Tuesday, 23 January 2024

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर, दिनांक:23.01.2024 रोजीचे सकाळी: 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date: 23 January 2024

Time: 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक: २३ जानेवारी २०२ सकाळी ७.१० मि.

****

ठळक बातम्या 

·      अयोध्येतल्या रामजन्मभूमी मंदिरात बाळरामाच्या मूर्तीची विधीवत प्राणप्रतिष्ठा;देशभरात उत्साह 

·      मराठवाड्यात सर्वत्र शोभायात्रा, कलशयात्रा, दीपोत्सव,महाआरतीसह आतिषबाजी

·      राष्ट्रीय बाल पुरस्कार राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते प्रदान

·      छतावर सौर ऊर्जा यंत्रणा बसवणाऱ्या सूर्योदय योजनेची पंतप्रधानांकडून घोषणा

आणि

·      शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाची शिंदे गटाला नोटीस

सविस्तर बातम्या 

अयोध्येत श्री राम जन्मभूमी स्थळी उभारलेल्या मंदिरात बाळरामाच्या मूर्तीची काल विधीवत प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी या सोहळ्यात संपूर्ण देशाच्या वतीनं सहभागी झाले. हा अलौकिक क्षण पुढची हजारो वर्ष लोकमानसात जिवंत राहील, असा विश्वास पंतप्रधानांनी यावेळी व्यक्त केला. ते म्हणाले.

सदियों का अभुतपूर्व धैर्य, अनगिनत बलिदान-त्याग और तपस्या के बाद, हमारे प्रभु राम आ गये हैं. ये सुखद सहयोग है, कि हमारी पीढी को एक कालजयी पथ के शिल्पकार के रूप में चुना गया हैं. हजार वर्ष बाद की पीढी राष्ट्र निर्माण के हमारे आज के कार्यों को याद करेगी.

राममूर्तीच्या या प्रतिष्ठापना सोहळ्यासाठी मंदिराच्या गाभाऱ्यात उत्तरप्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ मोहन भागवत उपस्थित होते. बीड इथले गजानन ज्योतकर यांनी या सोहळ्याचं पौरोहित्य केलं. या सोहळ्यानंतर पंतप्रधानांनी देशभरातून आलेल्या हजारो संतमहंतांना अभिवादन केलं, मंदिर उभारण्यात महत्त्वाचं योगदान असलेल्या श्रमिकांचा पुष्पवर्षाव करून सन्मान केला.

****

अयोध्येच्या या सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर देशभरात विविध कार्यक्रम पार पडले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे इथं ऐतिहासिक श्री कोपिनेश्वर मंदिरात श्री प्रभू रामाची आरती केली. प्रभु राम प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातल्या जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. अयोध्येत बाळरामाची प्रतिष्ठापना ही भारताच्या नव्या अस्मिता पर्वाची सुरुवात असल्याचं, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. काल नागपूर इथं राम मंदिरात झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. नाशिक इथल्याही काळाराम मंदिरात ढोल ताशांचा गजर, शंखध्वनि तसंच घंटानादात रामजयघोष निनादला. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याहस्ते काल सायंकाळी रामाची आरती करण्यात आली.

****

मराठवाड्यातही सर्वत्र हा सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला.

छत्रपती संभाजी नगर शहरात विविध संघटनांच्या वतीने काल मिरवणुका, कलश यात्रा काढण्यात आल्या. नागरिकांनी घरोघरी प्रभुरामाच्या प्रतिमेचं पूजन करून आरती केली. किराडपुरा इथल्या श्रीराम मंदिरात १०५ किलो वजनाच्या लाडूचा प्रसाद वितरित करण्यात आला. समर्थ राम मंदिरातही विविध उपक्रम राबवण्यात आले. खडकेश्वर मंदिर परिसरात काल सायंकाळी दीपोत्सव साजरा झालं. नगरखाना इथल्या ३५० वर्षांपूर्वीच्या श्रीरामाच्या मूर्तीची पाटीदार समाजाच्या वतीने विधिवत पूजा करण्यात आली.

