Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 22 March
2024
Time 18.10 to
18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २२ मार्च २०२४ सायंकाळी ६.१०
****
· इस्रोच्या 'आर. एल. व्ही. पुष्पक' उपग्रह
प्रक्षेपक वाहनाचं यशस्वीपणे भू अवतरण
· जागतिक जल दिन आज सर्वत्र विविध कार्यक्रमांनी साजरा
· यापुढं कोणतीही निवडणूक लढवणार नसल्याचा ज्येष्ठ नेते शरद पवार
यांचा पुनरुच्चार
आणि
· छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात १८ महसूल मंडळात गंभीर स्वरुपाचा
दुष्काळ जाहीर
****
भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोनं आज, 'आर. एल. व्ही. पुष्पक'
हे पुनर्वापर करण्याजोगं उपग्रह प्रक्षेपक वाहन यशस्वीपणे जमिनीवर
उतरवलं. कर्नाटकातल्या चित्रदुर्ग चाचणी केंद्रावर ही मोहीम पार पडली. संपूर्णपणे स्वयंचलित
पद्धतीनं अंतराळ यानाचं संचालन, लँडिंग आणि इंधन व्यवस्थापन केल्याबद्दल, इस्रोचे
अध्यक्ष सोमनाथ यांनी या अभियानाच्या चमूचं अभिनंदन केलं आहे. इस्रोच्या आजच्या यशस्वी
मोहिमेमुळे देशांतर्गत विकसित तंत्रज्ञानाची गुणवत्ता पुन्हा एकदा सिद्ध झाली आहे.
अंतराळातून परतणाऱ्या उपग्रह प्रक्षेपक वाहनाच्या अतिवेगवान स्वयंचलित लँडिंगसाठी हे
तंत्रज्ञान महत्त्वाचं आहे. आणखी एक उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल माहिती आणि प्रसारण
मंत्री अनुराग सिंह ठाकूर यांनी इस्रोच्या वैज्ञानिकांचं अभिनंदन केलं आहे.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज दोन दिवसांच्या
भूतान दौऱ्यावर दाखल झाले. भूतानचे राजे जिग्मे खेसर नामग्येल वांगचुक यांनी थिंपू
इथे झालेल्या समारंभात,
भूतानचा सर्वोच्च नागरी सन्मान, 'द ऑर्डर ऑफ द ड्रूक ग्यालपो' देऊन पंतप्रधान नरेंद्र
मोदी यांचा सन्मान केला. हा पुरस्कार म्हणजे एका व्यक्तीचा गौरव नसून भारत देशाचा आणि
भारतातल्या जनतेचा गौरव असल्याची भावना व्यक्त करत, आपण
भारतीय जनतेच्या वतीनं हा पुरस्कार स्वीकारतो, असं पंतप्रधानांनी नमूद केलं.
****
कथित मद्यधोरण घोटाळा प्रकरणात अटक झालेले
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या कोठडीसंदर्भातला निर्णय न्यायालयानं
राखून ठेवला आहे. केजरीवाल यांना दिल्लीच्या राऊस एव्हेन्यू न्यायालयात आज हजर करण्यात
आलं. यावेळी युक्तिवाद करताना सक्तवसुली संचालनालयानं, केजरीवाल
हेच या मद्य धोरण घोटाळ्याचे मुख्य सूत्रधार असल्याचा दावा करत, मद्य
धोरणातून मिळालेला पैसा गोवा निवडणुकीत वापरल्याचा आरोपही केला आणि केजरीवाल यांना
दहा दिवसांची ईडी कोठडी देण्याची मागणी न्यायालयाकडे केली.
दरम्यान, केजरीवाल यांच्या अटकेच्या
विरोधात आज आम आदमी पक्षाचे नेते आणि कार्यकर्त्यांनी आज दिल्ली आणि इतरत्र निषेधाची
निदर्शनं केली. या पक्षाच्या नेत्या आतिशी आणि सौरभ भारद्वाज यांच्यासह अन्य नेत्यांना
पोलिसांनी यावेळी ताब्यात घेतलं.
