Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 02 March 2024
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती
संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ०२ मार्च २०२४
सायंकाळी ६.१०
****
·
'नमो महारोजगार'
मेळाव्यातून आतापर्यंत राज्यातल्या २५ हजार युवकांना रोजगार मिळाल्याची
मुख्यमंत्र्यांची माहिती
·
देशातल्या
तेहतीस साखर कारखान्यांच्या एक हजार ३७८ कोटी रुपयांच्या थकीत कर्जाची पुनर्बांधणी
करण्यास मान्यता
·
छत्रपती
संभाजीनगर इथल्या शेंद्रा औद्योगिक वसाहतीच्या भूखंड विक्रीमध्ये घोटाळा झाल्याचा खासदार
इम्तियाज जलिल यांचा आरोप
आणि
·
राज्यात
उद्या राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिम
****
'नमो महारोजगार' मेळाव्यातून आतापर्यंत राज्यातल्या २५
हजार युवकांना रोजगार मिळाल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. बारामती
इथं आज नमो महारोजगार मेळाव्याचं उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र
फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार तसंच खासदार शरद पवार आणि सुप्रिया
सुळे, हे या कार्यक्रमाला उपस्थित होते. यावेळी विविध विकासकामांचंही
लोकार्पण करण्यात आलं. रोजगार मेळावा आणि शासन आपल्या दारी या कार्यक्रमांना,
राज्यात फार चांगली लोकप्रियता मिळाली असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले.
एका छताखाली नागरिकांना सर्व योजनांचा लाभ देण्याच्या हेतूनं या कार्यक्रमाचं आयोजन
करण्यात येत असल्याचं त्यांनी सांगितलं.
राज्य सरकारनं रोजगाराच्या समस्येकडे लक्ष दिल्याबद्दल शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांचे
आभार मानले. या मेळाव्यात पाच हजारांवर उमेदवारांनी नोंदणी केली असून, २५४ कंपन्या रोजगार देणार आहेत.
उपमुख्यमंत्री फडणवीस आणि अजित पवार यांच्यासह कौशल्य विकासमंत्री मंगलप्रभात लोढा
यांनी याप्रसंगी, सरकारच्या विविध उप्रकमांची माहिती दिली. पुढचा
रोजगार मेळावा ठाणे इथं सहा आणि सात मार्च रोजी आयोजित करण्यात येणार आहे.
बारामती तालुक्यातल्या बऱ्हाणपूर इथं नव्यानं निर्मित पोलीस उपमुख्यालयाचं तसंच
अन्य विविध विकासकामांचं उद्घाटन आणि लोकार्पण देखील, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे करण्यात आलं.
****
पुणे जिल्ह्यात शिरुर तालुक्यातल्या वढु बुद्रुक इथं छत्रपती संभाजी महाराज यांच्या
समाधीस्थळ विकासकामांचं भूमिपूजन देखील आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं.
दरम्यान, आज सकाळी सिंधुदुर्ग जिल्ह्यात आंगणेवाडी इथं
भराडी देवी यात्रेनिमित्त मुख्यमंत्र्यांनी देवीचं दर्शन घेतलं. राज्यात शेतकरी,
कष्टकरी जनतेला सुखी आणि संपन्न करण्याचं, भराडी
देवी चरणी साकडं घातल्याचं, त्यांनी यावेळी वार्ताहरांशी बोलताना
सांगितलं.
****
देशातल्या तेहतीस साखर कारखान्यांच्या, एक हजार ३७८
कोटी रुपयांच्या थकीत कर्जाची पुनर्बांधणी करण्याला मान्यता मिळाली आहे. राष्ट्रीय
सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी ही माहिती दिली. या निर्णयामुळे
६१९ कोटी रुपयांचं अतिरिक्त व्याज पूर्णपणे माफ होणार आहे. या
एकूण थकीत कर्जामध्ये महाराष्ट्रातल्या कारखान्यांचं जवळपास ८६१ कोटी रुपये कर्ज थकीत
होतं. राष्ट्रीय सहकारी साखर महासंघाने याबाबत, केंद्रीय अर्थमंत्री
निर्मला सीतारामन यांच्याकडे पाठपुरावा केला होता.
****
निर्यातबंदी उठल्यानंतर पहिल्यांदाच भारतातून समुद्रमार्गे अमेरिकेला डाळिंबं निर्यात
करण्यात आले. १४ मेट्रिक टन डाळिंब भरलेला कंटेनर जवाहरलाल नेहरू पोर्ट टस्ट्र नाव्हा
शेवा इथून समुद्रमार्गे अमेरिकेच्या नेवार्क या पोर्टसाठी आज रवाना करण्यात आला असल्याची
माहिती पणन विभागाने दिली आहे. भारत सरकारच्या वाणिज्य मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव राजेश
अग्रवाल यांनी या कंटेनरला हिरवा झेंडा दाखवला.
