Sunday, 3 December 2023

TEXT - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 03.12.2023 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजताचे मराठी बातमीपत्र

 

Regional Marathi Text Bulletin, Chatrapati Sambhajinagar

Date – 03 December 2023

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक – ०३ डिसेंबर २०२३ सायंकाळी ६.१०

****

·      मध्यप्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड विधानसभा निवडणुकीत मतदारांचा भाजपला कौल तर तेलंगणात काँग्रेसची सत्तास्थापनेकडे वाटचाल;महाराष्ट्रात भाजप कार्यकर्त्यांचा जल्लोष.

·      डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणदिनानिमित्त चैत्यभूमीवर येणाऱ्या अनुयायांसाठी मुंबई मनपाकडून चोख व्यवस्था.

·      गंगापूर इथं आयोजित ४३ व्या मराठवाडा साहित्य संमेलनाचा आज समारोप.

आणि

·      लातूर मॅराथॉन स्पर्धेत शेकडो नागरिकांचा उत्स्फुर्त सहभाग.

****

मध्यप्रदेश, राजस्थान, छत्तीसगड आणि तेलंगणा या चार राज्यांमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीची मतमोजणी आज सुरू आहे. यामध्ये मध्यप्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये मतदारांनी भारतीय जनता पक्षाला तर तेलंगणात काँग्रेस पक्षाला कौल दिल्याचं दिसून येत आहे.

मध्यप्रदेशात सत्ता कायम राखण्यात भाजपला यश मिळाल्याचे स्पष्ट संकेत आहेत. विधानसभेच्या २३० जागांपैकी भाजपने आतापर्यंत ३७ जागा जिंकल्या असून, १२७ जागांवर भाजप उमेदवार आघाडीवर आहेत. काँग्रेसने आतापर्यंत नऊ जागा जिंकल्या असून, ५६ जागांवर काँग्रेस उमेदवार आघाडीवर आहेत. छत्तीसगडमध्ये ९० जागांपैकी भाजपने आतापर्यंत दोन जागांवर विजय मिळवला असून, ५४ जागांवर भाजप उमेदवार तर सत्ताधारी काँग्रेस पक्षाचे उमेदवार ३४ जागांवर आघाडीवर आहेत. राजस्थानातही भाजपने सत्तास्थापनेकडे वाटचाल सुरू केली आहे. एकूण १९९ जागांपैकी

भाजपने आतापर्यंत ६५ जागांवर विजय मिळवला असून, आणखी ५० जागांवर भाजप उमेदवार आघाडीवर आहेत. सत्ताधारी काँग्रेस पक्षाचे उमेदवार ३६ जागांवर विजयी झाले असून, ३३ जागांवर आघाडीवर आहेत.

तेलंगणात ११९ जागांपैकी काँग्रेस पक्षाने आतापर्यंत ३२ जागांवर विजय मिळवला असून, ३२ जागांवर काँग्रेस उमेदवार आघाडीवर आहे. सत्ताधारी भारत राष्ट्रीय समितीने ११ जागांवर विजय मिळवला असून, २९ जागांवर बीआरएस उमेदवार आघाडीवर आहेत.

****

चार राज्यात जनतेने दिलेला कौल काँग्रेस पक्षाला मान्य असल्याचं, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटलं आहे. ते आज मुंबईत बोलत होते. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत मात्र आजचे चित्र दिसणार नाही, त्यात बदल होईल, असा विश्वास पटोले यांनी व्यक्त केला.

 

दरम्यान, या निकालावर मंथन करण्यासाठी परवा मंगळवारी दिल्ली इथं काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खडगे यांच्या निवासस्थानी इंडिया आघाडीची बैठक होणार आहे. खासदार शरद पवार यांनी सातारा इथं पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. तेलंगणात काँग्रेसचा झालेला विजय राहुल गांधी यांच्या हैद्राबाद इथल्या भव्य सभेमुळे सुकर झाल्याची प्रतिक्रियाही पवार यांनी नोंदवली.

****

दरम्यान, तीन राज्यात भाजपला मिळालेला हा विजय निर्णायक असल्याचं, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. ते आज नागपुरात प्रसार माध्यमांशी बोलत होते. विरोधकांच्या इंडिया आघाडीला जनतेने साफ नाकारल्याचं मतही फडणवीस यांनी व्यक्त केलं.

