▼

Thursday, 21 December 2023

TEXT - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 21.12.2023 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजताचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chatrapati Sambhajinagar

Date – 21 December 2023

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक – २१ डिसेंबर २०२३ सायंकाळी ६.१०

****

·      वृत्तपत्र आणि नियतकालीकं नोंदणी विधेयक लोकसभेत संमत

·      पुणे - छत्रपती संभाजीनगर द्रुतगती महामार्ग लवकरच निर्माण करणार- नितीन गडकरी यांची माहिती

·      मराठा कुणबी नोंदी असलेल्यांच्या नातेवाईकांनाही प्रमाणपत्र मिळावं- जरांगे पाटील यांची मागणी

आणि

·      ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक मुर्गाप्पा काशिनाथअप्पा खुमसे यांचं निधन

****

वृत्तपत्र आणि नियतकालीकं नोंदणी विधेयक २०२३ आज लोकसभेत संमत करण्यात आलं. यापूर्वीच राज्यसभेत हे विधेयक संमत झालं आहे. वृत्तपत्र तसंच नियतकालिकांची नोंदणीची प्रक्रिया या विधेयकामुळे सुलभ होणार आहे. दरम्यान, पत्रकारांच्या सुरक्षेसाठी सरकार कटीबद्ध असल्याचं सूचना आणि प्रसारण मंत्री अनुरागसिंह ठाकूर यांनी म्हटलं आहे. पश्चिम बंगालमध्ये पत्रकारांशी झालेल्या हिंसेबद्दल मंत्री ठाकूर यांनी यासंदर्भातल्या पूरक प्रश्नाचं उत्तर देताना चिंता व्यक्त केली. सर्व राज्य सरकारांनी पत्रकारांच्या सुरक्षेकडे लक्ष द्यावं असं आवाहनही मंत्री ठाकूर यांनी यावेळी केलं.

****

लोकसभेत आज मुख्य निवडणूक आयुक्त आणि निवडणूक आयुक्त नेमणूक विधेयक मंजूर झालं. पंतप्रधान, केंद्रीय मंत्री, लोकसभेतल्या विरोधी पक्ष नेत्यांच्या समितीने शिफारस केल्यावर राष्ट्रपती, निवडणूक आयुक्तांची नेमणूक करतील, अशी तरतूद या विधेयकात आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार हे विधेयक आणल्याचं केंद्रीय कायदा मंत्री अर्जून राम मेघवाल यांनी सांगितलं.

****

राज्यसभेत आज इलेक्ट्रॉनिक आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी मांडलेलं दूरसंचार विधेयक २०२३ देखील आज मंजूर झालं. या विधेयकात दूरसंचार सेवा आणि जाळं वाढवण्यासाठी विस्तार आणि कार्यवाही संबंधी कायद्यांमध्ये सुधारणा आणि एकत्रीकरण करण्यात आलं आहे.

****

पुणे-अहमदनगर-छत्रपती संभाजीनगर या मार्गावरची वाढती वाहतूक पाहता, नवा पुणे - छत्रपती संभाजीनगर द्रुतगती महामार्ग लवकरच निर्माण करण्यात येईल अशी माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज लोकसभेत दिली. बांधा-चालवा- हस्तांतरित करा `बीओटी` योजने अंतर्गत हा प्रकल्प राबवण्यात येणार आहे. हा मार्ग पुणे वर्तुळाकार रस्त्याला जोडण्यात येणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. तळेगाव- चाकण- शिंगणापूर मार्गासाठीचा आराखडाही तयार असून यासाठीचा प्रस्ताव केंद्राकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आला असल्याची माहिती मंत्री गडकरी यांनी यावेळी दिली.

****

नागरी विमान वाहतूक कंपन्यांच्या कार्यरत ताफ्याची संख्या पुढच्या वर्षापर्यंत ६८६ पर्यंत पोहचणार असल्याची माहिती नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी आज लोकसभेत एका प्रश्नाच्या उत्तरात दिली. २०१४ साली असलेली ताफ्यांची ४०० ही संख्या सध्या ६४४ पर्यंत पोहचली आहे.

