Thursday, 21 March 2024

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर, दिनांक:21.03.2024रोजीचे सकाळी: 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date: 21 March 2024

Time: 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक: २१ मार्च २०२ सकाळी ७.१० मि.

****

ठळक बातम्या 

·      लोकसभा निवडणुकीसाठीच्या पहिल्या टप्प्याची अधिसूचना जारी, राज्यातल्या पाच  मतदारसंघांचा समावेश

·      देशातली सर्व प्राप्तिकर कार्यालयं येत्या २९ ते ३१ मार्च या सुटीच्या काळातही सुरू राहणार

·      मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी महिलांनी स्वतः मतदान आणि मतदार जागृतीसाठी पुढाकार घ्यावा - छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांचं आवाहन

आणि

·      हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यात आज सकाळी भूकंपाचे धक्के

सविस्तर बातम्या

लोकसभा निवडणुकीसाठीच्या पहिल्या टप्प्यातल्या मतदानाबाबतची अधिसूचना काल जारी करण्यात आली. या टप्प्यात विदर्भातल्या रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर, आणि चंद्रपूर या पाच मतदारसंघांसह १७ राज्यं आणि चार केंद्रशासित प्रदेशांमधल्या १०२ मतदारसंघांचा समावेश आहे. या मतदार संघात २७ मार्चपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार असून, २८ तारखेला अर्जांची छाननी होणार आहे तर १९ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. नागपूर लोकसभा मतदारसंघ निवडणुकीसाठी काल पहिल्या दिवशी एक नामनिर्देशन पत्र दाखल झाल्याचं आमच्या प्रतिनिधींनी कळवलं आहे.

****

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मुंबईत नुकत्याच झालेल्या सभेत शक्ती शब्दाबाबत धार्मिक भावना दुखावणारं आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप, भारतीय जनता पक्षानं केला आहे. भाजपनं या प्रकरणी निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल करत, राहुल गांधी यांनी या संदर्भात जनतेची बिनशर्त माफी मागावी, तसंच यापुढे धार्मिक भावना दुखावणारी विधानं करणार नसल्याची ग्वाही द्यावी, अशी मागणी केली आहे.

****

केंद्रीय मंत्री शोभा करंदलाजे यांनी तमिळनाडूसंदर्भात केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याप्रकरणी, द्रविड मुनेत्र कळघम पक्षानं निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती. आयोगानं कर्नाटकच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना यासंदर्भात आवश्यक कार्यवाहीचे निर्देश दिले आहेत.

दरम्यान, देशभरातले राजकीय फलक हटवण्याचे निर्देश निवडणूक आयोगानं सर्व राज्यांना दिले आहेत. देशभरात अनेक ठिकाणी अजूनही असे फलक असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्याच्या पार्श्वभूमीवर आयोगानं हे निर्देश दिले.

****

देशातली सर्व प्राप्तिकर कार्यालयं येत्या २९, ३० आणि ३१ मार्च या सुटीच्या दिवशीही सुरू राहतील. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने काल हे निर्देश जारी केले. दरम्यान, चालू आर्थिक वर्षात प्रत्यक्ष कर संकलनात १८ पूर्णांक ७४ शतांश टक्क्यांनी वाढ झाल्याची माहिती, अर्थ मंत्रालयानं दिली आहे.

****

अमरावती लोकसभा मतदार संघाची जागा भारतीय जनता पक्ष लढवेल, या मतदार संघातला जो कोणी उमेदवार असेल, तो भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढेल, असं भाजप नेते तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. ते काल अकोला इथं निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व व्यवस्थेचा आढावा घेतल्यानंतर पत्रकारांशी बोलत होते. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यावेळी उपस्थित होते.

