Wednesday, 3 January 2024

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर, दिनांक: 03.01.2024, रोजीचे सकाळी: 07.10 वाजताचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 03 January 2024

Time 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक ०३ जानेवारी २०२ सकाळी ७.१० मि.

****

·      देशभरातल्या वाहतुकदारांचा संप मागे;इंधन पुरवठा आज सुरळीत होण्याची शक्यता  

·      मराठा आरक्षणासंदर्भातलं सर्वेक्षण कालमर्यादेत पूर्ण करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

·      राज्यात कोविड जेएन-वन चे नवे पाच रुग्ण-छत्रपती संभाजीनगर इथल्या दोघांचा समावेश

आणि

·      अजिंठा-वेरुळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला आजपासून प्रारंभ

****

देशभरातल्या वाहतुकदारांनी पुकारलेला संप मागे घेतला आहे. केंद्रीय गृह मंत्रालय आणि अखिल भारतीय मोटार वाहन संघटना यांच्यात काल नवी दिल्लीत झालेल्या बैठकीनंतर संप मागे घेण्यात आला. या बैठकीत गृहमंत्रालयाने नवीन वाहन कायद्यातल्या हीट एण्ड रनतरतूद तुर्तास लागू होणार नाही असं जाहीर केलं. भारतीय न्याय संहिता १०६-२ ही तरतूद अद्याप लागू झालेली नाही, ती लागू करण्यापूर्वी अखिल भारतीय मोटात वाहतूक कॉंग्रेसच्या प्रतिनिधींशी चर्चा केली जाईल, असं केंद्रीय गृह सचिव अजय भल्ला यांनी यावेळी सांगितलं.

**

दरम्यान, महाराष्ट्रात काल अनेक ठिकाणी वाहतुकदारांनी आंदोलन केलं. पेट्रोल आणि डिझेल टँकर चालक देखील या संपात सहभागी होते, परिणामी पेट्रोल पंपांवर पुरेसा इंधन साठा शिल्लक नसल्याने, छत्रपती संभाजीनगर शहरातल्या बहुतांश पेट्रोल पंपावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. संपामुळे फळं-भाजीपाला तसंच दूध वितरणावर देखील परिणाम झाला तसंच औद्योगिक उत्पादनांची वाहतूक देखील ठप्प झाली होती.

**

हिंगोली जिल्ह्यात नांदेड - वाशिम राष्ट्रीय महामार्गावर बासंबा फाटा तसंच वसमत तालुक्यातल्या कुरुंदा इथं वाहन चालक-मालक संघटनेच्या वतीनं चक्का जाम आंदोलन करण्यात आलं. संपामुळे हिंगोली जिल्ह्यातल्या ५१ पैकी १५ पंपांवर पेट्रोल, डिझेलचा साठा संपला असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

**

नांदेड इथं जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी जिल्ह्यातल्या पेट्रोल पंप चालकांची, पेट्रोलियम कंपन्यांच्या प्रतिनिधींची बैठक घेतली. जिल्ह्यात सात ते आठ दिवस पुरेल इतका पेट्रोल साठा उपलब्ध आहे. त्यामुळे नागरिकांनी कोणताही अतिरिक्त साठा करू नये, असं आवाहन त्यांनी केलं. पेट्रोल वाहतूक करणाऱ्या टँकरचं संनियंत्रण केलं जात असून, जिल्ह्यात कोणताही पेट्रोल तुटवडा निर्माण होणार नाही याची खबरदारी घेतली जाईल असं राऊत यांनी स्पष्ट केलं.

**

दरम्यान, नाशिकचे जिल्हाधिकारी जलज शर्मा आणि पोलीस अधीक्षक शहाजी उमप यांच्याशी झालेल्या चर्चेत तोडगा निघाल्यानं मनमाडमध्ये टँकर चालकांनी संप मागे घेतला. यामुळे मराठवाड्यासह उत्तर महाराष्ट्रातला इंधन पुरवठा आज सुरळीत होण्याची शक्यता याबाबतच्या वृत्तात वर्तवण्यात आली आहे.