****

भारतानं २०१४ ते २०२३ या कालावधीत ३९६ परदेशी आणि ७० देशांतर्गत उपग्रह प्रक्षेपित केले, तर २००३ ते २०१३ या कालावधीत भारताने ३३ परदेशी आणि देशांतर्गत ३१ उपग्रह प्रक्षेपित केले होते, अशी माहिती केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान, अंतराळ राज्यमंत्री डॉ.जितेंद्र सिंह यांनी आज लोकसभेत एका लेखी उत्तरात दिली. २०१४ ते २०२३ या दशकात उपग्रह प्रक्षेपणातून मिळणारा महसूल १५७ दशलक्ष अमेरिकी डॉलर्स आणि २६०दशलक्ष युरो इतका आहे. येत्या काही वर्षांत या क्षेत्राची वाढ सुमारे ८ टक्के दरानं होईल, असं मंत्री जितेंद्र सिंह यांनी यावेळी सांगितलं. लोकसभेचं कामकाज आज संस्थगित करण्यात आलं. अधिवेशन काळात लोकसभेत १८ महत्वपूर्ण विधेयकं पारित झाले असल्याचं अध्यक्ष ओम बिर्ला यांनी सांगितलं.

****

विरोधी पक्षांच्या खासदारांनी आज नवी दिल्लीत संसद ते विजय चौक असा निषेध मोर्चा काढला. संसेदतून निलंबित करंण्यात आलेले खासदार मोर्चात सहभागी झाले होते. मोर्चाचं नेतृत्व काँग्रेसचे अध्यक्ष आणि राज्य सभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी केलं. लोकसभेत सुरक्षा भंग केल्याप्रकरणी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राजीनामा द्यावा तसंच खासदारांचं निलंबन मागं घ्यावं अशी मागणी मोर्चेकरी खासदारांनी केली. या मोर्चात काँग्रेस, द्रवीड मुनेत्र कळघम, राष्ट्रीय जनता दल, राष्ट्रवादी काँग्रेस आणि अपक्ष खासदार सहभागी झाले होते.

****

मराठा कुणबी नोंदी असलेल्यांच्या नातेवाईकांना कुणबी प्रमाणपत्र मिळावं, अशी मागणी मराठा आरक्षण कार्यकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे. जालना जिल्ह्यातल्या आंतरवालीसराटी इथं राज्य सरकारच्या शिष्टमंडळानं आज त्यांची या मुद्द्यावर भेट घेऊन चर्चा केली, त्यावेळी जरांगे यांनी ही मागणी केली. मंत्री गिरीश महाजन, उदय सामंत आणि संदीपान भुमरे यांचा या शिष्टमंड‍ळात समावेश होता. रक्तातील सगे सोयऱ्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळायला हवं. मामाला किंवा मावशी देखील प्रमाणपत्र मिळावं असं जरांगे म्हणाले. मात्र, असं करता येणार नाही आणि तसा निर्णय देखील घेता येणार नसल्याचं मंत्री महाजन यांनी सांगितलं. संध्याकाळी उशिरा पर्यंत ही चर्चा सुरू होती. मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र मिळावं, यासाठी स्वतंत्र कायदा करावा लागेल, अशी माहिती मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे. त्यांनी आज पुण्यामध्ये प्रसिद्धी माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना हे सांगितलं.

****

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा जातीनिहाय जनगणनेला विरोध असला तरी जातीनिहाय जनगणना झाली पाहिजे अशी रिपब्लिकन पक्षाची भूमिका असल्याचं केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी म्हटलं आहे. आरक्षणाचा वाद मिटवायचा असेल तर ज्या जातीची जेवढी टक्केवारी आहे तेवढं आरक्षण त्या जातीला द्यावं अशी मागणीही आठवले यांनी आज यवतमाळमध्ये केली. मराठा आरक्षणाला आपला विरोध नसून मराठा समाजातल्या ज्यांचं उत्पन्न ८ लाखांच्या आत आहे त्यांना आरक्षणाचा लाभ मिळाला पाहिजे अशीही भूमिका आठवलेंनी मांडली. प्रकाश आंबेडकर यांनी भारतीय जनता पक्षासोबत यावं, असं आवाहनही आठवले यांनी यावेळी केलं.