जालना शहरात बडीसडक परिसरातलं श्रीराम मंदिराचा कलशारोहण सोहळा काल साजरा झाला. आनंदवाडी इथल्या श्रीराम मंदिरात अखंड रामजपासह अन्य धार्मिक कार्यक्रम पार पडले. जिल्ह्यातल्या विविध शहरातही यानिमित्त श्रीरामांच्या प्रतिमेची मिरवणूक काढण्यात आली. नागरिकांनी आतषबाजी करत प्रभू श्रीराम जयघोष केला.

बीड इथं टाळ- मृदंगाच्या गजरात पालखी मिरवणूक काढण्यात आली. भाजपतर्फे छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुलावर दीपोत्सव साजरा झाला. खासदार प्रितम मुंडे यांच्या हस्ते प्रभू श्रीरामाची महाआरती करण्यात आली.

लातूरचं ग्रामदैवत असलेल्या सिद्धेश्वर रत्नेश्वर मंदिरात माजी महापौर विक्रांत गोजमगुंडे यांच्या हस्ते श्रीरामाची आरती करण्यात आली. ढोल ताशाच्या गजरात नागरिकांनी श्रीरामाचा जयघोष करत रामरक्षा पठण तसंच दीपोत्सवात सहभाग घेतला.

नांदेड इथं विविध मंदिरामध्ये पहाटेपासूनच धार्मिक विधी सुरू झाले. दुपारच्या सुमारास रामलल्लांची प्रतिष्ठापना होताच शहराच्या अनेक भागात आतिषबाजी तसंच सायंकाळी गोदावरी तिरी आरती करण्यात करण्यात आली.

हिंगोली जिल्ह्यात नरसी नामदेव इथं श्रीराममूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त भव्य कार्यक्रम झाला. परिसरातल्या सुमारे सहा हजार स्वयंसेवक महिलांना आमदार तानाजी मुटकुळे, खासदार हेमंत पाटील यांच्या हस्ते साड्या तसचं साखरेचं वाटप करण्यात आलं. आखाडा बाळापूर परिसरात घरोघरी दीपोत्सव साजरा झाला.

धाराशिव इथं विविध मंदिरांमध्ये प्रभू रामचंद्रांचं पूजन, शोभायात्रा, भजन, ज्ञानेश्वरीचे सामूहिक वाचन, महाप्रसाद आदी उपक्रमांनी  अयोध्येतलं प्राणप्रतिष्ठा सोहळा साजरा करण्यात आला.

परभणी इथं काल सायंकाळी भव्य शोभायात्रा काढण्यात आली. पारंपारिक वाद्यांसह गोंधळी, हलगी पथक तसंच लेझीम पथकासह विविध वेषभुषा केलेले नागरिक मोठ्या संख्येनं या शोभायात्रेत सहभागी झाले.

****

या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत

****

राष्ट्रीय बाल पुरस्कार काल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. कला, संस्कृती, तसंच शौर्यासह विविध क्षेत्रातल्या उल्लेखनीय योगदानासाठी देशातल्या १९ मुलांना हे पुरस्कार प्रदान करण्यात आले. यात नंदूरबारच्या आदित्य ब्राह्मणे याला मरणोत्तर शौर्य पुरस्कार प्रदान करण्यात आला. या सर्व मुलांशी पंतप्रधान आज संवाद साधणार आहेत. ही सर्व मुलं येत्या गणतंत्र दिनाच्या संचलनात सहभागी होणार आहेत.

****

स्वातंत्र्य सेनानी नेताजी सुभाष चंद्र बोस यांची जयंती आज पराक्रम दिवस म्हणून साजरी होत आहे. यानिमित्त आज संध्याकाळी नवी दिल्लीत होणाऱ्या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी होणार आहेत. यावेळी ते भारत पर्व चा शुभारंभ करणार असून, हा कार्यक्रम ३१ जानेवारी पर्यंत चालणार आहे.

