▼

Tuesday, 20 February 2024

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर, दिनांक: 20.02.2024 रोजीचे सकाळी: 11.00 वाजेचे मराठी संक्षिप्त बातमीपत्र

 आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

संक्षिप्त बातमीपत्र

२० फेब्रुवारी २०२४ सकाळी ११.०० वाजता

****

मुंबईत आज राज्य विधीमंडळाचं विशेष अधिवेशन होत असून मराठा आरक्षणाबाबतचा प्रस्ताव दोन्ही सभागृहात मांडण्यात येणार आहे. थोड्याच वेळात राज्यपाल रमेश बैस अभिभाषणाला सुरुवात करतील.

****

राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या उद्यापासून सुरु होत असलेल्या बारावीच्या परिक्षांसाठी शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. लिखाणासाठी वेळ कमी पडू नये, यासाठी शेवटची दहा मिनिटे वाढवून दिली जाणार असून विद्यार्थ्यांनी तणावमुक्त वातावरणात परीक्षा द्याव्यात, असं आवाहन केसरकर यांनी केलं आहे. राज्यातील नऊ विभागीय मंडळांमध्ये १५ लाख १३ हजार ९०९ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत.

****

प्रधानमंत्री उच्च स्तर शिक्षा अभियान - पीएम उषाचा प्रारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी आज जम्मूतून दूरदृश्य प्रणालीद्वारे करणार आहेत. यावेळी ते उच्च शिक्षणाविषयी तसंच विद्यापीठांविषयी संबोधित करणार आहेत.

पीएम उषा अंतर्गत छत्रपती संभाजीनगर इथल्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाला शंभर कोटी रुपये अनुदान मंजूर झालं आहे.

नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाला देखील पीएम उषा अभियानाअंतर्गत २० कोटी रुपयांचं अनुदान मिळणार असून, यातून मुख्यतः विद्यापीठात मुलींचं वसतीगृह, सौरऊर्जा, कौशल्य विकास इत्यादींचा विकास करण्यात येणार असल्याचं कुलसचिव डॉ. शशिकांत ढवळे यांनी सांगितलं.

****

जम्मू-काश्मीर आणि लद्दाखमध्ये काल रात्री साडे नऊच्या सुमारास भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंप मापकावर या भूकंपाची तीव्रता पाच पूर्णांक दोन दशांश इतकी नोंदली गेली. या भूकंपामुळं कडाक्याच्या थंडीतही नागरिक घराबाहेर निघाल्याचं सूत्रांनी सांगितलं.

****

छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेच्या वतीनं आजपासून ३१ मार्चपर्यंत करवसुली अभियान राबवण्यात येणार आहे. जिल्ह्यातल्या सर्व ग्रामपंचायतींमध्ये गृहकर, पाणीकर आणि आस्थापना कर इत्यादी सर्व करांची वसुली या अभियानाअंतर्गत करण्यात येणार आहे.

****

नांदेड - अमृतसर सचखंड एक्सप्रेस आज नांदेड इथून सकाळी साडे नऊऐवजी दुपारी १२ वाजून २० मिनिटांनी सुटणार आहे. दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड कार्यालयानं ही माहिती दिली.

*****

No comments:

Post a Comment