Monday, 18 March 2024

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर, दिनांक:18.03.2024 रोजीचे दुपारी: 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date: 18 March 2024

Time: 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक: १८ मार्च २०२ दुपारी १.०० वा.

****

प्रत्येक निवडणूक रोख्याचा क्रमांक सार्वजनिक करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं भारतीय स्टेट बॅंकेला दिले आहेत. मात्र एप्रिल २०१९ आधीची माहिती सार्वजनिक करण्याची मागणी न्यायालयानं फेटाळली. गुरुवारपर्यंत बॅंकेला यासंदर्भात प्रतिज्ञापत्र सादर करण्याचा आदेशही न्यायालयानं दिला आहे. ही सर्व माहिती निवडणूक आयोगानं संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यासही न्यायालयानं सांगितलं आहे.

****

आर्थिक गुन्हे प्रकरणी दिल्लीचे माजी आरोग्य मंत्री सत्येंद्र जैन यांचा जामिन अर्ज सर्वोच्च न्यायालयानं आज फेटाळला. जैन यांना ताबडतोब न्यायालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले.

****

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पुन्हा एकदा सक्तवसुली संचालनालय - ईडीच्या चौकशीला हजर राहण्यास नकार दिला आहे. दिल्ली मद्य धोरण घोटाळा आणि दिल्ली जल बोर्ड मधल्या कथित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी ईडीनं केजरीवाल यांना समन्स पाठवलं होतं. इडीचं हे समन्स अवैध असल्याचं सांगत केजरीवाल यांनी हजार राहण्यास नकार दिला. याआधी देखील त्यांना सात वेळा समन्स बजावण्यात आलं होतं.

****

नवी दिल्लीच्या भारत मंडपम् मध्ये आजपासून स्टार्टअप महाकुंभ सुरु झाला. भारतातल्या स्टार्टअप्स युक्त वातावरणाचं दर्शन घडवणारा हा उपक्रम, २० मार्चपर्यंत सुरु असेल. स्टार्टअप्स आणि गुंतवणुकदार कंपन्या यांना एकत्र आणण्याचं या उपक्रमाचं उद्दीष्ट आहे. केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाच्या उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभागाचे सचिव राजेश कुमार सिंह यावेळी उपस्थित होते. २०१६ मध्ये जेव्हा स्टार्टअप इंडिया उपक्रम सुरू करण्यात आला, तेव्हा जवळपास ३०० स्टार्टअप होते आणि आता ही संख्या देशात एक लाखाहून अधिक झाल्याची माहिती त्यांनी दिली.

****

लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आज आणि उद्या महायुतीच्या बैठका होणार असून, लवकरच सर्व जागा जाहीर होतील, अशी माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. ते आज नागपूर इथं वार्ताहरांशी बोलत होते. काल इंडिया आघाडीच्या मुंबईत झालेल्या सभेवर त्यांनी टीका केली.

****

लोकसभा निवडणुकीसाठी नाशिक जिल्ह्यातल्या एका जागेवर भाजपने उमेदवार जाहीर केला असला, तरी नाशिक लोकसभा मतदारसंघावर राष्ट्रवादीचा दावा आहे, असं मत पक्षाचे नेते तथा मंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केलं आहे. ते काल नाशिक इथं माध्यमांशी बोलत होते. जिल्ह्यामध्ये भाजपचे सहा आमदार आहेत, त्यामुळे आता नाशिकची जागा राष्ट्रवादी काँग्रेसला मिळाली पाहिजे यासाठी आग्रह असल्याचं भुजबळ म्हणाले.

****

आगामी लोकसभा निवडणुकीत आदर्श आचारसंहितेचा भंग केल्यास कारवाईचा इशारा छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी दिलीप स्वामी यांनी दिला आहे. आकाशवाणीला दिलेल्या विशेष मुलाखतीत ते बोलत होते. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनानं केलेल्या तयारीची त्यांनी यावेळी माहिती दिली. मतदान प्रक्रियेत काही अडचण असेल, तर एक नऊ पाच शून्य हा नि:शुल्क क्रमांक सुरु केला असल्याचं त्यांनी सांगितलं. नागरीकांनी अधिकाधिक मतदान करण्याचं आवाहन जिल्हाधिकारी स्वामी यांनी यावेळी केलं.

****

लातूर जिल्ह्यातले काँग्रेसचे नेते तथा लातूर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष मिठाराम राठोड यांचं हैदराबाद इथं निधन झालं, ते ७४ वर्षांचे होते. लातूर जिल्हा परिषदेच्या माध्यमातून तसंच विविध सामाजिक, राजकीय, शैक्षणिक क्षेत्रात राठोड यांचं मोठं योगदान राहिलं आहे. त्यांच्या पार्थिवावर रेणापूर इथं अंत्यसंस्कार करण्यात आले.

****


भारतीय ॲथलिट गुलवीर सिंग यानं अमेरिकेत कॅलिफोर्निया इथं झालेल्या १० किलोमीटर मॅरोथॉन स्पर्धेतल्या कामगिरीनं नव्या राष्ट्रीय विक्रमाची नोंद केली आहे. या स्पर्धेत त्यानं २७ मिनीटं आणि ४१ पूर्णांक ८१ सेकंदाची वेळ नोंदवत १६ वर्षे जुना राष्ट्रीय विक्रम मोडला. या स्पर्धेत त्यानं दुसरं स्थान पटकावलं, मात्र तो पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेसाठी पात्र ठरू शकला नाही.

दरम्यान, स्लोव्हाकिया इथं झालेल्या चालण्याच्या शर्यतीत पुरुषांच्या २० किलोमीटर प्रकारात भारताच्या राम बाबूने सर्वोत्कृष्ट वेळ नोंदवत, पॅरिस ऑलम्पिकसाठी पात्रता मिळवली आहे. यापूर्वी हांगझू इथं झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत ३५ किलोमीटर चालण्याच्या शर्यतीत त्यानं कांस्य पदकाची कमाई केली होती.

****

हवामान विभागानं महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि छत्तीसगढमध्ये अनेक ठिकाणी पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. येत्या दोन दिवसांत मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असून, मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे. विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडण्याचा अंदाज असून तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह गारपिटीचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या काळात मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असून कोकणात हवामान कोरडं राहील, अशी शक्यता हवामानशास्त्र विभागानं व्यक्त केली आहे.

****s

No comments:

Post a Comment