****
मानवी संबंधांचं व्यवस्थापन या विषयाचा अभ्यासक्रमात समावेश असायला हवा, अशी अपेक्षा, केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री
नितीन गडकरी यांनी व्यक्त केली आहे. नागपूर इथं आज विदर्भ मॅनेजमेंट संघटनेच्या वतीनं
आयोजित, सेंट्रल इंडिया मॅनेजमेंट परिषदेचं उद्घाटन केल्यानंतर
ते बोलत होते. दीर्घकाळ यशस्वी राहायचं असल्यास, नेतृत्वगुण,
वागणूक, विश्वासार्हता, सकारात्मकता
आणि आत्मविश्वास, हे मूल्य अधिक महत्त्वाची असतात, असं त्यांनी यावेळी सांगितलं. उत्तम व्यवस्थापनाच्या माध्यमातून आपल्या प्रदेशातली
क्षमता ओळखून, त्यांचं संधीत रूपांतर करण्याचा प्रयत्न करण्याचं
आवाहन गडकरी यांनी यावेळी केलं.
****
सकारात्मक चिंतनासह वर्तणूकशास्त्राकडे लक्ष देण्याची गरज, राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केली आहे.
नाशिक इथं आज भोसला सैनिकी शाळा परिसरातल्या, डॉ.मुंजे इन्टीट्युटच्या
बोधचिन्हाचं अनावरण केल्यानंतर ते बोलत होते. संस्काराबरोबरच वर्तुणूकशास्त्रातल्या
घटकांना प्राधान्य देत, संस्कारक्षम पिढी निर्माण करण्याचं ध्येय
समोर ठेवायला हवं, असं त्यांनी यावेळी सांगितलं.
****
शहरी सहकारी बँक संघटना अंतर्गत, राष्ट्रीय शहरी
सहकारी पत आणि विकास महामंडळाचा, आज केंद्रीय गृह आणि सहकारमंत्री
अमित शहा यांच्या हस्ते नवी दिल्लीत प्रारंभ करण्यात आला. या संघटनेच्या स्थापनेमुळे,
आत्मनिर्भर भारताची सहकारातून समृद्धीकडे वाटचाल होण्यास मदत होणार आहे.
शहरी सहकारी बॅंकांमुळे देशाचा सर्वसमावेशक आर्थिक विकास शक्य होणार असल्याचं सांगत,
बँकिंग क्षेत्राचा विकास आणि आधुनिकीकरणावर भर द्यावा, असंही शहा यांनी यावेळी सांगितलं.
****
यंदाच्या उन्हाळ्यात अल-निनो स्थिती कायम राहण्याची शक्यता, हवामान विभागाचे महासंचालक डॉ. मृत्यूंजय महापात्रा यांनी व्यक्त केली आहे.
त्यामुळे या उन्हाळ्यात महाराष्ट्रासह देशाच्या बहुतांश भागांत, तापमानाचा पारा सरासरीपेक्षा अधिक राहण्याचा अंदाज आहे. मात्र फक्त वायव्य,
ईशान्य, मध्य आणि द्वीपकल्पीय भारतात तापमान सरासरीपेक्षा
कमी राहणार असल्याचं हवामान विभागानं म्हटलं आहे.
****
नवमतदारांसाठी मेरा पहला वोट देश के लिए हे मतदार जागरूकता अभियान सरकारने सुरु
केलं आहे. निवडणूक हा लोकशाहीचा उत्सव असतो. यावेळी पहिल्यांदा मतदान करणार असलेल्या
नवमतदारांनी या लोकशाहीच्या उत्सवामध्ये सहभागी होऊन आपला मतदानाचा हक्क बजावावा, असं आवाहन अभिनेत्री किशोरी अंबिये यांनी केलं आहे,
****
छत्रपती संभाजीनगर इथल्या शेंद्रा औद्योगिक वसाहतीच्या भूखंड विक्रीमध्ये करोडो
रुपयांचा घोटाळा झाला असल्याचा आरोप, खासदार इम्तियाज
जलिल यांनी केला आहे. ते आज छत्रपती संभाजीनगर इथं वार्ताहरांशी बोलत होते. या औद्योगिक
वसाहतीत विशेष आर्थिक क्षेत्र अर्थात सेझ च्या अंतर्गत एका बड्या कंपनीनं २००७ मध्ये
२३२ एकर भुखंड संपादित केला होता. त्यावर मोठा प्रकल्प उभारण्यात येणार होता मात्र
आता या भूखंडाची परस्पर विक्री होत असल्याचं खासदार जलिल यांनी सांगितलं. याप्रकरणी
चौकशी व्हावी अशी मागणी करत त्यांनी, औद्योगिक संघटनांनी पुढाकार
घ्यावा, असं आवाहन केलं.
