▼

Friday, 22 December 2023

TEXT - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 22.12.2023 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजताचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 22 December 2023

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक – २२ डिसेंबर २०२३ सायंकाळी ६.१०

****

·      छत्रपती संभाजीनगर तसंच सांगली शहरात कोविडचे प्रत्येकी दोन नवे रुग्ण;प्रशासनाकडून खबरदारी घेण्याचं आवाहन

·      नागपूर जिल्हा बँक घोटाळा प्रकरणी माजी मंत्री सुनील केदार यांना पाच वर्षांची शिक्षा

·      एनसीसीच्या राष्ट्रीय शिबीरात सर्वोत्तम कॅडेट्सचा अतिरिक्त महासंचालकांकडून सत्कार

·      विकसित भारत संकल्प यात्रेअंतर्गत आतापर्यंत १ कोटींहून अधिक आयुष्मान कार्ड वाटप

आणि

·      लातूर-तुळजापूर महामार्गावर कार आणि ट्रॅक्टर अपघातात चौघांचा मृत्यू

****

छत्रपती संभाजीनगर शहरात सिडको एन सेवन परिसरात आज कोविडचे दोन रुग्ण आढळले आहेत. यात एका दहा वर्षीय बालिका तसंच ६५ वर्षीय वृद्ध महिलेचा समावेश आहे. या दोन्ही रुग्णांना गृह विलगीकरणात ठेवण्यात आलं असून, दोघांची प्रकृती स्थिर असल्याचं महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ पारस मंडलेचा यांनी सांगितलं. या दोन्ही रुग्णांच्या श्वसन स्रावाचे नमुने जीनोम सिक्वेंसिंगसाठी पाठवण्यात आले असून, त्यांच्या कुटुंबातल्या इतर सदस्यांचीही कोविड चाचणी करण्यात आली आहे, या चाचणीचे अहवाल अद्याप प्रलंबित असल्याची माहिती डॉ मंडलेचा यांनी दिली. दरम्यान, या पार्श्वभूमीवर नागरिकांनी खबरदारी बाळगण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.

****

सांगली-मिरज कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रात कोविडचे दोन नवीन रुग्ण आढळून आले असून या दोन्ही रुग्णांची कोविड टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. हे दोनही रुग्ण ठणठणीत असल्याची माहिती महापालिका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर वैभव पाटील यांनी आज दिली. त्यामुळं नागरिकांनी घाबरून न जाता कोविड -19 मध्ये आपण ज्या गोष्टींचं पालन केलं त्या गोष्टीचं पालन करावं आणि आपल्या तब्येतीची काळजी घ्यावी असं सांगत, सांगली जिल्ह्यामध्ये आरोग्य यंत्रणा सतर्क असल्याची माहिती डॉक्टर विक्रम सिंह कदम यांनी यावेळी दिली.

****

नागपूर जिल्हा सहकारी बँक -एनडीसीसी मध्ये दीडशे कोटी रुपये घोटाळा प्रकरणी माजी मंत्री सुनील केदार यांना पाच वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. २००२ मध्ये नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत हा कोट्यवधी रुपयांचा घोटाळा उघडकीस आला होता, त्यावेळी सुनील केदार हे बँकेचे अध्यक्ष होते. या प्रकरणी नागपूरचे अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी जे. व्ही. पेखले-पूरकर यांच्या न्यायालयाने केदार यांच्यासह पाच जणांना आज दोषी ठरवलं अ‍सून त्यांना पाच वर्षांची शिक्षा सुनावली आहे.

****

मुंबईत येत्या २० ते २८ जानेवारी दरम्यान 'मुंबई फेस्टिव्हल २०२४' आयोजित करण्यात आला आहे. हा महोत्सव यशस्वी करण्यासाठी सर्व सहभागी संस्थांनी समन्वयानं काम करण्याचे निर्देश पर्यटन मंत्री गिरीश महाजन यांनी दिले आहेत. ते आज मुंबईत सह्याद्री अतिथीगृहात या महोत्सवाच्या पूर्वतयारीबाबत झालेल्या आढावा बैठकीत बोलत होते. या महोत्सवामध्ये शॉपिंग मॉल, कला दालने, सिनेमा गृह, हॉटेल, फूड कोर्ट, साहसी क्रीडा केंद्रे, मनोरंजन केंद्रे, सीटी टूर यांचा समावेश असणार आहे. मुंबई फेस्टिवलची माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी विविध समाज माध्यमांचा प्रभावी वापर करुन या महोत्सवात लोकांचा सहभाग वाढवण्यात यावा, असं आवाहन महाजन यांनी केलं.

****

राष्ट्रीय छात्र सेना - एनसीसीच्या अखिल भारतीय थल सैनिक शिबीरात सर्वोत्तम ठरलेल्या कॅडेट्सचा एनसीसीचे अतिरिक्त महासंचालक मेजर जनरल योगेंदर सिंह यांच्याहस्ते आज सत्कार करण्यात आला. नवी दिल्लीत ऑक्टोबर महिन्यात झालेल्या या शिबीरात महाराष्ट्रातल्या कॅडेट्सनी मुलींच्या गटात दुसरा तर मुलांच्या गटात तिसरा क्रमांक पटकावला आहे. छत्रपती संभाजीनगर इथं एनसीसी मुख्यालयात झालेल्या या कार्यक्रमात राज्याचे ग्रूप कमांडर ब्रिगेडियर यू के ओझा यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते. महाराष्ट्रात एनसीसी कॅडेट्सना दिलं जात असलेलं प्रशिक्षण तसंच व्यवस्थापनाबद्दल सिंह यांनी समाधान व्यक्त केलं. योगेंदर सिंह यांनी देवगिरी महाविद्यालयाच्या पथकाने दिलेल्या गार्ड ऑफ ऑनरचं कौतुक केलं. सिंह यांनी या दौऱ्यात एमजीएम विद्यापीठालाही भेट देऊन कुलपती तसंच कुलगुरूंशी चर्चा केली.

