▼

Sunday, 3 March 2024

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर, दिनांक: 03.03.2024 रोजीचे सकाळी: 11.00 वाजेचे मराठी संक्षिप्त बातमीपत्र

 

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

संक्षिप्त बातमीपत्र

०३ मार्च २०२४ सकाळी ११.०० वाजता

****

राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमला आज सकाळपासून प्रारंभ झाला असून
ठिकठिकाणी बालकांना लस दिली जात आहे. पोलिओच्या समूळ उच्चाटनाकरता शुन्य ते पाच वयोगटातील सर्व बालकांना पालकांनी जवळील लसीकरण केंद्रात जाऊन पोलिओची लस द्यावी, असं आवाहन सार्वजनिक आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी केलं आहे.

****

मुंबई-सिंधुदुर्ग हा ग्रीनफिल्ड अर्थात हरीत आणि मैदानी जमिनीच्या क्षेत्रातून जाणारा द्रुतगती महामार्ग  होणार असून यामुळं वेळ आणि इंधन बचतीसह रोजगार-पर्यटन व्यवसाय वाढीस लागेल, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. ते काल सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या आंगणेवाडी इथं बोलत होते.

****

राज्यातील साखर कारखान्यांना साखरेच्या मासिक विक्रीचा कोटा वाढवून देण्यात आला आहे. केंद्र सरकारनं गेल्या महिन्यातही असा विक्रीचा कोटा वाढवला होता. मात्र त्यातील साखरेची संपूर्ण विक्री झाली नाही. यामुळं साखर कारखान्यांसमोरील अडचणी वाढल्या आहेत.   

****

दरम्यान, हिंगोली जिल्ह्यात सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत अंत्योदय शिधापत्रिका धारकांसाठी, ६३५ क्विंटल साखरेचं आयतन मंजूर झालं आहे. गेल्या वर्षातल्या ऑक्टोबर ते डिसेंबर या तीन महिन्यांसाठी प्रति शिधापत्रिका एक किलो साखर, संबंधित स्वस्त धान्य दुकानामार्फत वितरीत होणार आहे.

****

आगामी लोकसभा निवडणुकीत, भाजप महायुतीचे ४५ खासदार निवडून आणण्याचा रिपब्लिकन पक्षाचा संकल्प असल्याचं, पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी म्हटलं आहे. ते काल मुंबईत आयोजित पक्षाच्या संकल्प मेळाव्यात बोलत होते. आगामी मुंबई महापालिका निवडणुकीतही महायुतीमधून २५ जागा लढवून, त्यापैकी किमान १५ जागा निवडून आणण्याचा आणि मुंबईचे उपमहापौरपद मिळवण्याचा पक्षाचा संकल्प असल्याचं त्यांनी सांगितलं.

****

नांदेड इथं परवा पाच मार्चला जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषद होणार आहे. यात जिल्हाधिकारी अभिजीत राऊत मार्गदर्शन करणार आहेत. यासह परभणी इथंही पाच मार्चला जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषद होणार आहे.

****

बुलडाणा जिल्ह्यात मेहकर-छत्रपती संभाजीनगर मार्गावरील अंजनी खुर्द इथं काल संध्याकाळी दुचाकी आणि कंटेनरच्या धडकेत दुचाकीवरील दोन जणांचा मृत्यू झाला. रामेश्वर कांबळे आणि पंडित भारसाकळे अशी मृतांची नावं असून या अपघातात एक जण गंभीर जखमी झाला.

****

No comments:

Post a Comment