▼

Saturday, 23 December 2023

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर, दिनांक: 23.12.2023 रोजीचे सकाळी: 11.00 वाजेचे मराठी संक्षिप्त बातमीपत्र

 आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

संक्षिप्त बातमीपत्र

२३ डिसेंबर २०२३ सकाळी ११.०० वाजता

****

कोरोनाचा नवा विषाणू जेएन-वन देशासह राज्यात आढळून येत असून या पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्यातल्या नागरिकांनी घाबरून न जाता योग्य काळजी घ्यावी तसंच कोविडचा संसर्ग आणि प्रसार होणार नाही याची खबरदारी घ्यावी, असं आवहन जिल्हाधिकारी दीपा मुधोळ- मुंडे यांनी केलं आहे.

***

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेकडून आगामी वर्षातील जानेवारी ते मे या कालावधीत महाराष्ट्र शासनाच्या सहकार्यानं शतकमहोत्सवी नाट्यसंमेलन साजरं होणार आहे. या निमित्त बीडमध्ये २४ ते २६ डिसेंबर या कालावधीत नाट्यकर्मींसाठी नाट्यकलेचा जागर हा स्पर्धात्मक महोत्सव होणार आहे. अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या बीड शाखेच्या अध्यक्षा डॉ. दीपा क्षीरसागर यांनी काल ही माहिती दिली.

***

महाराष्ट्रातील रेल्वेस्थानकं आणि रेल्वेरुळालगत रेल्वेच्या जमिनीवर असणाऱ्या झोपडपट्ट्यांच्या प्रश्नांवर काल केंद्रिय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केंद्रिय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेऊन चर्चा केली. यावेळी रेल्वे रुळालगत असणाऱ्या झोपड्या काढून टाकण्याची कार्यवाही तातडीनं थांबवण्याची मागणीही केली. ४० वर्षाहुन अधिक काळापासून वसलेल्या झोपडपट्ट्यांच्या बाबतीत सहानुभूतीनं विचार करण्याची विनंती त्यांनी या निवेदनात केली आहे.

***

नांदेड जिल्ह्यात मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाद्वारे स्वयंरोजगार निर्मितीला चालना देण्यासाठी येत्या मंगळवारी २६ डिसेंबर रोजी पंचायत समिती सभागृह नायगाव आणि बिलोली इथं सकाळी दहा वाजता रोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे. या मेळाव्यासाठी तालुक्यातील पात्र आणि होतकरू सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींनी उपस्थित राहावं, असं आवाहन जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक अमोल इंगळे यांनी केलं आहे.

****

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. प्रमोद येवले यांचा अंबाजोगाईकरांच्या वतीनं येत्या मंगळवारी २६ डिसेंबर रोजी सत्कार करण्यात येणार आहे.

***

No comments:

Post a Comment