Monday, 1 January 2024

TEXT - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 01.01.2024 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजताचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chatrapati Sambhajinagar

Date – 01 January 2024

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक – ०१ जानेवारी २०२४ सायंकाळी ६.१०

****

·      एक्सपोसॅट, अर्थात एक्स-रे पोलारिमीटर या उपग्रहाचं यशस्वी प्रक्षेपण

·      पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेची पुढील पाच वर्षांसाठी अंमलबजावणी आजपासून सुरु

·      राज्य शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभागामार्फत नवीन वर्षात १०० महाविद्यालयांमध्ये कौशल्य विकास केंद्र सुरु केली जाणार

आणि

·      विकसित भारत संकल्प यात्रेचं ठिकठिकाणी यशस्वी मार्गक्रमण

****

भारतीय अंतराळ संशोधन संस्था - इस्रोनं आज एक्सपोसॅट, अर्थात 'एक्स-रे पोलारिमीटर' या उपग्रहाचं यशस्वीपणे प्रक्षेपण केलं. आंध्र प्रदेशमध्ये श्रीहरिकोटा इथल्या सतीश धवन अंतराळ केंद्रामधून आज सकाळी PSLV-C58 या ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपकाच्या सहाय्यानं, हा उपग्रह अवकाशात झेपावला. या उपग्रहाबरोबर इतर दहा वैज्ञानिक उपग्रहांचं देखील यावेळी प्रक्षेपण करण्यात आलं. खगोलीय स्त्रोतांपासून वैश्विक क्ष-किरणांच्या ध्रुवीकरणाचा अभ्यास करण्याचा, भारताचा हा पहिलाच प्रयत्न आहे. एक्सपोसॅट उपग्रहाच्या प्रक्षेपणामुळे, आकाशगंगेतली कृष्ण विवरं आणि न्यूट्रॉन ताऱ्यांचा अभ्यास करण्यासाठी विशेष खगोलशास्त्रीय वेधशाळा अवकाशात पाठवणारा अमेरिकेनंतरचा भारत हा जगातला दुसरा देश ठरला आहे. एक्सपोसॅट अभ्यास उपग्रहाचा कालावधी पाच वर्षांचा असून, तो कक्षेत यशस्वीपणे स्थिरावल्याचं इसरोचे प्रमुख एस. सोमनाथ यांनी सांगितलं.

एक्सपोसॅटच्या यशस्वी प्रक्षेपणाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आनंद व्यक्त करत इस्रोच्या शास्त्रज्ञांची प्रशंसा केली आहे. २०२४ ची ही चांगली सुरुवात असून, अंतराळ क्षेत्रात भारताची ताकद आणखी वाढवणारी ही बातमी असल्याचं, त्यांनी ट्विट संदेशात म्हटलं आहे.

अंतराळ राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनीही या यशस्वी प्रक्षेपणाबद्दल इस्रोचं अभिनंदन केलं आहे.

****

पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेची पुढील पाच वर्षांसाठी अंमलबजावणी आजपासून सुरु झाली. या योजनेंतर्गत ८१ कोटींहून अधिक लाभार्थ्यांना अन्न धान्याचं मोफत वाटप केलं जाईल. नोव्हेंबर महिन्यामध्ये झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत या योजनेला पुढील पाच वर्षांसाठी मंजुरी देण्यात आली होती. केंद्र सरकारची ही योजना म्हणजे लाभार्थ्यांसाठी अन्नधान्य आणि पोषण सुरक्षा पुरवणारा ऐतिहासिक निर्णय आहे. अन्नसुरक्षा पुरवणारी ही जगातील सर्वात व्यापक मोहीम आहे, या मोहिमेवर ११ लाख ८० हजार कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे. या योजनेंतर्गत गरीब कुटुंबांना ५ किलो धान्य मोफत देण्यात येतं. कोरोना काळात जनतेला या योजनेचा मोठा लाभ मिळाला होता.

****

राज्य शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभागामार्फत नवीन वर्षात राज्यातल्या १०० महाविद्यालयांमध्ये कौशल्य विकास केंद्र सुरु केली जाणार आहेत. १५ ते ४५ वयोगटातल्या व्यक्तींना रोजगारक्षम बनवण्यासाठी कौशल्य विकास सोसायटीमार्फत प्रमोद महाजन कौशल्य आणि उद्योजकता विकास अभियानाची अंमलबजावणी केली जाणार आहे. कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या प्रयत्नांतून कौशल्य संपन्न महाराष्ट्राच्या दिशेनं सरकारने या माध्यमातून आणखी एक महत्वपूर्ण पाऊल उचललं आहे.

****

दरम्यान, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित - एम एस ई बी च्या "विद्युत सहाय्यक" या पदभरती जाहिरातीतील शैक्षणिक अर्हता मध्ये व्यवसाय शिक्षण आणि प्रशिक्षण मंडळाच्या अभ्याक्रमांचा समावेश करण्यात आला असल्याची माहिती लोढा यांनी दिली. यामुळे राज्यातल्या विविध कौशल्यपूर्ण व्यवसाय अभ्यासक्रमांच्या प्रवेशाला चालना मिळेल, असं ते म्हणाले.

****

भीमा कोरेगावच्या २०६ व्या शौर्यदिनानिमित्त पुणे जिल्ह्यातल्या पेरणे फाटा इथल्या विजयस्तभांला अभिवादन करण्यासाठी आज अनुयायांनी मोठी गर्दी केली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार तसंच क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांनी सकाळी या विजयस्तंभाला अभिवादन केलं. वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी देखील याठिकाणी अभिवादन केलं.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर लिखित 'द प्रॉब्लेम ऑफ रुपी' या ग्रंथाच्या शताब्दी वर्षानिमित्त बार्टीमार्फत आयोजित ग्रंथ प्रदर्शनाचं उद्घाटन, संजय बनसोडे यांच्या हस्ते यावेळी करण्यात आलं. विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी विविध क्षेत्रांतील मान्यवर दाखल होत आहेत. या कार्यक्रमासाठी प्रशासन आणि पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे.

