Regional Marathi Text Bulletin, Chatrapati Sambhajinagar
Date – 01 March 2024
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०१ मार्च २०२४ सकाळी ७.१० मि.
****
· एक कोटी घरांवर सौर उर्जानिर्मिती संच बसवण्याच्या, पीएम सूर्य-घर मोफत वीज योजनेला केंद्र सरकारची मंजुरी
· मातृभाषेतून शिक्षणासाठी आयआयटी मुंबईकडून कृत्रिम बुद्धिमत्ताआधारित सॉफ्टवेअर विकसित
· दहावीच्या लेखी परीक्षेला आजपासून सुरुवात; यंदाही परीक्षार्थींना दहा मिनिटं जादा वेळ
आणि
· लातूर इथं राज्यातली पहिली जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषद-९५ उद्योग घटकांसाठी सामंजस्य करार
****
देशभरात एक कोटी घरांना छपरावर सौर उर्जानिर्मिती संच बसवण्यासाठीच्या, पीएम सूर्य - घर मोफत वीज योजनेला केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. त्याकरता ७५ हजार २१ कोटी रुपये खर्चालाही केंद्रीय मंत्रिमंडळाने मान्यता दिली. माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी नवी दिल्लीत मंत्रिमंडळ बैठकीनंतर वार्ताहरांना माहिती दिली. या योजनेच्या लाभार्थी घरांना ३०० एकक वीज मोफत मिळणार असून, अतिरिक्त विजेच्या विक्रीतून १५ हजार रुपये कमावण्याची संधी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गेल्या १३ फेब्रुवारीला योजनेचं उद्घाटन झालं होतं.
चालू वर्षातल्या खरीप हंगामासाठी स्फुरद आणि पलाश खतांच्या पोषण मूल्य आधारित अनुदानाचे दरही सरकारने मंजूर केले आहेत. त्याशिवाय आणखी तीन खत श्रेणींचा प्रकारांचा समावेश अनुदान योजनेत करण्याचा निर्णयही मंत्रिमंडळाने घेतला आहे.
****
राज्यातल्या मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाला मिळणाऱ्या ५०० कोटी रुपये कर्जाची हमी मर्यादा, आता कायमस्वरुपी करण्यात आली आहे. काल झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या निर्णयामुळे अल्पसंख्याक विशेषत: मुस्लिम समाजात रोजगाराच्या संधी वाढणार आहेत. राज्यातल्या अनेक मुस्लिम संस्था, संघटनांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे या निर्णयासाठी आभार मानले आहेत.
****
खरीप हंगाम-२०२३ मध्ये दुष्काळामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानासाठी बाधित शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या मदतीपोटी २ हजार ४४३ कोटी २२ लाख ७१ हजाराचा निधी वितरणास राज्य शासनाने मान्यता दिली आहे. याबाबतचा शासन निर्णय काल जारी करण्यात आला. या निर्णयामुळे राज्य शासनाने आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना दिलेल्या मदतीच्या आश्वासनाची पूर्तता केल्याचं, मदत आणि पुनर्वसन तसंच आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल पाटील यांनी म्हटलं आहे.
****
केंद्र सरकारच्या नव्या शिक्षण धोरणानुसार मातृभाषेतून शिक्षण देण्यासाठी आयआयटी मुंबईने कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित सॉफ्टवेअर विकसित केलं असून, हे सॉफ्टवेअर सगळया विद्यापीठांना देण्यात येईल, अशी माहिती उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी काल विधान परिषदेत दिली. यामुळे शिक्षकाने कोणत्याही भाषेत शिकवलं तरी मातृषाभेतूनच विद्यार्थ्याला ते समजू शकेल, असं हे सॉफ्टवेअर असल्याचं त्यांनी सांगितलं.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ सुधारणा विधेयक काल विधान परिषदेत मंजूर करण्यात आलं. या सुधारीत विधेयकामुळे या विद्यापीठात तंत्रशास्त्र अभ्यासक्रम मराठीतूनही उपलब्ध होणार आहे.
येत्या शैक्षणिक वर्षांपासून पदवीअभ्यासक्रम चार वर्षांचा केला जाणार असून, तो पूर्ण करण्यासाठीचा कालावधी ऐच्छिक असणार आहे. या दरम्यान एकावेळी अनेक भाषा किंवा कौशल्य आत्मसात करणं सोपं होईल, असंही पाटील यांनी सांगितलं.