****

हैद्राबाद मुक्तीसंग्रामतले ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक मुर्गाप्पा काशिनाथअप्पा खुमसे यांचं आज लातूर इथं वृद्धापकाळानं निधन झालं, ते १०३ वर्षांचे होते. मुर्गाप्पा खुमसे हे मूळ लातूर जिल्ह्यातल्या रेणापूरचे रहिवासी होते. त्यांनी हैद्राबाद मुक्ती संग्रामात बीड जिल्ह्याच्या अंबाजोगाई तालुक्यातल्या बर्दापूर इथं झालेल्या पोलीस कारवाईत मोलाची कामगिरी केली होती. स्वातंत्र्यसैनिक मुर्गाप्प्पा खुमसे यांच्या पार्थिव देहावर उद्या सकाळी रेणापूर इथं अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

****

वीरशैव लिंगायत समाजातर्फे लातुरमध्ये लिंगायत आरक्षणाच्या मागणीसाठी आज मोर्चा काढण्यात आला. लिंगायत समाजातल्या वाणी समाजाला सरकारनं आरक्षण दिलं. मात्र हिंदू लिंगायत, लिंगायत आणि वाणी हे एकच असल्यामुळं सरसकट वीरशैव लिंगायत समाजाला वाणी जातीचं प्रमाणपत्र देऊन आरक्षण देण्यात यावं अशी मागणी यावेळी करण्यात आली.

****

संसद भवनात तृणमूल काँग्रसचे खासदार कल्याण बॅनर्जी यांनी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांची नक्कल केली तसंच काँग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी यांनी मोबाईलमध्ये चित्रफीत केल्याचा लातूरमध्ये भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी निषेध केला. धुळे आणि नाशिक इथेही या कारणासाठी भाजप कार्यकर्त्यांनी तीव्र निषेध करत आंदोलन केलं.

****

नांदेड जिल्ह्यातल्या देगलूर तालुक्यातल्या लेंडी प्रकल्पाबाबत आधी पुनर्वसन मग धरण अशी भूमिका ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांनी जाहीर केली आहे. धरणाला विरोध नाही मात्र पुनर्वसना संदर्भातल्या कायद्यांचं पालन झालं पाहिजे अशी शेतकऱ्यांची भूमिका असल्याचं त्यांनी आज नांदेड इथं सांगितलं. पाटकर यांनी आज नांदेड इथं लेंडी प्रकल्पाबाबत जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्यासह जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली. १९८६ मध्ये मंजुरी मिळालेला या प्रकल्पात अजुनही पुनर्वसनाचं काम पूर्ण झालेलं नसून १२ गावांच्या गावठाण जमीनी तसंच सात गावांच्या जमिनी या प्रकल्पात बाधित होत असल्याची टीका पाटकर यांनी यावेळी केली.

****

भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या महिला क्रिकेट संघादरम्यान मुंबईत सुरु असलेल्या कसोटी क्रिकेट सामन्यात आजच्या पहिल्या दिवस अखेर भारताच्या पहिल्या डावात एक बाद ९८ धावा झाल्या. स्मृती मंधाना ४३, तर स्नेह राणा चार धावांवर खेळत आहे. तत्पूर्वी ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव २१९ धावांवर संपुष्टात आला.

****

भारत आणि दक्षिण आफ्रिकेच्या पुरुष क्रिकेट संघादरम्यान दक्षिण आफ्रिकेतल्या पार्ल इथं सुरु असलेल्या तिसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा भारताच्या १९व्या षटकांत तीन बाद १०१ धावा झाल्या होत्या. दक्षिण आफ्रिकेनं या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं.

****

No comments:

Post a Comment