****

महायुतीची लोकसभा निवडणूक जागा वाटपाची बोलणी एक ते दोन दिवसात पूर्ण होईल, आणि ४८ जागांचं सन्मानपूर्वक वाटप शुक्रवार किंवा शनिवारी होईल, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी दिली. ते काल मुंबईत प्रसार माध्यमांशी बोलत होते. अधिकाधिक जागा जिंकण्याचं उद्दिष्ट असल्यानं, आम्ही सर्वच गोष्टींचा आढावा घेत आहोत. त्यामुळेच एक - दोन दिवसांचा विलंब होत असल्याचं तटकरे म्हणाले.

****

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल बुलडाणा जिल्ह्यात सिंदखेडराजा आणि मेहकर इथं जाहीर सभा घेतली. अवकाळी पाऊस तसंच गारपीटीमुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अजुनही नुकसान भरपाई मिळाली नसल्याचं सांगत केंद्र आणि राज्य सरकारवर त्यांनी टीका केली.

****

वंचित बहुजन आघाडी तसंच स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं महाविकास आघाडीत सहभागी व्हावं, अशीच आपली भूमिका असल्याचं, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे. ते काल छत्रपती संभाजीनगर इथं पत्रकारांशी बोलत होते. या संदर्भात अत्यंत सकारात्मक चर्चा झाली असून, कोणाचीही आडमुठेपणाची भूमिका नाही, येत्या एक दोन दिवसांत याबाबत निर्णय होईल, असं राऊत यांनी स्पष्ट केलं.

****

बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त म्हणून भूषण गगराणी यांची नेमणूक झाली आहे. ठाणे महानगरपालिका आयुक्तपदी सौरभ राव तर नवी मुंबईचे मनपा आयुक्त म्हणून कैलास शिंदे यांची नियुक्ती झाली आहे. निवडणूक आयोगानं काल हे जाहीर केलं. नवीन आयुक्तांकडे कोणताही अतिरिक्त पदभार नसेल.

****

मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी महिलांनी स्वतः मतदान आणि मतदार जागृतीसाठी पुढाकार घ्यावा, असं आवाहन छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी केलं आहे. काल पैठण इथं महिला मतदारांच्या मेळाव्यात ते बोलत होते. महिला मतदारांच्या लहान बाळांना सांभाळण्यासाठी पाळणाघराची व्यवस्था मतदान केंद्रावर करण्यात येत असल्यामुळे महिलांनी चिंता न बाळगता मतदान करावं, असं ते म्हणाले.

दरम्यान, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी काल पैठण इथं निवडणूक पूर्वतयारीचा तसंच ३१ मार्चला होणाऱ्या नाथषष्ठी यात्रेच्या पूर्वतयारीचा आढावा घेतला. प्रशासनानं नाथषष्ठी यात्रेसाठी येणाऱ्या यात्रेकरुंसाठी स्वच्छता, सुव्यवस्था आणि सुविधांकडे लक्ष द्यावं, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिले.

****

निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशानुसार सर्व राजकीय पक्ष तसंच अपक्ष उमेदवारांनी, निवडणूक खर्चासाठी नवीन खातं उघडून त्या खात्यातून खर्च करावा, असे निर्देश, नांदेडचे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिले. बँक व्यवस्थापकांसोबत झालेल्या बैठकीत काल ते बोलत होते.

दरम्यान, नांदेड जिल्ह्यात पोलीस दलाच्या वतीनं सुरू असलेल्या कारवाई दरम्यान ४९ तलवारी, ९४ खंजीर, ७ गुप्ती, २ बिचवे असा, सुमारे सव्वा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली. जिल्ह्यात गेल्या चार दिवसांच्या काळात तब्बल ४४ लाखांची रोकड, सात लाख रुपयांचं मद्य आणि १६ लाख रुपयांचं इतर साहित्य जप्त करण्यात आलं आहे.

****

लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर लातूर जिल्हा आणि कर्नाटक राज्यातल्या बिदर जिल्हा प्रशासनातल्या अधिकाऱ्यांची काल संयुक्त बैठक झाली. लातूर जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांच्यासह इतर अधिकारी यावेळी उपस्थित होते.

