Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 18 March 2024
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – १८ मार्च २०२४ सायंकाळी ६.१०
****
· प्रत्येक निवडणूक रोख्याचा क्रमांक सार्वजनिक करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे भारतीय स्टेट बॅंकेला निर्देश.
· राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांची राजकीय पक्षांसोबत बैठक.
· राज्यात पोलिओ लसीकरण मोहिमेअंतर्गत ९० टक्के लसीकरण पूर्ण.
आणि
· शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे नांदेड आणि हिंगोली दौऱ्यावर.
****
प्रत्येक निवडणूक रोख्याचा क्रमांक सार्वजनिक करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं भारतीय स्टेट बॅंकेला दिले आहेत. मात्र एप्रिल २०१९ आधीची माहिती सार्वजनिक करण्याची मागणी न्यायालयानं फेटाळून लावली. रोखे खरेदी करणारा आणि हे रोखे वटवणारा राजकीय पक्ष यांची माहिती उघड होईल असा रोख्यांचा क्रमांकही जाहीर करण्याचे आदेश न्यायालयानं दिले. गुरुवारपर्यंत बॅंकेला यासंदर्भात प्रतिज्ञापत्र सादर करण्याचा आदेशही न्यायालयानं दिला आहे. ही सर्व माहिती निवडणूक आयोगानं संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्याची सूचनाही न्यायालयानं केली आहे.
****
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पुन्हा एकदा सक्तवसुली संचालनालय - ईडीच्या चौकशीला हजर राहण्यास नकार दिला आहे. दिल्ली मद्य धोरण घोटाळा आणि दिल्ली जल बोर्ड मधल्या कथित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी ईडीनं केजरीवाल यांना समन्स पाठवलं होतं. इडीचं हे समन्स अवैध असल्याचं सांगत केजरीवाल यांनी हजार राहण्यास नकार दिला. याआधी देखील त्यांना सात वेळा समन्स बजावण्यात आलं होतं.
****
राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी आज मुंबईत मंत्रालयात नोंदणीकृत राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींसोबत बैठक घेतली. १८व्या लोकसभा निवडणुकीसाठी राज्यातील मतदानाचं वेळापत्रक, निवडणुकीसाठी विविध पातळ्यांवरची सज्जता यासोबतच निवडणूक प्रक्रिया, नामांकन प्रक्रिया, खर्च या विषयीचे नियम आणि तरतुदींविषयी सविस्तर माहिती त्यांनी राजकीय प्रतिनिधींना दिली. राजकीय पक्षांनी नियमांचं काटेकोर पालन करावं, असं आवाहन करतानाच, निवडणूक यंत्रणेकडून अपेक्षित सहकार्याचं आश्वासन चोक्कलिंगम यांनी दिलं.
****
मतदानाची कमी होणारी टक्केवारी ही चिंतेची बाब असल्याचं, छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी म्हटलं आहे. लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आकाशवाणीला दिलेल्या विशेष मुलाखतीत ते बोलत होते. आगामी निवडणुकीत सर्व मतदारांनी मतदान करण्याचं आवाहन त्यांनी केलं. ते म्हणाले...
मागच्या काही निवडणुकीतील मतदानाची टक्केवारी जर आपण पाहिली तर ही टक्केवारी घसरत चालली आहे. आणि हा सर्वांसाठी एक चिंतेचा विषय आहे. औरंगाबाद जिल्ह्यामध्ये समावेश असलेल्या दोन्ही मतदार संघामध्ये मतदानाची टक्केवारी जास्तीत जास्त व्हावी यासाठी वेगवेगळ्या माध्यमातून आपण प्रयत्न करत आहोत. माझं सर्व मतदार बंधू भगिनींना विनम्र आवाहन आहे की मतदान करा.
