▼

Sunday, 21 January 2024

Text-आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 21.01.2024 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजताचे मराठी बातमीपत्र

 

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 21 January 2024

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक – २१ जानेवारी २०२४ सायंकाळी ६.१०

****

·      अयोध्येत श्रीराममूर्तीची प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात सर्वत्र उत्साह.

·      शोभायात्रांसह विविध कार्यक्रमांमध्ये आबालवृद्धांचा उत्स्फुर्त सहभाग.

·      राज्यातील सर्व विधानसभा मतदारसंघाच्या अंतिम मतदार याद्या परवा प्रसिद्ध होणार.

आणि

·      मराठा समाजाच्या सर्वेक्षणासाठी प्रशासकीय तयारी अंतिम टप्प्यात.

****

अयोध्येत उद्या श्रीराममूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे, या पार्श्वभूमीवर राज्यभरात सर्वत्र उत्साहाचं वातावरण दिसून येत आहे. या सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर मंदिरामध्ये स्वच्छता मोहीम राबवण्याचं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं होतं. त्याला प्रतिसाद देत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मुंबईत कुर्ला इथल्या शिवसृष्टी गणेश मंदिर, कामगार नगरमधल्या नंदिकेश्वर मंदिर, हेरंब मंदिर आणि परिसराची स्वच्छता केली. बाळासाहेब ठाकरे नगर इथंही मुख्यमंत्र्यांनी स्वच्छता मोहिमेत सहभागी होत सफाई कामगारांशी संवाद साधला. यावेळी आमदार मंगेश कुडाळकर, मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त पी. वेलारासु यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

****

या सोहळ्याच्या निमित्ताने छत्रपती संभाजीनगर शहरात भजन, होमहवन, महाआरती आदी धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. शहरातल्या राम मंदिरांसह सर्व मंदिरांवर रोषणाई तसंच सजावट करण्यात आली आहे. घरांवर तसंच बाजारपेठांमध्ये विविध आस्थापनांवर श्रीरामाची छबी असलेले भगवे ध्वज फडकताना दिसत आहेत. टीव्ही सेंटर चौकात श्रीरामाची भव्य प्रतिमा सगळ्यांचं लक्ष वेधून घेत आहे.

****

जालना शहरात आज श्रीराम भक्तांच्यावतीनं भव्य शोभायात्रा काढण्यात आली. जुन्या जालन्यातल्या आनंदवाडी इथल्या श्रीराम मंदिरातून निघालेल्या या यात्रेत बाल, गोपालांसह लहान-थोरांनी उत्साहात सहभाग घेतला. श्रीराम, लक्ष्मण, सीता, वीर हनुमान यांचे सजीव देखावे या शोभायात्रेचं आकर्षण ठरले. महिलांनी सडा-रांगोळी काढून यात्रेचं उत्साहात स्वागत केलं. यानिमित्त ठिकठिकाणी अल्पोपहाराचं वाटपही करण्यात आलं. केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, माजी मंत्री अर्जुन खोतकर यांच्यासह सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातल्या पदाधिकाऱ्यांनी या मिरवुणकीत सहभाग घेतला. नवीन जालन्यातल्या श्रीराम मंदिराजवळ या शोभायात्रेचा समारोप करण्यात आला.

****

हिंगोली इथं श्रीराम भक्त हनुमान मंदिराच्या वतीने आज भव्य कलश यात्रा काढण्यात आली. चिंतामणी गणपती मंदिरापासून सुरु झालेली ही कलशयात्रा महावीर चौक, गांधी चौक, कपडा गल्ली मार्गे गवळीपुरा हनुमान मंदिर भागात विसर्जित करण्यात आली. शहरात विविध ठिकाणी धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.

हिंगोली तालुक्यातल्या राम देऊळगाव इथं असलेल्या श्रीरामचंद्र देवस्थान मंदिरात आमदार तानाजी मुटकुळे यांनी दर्शन घेत मंदिर परिसरात स्वच्छता केली. यावेळी भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष फुलाजी शिंदे, रामदास पाटील सोमठाणकर, यांच्या सह अनेक मान्यवर उपस्थित होते.

****

अहमदनगर जिह्यातल्या शिर्डी इथल्या साईबाबा मंदिरावरही विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.

यवतमाळ इथं श्री बालाजी दुर्गादेवी उत्सव मंडळातर्फे आज भव्य शोभायात्रा काढण्यात आली. शोभायात्रेत रथावर असलेली श्रीरामाची भव्य मूर्ती आणि रामदरबार नागरिकांचं लक्ष वेधून घेत होता. 

दरम्यान, यवतमाळ इथले श्रीरामभक्त जुगल तिवारी यांनी अयोध्येतील राम मंदिराची प्रतिकृती साकारली आहे. जळगाव इथं सराफ बाजारांमधल्या महालक्ष्मी मंदिर देवस्थान ट्रस्टच्या विश्वस्तांनी अयोध्येतील राम मंदिराची प्रतिकृती साकारली असून, ह्या दोन्ही शहरात उभारलेल्या या मंदिराच्या दर्शनासाठी रामभक्त गर्दी करीत आहेत.

****

या सोहळ्याच्या या निमित्ताने बुलडाणा जिल्ह्यात दीपोत्सव साजरा करण्याचं आवाहन विश्व हिंदू परिषद तसच सर्व हिंदू धार्मिक संघटनाच्या वतीनं करण्यात आलं आहे. उद्याचा उत्सव साजरा करण्याची तयारी पूर्ण झाली असून या कार्यक्रमांमध्ये सर्वांनी सहभागी व्हावं, असं आवाहन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक बापुसाहेब करंदीकर यांनी केलं आहे.