****
राज्यात उद्या तीन मार्च रोजी, सार्वजनिक आरोग्य
विभागामार्फत राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिम राबवण्यात येणार आहे. या अंतर्गत नागरिकांनी
आपल्या शून्य ते ५ वर्ष वयोगटातल्या बालकांचं लसीकरण करण्याचं आवाहन, आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी केलं आहे.
छत्रपती संभाजीनगर महापालिकेअंतर्गत, सुमारे दोन
लाख बालकांना पोलिओ डोस देण्याकरीता ६८९ पोलिओ बूथ उभारण्यात आले आहेत.
धाराशिव जिल्ह्यात एकूण एक हजार ३४१ लसीकरण केंद्र, नांदेड जिल्ह्यात दोन हजार ७६७, तर लातूर शहरात एकूण
२१५ पोलिओ लसीकरण केंद्रांसह, तीन फिरत्या पथकांची व्यवस्था करण्यात
आली आहे. जालना इथं दोन लाख ५३ हजार ६५३ बालकांचं लसीकरण करण्यासाठी, एक हजार ५२१ बुथ तसंच १०९ फिरत्या पथकांची व्यवस्था करण्यात आली आहे.
****
चंद्रपूर इथं ताडोबा महोत्सवात आज दुसऱ्या दिवशी, ६५ हजार ७२४ वृक्ष रोपट्यांच्या माध्यमातून भारत माता हा शब्द साकारण्यात आला
असून, याची गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये नोंद करण्यात
आली आहे. राज्यातला सर्वात लोकप्रिय व्याघ्र प्रकल्प आणि २०० पेक्षा जास्त वाघांचं
निवासस्थान असलेल्या ताडोबा व्याघ्र तीन दिवसीय महोत्सवाला कालपासून सुरुवात झाली.
****
सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत हिंगोली जिल्ह्यात अंत्योदय शिधापत्रिका धारकांसाठी, ६३५ क्विंटल साखरेचं आयतन मंजूर करण्यात आलं आहे. २०२३ या वर्षातल्या ऑक्टोबर,
नोव्हेंबर, डिसेंबर या तीन महिन्यांसाठी प्रति
शिधापत्रिका एक किलो साखर, संबंधित स्वस्त धान्य दुकानामार्फत
वितरीत केली जाईल.
****
नांदेडमध्ये येत्या पाच मार्चला जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषदेचं आयोजन करण्यात
आलं आहे. या परिषदेला जिल्हाधिकारी अभिजीत राऊत मार्गदर्शन करणार आहेत. जिल्हास्तरावर
गुंतवणूक आकर्षित करणं, गुंतवणूकदार आणि व्यवसायांना एकत्र व्यासपीठ
उपलब्ध करुन देणं आणि उद्योग क्षेत्रात गुंतवणूकीला चालना देण्यासाठी ही परिषद आयोजित
करण्यात आली आहे. या परिषदेला उपस्थित राहण्याचं आवाहन, जिल्हा
उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक अमोल इंगळे यांनी केलं आहे.
परभणी इथंही येत्या पाच मार्च रोजी, जिल्हास्तरीय
गुंतवणूक परिषद होणार आहे.
****
हिंगोली शहरात जलेश्वर तलाव परिसरातलं अतिक्रमण आज काढण्यात आलं. या तलाव परिसराचं
आता सौंदर्यीकरणं करण्यात येणार आहे. प्रशासनाच्या वतीने अतिक्रमण धारकांना २९ फेब्रुवारी
रोजी नोटीसा बजावण्यात आला होत्या, त्यानुसार आज
ही कारवाई करण्यात आली. याठिकाणी चारशे अधिकारी कर्मचाऱ्यांचा ताफा तैनात करण्यात आला
होता.
****
अहमदनगर इथं दोन दिवसीय ग्रंथोत्सवाचं उद्धाटन, आज आमदार
संग्राम जगताप यांच्या हस्ते झालं. तत्पूर्वी ग्रंथदिंडी देखील काढण्यात आली होती.
या ग्रंथोत्सवात राज्यातल्या विविध प्रकाशन संस्था सहभागी झाल्या आहेत.
****
No comments:
Post a Comment