दरम्यान, छतावर सौर ऊर्जा यंत्रणा बसवण्यासाठीच्या प्रधानमंत्री सूर्योदय योजनेची पंतप्रधानांनी काल घोषणा केली. या योजनेमुळे गरीब तसंच मध्यमवर्गाच्या दरमहा विजेच्या देयकात कपात होईल, तसंच ऊर्जा क्षेत्रात देश स्वयंपूर्ण होण्यासही मदत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

****

शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी सर्वोच्च न्यायालयानं शिंदे गटाला नोटीस बजावली आहे. विधानसभा अध्यक्षांनी यासंदर्भात दिलेल्या निर्णया विरोधात उद्धव ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्याप्रकरणी न्यायालयानं ही नोटीस बजावत, दोन आठवड्यात उत्तर देण्याचे आदेश शिंदे गटाला दिले आहेत.

****

काँग्रेस पक्षाचे माजी प्रदेश उपाध्यक्ष डॉ. उल्हास पाटील, यांना काँग्रेस पक्षातून सहा वर्षांसाठी निलंबित करण्यात आलं आहे. पक्षविरोधी कारवायाप्रकरणी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या निर्देशानुसार ही कारवाई करण्यात आली.

****

ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी, कम्युनिस्ट नेते विधीज्ञ भगवानराव देशपांडे यांचं परवा छत्रपती संभाजीनगर इथं निधन झालं, ते ९५ वर्षांचे होते. त्यांचा पार्थिव देह छत्रपती संभाजीनगर इथं शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, घाटी रुग्णालयाला दान म्हणून देण्यात आला.

****

विकसित भारत संकल्प यात्रेला नागरिकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. मेरी कहानी मेरी जुबानी अंतर्गत जालना इथले मनोज मामलेकर, जयश्री सूर्यवंशी यांनी आपलं मनोगत या शब्दांत व्यक्त केलं.

****

तुळजापूर इथं तुळजाभवानी मातेच्या शाकंभरी नवरात्र महोत्सवात काल पारंपारिक जलकुंभ यात्रा काढण्यात आली. पापनाश तीर्थकुंडातल्या इंद्रायणी देवीचं पूजन करून या यात्रेला प्रारंभ झाला. डोक्यावर पवित्र जलकुंभ घेतलेल्या शेकडो महिलांनी यात्रेत सहभागी होत, मंदिराचा गाभारा या पाण्याने धुवून काढला. मंदिर संस्थानच्या वतीनं या महिलांचा पारंपरिक पद्धतीने सन्मान करण्यात आला. दरम्यान, देवीची काल शेषशायी पूजा बांधण्यात आली होती.

****

परभणी इथं सय्यद शाह तुराबुल हक यांचा एक फेब्रुवारीपासून ऊर्स भरणार असून, या ऊर्स काळात शहरातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवत जिल्हा प्रशासन आणि पोलीस यंत्रणेला सहकार्य करण्याचं, आवाहन जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी केलं आहे.

****

धाराशिवचे जिल्हाधिकारी डॉक्टर सचिन ओंबासे यांना उत्कृष्ट जिल्हा निवडणूक अधिकारी म्हणून पुरस्कार जाहीर झाला आहे. भटक्या विमुक्त समाजातल्या व्यक्तींसाठी उत्कृष्ट कामगिरी करणारे जिल्हा निवडणूक अधिकारी म्हणूनही त्यांना पारितोषिक दिलं जाणार आहे. राज्यातला उत्कृष्ट उपजिल्हा निवडणूक अधिकारी पुरस्कार धाराशिवचे शिरीष यादव यांना जाहीर झाला आहे. हे पुरस्कार २५ जानेवारी रोजी चौदाव्या राष्ट्रीय मतदार दिन कार्यक्रमात प्रदान केले जाणार आहेत.

****

छत्रपती संभाजीनगर इथं सुरू असलेल्या नमो चषक २०२४ क्रीडा स्पर्धेत खो-खो मध्ये राजे संभाजी भोसले सैनिकी शाळेच्या संघानं विजेतेपद पटकावलं. चौदा वर्ष वयोगटाच्या अंतिम सामन्यात, या संघानं राजर्षी शाहू विद्यालयाचा पराभव केला.

****

No comments:

Post a Comment