****

सोलापूर इथल्या छत्रपती बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने उद्याच्या सोहळ्यानिमित्त एक लाख लाडू प्रसाद वाटप करण्यात येणार आहेत. माजी आमदार दिलीप माने, छत्रपती ग्रुपचे अध्यक्ष माजी नगरसेवक नागेश ताकमोगे आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत हे प्रसाद वाटप करण्यात येणार आहे.

****

कोल्हापूर इथं सकल हिंदू समाजातर्फे ऐतिहासिक दसरा चौकात उभारलेल्या श्रीरामांच्या १०८ फुटी प्रतिमेचं मान्यवरांच्या हस्ते काल उद्घाटन झालं.

****

राज्यातील सर्व विधानसभा मतदारसंघाच्या अंतिम मतदार याद्या उद्या ऐवजी परवा मंगळवारी २३ जानेवारी रोजी प्रसिध्द केल्या जाणार आहेत. उद्या जाहीर झालेल्या सार्वजनिक सुटीमुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.

दरम्यान, अकोला इथं पश्चिम मतदार नोंदणी अधिकारी कार्यालयातर्फे नियोजन भवनात काल मतदान विषयक कार्यशाळा झाली. भावी मतदार असलेल्या विद्यार्थ्यांसाठी अभ्यासक्रम बनवण्यात आला असून तो शिकवण्यासाठी शाळा - महाविद्यालयांत मतदान प्रक्रीया साक्षरता मंडळं स्थापन करण्याचे निर्देश निवडणूक आयोगानं दिले आहेत. सुदृढ लोकशाही प्रक्रिया आणि मतदानाबाबत जागृती करणं, हा यामागचा उद्देश असल्याचं मतदार नोंदणी अधिकारी अनिता भालेराव यांनी सांगितलं. यासंदर्भात मतदान केंद्रस्तरीय अधिकारी आणि शाळांनी प्रयत्न करण्याचं आवाहन त्यांनी केलं.

****

अवास्तव अपेक्षा ठेवू नयेत, कारण अपेक्षाभंगाचा त्रास आपल्यालाच होतो, असं मत मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती नितीन सांबरे यांनी व्यक्त केलं आहे. पालघर इथं न्यायालयाच्या नव्या विस्तारित इमारतीचं उद्घाटन आज न्यायमूर्ती सांबरे यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. प्रलंबित न्यायप्रविष्ट प्रकरणं लवकरात लवकर निकाली काढावेत, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

****

मराठा समाजाचं मागासलेपण तपासण्यासाठी मागास आयोगाच्या वतीने २३ तारखेपासून ३१ तारखेपर्यंत सर्वेक्षण करण्यात येणार आहे. यासाठी प्रशासकीय तयारी पूर्ण होत आली आहे.

नांदेड जिल्ह्यात ३ हजार ६४८ अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून काम करण्यात येणार आहे. जिल्ह्यात ग्रामीण आणि शहरी भागात परवा २३ जानेवारीपासून प्रत्यक्ष सर्वेक्षणाला प्रारंभ होणार आहे. या सर्वेक्षणाच्या अनुषंगाने आज नांदेड इथं शंकराव चव्हाण नियोजन भवनात प्रशिक्षण आणि आढावा बैठक घेण्यात आली. जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी या बैठकीत मार्गदर्शन केलं, जिल्ह्यात सर्व पातळीवरचं प्रशिक्षण पूर्ण करण्यात आल्याची माहिती राऊत यांनी दिली. सुमारे साडेपाच लाख कुटुंबांना भेट देऊन सर्वेक्षणाचं हे काम पूर्ण केलं जाणार आहे. या सर्वेक्षणात तहसीलदार हे नोडल अधिकारी म्हणून तर नायब तहसीलदार हे सहाय्यक नोडल अधिकारी म्हणून जबाबदारी पार पाडणार आहेत.

****

लातूर जिल्ह्यात मराठा आणि खुल्या प्रवर्गातील सर्वेक्षण परवा २३ जानेवारी पासून सुरु होत असून त्याला नागरिकांनी सहकार्य करावं, असं आवाहन जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर - घुगे यांनी केलं आहे. लातूर इथं सर्वेक्षण पूर्व तयारी आढावा बैठकीत त्या आज बोलत होत्या. या सर्वेक्षणाचा उपयोग राज्यस्तरावरील निर्णय प्रक्रियेत महत्त्वाचा वाटा असेल, त्यामुळे जागृकपणे सर्वेक्षण करण्याच्या सक्त सूचना ठाकूर यांनी दिल्या.

दरम्यान, जिल्ह्यातल्या १९६७ पुर्वीच्या १ हजार ४६ शाळांच्या दप्तरांची प्राधिकृत अधिकाऱ्यांच्या निगराणी खाली फेरतपासणी करण्याच्या सूचना ठाकूर यांनी दिल्या. या कामात कोणतीही हलगर्जी खपवून घेतली जाणार नसल्याचं ठाकूर यांनी स्पष्ट केलं. नागरिकांकडे कुणबी नोंदीचा कोणताही पुरावा असेल तर तो तहसील कार्यालय,  नगर परिषद,  नगरपंचायत,  जिल्हाधिकारी कार्यालयात जमा करावा, असं आवाहन ठाकूर यांनी केलं आहे.

****

विकसित भारत संकल्प योजनेंतर्गत मेरी कहानी मेरी जुबानी या उपक्रमांतर्गत परभणी इथले लाभार्थी, प्रणाली काठे पल्लेवार, संजय श्रीमंगले, मीरा लोंढे यांनी आपल्या भावना या शब्दात व्यक्त केल्या.

बाईट - प्रणाली काठे पल्लेवार, संजय श्रीमंगले, मीरा लोंढे, जि. परभणी

****

No comments:

Post a Comment