▼

Wednesday, 21 February 2024

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर, दिनांक: 21.02.2024 रोजीचे सकाळी: 11.00 वाजेचे मराठी संक्षिप्त बातमीपत्र

 आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

संक्षिप्त बातमीपत्र

२१ फेब्रुवारी २०२४ सकाळी ११.०० वाजता

****

शेकडो ट्रॅक्टर घेऊन शंभू सीमेवर बसलेल्या आंदोलक शेतकऱ्यांना पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयानं फटकारलं आहे. आंदोलक सार्वजनिक जीवनात व्यत्यय आणू शकत नाहीत, असं न्यायालयानं म्हटलं असून शेतकऱ्यांच्या मोठ्या मेळाव्याला परवानगी दिल्याबद्दलही खंडपीठानं पंजाब सरकारला प्रश्न विचारला आहे. दरम्यान, कृषिमंत्री अर्जून मुंडा यांनी आंदोलक शेतकरी संघटनांना शांततेचं आवाहन केलं असून चर्चेच्या मार्गानं  प्रश्न सोडवण्यावर भर द्यायला हवा असं त्यांनी सांगितलं.

****

राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीनं घेण्यात येणारी इयत्ता बारावीची लेखी परीक्षा आजपासून सुरु झाली असून ती १९ मार्चपर्यंत चालणार आहे. या परीक्षेसाठी राज्यातील १५ लाख १३ हजार ९०९ विद्यार्थ्यांनी नोंदणी केलेली आहे. संपूर्ण राज्यात तीन हजार तीनशे वीस मुख्य केंद्रांवर परीक्षेची व्यवस्था करण्यात आली आहे, अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी काल पुण्यात दिली. 

****

दरम्यान, नांदेड जिल्हा प्रशासनानं अठ्ठावीस परीक्षा केंद्र संवेदनशील घोषित करून तिथं अतिरिक्त पोलिस बंदोबस्त दिला आहे. कुठेही गैरप्रकार झाल्यास केंद्रप्रमुखांसह प्रत्येक कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असा इशारा जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिला आहे.

****

कांदा निर्यातीवरची बंदी येत्या ३१ मार्चपर्यंत कायम राहील, असं केंद्र सरकारनं पुन्हा सांगितलं आहे. नागरिकांना रास्त किमतीत कांदा मिळावा, यासाठी गेल्या वर्षीच्या ८ डिसेंबरपासून यावर्षीच्या ३१ मार्चपर्यंत सरकारनं कांदा निर्यातीवर बंदी घातली आहे. या निर्णयाचा शेतकऱ्यांवर विपरीत परिणाम होऊ नये, यासाठी सरकार शेतकऱ्यांकडून सातत्यानं कांदा खरेदी करत आहे.

****

इंडीयन प्रीमियर लीग आईपीएलचा सतरावा हंगाम येत्या २२ मार्चपासून सुरु होणार असल्याचं आईपीएलचे अध्यक्ष अरुण धुमाल यांनी सांगितलं. सुरुवातीला १० दिवसांचा कार्यक्रम जाहीर केला जाईल त्यानंतर सार्वत्रिक निवडणुका जाहीर  झाल्यावर पुढील सामने ठरवले जातील, असं धुमाल यांनी सांगितलं. जूनमध्ये टी-ट्वेंटी विश्वचषक स्पर्धा असल्यानं त्याआधी मे अखेरपर्यंत आईपीएल स्पर्धा संपवल्या जातील. असंही त्यांनी नमूद केलं.

****

No comments:

Post a Comment