****

राज्यात स्वयंपाकाचा गॅस, पेट्रोल आणि डिझेलचा पुरवठा सुरळीत सुरू राहण्यासाठी उपाययोजना कराव्यात, अशा सूचना अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी सर्व जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त आणि पोलीस अधीक्षक यांना केल्या आहेत. इंधनाचा समावेश जीवनावश्यक वस्तूमध्ये होतो. सर्व यंत्रणांनी या अंतर्गत आवश्यक कार्यवाही करावी, तसंच अत्यावश्यक वस्तूंची वाहतूक आणि पुरवठा खंडित होणार नाही याची काळजी घ्यावी अशा सूचनाही भुजबळ यांनी दिल्या.

****

राज्य मागासवर्ग आयोगामार्फत मराठा आरक्षणासंदर्भात करण्यात येणाऱ्या सर्वेक्षणास प्राधान्य द्यावं, तसंच हे काम बिनचूकरित्या आणि कालबद्ध पद्धतीने पूर्ण करण्याचे निर्देश, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. मुंबईत काल मराठा आरक्षण आणि सुविधा मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत ते बोलत होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी या बैठकीत सहभागी झाले होते. मराठवाड्यात कुणबी नोंदी अधिक प्रमाणात मिळण्यासाठी केलेल्या शिफारशींवर देखील या बैठकीत चर्चा करण्यात आली.

**

दरम्यान, या बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांनी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांच्याशी चर्चा केली, मराठा समाजाच्या अनेक ठिकाणी नोंदी सापडल्याने कायदेशीर आधार आहे, त्यामुळे मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यात काय अडचण आहे, असा सवाल जरांगे यांनी उपस्थित केला. आरक्षणाचा निर्णय येत्या २० जानेवारीपर्यंत घ्यावा, मुदत वाढवून देणार नसल्याचा पुनरुच्चार जरांगे यांनी यावेळी केला.

****

खरीप हंगाम - २०२३ मध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती जाहीर केलेल्या एक हजार २१ मंडळांपैकी ज्या मंडळांचे विभाजन होऊन नवीन महसुली मंडळ स्थापन करण्यात आली आहेत, त्यामध्ये देखील दुष्काळ सदृश्य परिस्थिती जाहीर करण्यात आली आहे. यासंदर्भात स्थापन मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत काल हा निर्णय घेण्यात आला.

****

राज्यात काल कोरोनाच्या जेएन-वन प्रकारच्या आणखी पाच नव्या रुग्णांची नोंद झाल्यानं या प्रकारच्या एकूण रुग्णांची संख्या ३४ झाली आहे. तर काल कोविडचे १०५ नवीन रुग्ण आढळले, तर ३७ रुग्ण बरे झाले. राज्यात सध्या कोविडचे ७९९ सक्रीय रुग्ण आहेत.

दरम्यान, छत्रपती संभाजीनगर इथं काल कोविडचे सात रुग्ण आढळून आले. सध्या शहरात ४७ रुग्णांवर उपचरा सुरु आहेत. तर १६ रुग्णांचे नमुने जिनोम सिक्वेंसिंगसाठी पुण्याला पाठवण्यात आले होते, त्यात दोन जण जे - एन वन या नव्या विषाणूचे रुग्ण असल्याचं समोर आलं आहे.

****

स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती आज साजरी होत आहे. या निमित्ताने सावित्रीबाईंना अभिवादन करण्यासाठी विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे.

****

छत्रपती संभाजीनगर इथं आजपासून अजिंठा - वेरुळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला प्रारंभ होत आहे. संध्याकाळी सात वाजता एमजीएम विद्यापीठात रुक्मिणी सभागृहात होणाऱ्या या उद्घाटन सोहळ्यात ज्येष्ठ गीतकार जावेद अख्तर यांना पद्मपाणी जीनवगौरव पुरस्कारानं गौरवण्यात येणार आहे. जगभरातल्या विविध भाषांमधले सुमारे साठ चित्रपट या महोत्सवात पाहता येणार आहेत.

