Regional Marathi Text Bulletin, Chatrapati Sambhajinagar
Date: 02 March 2024
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०२ मार्च २०२४ दुपारी १.०० वा.
****
राज्य शासनाच्या वतीनं
आयोजित नमो महारोजगार मेळाव्याला बारामती इथं आज दुपारी बारा वाजता सुरुवात झाली असून
या मेळाव्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार शरद पवार आदी उपस्थिती आहेत. पाच हजारांवर उमेदवारांनी नमो महारोजगार मेळाव्यात
नोंदणी केली असून २५४ कंपन्या रोजगार देणार आहेत. तरुणांना रोजगार मिळेपर्यंत आपण
काम करत राहणार असल्याचं कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी यावेळी म्हटलं. या मेळाव्यात उमेदवारांना
व्यवसाय मार्गदर्शन आणि समुपदेशनही करण्यात येणार आहे.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी
आज झारखंड मधल्या पस्तीस हजार सातशे कोटी रुपये तसंच पश्चिम बंगालमधील नादिया
जिल्ह्यातल्या कृष्णनगर इथं १५ हजार कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांचं उद्घघाटन
आणि पायाभरणी केली. हे प्रकल्प खतं, रेल्वे, ऊर्जा आणि कोळसा क्षेत्राशी संबंधित आहेत.
या प्रकल्पाच्या माध्यमातून भारत युरियाच्या बाबतीत स्वावलंबी होईल असा विश्वास
पंतप्रधानांनी यावेळी व्यक्त केला.
****
मेक इन इंडिया मोहिमेअंतर्गत संरक्षण
मंत्रालयानं पाच कंपन्यांसोबत ३९ हजार १२५ कोटी रुपयांचे खरेदी करार केले आहेत.
संरक्षणमंत्री राजनाथसिंह आणि संरक्षण सचिव गिरीधर अरामाने यांच्या उपस्थितीत हे
करार करण्यात आले.
****
कलावंत
आणि तंत्रज्ञांच्या मदतीनं मराठी चित्रपटसृष्टीतील
समस्या सोडवण्यासाठी निश्चितपणे प्रयत्न केले जातील, असं प्रतिपादन सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केलं. मराठी
चित्रपटसृष्टीतील मान्यवर कलावंतांशी मुनगंटीवार यांनी नुकताच संवाद साधला. मराठी
चित्रपट निर्मितीला प्रोत्साहन देण्याचं राज्य शासनाचं धोरण असल्याचं त्यांनी
सांगितलं. राज्य शासनानं उपलब्ध करून दिलेल्या ३८७ कोटी रुपयांच्या निधीतून
राज्यात ७५ चित्रनाट्यगृह उभारणार असल्याचं तसंच वृद्ध कलावंतांच्या मानधन
वाढीबाबत लवकरच निर्णय घेणार असल्याचं मुनगंटीवार यांनी सांगितलं.
****
बालविवाह
रोखण्यासाठी विवाहकार्यात प्रत्यक्ष किंवा
अप्रत्यक्षरित्या सहभागी असणाऱ्या सर्वांवर कारवाई करा, अशी सूचना राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर
यांनी दिली. काल यासंदर्भात कोल्हापूर इथं झालेल्या बैठकीत त्या बोलत होत्या.
महिलांवरील गुन्हे रोखण्यासाठी नागरिकांनीही सामाजिक बांधिलकी
म्हणून एकजुटीनं पुढं यावं, असं आवाहनही चाकणकर यांनी केलं.
****
राज्यात उद्या तीन मार्च रोजी, सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण
मोहिम राबवण्यात येणार आहे. या अंतर्गत नागरिकांनी आपल्या शून्य ते पाच वर्ष
वयोगटातल्या मुलांचं लसीकरण करावं, असं आवाहन आरोग्य मंत्री डॉक्टर तानाजी सावंत यांनी केलं आहे.
छत्रपती संभाजीनगर महापालिकेअंतर्गत सुमारे दोन लाख
बालकांना पोलिओ डोस देण्याचं नियोजन आहे. यासाठी ६८९ पोलिओ बूथ उभारण्यात आल्याचं
महापालिकेच्या पत्रकात म्हटलं आहे.
****
सार्वजनिक वितरण
व्यवस्थेअंतर्गत हिंगोली जिल्ह्यातल्या अंत्योदय शिधापत्रिका धारकांसाठी ६३५ क्विंटलचे
नियतन शासनाकडून प्राप्त झालं असून सर्व अंत्योदय शिधापत्रिकाधारकांनी स्वस्त
धान्य दुकानातून साखरेची उचल करावी, असं आवाहन जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी केलं आहे.
****
सिंधुदुर्ग जिल्ह्यात
आंगणेवाडी इथं आज भराडी देवीची यात्रा मोठ्या उत्साहात संपन्न होत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय मंत्री
नारायण राणे यांच्यासह विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, उद्योगमंत्री
उदय सामंत यांनी भराडी देवीचं दर्शन घेतलं. संपूर्ण मंदिराला
फुलांच्या सजावटीसह आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे. या यात्रेला दहा ते पंधरा लाख
भाविक येण्याची शक्यता असल्यामुळं पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
****
चंद्रपूर जिल्ह्यात कालपासून ताडोबा महोत्सवाला
प्रारंभ झाला. ताडोबाचा पर्यटन आणि रोजगार
विषयक समन्वय साधण्याचा प्रयत्न असल्याची प्रतिक्रिया वनमंत्री मुनगंटीवार यांनी
यावेळी व्यक्त केली. यावेळी आयोजित परिसंवादात देशभरातून वने-वन्यजीव
अभ्यासक, पर्यटन क्षेत्रातील तज्ज्ञ उपस्थित होते. तीन दिवस चालणाऱ्या या महोत्सवात वनविषयक विविध पुस्तकांचं प्रकाशन झालं तसंच
सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजनही करण्यात आलं आहे.
****
रायगड जिल्ह्यात काल काही ठिकाणी पडलेला अवकाळी
पाऊस आणि ढगाळ वातावरणाचा फटका आंबा पिकाला बसण्याची शक्यता असून मोहर पडल्यामुळं
उत्पादन घटणार आहे. त्यामुळं आंबा उत्पादक शेतकरी
चिंतेत आहे.
****
आदिलाबाद ते नांदेड इंटर सिटी एक्स्प्रेस आज रद्द करण्यात
आली असून परतीची नांदेड ते
आदिलाबाद इंटर सिटी एक्स्प्रेसही आज रद्द करण्यात आली असल्याचं दक्षिण मध्य रेल्वेच्या
नांदेड कार्यालयानं कळवलं आहे.
****
No comments:
Post a Comment