जिल्ह्यातली निवडणूक व्यवस्था, मतदान केंद्रांवरच्या सुविधा, आदर्श आचारसंहितेचे पालन, यासह विविध मुद्यांबाबत जिल्हाधिकारी स्वामी यांनी या मुलाखतीत सविस्तर माहिती दिली. छत्रपती संभाजीनगरचे जिल्हा माहिती अधिकारी डॉ. मिलिंद दुसाने यांनी घेतलेली ही मुलाखत परवा बुधवारी सकाळी साडेदहा वाजता आमच्या केंद्रावरून प्रसारित होईल. एआयआर छत्रपती संभाजीनगर या ट्यूब चॅनलवरही श्रोते ही मुलाखत ऐकू शकतील.
****
राज्यातील बालकांच्या पोलिओ लसीकरण मोहिमेअंतर्गत ९० टक्के लसीकरण पूर्ण झाल्याची माहिती आरोग्य विभागानं दिली आहे. राज्यात नियमित लसीकरणांतर्गत वर्षभरात १९ लाख चार हजार बालकांचे लसीकरण करण्याच्या उद्दिष्टांपैकी १७ लाख नऊ हजार बालकांचं लसीकरण पूर्ण झाल्याचं विभागातर्फे सांगण्यात आलं आहे.
****
डेंग्यूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असून या आजाराशी लढा देण्यासाठी सर्व घटकांच्या एकत्रित प्रयत्नांची आवश्यकता असल्याचं मत केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या अतिरिक्त सचिव लाम चोंगोई स्वीटी चांगसान यांनी व्यक्त केलं. नवी दिल्ली इथं आज झालेल्या डेंग्यू परिषदेत त्या बोलत होत्या. जनतेच्या आरोग्यसुरक्षा आणि नगरनियोजन विभागातल्या सर्व घटकांनी एकत्रितपणे काम करून डेंग्यूच्या विरोधात लढले पाहिजे, असंही त्यांनी सांगितलं.
****
इंडिया आघाडीची कालची सभा म्हणजे फॅमिली गॅदरिंग असल्याची टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. या सभेत जमलेल्या नेत्यांमध्ये आत्मविश्वासाचा अभाव दिसत असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. ते आज मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते.
****
महायुतीच्या बैठका आज आणि उद्या होणार असून लवकरच सर्व जागा जाहीर होतील, अशी माहिती भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे. ते आज नागपूर इथं बोलत होते. अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी भाजपमध्ये प्रवेश केला नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. मुंबईतली कालची भारत जोडो न्याय यात्रेची सभा ही फक्त आपापले परिवार सांभाळण्यासाठीची सभा होती, काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या या सभेतल्या भाषणात काहीही गांभीर्य नव्हतं अशी टीका त्यांनी केली.
****
महायुतीत घटक पक्ष म्हणून शिर्डी आणि सोलापूर या लोकसभा मतदार संघाच्या जागेची मागणी आरपीआयनं केली असल्याचं, केंद्रीय राज्यमंत्री तसंच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी म्हटलं आहे. ते आज नागपूरमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते. यावर आवश्यक ते सहकार्य करण्याचं आश्वासन भाजपा अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी दिल्याचं आठवले यांनी सांगितलं.
****
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे आज नांदेड आणि हिंगोली दौऱ्यावर आले आहेत. आज दुपारी नांदेड विमानतळावर माजी आमदार अनसुया खेडकर, युवा सेनेचे विभागीय सचिव महेश खेडकर आदींनी त्यांचं स्वागत केलं. त्यानंतर ठाकरे यांनी हिंगोली जिल्ह्यातल्या वसमत इथं कुटुंब संवाद दौऱ्यामध्ये सभेला संबोधित केलं. यावेळी त्यांनी विविध मुद्यांवरून भाजपवर कडाडून टीका केली. दरम्यान, ठाकरे यांचा उद्या सकाळी साडेअकरा वाजता उमरखेड इथं आणि दुपारी एक वाजता हदगाव इथं पदाधिकाऱ्यांसोबत संवाद मेळावा होणार आहे.
