Regional Marathi Text Bulletin, Chatrapati Sambhajinagar
Date: 01 March 2024
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०१ मार्च २०२४ दुपारी १.०० वा.
****
राज्याची आर्थिक स्थिती भक्कम असून, नागरीकांनी
त्याबाबत शंका बाळगू नये,
असं उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी म्हटलं
आहे. विधानसभेत आज अंतरिम अर्थसंकल्पावरच्या चर्चेला उत्तर देताना ते बोलत होते.
राज्याची महसुली तुट निकषापेक्षा अधिक राहणार नाही याची काळजी घेतली जात असून, जीएसटी
संकलनात देखील मोठी वाढ झाली आहे, राज्याची अर्थव्यवस्था निर्धारित वेळेत
एक ट्रिलियन डॉलरपर्यंत पोहोचेल असा विश्वास पवार यांनी यावेळी व्यक्त केला.
राज्याचं स्थुल राज्य उत्पन्न मागील वर्षाच्या तुलनेत चार हजार कोटीनं वाढलं, २०२३-
२४ मध्ये स्थुल राज्य उत्पन्न ३८ लाख ७९ हजार कोटी होतं, ते
२०२४-२५ मध्ये ४२ लाख ६७ हजार ७७१ कोटी इतकं झाल्याचं पवार यांनी सांगितलं.
राज्याची अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी
नवीन तंत्रज्ञानाचा वापर,
कर चुकवेगिरीला आळा घालण्यासाठी अभय योजनेसारख्या उपाययोजना, दैनंदिन
जीवनात गुणात्मक बदल घडवण्यासाठी उपाय, शेतकर्यांना वाढीव नुकसान
भरपाई, विदेशी गुंतवणूक वाढवण्याचा प्रयत्न, आदी उपाययोजना केल्या जात
असल्याचं, पवार यांनी सांगितलं. महसुली उत्पन्नात वाढ करण्यास सरकार अयशस्वी ठरल्याचा
विरोधकांचा आरोप त्यांनी फेटाळून लावला.
सरकारच्या अंतरिम अर्थसंकल्पात
सामान्यांना न्याय मिळाला नाही, याचा निषेध करत, विरोधकांनी
सभात्याग केला. त्यानंतर लगेच सभागृहाने अर्थसंकल्पाला मंजुरी देणारं विधेयक मंजूर
केलं.
दरम्यान, राज्य विधीमंडळाच्या
अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज समारोप होणार आहे.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज
झारखंडमध्ये ३५ हजार ७०० कोटी रुपयांच्या बहुविध विकास प्रकल्पांचं उद्घाटन, लोकार्पण
आणि पायाभरणी केली. सिंद्री खत प्रकल्प त्यांनी राष्ट्राला समर्पित केलं असून, गोरखपूर
आणि रामागुंडममधील खत संयंत्रांच्या पुनरुज्जीवनानंतर देशातलं पुनरुज्जीवित होणारं
हे तिसरं खत संयंत्र आहे.
****
निती आयोगाचे सदस्य डॉ व्ही के पॉल
यांनी आज नवी दिल्ली इथं राष्ट्रीय जन्म दोष जागरूकता महिना २०२४ ची सुरुवात केली.
केंद्रीय आरोग्य सचिव अपूर्व चंद्रा यावेळी उपस्थित होते. अडथळे तोडणं - जन्म दोष
असलेल्या मुलांसाठी सर्वसमावेशक सहकार्य, ही यंदाच्या जन्म दोष
जागरूकता महिन्याची संकल्पना आहे. याअंतर्गत महिनाभर जन्मदोष प्रतिबंध, लवकर
ओळख, वेळेवर व्यवस्थापन आणि मनोसामाजिक परिणाम याविषयी विविध उपक्रम राबवले जाणार
आहेत.
****
एक भारत श्रेष्ठ भारत योजनेला साकार करणाऱ्या, भारत
का अमृत कलश,
या दूरदर्शनवर प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमामुळे, देशभरातल्या
विविध भागातल्या प्रतिभावंतांना व्यासपीठ उपलब्ध झालं आहे, असं
केंद्रीय माहिती आणि प्रसारणमंत्री अनुराग ठाकूर यांनी म्हटलं आहे. या उपक्रमाच्या
निमित्तानं आयोजित कार्यक्रमात ते काल मुंबईत बोलत होते. प्रसारभारती आणि गायक
पद्मश्री कैलाश खेर यांनी एकत्र येऊन, संगीत आणि लोककलांवर आधारित
असा अमृत कलश हा कार्यक्रम तयार केला आहे. या कार्यक्रमात संपूर्ण देशातल्या
लोककलांचं दर्शन घडवणारे कलाकार सहभागी होणार आहेत. हा कार्यक्रम देशाच्या समृद्ध
सांस्कृतिक वारश्याला पुढे घेऊन जाईल, असा विश्वास ठाकूर यांनी
यावेळी व्यक्त केला.
****
नांदेड जिल्ह्यात पोलीस शिपाई पदाच्या
१३४ जागा भरण्यात येणार आहेत. या जागांसाठी पाच मार्चपासून ऑनलाईन पद्धतीनं अर्ज
मागवण्यात आले आहेत. ३१ मार्च ही अर्ज भरण्याची मुदत आहे. भरती प्रक्रियेत शारीरिक
आणि लेखी चाचणी होणार आहे. ही भरती प्रक्रिया पारदर्शक होणार असून कोणत्याही
प्रकारची मागणी केल्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा असं पोलीस
अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी सांगितलं.
****
माजलगावच्या श्री सिद्धेश्वर
महाविद्यालयाचे सेवानिवृत्त प्राचार्य सुधाकरराव तालखेडकर यांचं परभणी इथं आज
पहाटे वृद्धापकाळाने निधन झालं, ते ९३ वर्षांचे होते. प्रारंभी महसूल
खात्यात कार्यरत तालखेडकर यांनी अंबाजोगाईच्या खोलेश्वर महाविद्यालयात दीर्घकाळ
हिंदीचे प्राध्यापक म्हणून काम केलं होतं. त्यांच्या पार्थिव देहावर आज सांयकाळी
परभणी इथं अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत
****
नांदेड - पनवेल रेल्वे आज संध्याकाळी
सहा वाजून २० मिनिटांऐवजी रात्री साडे अकरा वाजता सुटणार आहे. दक्षिण मध्य
रेल्वेच्या नांदेड कार्यालयानं ही माहिती दिली.
****
जर्मनीत मुल्हेम इथं सुरु असलेल्या
जर्मन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत महिला दुहेरीत भारताच्या ट्रीसा जॉली आणि गायत्री
गोपिचंद या जोडीने झेक प्रजासत्ताकच्या जोडीचा २१ - १०, २१
- ११ असा पराभव करुन उपान्त्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. महिला एकेरीत मात्र
आकर्षी कश्यपला डेन्मार्कच्या खेळाडुकडून १३ - २१, १४ - २१ असा पराभव
पत्करावा लागला. पुरुष एकेरीच्या दुसर्या फेरीत सतीश कुमार करुणाकरनचा देखील
आयर्लंडच्या खेळाडुनं पराभव केला.
****
No comments:
Post a Comment