Tuesday, 2 January 2024

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर संक्षिप्त बातमीपत्र ०२ जानेवारी २०२४ सकाळी ११.०० वाजता

 

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

संक्षिप्त बातमीपत्र

०२ जानेवारी २०२ सकाळी ११.०० वाजता

****

चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या ९ महिन्यात देशाच्या जीएसटी संकलनात १२ टक्क्यांची वाढ झाली आहे. डिसेंबरअखेर सुमारे १५ लाख कोटी रुपयांचा महसूल जीएसटी अंतर्गत जमा झाला. गेल्या महिन्यात १ लाख ६४ हजार ८८२ कोटी रुपये जीएसटी महसुलाच्या रुपानं केंद्र सरकारच्या तिजोरीत जमा झाले. त्यात महाराष्ट्राचा वाटा सर्वाधिक २६ हजार ८१४ कोटी रुपये आहे.

****

चालू आर्थिक वर्षात कालपर्यंत आठ कोटी १८ लाख अशा विक्रमी संख्येनं आयटीआर अर्थात आयकर विवरणपत्रं भरली गेली. गेल्या आर्थिक वर्षात दाखल केलेल्या एकूण आयटीआरपेक्षा हे प्रमाण नऊ टक्क्यांनी जास्त आहे. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाच्या माहितीनुसार, गेल्या वर्षी याच कालावधीत सुमारे साडेसात कोटी आयटीआर दाखल झाले होते.

****

बब्बर खालसा या दहशतवादी संघटनेशी संबंधित गुन्हेगार गोल्डी ब्रार याला केंद्रसरकारनं युएपीए म्हणजे बेकायदेशीर कारवाया प्रतिबंधक कायद्याखाली दहशतवादी घोषित केलं आहे. खून, खंडणी आणि धमक्यांच्या अनेक गुन्ह्यांमधे त्याचा हात असल्याचं केंद्रीय गृहमंत्रालयाच्या पत्रकात म्हटलं आहे.

****

हवामानाच्या दृष्टीनं २०२३ हे वर्ष गेल्या १२३ वर्षातलं भारतासाठीचं दुसरं सर्वात उष्ण वर्ष ठरलं आहे, असं भारतीय हवामान विभागानं काल जाहीर केलं. गेल्यावर्षी सरासरीपेक्षा ६५ शतांश सेल्सियस अधिक तापमानाची नोंद भारतात झाली. गेल्या वर्षीचे ऑगस्ट, सप्टेंबर आणि नोव्हेंबर हे तीन महिने सरासरीपेक्षा अधिक तापमान नोंदवण्यात आलेल्या गेल्या १२३ वर्षातले सर्वात उष्ण महिने ठरले.

****

महिला क्रिकेट स्पर्धेत भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यानच्या एक दिवसीय सामन्यांच्या मालिकेतला तिसरा आणि अखेरचा सामना आज मुंबईतल्या वानखेडे स्टेडियमवर दुपारी दीड वाजता सुरू होणार आहे.

****

No comments:

Post a Comment