Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 01 November
2023
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ०१ नोव्हेंबर २०२३ सायंकाळी ६.१०
****
· इतर समाजांवर अन्याय न होऊ देता मराठा आरक्षण देण्याच्या भूमिकेचा मुख्यमंत्र्यांकडून
पुनरुच्चार
· कायदेशीर बाबी पूर्ण करून टिकणारं आरक्षण देण्यावर सर्वपक्षीय बैठकीत एकमत;मनोज
जरांगे पाटील यांना उपोषण मागे घेण्याचं आवाहन
· मुंबईच्या वानखेडे मैदानावर भारतरत्न सचिन तेंडुलकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं
अनावरण
आणि
· एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत दक्षिण अफ्रिकेचं न्यूझीलंडसमारे ३५८ धावांचं
आव्हान
****
इतर समाजांवर अन्याय न होऊ देता मराठा आरक्षण
देण्याची सरकारची भूमिका असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. ते आज
मुंबईत मराठा आरक्षणाच्या मुद्यावर झालेल्या सर्वपक्षीय बैठकीनंतर पत्रकार परिषदेत
बोलत होते. राज्य सरकारनं दिलेलं मराठा आरक्षण सर्वोच्च न्यायालयानं ज्या त्रुटींमुळे
रद्द केलं होतं,
त्या त्रुटी आता नव्यानं माहिती गोळा करताना होणार नाहीत, याची
संपूर्ण काळजी घेण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. कुणबी नोंदी असलेल्या
सगळ्यांना तातडीनं प्रमाणपत्रं देण्याचे निर्देश सगळ्या जिल्हाधिकारी आणि तहसीलदारांना
दिल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं.
या सर्वपक्षीय बैठकीला, विधान
परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे, विधानसभेतले विरोधी पक्ष नेते
विजय वडेट्टीवार यांच्यासह विविध पक्षांचे नेते उपस्थित होते. मराठा समाजाला आरक्षण
देण्याबाबत सर्वांचं एकमत आहे. कायदेशीर बाबी पूर्ण करूनच टिकणारं आरक्षण देण्यासाठी
राज्यातले सगळेच पक्ष एकत्रितपणे काम करायला तयार आहेत, मात्र
राज्यात कुणीही कायदा हातात घेऊ नये, राज्यातली शांतता तसंच कायदा
आणि सुव्यवस्था अबाधित ठेवावी, असं आवाहन या सर्वपक्षीय बैठकीत करण्यात
आलं. सरकारच्या या सगळ्या प्रयत्नांना उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांनीही सहकार्य
करावं आणि आपलं उपोषण मागे घ्यावं, असं आवाहन करणारा ठराव सर्वपक्षीय
बैठकीत संमत करण्यात आला.
****
सरकारला किती वेळ पाहिजे आणि वेळ दिला तर
सरसकट सगळ्या मराठ्यांना आरक्षण देणार का, असा प्रश्न मनोज जरांगे पाटील
यांनी विचारला आहे. आंतरवली सराटी इथे आज पत्रकार परिषदेत ते बोलत होते. सरसकट सगळ्या
मराठा समाजाला आरक्षण दिलं पाहिजे, या आपल्या मागणीचा त्यांनी पुनरुच्चार
केला. आरक्षण मिळेपर्यंत आंदोलन थांबणार नाही, असंही जरांगे यांनी स्पष्ट केलं.
दरम्यान, मराठा आरक्षणासंदर्भात
राज्यात आजही ठिकठिकाणी विविध प्रकारची निदर्शनं करण्यात आली.
हिंगोली जिल्ह्यातल्या कळमनुरी तालुक्यात
कान्हेगाव इथल्या आंदोलक ग्रामस्थांनी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आज कयाधू नदी पात्रात
उतरून आंदोलन केलं. यानंतर पोलीस उपनिरीक्षक शिवाजी बोंडले यांना मागण्यांचं निवेदन
देण्यात आलं.
लातूर जिल्ह्यात औसा मार्गावर पेठ इथे आंदोलकांनी
लातूर-तुळजापूर-सोलापूर तसंच लातूर-हैद्राबाद महामार्गावर टायर जाळून रास्ता रोको आंदोलन
केलं.
सोलापूर जिल्ह्यातल्या मोहोळ तालुक्यात मराठा
समाजाच्या आंदोलकांनी आज सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्ग सुमारे एक तास रोखून धरला
होता, तर चिखली,
पोखरापूर, लांबोटी या ठिकाणीही रास्ता रोको आंदोलन
करण्यात आलं. मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला माथाडी, मापारी कामगारांनी पाठिंबा
दर्शवला आहे. या पाठिंब्याचं लेखी निवेदन भरवस फाटा इथे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी
उपोषणाला बसलेले अमित मुदगुल यांना लासलगाव माथाडी, मापारी कामगारांच्या
वतीनं आज देण्यात आलं.
पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीनं
आज बंद आणि लाक्षणिक उपोषण करत मनोज जरांगे पाटील यांच्या मागणीला पाठिंबा देण्यात
आला.
****
किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत शेतकऱ्यांना
देय असलेले चुकारे विहित मुदतीत अदा करण्यात यावेत, असे निर्देश अन्न, नागरी
पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी संबंधित यंत्रणेला दिले आहेत. आज
मुंबईत यासंदर्भात झालेल्या बैठकीत ते बोलत होते. धानाची घट होऊ नये याकरता, तत्काळ
धानाची उचल करावी,
धानासाठी केंद्र शासनानं मंजूर केलेल्या अर्धा टक्का घटीव्यतिरिक्त
राज्यशासनाकडूनही अर्धा टक्का अतिरिक्त घट मंजूर करण्याचे निर्देशही भुजबळ यांनी यावेळी
दिले.