****

मुंबईत भाजपातर्फे प्रदेश कार्यालयाजवळ मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांच्या नेतृत्वात जल्लोष करण्यात आला. आमदार प्रवीण दरेकर, प्रदेश महिला मोर्चा अध्यक्ष चित्रा वाघ,माजी मंत्री राम शिंदे, यांच्या सह पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

अहमदनगर इथं खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांच्या नेतृत्वात भाजप कार्यकर्त्यांनी आनंद साजरा केला.

छत्रपती संभाजीनगर इथं पक्ष कार्यालयात ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन आणि जिल्हाध्यक्ष शिरीष बोराळकर यांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांनी पेढे वाटप करून आनंद व्यक्त केला. उद्या सकाळी पक्ष कार्यालयासमोर जल्लोष करण्यात येणार आहे.

नांदेड इथं महात्मा फुले पुतळ्याजवळ भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी जल्लोष केल्याचं, आमच्या वार्ताहराने कळवलं आहे.

****

अवकाळी पाऊस आणि गारपिटीने बुलडाणा जिल्ह्यात शेतपिकांचं तसंच फळबागांचं मोठं नुकसान झालं आहे. देऊळगाव राजा तसंच सिंदखेड राजा तालुक्यात सर्वाधिक नुकसान झालं आहे. राज्याचे सहकार मंत्री तथा बुलडाण्याचे पालकमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी आज या नुकसानग्रस्त भागाची पाहणी करुन लवकरात लवकर नुकसान भरपाईची ग्वाही दिली...

अवकाळी पावसामुळे आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाले आहेत. नुकसान भरपाईसाठी केंद्र सरकारचे काही नॉर्म्स आहेत, राज्य सरकारचे वेगळे नॉर्म्स आहेत, आणि या कुठल्या नॉर्म्स प्रमाणे नुकसान भरपाई द्यायची किंवा त्याच्यापेक्षा जास्त नुकसान भरपाई द्यायची याचा निर्णय हे राज्यसरकारचं मंत्रीमंडळ घेईल.

****

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६७ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादनासाठी मुंबईत येणाऱ्या अनुयायांकरीता बृहन्मुंबई महानगरपालिकेने चैत्यभूमी, छत्रपती शिवाजी महाराज मैदान, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्‍थान 'राजगृह' यांसह आवश्यक त्या विविध ठिकाणी सुसज्‍ज नागरी सेवा-सुविधा उपलब्ध करुन दिल्या आहेत. यामध्ये प्रामुख्याने तात्पुरता निवारा, आरोग्य सेवा, पेयजल, स्वच्छतागृहं, विद्युत व्यवस्थेसह मोबाइल चार्जिंग सुविधा इत्यादी सोयी-सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत.

****

आम्ही ओबीसी समाजाच्या विरोधात नाही, कारण आम्ही ओबीसीच आहोत, असं मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे. ते आज धुळ्यात जाहीर सभेत बोलत होते. दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांच्या नांदेड जिल्ह्यात सात आणि आठ डिसेंबर रोजी सभा होणार आहेत. सात डिसेंबर रोजी भोकर तालुक्यात बारड इथं तर आठ डिसेंबर रोजी नांदेड, मारतळा, नायगाव आणि कंधार इथं जाहीर सभा होणार आहेत.

****

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात गंगापूर इथं श्री मुक्तानंद महाविद्यालया आयोजित ४३ व्या मराठवाडा साहित्य संमेलनाचा आज समारोप होत आहे. आज संमेलनाच्या दुसऱ्या दिवशी मराठवाडा मुक्तीसंग्राम अमृत महोत्सव आणि मराठवाडा पाणी प्रश्न या विषयावर चर्चासत्रं घेण्यात आली. मराठवाड्यातून कामगार, विद्यार्थी आणि बुध्दीजीवी मोठया प्रमाणात स्थलांतरीत होत आहेत, ही चिंतेची बाब आहे. अशी खंत निवृत्त प्राध्यापक जयदेव डोळे यांनी व्यक्त केलं आहे. मराठवाड्याच्या अर्थ शास्त्रावर काम झाले पाहिजे अशी अपेक्षा डा अशोक बेलखोडे यांनी या प्रसंगी व्यक्त केली. या संमेलनात संत साहित्यावरही परिसंवाद झाला. बालकथा मेळाव्यालाही रसिकांचा चांगला प्रतिसाद लाभला. 