केजरीवाल यांच्या अटकेच्या निषेधार्थ आज
नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आम आदमी पक्षाच्या वतीनं निषेधाच्या घोषणा देण्यात
आल्या. टायर जाळत रास्ता रोको आंदोलनही करण्यात आलं. या कार्यकर्त्यांना नंतर पोलिसांनी
ताब्यात घेतलं.
धुळे इथेही आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी
केजरीवाल यांच्या अटकेचा निषेध करणारं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिलं.
जालना इथंही आप कार्यकर्त्यांनी आज निषेध
आंदोलन केलं. आम आदमी पक्षाचे जिल्हाध्यक्ष संजोग हिवाळे यांच्यासह अनेक कार्यकर्ते
या आंदोलनात सहभागी झाले.
****
दरम्यान, केजरीवाल यांना त्यांच्या
कर्मांमुळेच अटक झाल्याची परखड प्रतिक्रिया ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे
यांनी दिली आहे. ते आज अहमदनगर इथे पत्रकारांशी बोलत होते. आपल्यासोबत काम करणारे, मद्याच्या
विरोधात असलेले केजरीवाल आता मद्य धोरणं तयार करत असल्याचं पाहून आपल्याला त्रास झाल्याची
भावनाही हजारे यांनी व्यक्त केली.
****
दरम्यान, अरविंद केजरीवाल यांना
दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदावरून दूर करावं, अशी मागणी करणारी एक जनहित याचिका
आज दिल्ली उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. सामाजिक कार्यकर्ते सुरजित सिंह यादव
यांनी ही याचिका दाखल केली आहे.
****
दिल्ली अबकारी धोरण घोटाळा प्रकरणातच अटक
झालेल्या भारत राष्ट्र समिती पक्षाच्या नेत्या के.कविता यांनी केलेला जामीन अर्ज सर्वोच्च
न्यायालयानं दाखल करून घेण्यास नकार देत, जामिनासाठी
कनिष्ठ न्यायालयात जाण्यास सांगितलं आहे. राजकीय व्यक्ती असल्याच्या कारणावरून कोणालाही जामिनासाठी थेट सर्वोच्च न्यायालयात जाण्याची
परवानगी देता येणार नाही, सर्वांना नियमानुसार प्रक्रियाच पाळावी लागेल, अशी
टिपणी न्यायालयानं केली. हा निकाल आल्यानंतर आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी आपल्या अटकेविरोधात सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेली याचिका
मागे घेतली.
दरम्यान, के.कविता यांनी दाखल
केलेल्या, पीएमएलएच्या तरतुदींना आव्हान देणाऱ्या याचिकेवर न्यायालयानं सक्त वसुली संचालनालयाकडून
सहा आठवड्यात उत्तर मागितलं आहे.
****
जागतिक जल दिन आज सर्वत्र पाळला जात आहे.
पाण्याच्या बचतीसाठी जागरुकता निर्माण व्हावी यासाठी संयुक्त राष्ट्रसंघाने १९९२ मध्ये
झालेल्या अधिवेशनात २२ मार्च हा दिवस जल दिन म्हणून घोषित केला होता. शांततेसाठी पाणी
ही यंदाच्या जल दिनाची संकल्पना आहे.
जागतिक जल दिनाच्या निमित्ताने आज छत्रपती
संभाजीनगर इथं महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या वतीने जलसाक्षरता फेरी काढण्यात आली.
या फेरीमध्ये नागरिक तसंच सामाजिक संस्था मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.
धाराशीव इथे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या
वतीनं आज जागतिक जलदिन साजरा करण्यात आला. यावेळी प्राधिकरणाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी
जल प्रतिज्ञा घेतली. जलजागृतीसाठी शहरातून जलदिंडी काढण्यात आली. यावेळी दैनंदिन जीवनातली
पाणी वापरण्याची पद्धत,
काटकसर आणि स्वच्छता या विषयावर व्याख्यान झाल्याचं आमच्या वार्ताहरानं
कळवलं आहे.
****
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज दिवसभर
महायुतीच्या अनेक नेत्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर या शासकीय
निवासस्थानी फडणवीस यांच्याशी चर्चा केली. निवडणूक संचालन समितीची बैठकही इथे पार पडली.