****

भीमा कोरेगाव इथल्या ऐतिहासिक विजयस्तंभाजवळची शंभर एकर जमीन राज्य शासनाने संपादित करून याठिकाणी भव्य आंतरराष्ट्रीय स्मारक उभारावं, त्यासाठी ५०० कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करावी, अशी मागणी, रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली आहे. विजयस्तंभाला अभिवादन केल्यानंतर ते बोलत होते. या मागणीसाठी आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटून लवकरच पत्र देणार असल्याचं त्यांनी सांगितलं.

****

देशातल्या नागरीकांनी नमो ॲप वर जनमन सर्वेक्षणात सहभागी होऊन गेल्या दहा वर्षात झालेल्या प्रगतीसंबंधी आपले विचार मांडावे, असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. हॅश टॅग जन मन सर्वे चा वापर करुन नागरीक आपली मतं थेट आपल्याला पाठवू शकतील, असं त्यांनी ट्विट संदेशात सांगितलं आहे.

****

विकसित भारत संकल्प यात्रा आज छत्रपती संभाजीनगर मधल्या मथुरा नगर, गुलमोहर कॉलनी परिसरात पोहचली. स्थानिक नागरिकांनी यावेळी केंद्र सरकारच्या विविध योजना जाणून घेतल्या.

****

रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडशी गावात आज विकसित भारत संकल्प यात्रेनं जनजागृती केली. या वेळी बचत गटांतील महिलांसह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते. प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजनेची माहिती देण्यात आली. तसंच, फवारणीसाठी ड्रोनचं प्रात्यक्षिक दाखवण्यात आलं आणि आरोग्य तपासणी शिबिरही घेण्यात आलं.

दरम्यान, मेरी कहानी मेरी जुबानी अंतर्गत परभणी जिल्ह्यातले गोकर्णा कदम आणि मीरा इंगळे यांनी त्यांना मिळालेल्या लाभांची माहिती दिली.

बाईट - गोकर्णा कदम आणि मीरा इंगळे, जि.परभणी

****

लातूर जिल्ह्यातल्या ११ लाख २७ हजार पात्रताधारक लाभार्थ्यांना आयुष्मान कार्ड मिळणार असून, आतापर्यंत केवळ २८ टक्के नागरीकांनीच हे कार्ड काढून घेतलं असल्याची माहिती आयुष्मान भारत मिशन महाराष्ट्र समितीचे प्रमुख डॉ. ओमप्रकाश शेटे यांनी दिली. लातूर इथं आज आयुष्मान भारत योजना आणि महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. जिल्हा प्रशासनाने मिशन मोडवर जनतेची आयुष्मान कार्ड काढून घ्यावीत, येत्या काही महिन्यात आयुष्मान भारत मिशन मध्ये मोठे बदल अपेक्षित असून, आयुष्मान कार्डचे महत्व ए.टी.एम. कार्डसारखे वाढेल, असं शेटे यावेळी म्हणाले.

****

छत्रपती संभाजीनगर इथं आज दुसऱ्या फुले-शाहू-आंबेडकरी साहित्य संमेलनाचा प्रसिद्ध विचारवंत लक्ष्मण माने यांच्या उपस्थितीत समारोप होत आहे. यावेळी शैक्षणिक तसंच सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा गौरव करण्यात आला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर साहित्य परिषद आणि सिल्लोड शिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने नुतन बहुउद्देशिय विद्यालय परिसरात हे संमेलन घेण्यात आलं.

****

उत्तर भारतात पसरलेल्या धुक्यामुळे अमृतसरहून नांदेडकडे येणारी सचखंड एक्सप्रेस उशिरा धावत असल्यामुळे नांदेड इथून सुटणाऱ्या सचखंड एक्सप्रेसच्या वेळेत बदल झाला आहे. आज सकाळी साडे नऊ वाजता सुटणारी नांदेड - अमृतसर सचखंड एक्सप्रेस उद्या सकाळी साडे चार वाजता सुटणार असल्याचं दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागानं कळवलं आहे.

****

बुलढाणा जिल्ह्यातल्या शेगाव इथं नववर्षानिमित्त श्री संत सत्गुरू श्री गजानन महाराज यांच्या दर्शनासाठी भाविकांनी आज मोठी गर्दी केली आहे. काल रात्रभरही गजानन महाराजांचं मंदिर भक्तांसाठी खुलं करण्यात आलं होतं.

****

धुळे जिल्हा स्वस्त धान्य संघटनेतर्फे आजपासून संप पुकारण्यात आला आहे. स्वस्त धान्य दुकानदारांनी सकाळी तहसिल कार्यालयासमोर निदर्शनं केली तसंच संघटनेच्या शिष्टमंडळानं यासंदर्भात जिल्हा प्रशासन आणि पुरवठा विभागाला लेखी निवेदन दिलं.

****

धुळे जिल्ह्यात पोलीस विभागानं दोन गावठी पिस्तुलं, पाच जिवंत काडतुसं असा ७५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याशिवाय १० लाख २४ हजार रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला. तसंच जिल्ह्यात विविध ११७ प्रकरणांतील गुन्ह्यांमध्ये ४९ हजार ७०० रूपयांचा दंड वसूल करण्यात आला असल्याची माहिती, जिल्हा पोलिस अधिक्षक श्रीकांत धिवरे यांनी दिली.

****

No comments:

Post a Comment