▼

Thursday, 21 December 2023

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर, दिनांक: 21.12.2023 रोजीचे सकाळी: 11.00 वाजेचे मराठी संक्षिप्त बातमीपत्र

 आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

संक्षिप्त बातमीपत्र

२१ डिसेंबर २०२३ सकाळी ११.०० वाजता

****

म्हाडाच्या मुंबई मंडळातर्फे वर्ष २०२० मध्ये बॉम्बे डाईंग मिल आणि श्रीनिवास मिलमधल्या गिरणी कामगारांसाठी जाहीर केलेल्या सोडतीतल्या यशस्वी पात्र १६० गिरणी कामगार, वारस यांना आठव्या टप्प्यांतर्गत नुकतंच सदनिकांच्या चाव्यांचं वाटप करण्यात आलं. गेल्या १५ जुलैपासून आतापर्यंत एक हजार ४७० सदनिकांच्या चाव्यांचं याअंतर्गत वाटप करण्यात आलं असल्याची माहिती या संबंधी समितीचे अध्यक्ष आमदार सुनील राणे यांनी दिली.

****

सोलापूर जिल्ह्यात माळशिरस तालुक्यातल्या वटपळी इथं एका उभ्या वाहनाला सहलीच्या एसटी बसनं धडक दिल्यानं झालेल्या अपघातात एक शिक्षक जागीच ठार झाला तर अन्य एक शिक्षक आणि विद्यार्थी जखमी झाले आहेत. आज पहाटे सहा वाजेच्या सुमारास हा अपघात झाला.

****

नांदेड जिल्ह्यात काल झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातांत एका पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू तर एक पोलीस कर्मचारी जखमी झाला आहे. जिल्हा पोलीस मुख्यालयात कार्यरत असलेले तुकाराम जायभाये हे लोह्याहून नांदेडकडे दुचाकीनं येत असतांना त्यांचा राष्ट्रीय महामार्गावर कारेगाव इथं अपघातात मृत्यू झाला तर अन्य अपघातामध्ये बिलोली तालुक्यात कार्यरत लक्ष्मण सूर्यवंशी हे जखमी झाले आहेत.

****

राष्ट्रीय बालस्वास्थ्य कार्यक्रमाअंतर्गत नांदेड जिल्ह्यात ३८ बालकांना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांच्या हस्ते काल श्रवण यंत्र वाटप करण्यात आलं. या वर्षात एप्रिल ते सप्टेंबर या कालावधीत ३३४५ अंगणवाड्यातील शून्य ते सहा वर्षे वयोगटातील २ लाख ८७ हजार ८३ बालकांची तपासणी करण्यात आली असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

****

गोंदिया जिल्ह्यातल्या नवेगावबांध - नागझिरा व्याघ्र प्रकल्पात आणखी तीन वाघ सोडण्यात येणार आहेत. चंद्रपूर जिल्ह्यातल्या ताडोबा व्याघ्र प्रकल्पातून हे वाघ आणण्यात येणार असून यापूर्वी गेल्या २० मे रोजी दोन वाघिणींना नागझिरा प्रकल्पात सोडण्यात आलं आहे.

****

 

No comments:

Post a Comment