छत्रपती संभाजीनगर इथल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या मराठी विभागाच्या सभागृहात काल चित्रपट रसग्रहण कार्यशाळा घेण्यात आली. चित्रपट समीक्षक अशोक राणे यांनी यावेळी मार्गदर्शन केलं.

****

नांदेड जिल्ह्यात विकसित भारत संकल्प यात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत जिल्ह्यातल्या ५६५ गावांमध्ये ही संकल्प यात्रा पोहोचली आहे. या यात्रेमध्ये दोन लाख २० हजार ४०४ नागरिकांनी सहभाग नोंदवला. या यात्रेच्या माध्यमातून तीन हजार ४५३ नागरिकांनी सुरक्षा विमा योजनेचा, तर एक हजार ५९३ नागरिकांनी जीवन ज्योती विमा योजनेचा लाभ घेतला आहे. २६ जानेवारीपर्यंत चालणाऱ्या या यात्रेत जिल्ह्यातल्या नागरिकांनी सहभागी होण्याचं आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल यांनी केलं आहे.

****

छत्रपती संभाजीनगर शहरातल्या विद्यानगर इथं काल विकसित भारत संकल्प यात्रा पोहोचली. यावेळी नागरिकांना विविध योजनांची माहिती देण्यात आली.

****

धाराशिव जिल्ह्यातही विकसित भारत संकल्प यात्रा यशस्वी मार्गक्रमण करत आहे. मेरी कहानी मेरी जुबानी अंतर्गत नागरिकांनी त्यांना मिळालेल्या लाभांची माहिती दिली.

****

लातूर-बार्शी-टेंभूर्णी राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणाच्या कामाला गती देण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत. मुंबईत काल यासंदर्भातल्या बैठकीत ते बोलत होते.

****

लातूर जिल्ह्यात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेतंर्गत मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा अभियान राबवण्यात येणार आहे. हे अभियान यशस्वीपणे शेवटच्या घटकांपर्यंत पोहचवण्याचं आवाहन लातूरचे विभागीय शिक्षण उपसंचालक डॉ. गणपतराव मोरे यांनी केलं आहे.

****

परभणी शहर वाहतूक शाखेच्या वतीनं काल नारायण चाळ ते नानलपेठ या दरम्यान जनजागृती रॅली काढण्यात आली. वाहनधारकांनी वाहतूक नियमांचं पालन करावं, असं आवाहन यावेळी करण्यात आलं.

****

लातूर इथं काल ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर-रतनेश्वर मंदिरात प्रभू श्रीरामांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळा अक्षता कलशाचं पूजन आणि निमंत्रण अक्षता वितरणाचा शुभारंभ करण्यात आला.

नांदेड इथं देखील काल अक्षता वाटपाला उत्साहात सुरूवात झाली. जिल्ह्यात हा उत्सव दीपावलीप्रमाणे साजरा करावा, असं आवाहन, नांदेडचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी केलं.

****

भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या महिला क्रिकेट संघादरम्यान काल मुंबईत झालेल्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियानं भारताचा १९० धावांनी पराभव केला. यासोबतच ऑस्ट्रेलियाच्या संघानं तीन सामन्यांची मालिका तीन - शून्य अशी जिकंली.

****

भारत आणि दक्षिण आफ्रिका संघात आज केपटाऊन इथं दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्याला सुरवात होत आहे. दोन सामन्यांच्या या मालिकेत पहिली कसोटी जिंकून यजमान संघ आघाडीवर आहे.

****

छत्रपती संभाजीनगर जिल्हा महिला आणि बाल विकास अधिकारी कार्यालयाच्या वतीनं आयोजित तीन दिवसीय बाल महोत्सवाचं उद्घाटन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीणा यांच्या हस्ते काल झालं. हडको परिसरातल्या सुधार गृहाच्या मैदानावर होत भरवलेल्या या महोत्सवात विविध क्रीडा स्पर्धांसह, सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे.

****

No comments:

Post a Comment