****
राज्य शासनाच्या आरोग्य विभागातल्या गट-अ या संवर्गातल्या एक हजार ४४६ वैद्यकीय अधिकाऱ्यांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते काल पदस्थापनेचे ऑनलाईन आदेश देण्यात आले. आरोग्य विभागानं युद्ध पातळीवर ही भरती प्रक्रिया यशस्वीपणे राबवली असून, सामान्य नागरिकांना वेळेवर आणि गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा देण्यात यावी, असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केलं. मुंबई इथं झालेल्या या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत उपस्थित होते.
****
राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या इयत्ता दहावीच्या लेखी परीक्षेला आजपासून सुरुवात होत आहे. यंदा नऊ विभागीय मंडळातून १६ लाख नऊ हजार ४४५ विद्यार्थी ही परीक्षा देणार आहेत. यासाठी पाच हजार ८६ केंद्र निश्चित करण्यात आली आहेत. परीक्षेदरम्यान गैरप्रकरणांना आळा बसावा यासाठी मंडळाकडून २७१ भरारी पथकं नेमण्यात आली आहेत. गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही निर्धारित वेळेनंतर शेवटी दहा मिनिटं वाढवून देण्यात आली आहेत. विद्यार्थ्यांनी आत्मविश्वासाने परीक्षा द्यावी असं आवाहन करून शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
****
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या नेत्यांची एक महत्त्वपूर्ण बैठक काल ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या निवासस्थानी पार पडली. महाविकास आघाडीच्या घटक पक्षांनी कोणत्या आणि किती जागा लढवायच्या याबद्दल या बैठकीत चर्चा झाल्याचं कॉंग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी सांगितलं. निवडून येण्याची क्षमता हेच महाविकास आघाडीचं सूत्र आहे, अद्याप जागा वाटप ठरलेलं नसून वंचित आघाडीसोबत चर्चा सुरु असल्याची माहितीही थोरात यांनी दिली.
****
चालू गाळप हंगामात आत्तापर्यंत राज्यातल्या साखरेच्या उत्पादनात गेल्या वर्षीच्या तुलनेत सुमारे ७२ लाख क्विंटलने घट झाली आहे. केंद्र सरकारने उसाचे रास्त आणि किफायतशीर दर- एफआरपीमध्ये वाढ केल्यानंतर साखरेच्या घाऊक बाजारातील किमान विक्री दरात देखील वाढ करण्याची मागणी साखर कारखानदारांनी केली आहे. दरम्यान यावर्षी राज्यात आत्तापर्यंत सुमारे ७९५ लाख क्विंटल साखरेचं उत्पादन झाल्याचं साखर आयुक्त कार्यालयानं सांगितलं आहे.
****
राष्ट्रीय औष्णिक ऊर्जा महामंडळ - एनटीपीसीच्या, एनटीपीसी हरित ऊर्जा मर्यादित - एनजीईएल या कंपनीनं, महाराष्ट्र राज्य वीजनिर्मिती कंपनी- महाजेनकोशी नवीकरणीय ऊर्जा पार्क विकसित करण्यासाठी करार केला आहे. या संयुक्त कराराअंतर्गत तयार होणाऱ्या कंपनीच्या माध्यमातून महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर हरित ऊर्जानिर्मिती करण्यात येणार आहे.
****
लातूर जिल्ह्यात उद्योग क्षेत्रात गुंतवणुकीला चालना देण्यासाठी जिल्हा उद्योग केंद्राच्यावतीने काल लातूर इथं राज्यातली पहिली जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषद पार पडली. जिल्ह्यात गुंतवणुकीसाठी प्रोत्साहन देण्यासाठी गुंतवणूकदार आणि व्यावसायिक यांना एकत्र व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी ही परिषद आयोजित करण्यात आली होती. जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्या उपस्थितीत झालेल्या या परिषदेत ९५ उद्योग घटकांसाठी सामंजस्य करार करण्यात आले.