दरम्यान, लातूर जिल्हास्तरीय माध्यम प्रमाणीकरण आणि सनियंत्रण समितीला इलेक्ट्रॉनिक माध्यमातून प्रसारित होणाऱ्या जाहिरातींसह सामाजिक माध्यमांच्या वापरावर लक्ष ठेवण्याच्या सूचना जिल्हाधिकार्यांनी दिल्या आहेत.

****

हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यात आज सकाळी भूकंपाचे धक्के जाणवले.

हिंगोली जिल्ह्यात वसमत, कळमनुरी, औंढा नागनाथ तालुक्यातल्या अनेक गावांमध्ये सकाळी सहा वाजून सात मिनिटांनी अणि सहा वाजून १९ मिनिटांनी हे धक्के जाणवले. जमिनीतून मोठे आवाज आले आणि जमिन हादरली, त्यामुळे भयभीत होऊन नागरिक घराबाहेर पडले आहेत. पहिला धक्का चार पूर्णांक पाच, तर दुसरा धक्का तीन पूर्णांक सहा रिश्टर स्केलचा असल्याची माहिती हिंगोली जिल्हा आपत्कालीन कक्षाच्या वतीने देण्यात आली.

आखाडा बाळापूर केंद्रबिंदू असलेल्या या भूकंपाचे धक्के नांदेड शहरासह जिल्ह्यातल्या काही भागातही जाणवले. नांदेड शहरात आज सकाळी सहा वाजून दहा मिनिटांनी भूगर्भातून आवाजासह भूकंपाचे धक्के जाणवले..

****

चवदार तळे सत्याग्रहाच्या सत्याण्णवाव्या वर्धापन दिनानिमित्त भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना काल रायगड जिल्ह्यात महाड इथं देशभरातून दाखल अनुयायांनी अभिवादन केलं. काल सकाळी रायगड पोलिसांच्या वतीनं बाबासाहेबांना मानवंदना देण्यात आली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यानिमित्तानं बाबासाहेबांना आदरांजली अर्पण केली. 

****

जागतिक चिमणी दिवस काल पाळण्यात आला. छत्रपती संभाजीनगर इथं एन्व्हार्यमेंटल एज्युकेशन फाऊंडेशनच्या वतीनं, पर्यावरण संबंधी चाचण्या करणाऱ्या एक्झोथर्म प्रयोगशाळेच्या सहकार्यानं, शालेय विद्यार्थ्यांसाठी घरटी वाटप कार्यक्रम घेण्यात आला.

जागतिक चिमणी दिनानिमित्त लातूर इथं झाडांवर बांधण्यात आलेल्या कुंड्यांमध्ये जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्या हस्ते चिमण्यांसाठी दाणा-पाणी उपक्रमाला सुरूवात करण्यात आली.

****

नांदेड जिल्ह्यात जल जीवन मिशन अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे यंदा पाणी टंचाई कमी प्रमाणात भासणार असल्याचं याबाबतच्या अहवालात म्हटलं आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांनी अभियानांतर्गत नळ योजनांच्या कामांना गती दिल्यामुळे जिल्ह्यात अजून एकही पाणी टँकर लागला नसून, केवळ तीन गावांना अधिग्रहण सुरु असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

****

बीड जिल्ह्याबाहेर चारा वाहतूक करण्यास जिल्हा प्रशासनातर्फे मनाई करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी दिपा मुधोळ- मुंडे यांनी काल हे आदेश दिले. जिल्ह्यात सध्या ४३ दिवस पुरेल इतका चारा उपलब्ध असून, संभाव्य चारा टंचाईच्या पार्श्वभूमीवर हे आदेश देण्यात आल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं.

****

लातूर जिल्हा क्षयरोगमुक्त करण्यासाठी निक्षय मित्र बनून नागरिकांनी या मोहिमेत सहभागी होण्याचं आवाहन जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी केलं. राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण कार्यक्रमांतर्गत क्षयरुग्णांसाठी अन्नदाता उपक्रमाच्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी २५ क्षयरुग्णांना जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरुपात पोषण आहार देण्यात आला.

****

No comments:

Post a Comment