन ७०० क्विंटलवर पोहोचल्याचं प्राध्यापक पेन्नन चिन्नसामी आणि वैशाली होनप यांनी केलेल्या अभ्यासात आढळलं. महाराष्ट्रात ९७ टक्क्यांनी जमिनीची धूप वाढल्याचा निष्कर्ष या अहवालात मांडला आहे.

****

मराठा आरक्षणाला आपला विरोध नाही; मात्र हे आरक्षण ओबीसीतून देऊ नये, अशी मागणी राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री आणि ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी केली आहे. जालना जिल्ह्यात अंबड इथं आज झालेल्या भटके, विमुक्त, ओबीसी आरक्षण बचाव एल्गार सभेत ते बोलत होते. या सभेत भुजबळ यांच्यासह, विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, भाजप आमदार गोपीचंद पडळकर, राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर, आमदार आशिष देशमुख यांच्यासह अनेक नेत्यांनी या सभेला मार्गदर्शन केलं. ओबीसी प्रवर्गात मराठा समाजाचा समावेश करण्यात येऊ नये, या मागणीचा यावेळी पुनरुच्चार करण्यात आला. यासोबतच बिहारच्या धर्तीवर महाराष्ट्रात ओबीसींची जात निहाय जनगनना करण्यात यावी, मराठा समाजाला देण्यात आलेली कुणबी प्रमाणपत्रे रद्द करावी, बंजारा समाजाचा अनुसूचित जमाती प्रवर्गात समावेश करुन संबंधित दाखले द्यावे, धनगर जमातीच्या अनुसूचित जमाती आरक्षणाची अंमलबजावणी करण्यात यावी अशा आदी मागण्या या सभेतून करण्यात आल्या.

****

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील यांनी आज सांगली जिल्ह्यात विटा आणि सांगली इथं जाहीर सभा घेतली. सर्वांनी एकजुटीने शांततेने आंदोलन करावं, असं आवाहन करतानाच, आरक्षण घेतल्याशिवाय आंदोलन शांत होणार नाही, असा इशारा मनोज जरांगे-पाटील यांनी या सभेतून दिला.

****

दरम्यान, मराठा आरक्षण कायमस्वरूपी टिकण्यासाठी देशाच्या लोकसभेत विधेयक संमत होण्याची गरज मराठा मावळा संघटनेचे अध्यक्ष माणिकराव शिंदे यांनी व्यक्त केली आहे. ते आज लातूर इथं बोलत होते. लोकसभेत असं विधेयक मांडण्यात यावं, यासाठी आपण राज्यभरातील लोकप्रतिनिधींना निवेदन देणार असून, हे विधेयक मंजूर करुन घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे विनंती करणार असल्याचं माणिकराव शिंदे यांनी सांगितलं.

****

शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळसाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिनानिमित्त राज्यभरात आज त्यांना अभिवादन करण्यात आलं. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कुटुंबियांसह मुंबईत शिवाजी पार्क इथं बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळावर अभिवादन केलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील काल रात्री बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळावर अभिवादन केलं.

छत्रपती संभाजीनगर इथं माजी महापौर नंदकुमार घोडेले यांनी बाळासाहेबांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. शहरात शिवसेनेच्या विविध शाखांमधूनही बाळासाहेबांच्या स्मृतींना आंदरांजली वाहण्यात आली.

****

विकसित भारत संकल्प यात्रेअंतर्गत नांदेड जिल्ह्यात आज तिसऱ्या दिवशी किनवट तालुक्यातल्या मांडवी आणि जवरला या गावात विविध शासकीय योजनांची माहिती देण्यात आली. उज्ज्वला योजना, पंतप्रधान किसान सन्मान योजना, सुकन्या योजना आदी योजनांची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. दरम्यान, आरोग्य विभागाकडून मधुमेह, उच्च रक्तदाब तपासणीसह सिकलसेल तपासणीही करण्यात आली.

****

महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक विभागाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या ६२ व्या हौशी राज्य नाट्य स्पर्धेच्या प्राथमिक फेरीची सुरुवात येत्या २० नोंव्हेबर पासून सोलापूर इथं होणार आहे, अशी माहिती स्पर्धा समन्वयक अमोल धाबळे यांनी दिली. या स्पर्धेत एकूण पंधरा संघ सहभागी होणार असल्याचं सांस्कृतिक कार्य संचालक बिभिषन चवरे यांनी सांगितलं.

****

नांदेड जिल्ह्यात जून ते सप्टेंबर २०२३ या कालावधीत सरासरीच्या ७५ टक्के पेक्षा कमी आणि एकूण ७५० मिलीमीटरपेक्षा कमी पाऊस झालेल्या २५ महसूली मंडळामध्ये दुष्काळसदृश्य परिस्थिती घोषित करण्यात आली आहे. आठ तालुक्यातील या २५ महसूली मंडळाना सवलती लागू करण्याचे आदेश जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी निर्गमित केले आहे.

