▼

Monday, 19 February 2024

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 19.02.2024 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजताचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 19 February 2024

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक – १९ फेब्रुवारी २०२४ सायंकाळी ६.१०

****

·      हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती सर्वत्र उत्साहात साजरी, विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून शिवरायांना अभिवादन

·      मोतीबिंदू मुक्त महाराष्ट्र पंधरवड्याला सुरुवात, आरोग्यवर्धक शिवजयंतीचा आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांचा संकल्प

·      मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भात राज्य विधीमंडळाचं उद्या विशेष अधिवेशन

आणि

·      पीएम उषा अभियानाअंतर्गत डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाला शंभर कोटी, तर स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाला २० कोटी अनुदान मंजूर

****

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आज सर्वत्र उत्साहात साजरी होत आहे.

पुणे जिल्ह्यात किल्ले शिवनेरी इथं शिवजन्म सोहळा पार पडला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शिवाई देवीची शासकीय महापूजा करून शिवरायांचा पाळणा झाला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यावेळी उपस्थित होते.

शिवाजी महाराजांचे गडकोट किल्ले आपला ठेवा असून, तो जपण्याचा प्रयत्न नक्की करू, असं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं. राज्यातले किल्ले जागतिक वारसा स्थळामध्ये समाविष्ट करण्यासाठी केंद्राकडे शिफारस केली असून, ही आपल्यासाठी अभिमानाची बाब असल्याचं ते म्हणाले.

राज्यातल्या किल्ल्यांचं संवर्धन करत असताना पुरातत्व खात्याची प्रमाणित कार्यपद्धती सुलभ करण्याबाबत आश्वासन देण्यात आलं असून, ही प्रक्रिया सुलभ झाल्यानंतर किल्ले संवर्धन कामाला गती येईल, असं फडणवीस यावेळी म्हणाले. तर किल्ल्यांच्या संवर्धनासाठी राज्य शासन निधी कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही अजित पवार यांनी दिली.

****

शिवजयंती आज दिल्लीत मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. महाराष्ट्रातून जवळपास दहा हजार शिवप्रेमी या उत्सवात सहभागी झाले होते.

मुंबईत राजभवनात तसंच शिवाजी पार्क इथं राज्यपाल रमेश बैस यांनी शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं.

****

मराठवाड्यात सर्वत्र शिवजयंती जल्लोषात साजरी होत आहे. विशेषत: तरुणाईमध्ये उत्साह पाहायला मिळत आहे. अनेक ठिकाणी दुचाकी फेरी, गायनाचे कार्यक्रम, रक्तदान आणि आरोग्य शिबिरांचं आयोजन करण्यात आलं आहे.

छत्रपती संभाजीनगरमध्ये क्रांती चौकातल्या शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी जनसागर लोटला आहे. बाळगोपाळ शिवाजी महाराजांच्या, तसंच मावळ्यांच्या वेषात येऊन अभिवादन करत आहेत. शहरात ठिकठिकाणी विविध उपक्रमांच्या माध्यमातून शिवजयंती साजरी होत आहे.

यानिमित्त डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात रयतेचे राजे छत्रपती शिवराय या विषयावर स्मार्ट सिटी चे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र जोगदंड यांचं व्याख्यान झालं. इतिहास हा समजून घेण्याचा विषय आहे, त्यातून बोध घ्यावा असं आवाहन त्यांनी यावेळी केलं. कुलगुरू डॉक्टर विजय फुलारी हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. शिवजयंतीनिमित्त आज सकाळी विद्यापीठात मिरवणूक काढण्यात आली. शिवाजी महाराजांच्या जयघोषाने हा परिसर दणाणून गेला होता.

****

 

नांदेड इथल्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात कुलगुरू डॉ. प्रकाश महानवर यांनी शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. विद्यापीठ परिसरात विद्यार्थी, अधिकारी-कर्मचाऱ्यांनी महाराजांच्या पुतळ्याची पालखीद्वारे मिरवणूक काढली.

नांदेड इथं सुरु असलेल्या महासंस्कृती महोत्सवाअंतर्गत आज शिवचरित्रावर आधारित रांगोळी स्पर्धा आणि प्रदर्शन भरवण्यात आलं आहे.

****

हिंगोली इथं शिवजयंतीनिमित्त भव्य मिरवणूक काढण्यात आली. शहरातल्या शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याजवळ उपस्थितांनी मानवंदना दिली. जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा पोलीस अधीक्षक जी श्रीधर, यावेळी उपस्थित होते.

****

बीड इथं छत्रपती शिवाजी महाराज चौक इथं शिवजयंती उत्साहात साजरी होत आहे. जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे, पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांच्या हस्ते शिवाजी महाराजांची शासकीय पूजा करण्यात आली. उपस्थित पोलीस बँड पथकाने राष्ट्रगीत आणि राज्यगीताचं गायन केलं.

****

धाराशिव इथं जिल्हाधिकारी डॉक्टर सचिन ओंबासे यांच्या हस्ते शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याला दुग्धाभिषेक करण्यात आला. यावेळी मोठ्या संख्येने शिवभक्त उपस्थित होते. याशिवाय श्री शिवराज्याभिषेक सोहळा समितीच्या वतीनं ऑटोरिक्षा रॅली काढण्यात आली.

