Sunday, 19 November 2023

Text - आकाशवाणी औरंगाबाद, दिनांक: 19.11.2023 रोजीचे दुपारी: 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date : 19 November 2023

Time : 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक : १९ नोव्हेंबर २०२ दुपारी १.०० वा.

****

अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर आज भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात विश्वकप क्रिकेटचा अंतिम सामना दुपारी दोन वाजता सुरू होईल. हा सामना पाहण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, ऑस्ट्रेलियाचे उपपंतप्रधान रिचर्ड मार्शल, आठ राज्यांचे मुख्यमंत्री आणि मान्यवर अहमदाबादला पोहोचले आहेत. या पार्श्वभूमीवर स्टेडीयमच्या आत आणि बाहेर त्रिस्तरीय सुरक्षा व्यवस्था करण्यात आली असून नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. स्टेडियममध्ये सहा हजारांहून अधिक पोलिस, ड्रोनसह राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल आणि जलद कृती दलाची टीम तैनात करण्यात आल्याचं अहमदाबादचे पोलिस आयुक्त जी. एस. मलिक यांनी सांगितलं.

****

गुन्हेगारांकडून कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापरामुळे डीप-फेकसारख्या समस्या समोर येत आहेत. पोलिस अधिकाऱ्यांनी तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात अद्यावत राहून गुन्हेगारांवर कारवाई करावी असं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी म्हटलं आहे. दिल्लीत राष्ट्रपती भवनात काल २०२२ च्या तुकडीच्या भारतीय पोलिस सेवा परिविक्षाधीन अधिकाऱ्यांना संबोधित करताना राष्ट्रपती बोलत होत्या.

सायबर गुन्हे, अंमली पदार्थांची तस्करी, दहशतवाद यासारख्या अनेक आव्हानांना पोलिस दल सामोरे जात असून आर्थिक आणि सामाजिक विकासासाठी कायदा आणि सुव्यवस्था मजबूत करणं आवश्यक असल्याचंही राष्ट्रपतींनी यावेळी सांगितलं. कोणत्याही क्षेत्राच्या बहुआयामी विकासात पोलीस विभागाची मध्यवर्ती भूमिका असते. अमृतकाळात देशाला विकसित राष्ट्र बनवण्याचा संकल्प पूर्ण करण्यासाठी पोलिस अधिकाऱ्यांची भूमिका निर्णायक ठरणार असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं.
                                ****
धाराशिव इथं आज महाराष्ट्र केसरीच्या तिसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्राचं विविध मान्यवरांच्या हस्ते  उद्धघाटन संपन्न झालं
. मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, कोकणसह राज्यभरातील पैलवानांची मांदियाळी इथं जमली आहे. उत्कृष्ट नियोजन आणि जंगी मैदान पाहायला कुस्ती शौकीन गर्दी करत आहेत. यासोबतच दिग्गज राजकीय नेतेमंडळीही कुस्त्या पाहायला तुळजभवानी मैदानावर येत आहेत.

                                ****
उत्तराखंडमधल्या उत्तरकाशी इथं सिलक्यारा बोगद्यात अडकलेल्या ४० कामगारांना वाचवण्याचे आज सातव्या दिवशीही प्रयत्न सुरुच आहेत. पंतप्रधान कार्यालय या कामावर सातत्यानं लक्ष ठेवून आहे आणि राज्य सरकारशी संपर्कात आहे. दरम्यान
, पंतप्रधान कार्यालयाचे उपसचिव मंगेश घिल्डियाल यांनी काल घटनास्थळाला भेट दिली आणि मदत आणि बचावकार्याचा आढावा घेऊन आवश्यक त्या सूचना दिल्या. उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्करसिंह धमी यांनीही वरिष्ठ अधिकाऱ्यांसह परिस्थितीची माहिती घेतली आहे.
                                ****

छत्रपती संभाजीनगर इथं माजी महापौर
, तसंच सेवानिवृत्त आयुक्तांकडून शहर विकासाचं व्हीजन जाणून घेतलं जाणार आहे. यातून शहर विकासाच्या विविध बाबींवर मंथन घडवून शहर विकासाचं नवीन व्हीजन ठरवण्याचा प्रशासक जी. श्रीकांत यांचा प्रयत्न आहे. यासाठी पुढील महिन्यात ८ डिसेंबर रोजी महापालिकेच्या वर्धापनदिनी माजी महापौर आणि आयुक्तांचा संवाद कार्यक्रम आयोजित केला जाणार आहे. मनपाच्या वर्धापन दिनानिमित्त ८ ते १५ डिसेंबरदरम्यान विविध कार्यक्रमही होणार आहेत.

                                    ****
लातूर जिल्ह्यात निदान न झालेल्या कुष्ठरूग्‍ण आणि क्षयरूग्‍णांची विशेष शोध मोहीम उद्यापासून राबविण्‍यात येत आहे. ही मोहीम सहा डिसेंबरपर्यंत चालणार आहे.

लातूर शहरातील निवडक भागातील २८ हजार घरांना भेटी देऊन सुमारे दीड लाख लोकसंख्‍येच्‍या भागात ही शोध मोहीम राबविण्‍यात येणार आहे. यासाठी एकूण ७२ पथकं स्थापन करण्‍यात आले आहेत. या मोहीमेत घरोघरी जाऊन ताप, सततचा खोकला, वजन कमी होणे आदी लक्षणे असलेल्‍या रुग्‍णांची संशयित क्षयरूग्‍ण म्‍हणून नोंद केली जाणार आहे. संशयित रुग्‍णांची तपासणी करुन त्‍यांच्‍या छातीची क्ष- किरण तपासणीही केली जाणार आहे, तसंच कुष्‍ठरोगाच्‍या बाबतीत लक्षणं जाणून शारिरीक तपासणी करण्‍यात येणार आहे. नागरिकांनी कुष्ठरूग्‍ण आणि सक्रीय क्षयरूग्‍ण शोध मोहीमेअंतर्गत घरी येणाऱ्या आरोग्‍य पथकाला आवश्‍यक माहिती देऊन सहकार्य करावं असं आवाहन लातूर शहर महानगरपालिकेच्‍या वतीने करण्‍यात आलं आहे.

                                    ****
सांगली जिल्ह्यातील मराठा- कुणबी , कुणबी -मराठा जात प्रमाणपत्र नागरिकांना देण्यासाठी त्यांच्याकडील उपलब्ध पुरावे, वंशावळ, शैक्षणिक आणि महसुली पुरावे तसंच जुने अभिलेखे जिल्हाधिकारी कार्यालयात स्थापित विशेष कक्षात २१ नोव्हेंबर ते २४ नोव्हेंबर या कालावधीत सादर करावेत असं आवाहन सांगली जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.

दरम्यान, यासाठी शासनानं नियुक्त केलेली निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील समिती ११ डिसेंबरला सिंधुदुर्ग जिल्ह्यात येणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात हि समिती आढावा बैठक घेणार आहे.

                                    ****

 

No comments:

Post a Comment