****
काँग्रेसचे जेष्ठ नेते तथा लातूर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष मिठाराम राठोड यांचं आज हैदराबाद इथल्या खाजगी रुग्णालयात उपचारा दरम्यान निधन झालं. ते ७४ वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिव देहावर रेणापूर इथल्या मागासवर्गीय सेवा संघ संस्थेच्या आश्रमशाळेच्या प्रांगणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
****
धुळे शहरातल्या तीन सराईत गुन्हेगारांवर आगामी निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी तडीपारीची कारवाई केली आहे. लोकसभा निवडणूका शांततेत पार पाडाव्या आणि नागरिकांनी भयमुक्त वातावरणात जीवन जगावं या उद्देशानं ही सक्त कारवाई केल्याचं पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी सांगितलं.
****
लातूर शहरात कोयता घेऊन खंडणी उकळणाऱ्याची लातूर पोलिसांनी भर बाजारात धिंड काढली. तोहीद अकबर पठाण असं या २१ वर्षीय आरोपीचं नाव असून, त्याने आपल्या साथीदारासह खंडणी उकळून, वाहनाची तोडफोड करुन ज्या भागात दहशत निर्माण केली होती, त्याच भागात पोलिसांनी त्याची धिंड काढली.
****
मुंबई महापालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकाने वर्षभरापुर्वी ताब्यात घेतलेली वडापावची गाडी परत करण्याची मागणी करत एका फेरीवाल्यानं आज मंत्रालयाच्या दुसऱ्या मजल्यावरून संरक्षक जाळीवर उडी मारली. अरविंद बंगेरा असं या फेरीवाल्याचं नाव असून, त्याला मरिन ड्राईव्ह पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं आहे.
****
सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्याचिपी विमानतळावरून फ्लाय-९१ विमान कंपनीची सिंधुदुर्ग ते बंगळुरू सेवा आजपासून सुरु झाली. आज बंगळुरूसाठी विमान सेवा सुरु झाली असून, उद्यापासून हैदराबाद विमान सेवा सुरु होणार आहे. बंगळूरूसाठी सोमवार, शुक्रवार, आणि शनिवार तर हैदराबादसाठी मंगळवार आणि रविवारी विमान सेवा असेल, ही विमानसेवा सुरू झाल्याने जिल्ह्यातल्या पर्यटनाला चालना मिळणार आहे.
****
भारतीय ॲथलिट गुलवीर सिंग यानं अमेरिकेत कॅलिफोर्निया इथं झालेल्या १० किलोमीटर मॅरोथॉन स्पर्धेतल्या कामगिरीनं नव्या राष्ट्रीय विक्रमाची नोंद केली. या स्पर्धेत त्यानं २७ मिनीटं आणि ४१ पूर्णांक ८१ सेकंदाची वेळ नोंदवत १६ वर्षे जुना राष्ट्रीय विक्रम मोडला. या स्पर्धेत त्यानं दुसरं स्थान पटकावलं, मात्र तो पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेसाठी पात्र ठरू शकला नाही.
दरम्यान, स्लोव्हाकिया इथं झालेल्या चालण्याच्या शर्यतीत पुरुषांच्या २० किलोमीटर प्रकारात भारताच्या राम बाबूने सर्वोत्कृष्ट वेळ नोंदवत, पॅरिस ऑलम्पिकसाठी पात्रता मिळवली आहे. यापूर्वी हांगझू इथं झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत ३५ किलोमीटर चालण्याच्या शर्यतीत त्यानं कांस्य पदकाची कमाई केली होती.
****
हवामान
हवामान विभागानं महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि छत्तीसगढमध्ये अनेक ठिकाणी पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. येत्या दोन दिवसांत मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असून, मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे. विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडण्याचा अंदाज असून तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह गारपिटीचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या काळात मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असून कोकणात हवामान कोरडं राहील, अशी शक्यता हवामानशास्त्र विभागानं व्यक्त केली आहे.
****
No comments:
Post a Comment