****

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात विकसित भारत संकल्प यात्रा आज टेंभापुरी, दहेगाव, चापानेर, शिरसगाव, वरूड, पिंप्री, भालगाव या गावांमध्ये दाखल झाली. नागरिकांनी यात्रेचं स्वागत करून शासकीय योजनांची माहिती जाणून घेतली.

वाशिम जिल्ह्यात पारडी ताड इथल्या लाभार्थी मंदा पानभरे यांनी विकसित संकल्प भारत यात्रेत आपलं मनोगत व्यक्त केलं...

मी मंदा पाऩभरे राहणार पारडी ताड, मी ग्राम उन्नती अभियानामध्ये २०१८ पासून काम करत आहे. मी रोज लोकांच्या शेतामध्ये जात होती. पण या अभियानात आली आणि महिला सक्षमीकरण झाली, म्हणजे स्वत:च्या पायावर उभी राहिली. ग्रामसभामधून निधी घेऊन काहीतरी छोटा मोठा व्यवसाय चालू केला आणि त्या व्यवसायामुळे मी माझा परिवार भागवतेय.

****

लातूर मॅराथॉन मध्ये आज शेकडो नागरिकांनी सहभाग घेतला. 'एक धाव व्यसनमुक्तीसाठी' या संकल्पनेखाली लातूर पोलिस दलातर्फे अंमली पदार्थ विरोधी मोहिमेचा भाग म्हणून ही स्पर्धा घेण्यात आली. १०, पाच आणि तीन किलोमीटर अशा तीन गटात ही स्पर्धा झाली. प्रथम येणाऱ्या स्पर्धकांना पदक आणि १० हजार रुपये या स्वरुपातलं पारितोषिक जिल्हा पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आलं.

****

धाराशिव जिल्ह्यातील महाराष्ट्र जीवनोन्नती अर्थात उमेद अभियानाच्या ५०१ महिला बचत गटांना भारतीय स्टेट बँकेकडून व्यवसायांसाठी दहा कोटी रुपयांच्या कर्जाच्या रकमेच वाटप जिल्हाधिकारी डॉक्टर सचिन ओंबासे आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता यांच्या हस्ते नुकतंच करण्यात आलं. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील महिला बचत गटांच्या महिलांनी पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम आणि मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमातून जास्तीत जास्त निधी घेऊन आपला स्वतःचा व्यवसाय सुरू करून आत्मनिर्भर व्हावं अस आवाहन केलं.

****

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात वाळूज, नारायणपूर आणि जोगेश्वरी परिसरात महावितरणने राबवलेल्या धडक मोहिमेत ६७ नागरिक घरगुती वापरासाठी लघुदाब वाहिनीवर आकडे टाकून वीजचोरी करताना आढळले. या सर्वांवर छावणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या सर्वांनी सुमारे साडे बारा लाख रुपयांहून अधिक रकमेची वीज चोरी केल्याचं समोर आलं आहे.

****

दक्षिण मध्य रेल्वेने आपल्या मंडळात रेल्वे मार्गाच्या कामासाठी धर्माबाद ते मनमाड मराठवाडा एक्स्प्रेस ही गाडी १०, १३, आणि १७ डिसेंबर रोजी धर्माबाद ते नांदेड दरम्यान अंशतः रद्द करण्यात आली आहे. या तीनही ही गाडी दिवशी धर्माबाद ऐवजी नांदेड इथून सुटणार आहे. औरंगाबाद - हैदराबाद एक्स्प्रेस ही गाडी पाच, नऊ आणि १२ डिसेंबर रोजी औरंगाबाद इथून तिच्या नियमित वेळे पेक्षा सुमारे दोन तास उशीरा सुटणार आहे.

****

No comments:

Post a Comment