भारतीय जनता पक्षानं आपल्या २० उमेदवारांची यादी जाहीर केली असून, आता
उर्वरित २८ जागांसाठी महायुतीमध्ये जागावाटप होणं बाकी आहे.
****
भाजपचे वरिष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री
नितीन गडकरी हे येत्या बुधवारी, २७ मार्चला, लोकसभेच्या
जागेसाठी भारतीय जनता पक्षातर्फे आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.त्या दिवशी सकाळी
९ वाजता नागपूरच्या संविधान चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयादरम्यान आपल्या कार्यकर्त्यांसह
रॅली काढून ते अर्ज भरणार असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
यापुढे आपण
कोणतीही निवडणूक लढवणार नसल्याचा पुनरुच्चार ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केला आहे.
बारामतीमध्ये आज ते पत्रकारांशी बोलत होते. महाविकास आघाडीतल्या जागा वाटपावर चर्चा
सुरू आहे,
असं त्यांनी सांगितलं. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल
यांच्या अटकेच्या कारवाईवर पवार यांनी टीका केली.
****
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील छत्रपती संभाजीनगर
तालुक्यात १४ तर सोयगाव तालुक्यात ४ अशा १८ महसूल मंडळात गंभीर स्वरुपाचा दुष्काळ जाहीर
करण्यात आला असून जिल्ह्यातील अन्य तालुक्यातील ५० महसूल मंडळांमध्ये दुष्काळ सदृष
परिस्थिती जाहीर करण्यात आली आहे. अशा गावांमध्ये दुष्काळी उपाययोजना व सवलती लागू
करण्याचे आदेशही जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी निर्गमित केले आहेत.
****
परभणी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी
विनय मून यांनी आज जिल्ह्यातल्या पाणी टंचाईबाबत आढावा बैठक घेतली. पाणी टंचाई कृती
आराखड्यातल्या प्रस्तावित उपाययोजनांचा यावेळी आढावा घेण्यात आला. सध्या जिल्ह्यामध्ये
दहा खाजगी विहिरी अधिग्रहित करून त्यातून पाणीपुरवठा सुरू आहे.
****
धाराशिव जिल्ह्यात सध्या बारा गावात २१ टँकरने
पाणीपुरवठा केला जात आहे. तर एकशे चाळीस गावात २७० विंधन विहिरींच्या अधिग्रहणातून
पाणी पुरवलं जात आहे.
****
हिंगोली जिल्ह्यातल्या सगळ्या ग्रामपंचायती
आणि नगर परिषद हद्दीतल्या सगळ्या यात्रा आणि धार्मिक स्थळी प्राण्यांना क्रूरतेनं वागवण्यास
तसंच धार्मिकतेच्या नावावर पशुबळी देण्यास प्रतिबंध करण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा
जिल्हा दंडाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिले आहेत. अशा पशुहत्या थांबवण्यासाठी ग्रामस्थ, ग्रामपंचायत
सदस्य, यात्रा समिती सदस्य,
देवस्थान विश्वस्त आणि समविचारी संस्था या सर्वांनी प्रयत्न
करावेत, असंही या आदेशात म्हटलं आहे.
****
बीड जिल्ह्यात निवडणूक काळात जात, धर्म
आणि भाषाविषयक शिबिरांचं आयोजन न करण्याबाबतचा आदेश आज बीडच्या जिल्हा दंडाधिकारी दीपा
मुधोळ-मुंडे यांनी रद्द केला. याबाबतचा आदेश आज जारी करण्यात आला आहे.
****
छत्रपती संभाजीनगर लोकसभा निवडणूक २०२४ ची
आदर्श आचारसंहिता १६ मार्च पासून लागू झाली आहे. निवडणूक प्रक्रिया दिनांक
चार जून रोजी पूर्ण होणार आहे. या कालावधीत लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात
येणार नाही,
असं जिल्हाधिकारी कार्यालयाकडून कळवण्यात आलं आहे.
****
No comments:
Post a Comment