Wednesday, 28 February 2024

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर, दिनांक: 28.02.2024 रोजीचे सकाळी: 11.00 वाजेचे मराठी संक्षिप्त बातमीपत्र

 आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

संक्षिप्त बातमीपत्र

२८ फेब्रुवारी २०२ सकाळी ११.०० वाजता

****

राष्ट्रीय विज्ञान दिवस आज साजरा होत आहे. 'विकसित भारतासाठी स्वदेशी तंत्रज्ञान' ही या वर्षीच्या विज्ञान दिनाची संकल्पना आहे. ज्येष्ठ भौतिकशास्त्रज्ञ सर सी.व्ही. रमण यांच्या 'रमण इफेक्ट' या उल्लेखनीय शोधाच्या स्मरणार्थ विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागामार्फत, नवी दिल्ली इथं आज एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे.

****

संगीत नाटक अकादमीने गेल्या दोन वर्षांसाठीचे पुरस्कार जाहीर केले. गोव्यातले लोककला अभ्यासक विनायक खेडेकर तसंच कुचिपुडी नृत्यगुरू राजा आणि राधा रेड्डी यांच्यासह सहा जणांना अकादमी रत्न विद्यावेतन जाहीर करण्यात आलं आहे.

याशिवाय गायनासाठी कलापिनी कोमकली तसंच देवकी पंडित, अभिनयासाठी अशोक सराफ, सृजनात्मक संगीतासाठी नीलाद्रीकुमार, ढोलकीवादक विजय चव्हाण, यांच्यासह ९२ जणांना अकादमी पुरस्कार जाहीर झाला आहे.

उस्ताद बिस्मिल्ला खान युवा अकादमी पुरस्कारही जाहीर करण्यात आले आहेत. अभिनयासाठी ऋतुजा बागवे, सुगम संगीतासाठी नंदिनी गुजर, शास्त्रीय गायनासाठी अनुजा झोकरकर, लोकनृत्यासाठी प्रमिला सूर्यवंशी, सरोद वादनासाठी सारंग कुळकर्णी, पारंपरिक नाट्यकलेसाठी प्रियंका ठाकूर तर अभंग गायनासाठी लातूरचे नागेश आडगावकर यांच्यासह ८० तरुण कलावंतांना या पुरस्काराने गौरवलं जाणार आहे.

****

सर्वोच्च न्यायालयातले सेवानिवृत्त न्यायमूर्ती अजय खानविलकर यांची देशाचे नवे लोकपाल म्हणून नियुक्ती झाली आहे. खानविलकर यांच्यासह सहा सदस्यांच्या नियुक्तीला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी मंजुरी दिली.

****

राज्याच्या दूध अनुदान योजनेत सहभागी होण्यासाठी येत्या दहा मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. अधिक माहितीसाठी जिल्हा दुग्धव्यवसाय विकास अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

****

मध्यप्रदेशातून भिवंडीमध्ये शस्त्रांची तस्करी करणाऱ्या गुरुचरण छाबिलासिंग जुनेजा याला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागानं काल अटक केली. त्याच्याकडून देशी बनावटीची सात पिस्तुलं आणि दहा जिवंत काडतुसं हस्तगत करण्यात आली.

दरम्यान, हॅश ऑईलसह अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या ठाणे इथल्या चौघांना गुन्हे अन्वेषण विभागानं काल ताब्यात घेतलं. त्यांच्याकडून एक कोटी ८३ लाख रुपयांचे अंमली पदार्थ जप्त करण्यात आले.

****

No comments:

Post a Comment