▼

Friday, 22 December 2023

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर, दिनांक: 22.12.2023 रोजीचे सकाळी: 11.00 वाजेचे मराठी संक्षिप्त बातमीपत्र

 आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

संक्षिप्त बातमीपत्र

२२ डिसेंबर २०२३ सकाळी ११.०० वाजता

****

जम्मू-काश्मीरमध्ये पूँछ जिल्हयात थानामंडी इथं काल लष्करी वाहनावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात चार सैनिकांना वीरमरण आलं, तर दोन जण जखमी झाले. डेरा की गली इथं रात्री उशीरापर्यंत ही चकमक सुरु होती. काही दहशतवादी लपून असल्याची माहिती मिळाल्यानंतर दोन वाहनांमधून लष्कराचे सैनिक कारवाईसाठी जात असताना हा हल्ला झाला. या परिसरात अद्यापही शोधमोहिम सुरु आहे. 

****

फौजदारी कायद्यात सुधारणा करणारी तीन विधेयकं संसदेत मंजूर झाल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समाधान व्यक्त केलं आहे. देशाच्या अमृतकाळात होत असलेले कायद्यातले बदल, कायद्याची चौकट कालानुरुप आणि समान अनुभूती पूर्ण करणारे असून, या सुधारणा विधेयकांमुळे वसाहतवाद कालीन कायदे संपुष्टात आणले असल्याचं पंतप्रधानांनी ट्विट संदेशात म्हटलं आहे.

****

मेरा युवा भारत पोर्टलसाठी आतापर्यंत २६ लाखांपेक्षा अधिक युवकांनी नोंदणी केली आहे. गेल्या ३१ ऑक्टोबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कर्तव्य पथावरुन यासंदर्भात आवाहन केलं होतं, त्याला युवकांनी मोठा प्रतिसाद दिला. या पोर्टलद्वारे विकसित भारताचं स्वप्न साकार करण्यासाठी सर्वांना समान संधी उपलब्ध करुन देण्याच्या उद्देशानं आणि युवकांच्या विकासासाठी, तंत्रस्नेही व्यासपीठ उपलब्ध करुन देण्यात आलं आहे.

****

गडचिरोली जिल्ह्यात धानोरा तालुक्यातल्या सोडे इथं शासकीय आश्रमशाळेतल्या आणखी ३३ विद्यर्थिनींना काल जेवणातून विषबाधा झाली. त्यांना ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. जिल्हाधिकारी संजय मीणा यांनी आश्रमशाळेला भेट देऊन, अन्नधान्य आणि इतर बाबींची पाहणी केल्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक निर्देश दिले.

****


लातूर जिल्ह्यात प्रधानमंत्री टीबी मुक्त भारत अभियान राबवण्यात येत असून, यामध्ये विविध औद्योगिक संस्था, स्वंयसेवी संस्था, सामाजिक संस्था, दानशूर व्यक्ती, कर्मचारी तसंच अधिकारी यांनी सहभाग नोंदवावा, असं आवाहन जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर - घुगे यांनी केलं आहे. क्षयरुग्णांना उपचार कालावधीमध्ये सकस आहार उपलब्ध होण्यासाठी सहकार्य करावं, असं आवाहन त्यांनी काल यासंदर्भातल्या बैठकीत केलं.

****

No comments:

Post a Comment