****

लातूर इथं जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचं पूजन करुन आणि पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केलं. लातूर शहरातल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात आज पहाटे रांगोळी काढून, दिवे लावून शिवपहाट साजरी करण्यात आली.

****

 

जालना शहरासह जिल्ह्यात शाळा, महाविद्यालयांसह, पक्ष, संघटनांच्या वतीनं शिवजयंती विविध उपक्रमांनी, उत्साहात साजरी होत आहे. जालना शहरातल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारुढ पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यासाठी सकाळपासून शिवप्रेमींनी गर्दी केली आहे. सर्वपक्षीय शिवजयंती समिती आणि शिवछत्रपती सांस्कृतिक मंडळातर्फे शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास दुग्धाभिषेक करण्यात आला.

****

परभणी शहरात आणि जिल्ह्याभरात मिरवणुका, पथनाट्य आणि व्याख्यानांच्या माध्यमातून शिवजयंती उत्साहात साजरी होत आहे. परभणी शहरातून शिवाजी महाराजांच्या मूर्तीची रथातून मिरवणूक काढण्यात आली. जिजाऊ ज्ञानतीर्थ वसतीगृहाच्या विद्यार्थ्यांनी मानवी शृंखलेच्या माध्यमातून शिवरायांची प्रतिमा साकारली. जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी शिवरायांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केलं.

****

राज्यभरात आजपासून मोतीबिंदू मुक्त महाराष्ट्र पंधरवडा राबवण्यात येत आहे. आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी आज धाराशिव इथं यानिमित्त आरोग्यवर्धक शिवजयंतीचा संकल्प केला. या अभियानात एक लाख मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात येणार असल्याची माहिती आरोग्य विभागानं दिली आहे. यासंदर्भात मोफत सल्ल्यासाठी १०४ हा नि:शुल्क क्रमांक सुरु केला आहे. धाराशिव जिल्ह्यात उमरगा इथं या मोहिमेचा शुभारंभ आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या हस्ते करण्यात आला.

****

मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भात राज्य विधीमंडळाचं उद्या विशेष अधिवेशन होणार आहे. इतर कुणाचंही नुकसान न करता, कुठल्याही समाजाला धक्का न लावता मराठा समाजाला कायद्याच्या चौकटीत बसणारं आणि टिकणारं आरक्षण देण्यासाठी हे अधिवेशन असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं आहे. ते आज जुन्नर इथं वार्ताहरांशी बोलत होते.

ओबीसी किंवा इतर कुठल्याही समाजावर अन्याय न करता मराठा समाजाला टीकणारं, कायद्याच्या कसोटीवर आणि चौकटीत बसणारं आरक्षण देण्यासंदर्भात उद्या विशेष अधिवेशन सरकारने घेतलेलं आहे.

****

छत्रपती संभाजीनगर इथल्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाला प्रधानमंत्री उच्च स्तर शिक्षा अभियान - पीएम उषा अंतर्गत शंभर कोटी रुपये अनुदान मंजूर झालं आहे. तसंच विद्यापीठाच्या घनसावंगी इथल्या मॉडेल कॉलेजलाही चार कोटींचं अनुदान घोषित झालं आहे.

नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाला देखील पीएम उषा अभियानाअंतर्गत २० कोटी रुपयांचं अनुदान मंजूर झालं आहे. या अनुदानातून मुख्यतः विद्यापीठात मुलींचं वसतीगृह, सौरऊर्जा, कौशल्य विकास इत्यादींचा विकास करण्यात येणार असल्याचं कुलसचिव डॉ. शशिकांत ढवळे यांनी सांगितलं.

****

विकसित भारत सकंल्प यात्रेअंतर्गत आज छत्रपती संभाजीनगर शहरात विद्यानगर आणि गारखेडा परिसरात जनजागृती करण्यात आली. यावेळी नागरीकांना केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजनांची माहिती देण्यात आली. यावेळी नागरीकांनी आरोग्य तपासणी करुन आयुष्मान कार्ड काढून घेतले. मेरी कहानी मेरी जुबानी अंतर्गत राजेश वक्ते आणि रविंद्र निळकंठे यांनी त्यांना मिळालेल्या लाभांची माहिती दिली.

बाईट - राजेश वक्ते आणि रविंद्र निळकंठे, छत्रपती संभाजीनगर

****

राज्याच्या माजी मंत्री काँग्रेस नेत्या रजनी सातव यांच्या पार्थिव देहावर आज हिंगोली जिल्ह्यात कळमनुरी इथं शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी बंदुकीच्या फैरी झाडून त्यांना मानवंदना देण्यात आली. रजनी सातव यांचं काल नांदेड इथं निधन झालं, त्या ७६ वर्षांच्या होत्या.

****

नांदेड - अमृतसर सचखंड एक्सप्रेस उद्या नांदेड इथून सकाळी साडे नऊ ऐवजी दुपारी १२ वाजून २० मिनिटांनी सुटणार आहे. दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड कार्यालयानं ही माहिती दिली.

****

पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेनं मोठी कारवाई करून आज साडेतीन कोटी रुपयांचा मेफेड्रोन या अंमली पदार्थाचा साठा जप्त केला. या प्रकरणी सोमवार पेठेतला गुंड वैभव उर्फ पिंट्या माने याच्यासह तिघांना अटक करण्यात आली असून, अंमली पदार्थ तस्करीमागे आंतरराष्ट्रीय तस्कर असल्याचा संशय आहे.

****

No comments:

Post a Comment