****

विकसित भारत संकल्प यात्रेअंतर्गत आतापर्यंत १ कोटींहून अधिक आयुष्मान कार्ड तयार करण्यात आली आहेत. एकोणऐंशी हजारांहून अधिक विकसित भारत आरोग्य शिबिरांमध्ये १ कोटी ३१ लाख ६६ हजारांपेक्षा अधिक नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. यात ४९ लाखांहून अधिक लोकांची क्षयरोग तपासणी तर, ३ लाख ४० हजारांहून अधिक नागरिकांना उच्च दर्जाच्या सार्वजनिक आरोग्य सुविधांची शिफारस करण्यात आली.

दरम्यान, विकसित भारत संकल्प यात्रा आज छत्रपती संभाजीनगर शहरातील हडको परिसरातील साई मंदिर इथं पोहचली. या निमित्त केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ भागवत कराड उपस्थित होते. केंद्र सरकारच्या विविध योजना गोरगरिबांपर्यंत पोहचवण्यासाठी विकसित भारत संकल्प यात्रा आपल्याकडं आली असून या योजना समजून, जाणून घ्या आणि लाभार्थी बना असं आवाहन कराड यांनी यावेळी केलं. ते म्हणाले -

या गाडीच्या माध्यमातून नागरिकांना वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून मदत कशी मिळते ही माहिती दिली जाते. मी आकाशवाणीच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांना विनंती करणार आहे, आपलं आरोग्य असेल, आपल्या घरातील गॅस असेल, आपला राहण्यासाठी घर असेल किंवा आपणाला लागणारा, गोरगरिबांसाठी अन्नधान्य असतील, शेतकऱ्यांसाठी निधी असेल अशा वेगवेगळ्या जवळजवळ ३४ योजनांची माहिती दिली जाते. आपण सुद्धा यामध्ये समावेश पहा आणि आपला विकास करा. आपला विकास म्हणजे भारत देशाचा विकास.

****

या यात्रेअंतर्गत मेरी कहानी मेरी जुबानी या सदरात अनेक लाभार्थी आपल्याला मिळालेल्या लाभाची माहिती देत आहेत. छत्रपती संभाजीनगर इथले योगेश सुरडकर आणि रत्नमाला पठाडे यांनी आपलं मनोगत या शब्दांत व्यक्त केलं.

बाईट - योगेश सुरडकर आणि रत्नमाला पठाडे, छत्रपती संभाजीनगर

****

विकसित भारत संकल्प यात्रेचा उद्देश गावखेड्यातील शेवटच्या घटकापर्यंत केंद्र आणि राज्य सरकारच्या कल्याणकारी योजनाचा लाभ पोहोचवण्याचं केंद्रीय कापड उद्योग मंत्रालयाच्या सह सचिव प्राजक्ता लवंगारे-वर्मा यांनी केलं आहे. त्या आज लातूर जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठकीत बोलत होत्या. या यात्रेत जास्तीत जास्त पात्र लाभार्थ्यांची नोंदणी होण्यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचना लवंगारे-वर्मा यांनी दिल्या.

****

सोलापूर जिल्ह्यात २३ नोव्हेंबर पासून विकसित भारत संकल्प यात्रे अंतर्गत विविध केंद्रीय योजनांची माहिती शहरी आणि ग्रामीण भागात देण्यासाठी चित्ररथ गावोगावी आणि शहरात फिरत आहेत. तरी सर्व संबंधित शासकीय यंत्रणांनी केंद्र आणि राज्य शासनाच्या योजनांची माहिती तसंच लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी सूक्ष्म नियोजन करून त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी असं आवाहन सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केलं आहे.

****

लातूर जिल्ह्यातील लातूर-तुळजापूर महामार्गावर मध्यरात्री कार आणि ऊसाच्या ट्रॅक्टर ट्रॉलीचा भीषण अपघातात कारमधील चार जणांचा जागीच मृत्यू झाला. मृत पावलेल्या चार पैकी तीन जण जिल्हा परिषद शाळेत शिक्षक होते. औसा शहराजवळ भरधाव वेगातील कार लोखंडी ट्रॉलीला मागच्या बाजूनं धडकल्यानं हा अपघात झाला.

****

 

लोकसाहित्याचे गाढे अभ्यासक पद्मश्री डॉ. प्रभाकर मांडे यांच्या पार्थिव देहावर आज सकाळी अहमदनगर इथं शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. विधानसभेचे माजी अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्यासह विविध क्षेत्रातल्या मान्यवरांनी यावेळी मांडे यांचं अंत्यदर्शन घेऊन त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. मांडे यांचं काल अहमदनगर इथं निधन झालं, ते ९० वर्षांचे होते.

****

'हेड टू टेल' या अभियानांतर्गत नांदेड इथल्या विष्णुपुरी प्रकल्पाच्या मुख्य कालव्याची आतापर्यंत २८ किलोमीटर अंतरातील कालव्याची स्वच्छता करण्यात आली आहे. एकूण ४९ किलोमीटर अंतराच्या या कालव्याच्या स्वच्छतेमुळे पाणी पातळी आणि वहन क्षमता यात लक्षणीय वाढ झाली आहे, अशी माहिती यांत्रिकी मंडळाचे अधिक्षक अभियंता जितेंद्र गंटावार यांनी दिली.

****

No comments:

Post a Comment