****

जायकवाडी धरणात त्वरित पाणी सोडावं, अन्यथा, उग्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा मराठवाडा पाणी परिषदेने दिला आहे. परिषदेचे अध्यक्ष नरहरी शिवपुरे यांच्या नेतृत्वात आज छत्रपती संभाजीनगर इथं न्याय्य हक्काच्या पाण्यासाठी गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ कार्यालयासमोर निदर्शनं करण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते. या आंदोलनात जलतज्ज्ञ डॉ.शंकरराव नागरे, डॉ.सर्जेराव ठोंबरे यांच्यासह अनेकांनी सहभाग घेतला.

****

धाराशिव जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना प्रधानमंत्री पिक विमा योजनेतील २०२० पासूनची पीक नुकसान भरपाईची रक्कम त्वरित मिळावी आणि धाराशिव जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने केली आहे. या मागण्यांसाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पक्षाच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आलं. यावेळी आमदार कैलास पाटील, शिवसेनासह संपर्कप्रमुख मकरंद राजे निंबाळकर आणि पदाधिकाऱ्यांनी यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना आपल्या मागण्यांचं निवेदन दिलं.

****

सोयाबीनला प्रति क्विंटल नऊ हजार रुपयांचा दर मिळावा या मागणीसाठी लातूर जिल्ह्यातले शेतकरी नेते राजेंद्र मोरे हे येत्या २४ नोव्हेंबर रोजी औसा तालुक्यातल्या मातोळा ते किल्लारी पायी दिंडी काढणार आहेत. जिल्ह्यात खरीप हंगामात ८० टक्के पीक हे सोयाबीनचं घेतलं जातं. मात्र सोयाबीनला मिळणारा आताचा दर उत्पादन खर्च बघता अत्यल्प असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

****

नांदेड जिल्ह्यात २० नोव्हेंबरपासून क्षयरोग आणि कुष्ठरोग शोध मोहीम राबवण्यास सुरुवात होणार आहे. या मोहिमेत आरोग्य पथकाद्वारे २५ लाख ६५ हजार ९५८ नागरिकांची तपासणी करण्यात येणार असून, तपासणीत कुष्ठरोग किंवा क्षयरोगाचं निदान झाल्यास नागरिकांना मोफत उपचार उपलब्ध करून देण्यात यावेत, असं आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केलं आहे.

दरम्यान, येत्या १९ नोव्हेंबरला जागतिक शौचालय दिनाचं औचित्य साधून नांदेड जिल्हयात स्वच्छ भारत अभियान ग्रामीणच्या दुसऱ्या टप्प्यांतर्गत स्‍वच्‍छता उपक्रम राबवावा, असं आवाहन जिल्‍हा परिषदेच्‍या स्‍वच्‍छ भारत मिशन कक्षाने केलं आहे.

****

बुलडाणा जिल्ह्यात आज मधमाशांच्या हल्ल्यात एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला आहे. मोताळा तालुक्यात रिधोन इथं ही घटना घडली. सुरेश कळमकर असं या शेतकऱ्याचं नाव आहे. आपल्या शेतात काम करत असताना मधमाशांनी त्यांच्यावर हल्ला केला, जखमी अवस्थेत त्यांना बुल़डाणा इथं रुग्णालयात दाखल केलं असता डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केलं.

****

कार्तिकी एकादशीनिमित्त पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेता दक्षिण मध्य रेल्वेनं काही विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये बीदर-पंढरपूर-बीदर, आदिलाबाद- पंढरपूर-आदिलाबाद, नांदेड-पंढरपूर-नांदेड या गाड्यांचा समावेश आहे.

****

दक्षिण मध्य रेल्वे काचीगुडा लालगढ काचीगुडा ही विशेष रेल्वे चालवणार आहे. ही गाडी काचीगुडा इथून शनिवार १८ आणि २५ नोव्हेंबर रोजी सुटणार असून निजामाबाद, नांदेड, पूर्णा, अकोला, भुसावळ, अहमदाबाद, अबूरोड, जोधपूर, बिकानेर मार्गे सोमवारी दुपारी लालगढला पोहोचेल. परतीच्या प्रवासात ही गाडी मंगळवार दिनांक २१ आणि २८ नोव्हेंबर रोजी लालगढ इथून रात्री पावणेआठ वाजता निघणार असून याच मार्गाने गुरूवारी सकाळी पावणेदहा वाजेच्या सुमारास काचीगुडा इथं पोहोचेल.

****

No comments:

Post a Comment