****
छत्रपती संभाजीनगरच्या लाच लुचपत प्रतिबंधक
विभागामार्फत तीस ऑक्टोबरपासून येत्या पाच तारखेपर्यंत दक्षता जनजागृती सप्ताह पाळण्यात
येत आहे. या अंतर्गत भ्रष्टाचाराविरुद्ध विविध उपक्रमांतून जनजागृती केली जात आहे.
छत्रपती संभाजीनगर,
जालना, बीड आणि धाराशिव या जिल्ह्यांमध्ये हा उपक्रम
राबवला जात आहे. लोकसेवकांकडून आपलं काम करून घेताना लाचेची मागणी होत असल्यास नागरिकांनी
निर्भयपणे लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे संपर्क साधावा, असं
आवाहन या विभागानं केलं असून, अशा तक्रारी नोंदवण्यासाठी १०६४ हा टोल फ्री
क्रमांकही जारी केला आहे.
****
भारतीय नौदलानं आज ब्रह्मोस क्षेपणास्त्राची
यशस्वी चाचणी केली. बंगालच्या उपसागरात झालेल्या या चाचणीनंतर, या
क्षेपणास्त्राच्या सगळ्या चाचण्या पूर्ण झाल्याची माहिती नौदलानं दिली. ब्रह्मोस क्षेपणास्त्र
हा भारत आणि रशियाचा संयुक्त उपक्रम आहे. या क्षेपणास्त्राचा पल्ला २९० किमीचा असून, याचा
वेग ध्वनीच्या तिप्पट असल्यानं ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जगातल्या सर्वात वेगवान क्षेपणास्त्रात
समावेश होतो.
****
खेळात कोणताही शॉर्टकट नव्हे तर कठोर परिश्रमच
तुम्हाला यशस्वी करतात,
असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. आज नवी दिल्लीत
पंतप्रधानांनी पॅरा आशियायी क्रीडा स्पर्धेत चमकदार कामगिरी केलेल्या संघाची भेट घेऊन
त्यांचं कौतुक केलं,
त्यावेळी ते बोलत होते. चीनमध्ये झालेल्या या स्पर्धेत भारताच्या
या पथकाने २९ सुवर्ण पदकांसह एकूण १११ पदकं जिंकली आहेत.
****
मुंबईच्या वानखेडे मैदानावर आज भारतरत्न
सचिन तेंडुलकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या
हस्ते झालं. यावेळी सचिन तेंडूलकर तसंच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार
उपस्थित होते. या पुतळ्याची निर्मिती अहमदनगरचे शिल्पकार प्रमोद कांबळे यांनी केली
आहे. २२ फुट उंचीचा हा पुतळा एका पृथ्वी गोलावर उभारण्यात आला आहे. ऑस्ट्रेलियाचा दिवंगत
गोलंदाज फिरकीपटू शेन वॉर्न यांच्या चेंडूवर सचिननं षटकार मारला, तो
क्षण या पुतळ्याच्या रूपानं कायम स्मरणात राहणार आहे.
****
गोव्यातल्या ३७ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये
काल हॉकी, रोइंग,
तायक्वांदो, वॉटर पोलो या क्रीडाप्रकारांसह
पंजाबमधल्या मार्शल आर्ट्स 'गटका' खेळालाही
सुरुवात झाली आहे. राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये ५४ सुवर्ण पदकांसह १२७ पदकं मिळवत
महाराष्ट्रानं पदकतालिकेत आपली आघाडी कायम ठेवली आहे.
****
एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत पुणे
इथं सुरू असलेल्या सामन्यात दक्षिण अफ्रिकेनं न्युझीलंडसमारे विजयासाठी ३५८ धावांचं
आव्हान ठेवलं आहे. न्युझीलंडनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं. दक्षिण
अफ्रिकेनं प्रथम फलंदाजी करतांना निर्धारीत ५० षटकांत चार बाद ३५७ धावा केल्या. अफ्रिकेच्या
रसी वॅन डेर दुसेन नं सर्वाधिक १३३ धावा केल्या तर क्वांटन डि कॉक ११४ धावा काढून बाद
झाला. न्युझीलंडच्या टीम साऊदीनं सर्वाधिक दोन गडी बाद केले.
****
धाराशिव इथं १६ ते २० नोव्हेंबर दरम्यान
राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेसाठी येणाऱ्या खेळाडूंची गैरसोय होणार
नाही यासाठी आवश्यक त्या सोयीसुविधा उपलब्ध करून द्याव्यात, असे
निर्देश जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओम्बासे यांनी दिले आहेत.
****
हिंगोली जिल्ह्यात बाळापूर- वारंगा रस्त्यावरच्या
दाती फाटा इथे काल मध्यरात्री अपघात होऊन दोन जणांचा मृत्यू झाला तर अन्य तीन जण गंभीर
जखमी झाले. सत्य गणपती मंदिराकडे दर्शनासाठी पायी जाणाऱ्या भाविकांना अज्ञात वाहनानं धडक दिल्यानं हा अपघात झाला. हे भाविक नांदेड जिल्ह्यातल्या
हदगाव तालुक्यातल्या मरडगा गावाचे आहेत. गंभीर जखमी असलेल्या रुग्णांना नांदेडच्या
रुग्णालयात उपचारासाठी हलवल्याची असल्याची माहिती पोलिसांनी दिल्याचं आमच्या वार्ताहरानं
कळवलं आहे.
****
No comments:
Post a Comment