****
कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पाअंतर्गत टप्पा क्रमांक सहा ला लवकरच प्राधान्यक्रम मिळणार असल्याची माहिती आमदार ज्ञानराज चौगुले यांनी दिली. उमरगा इथं काल जलसंपदा विभागांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर ते बोलत होते. टप्पा क्रमांक सहा मधल्या प्रस्तावित बंदिस्त नलिकेदवारे अस्तित्वातल्या एकूण १७ साठवण तलावात ३७ पूर्णांक ३५ दशलक्ष घनमीटर पाणी सोडण्यात येणार असून, याद्वारे उमरगा आणि लोहारा तालुक्यातलं एकूण ६५ टक्के क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे.
****
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यासाठी विभागीय आयुक्त मधुकर राजे आर्दड यांनी तीन स्थानिक सुट्ट्या जाहीर केल्या आहेत. या वर्षात दोन एप्रिलला संत एकनाथ महाराज कालाष्टमी, ११ सप्टेंबरला जर जरी जर बक्ष ऊर्स तर ३१ ऑक्टोबरला नरक चर्तुदशी या सणांनिमित्त स्थानिक सुट्ट्या जाहीर करण्यात आल्या आहेत.
****
नांदेड महापालिकेचा एक हजार ७१२ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प काल झालेल्या विशेष सर्वसाधारण सभेत मंजूर करण्यात आला. महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक डॉ. महेशकुमार डोईफोडे यांनी हा अर्थसंकल्प मांडला. कोणतीही करवाढ न करता शहरवासियांना सर्व मूलभूत सोयी सुविधा देण्याचा महापालिकेचा प्रयत्न राहणार असल्याचं, डोईफोडे यांनी यावेळी स्पष्ट केलं.
****
राज्याच्या नगरविकास विभागाने वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत धाराशिव शहरासाठी सहा कोटी ३२ लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी काल ही माहिती दिली. याअंतर्गत शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृह, अण्णाभाऊ साठे स्मृती उद्यान आणि शादीखान्याचं काम होणार आहे. त्याचबरोबर महिलांसाठी व्यायामशाळा, लहान मुलांसाठी विरंगुळा केंद्र, स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांकरता ई-लायब्ररी आणि अद्ययावत अभ्यासिकेच्या कामांचा यात समावेश आहे.
हिंगोली शहरासाठीही विशेष अनुदान योजनेत दहा कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे. आमदार तानाजी मुटकुळे यांनी यासाठी प्रस्ताव पाठवला होता.
****
परभणी जिल्ह्यातील अल्पसंख्यांक बेरोजगार उमेदवारांसाठी परवा तीन मार्चरोजी पंडित दीनदयाळ उपाध्याय महारोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे. पाडेला फंक्शन हॉल, इथं सकाळी १० वाजता हा मेळावा होणार आहे. या सहभागी होण्यासाठी इच्छुकांनी राज्य महास्वयम डॉट जीओव्ही डॉट इन या वेबसाईटवर नाव नोंदणी करावी, असं आवाहन करण्यात आलं आहे.
****
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नाशिक जिल्हा प्रमुख सुधाकर बडगुजर यांचे मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी सलीम कुत्ता याच्याशी असलेल्या संबंधाची चौकशी केल्यानंतर, नाशिक पोलीसांनी बडगुजर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. नाशिक पोलीसांनी १८ जणांची चौकशी करून जबाब घेतले, त्यानंतर ही कारवाई करण्यात आली.
****
बीड जिल्हयात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहवी यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांनी मनाई आदेश जारी केले आहेत. यानुसार मोर्चे, निदर्शनं तसंच आंदोलनासह पाच किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तींच्या जमावास परवानगी शिवाय एकत्र येण्यास निर्बंध असेल. आजपासून येत्या १४ तारखेच्या मध्यरात्रीपर्यंत हे आदेश लागू राहतील.
****
मागास प्रवर्गात व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना वसतिगृह प्रवेशासाठी अर्ज करण्याचं आवाहन, नांदेडच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या सहाय्यक संचालकांनी केलं आहे. १० मार्च ही अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे.
****
राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिम परवा तीन मार्चला राबवण्यात येणार आहे. छत्रपती संभाजीनगर शहरात शून्य ते पाच वर्ष वयोगटातल्या एक लाख ९८ हजार ९१० बालकांना पोलिओ डोस देण्यात येणार आहे.
****
No comments:
Post a Comment