Saturday, 23 March 2024

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर, दिनांक:23.03.2024रोजीचे दुपारी: 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date: 23 March 2024

Time: 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक: २३ मार्च २०२ दुपारी १.०० वा.

****

उत्तर अरबी समुद्रामध्ये चाचेगिरी करणाऱ्या ३५ सोमाली चाच्यांना घेऊन भारतीय नौदलाचं आयएनएस कोलकाता हे जहाज आज सकाळी मुंबईत दाखल झालं. या चाच्यांना मुंबईत यलो गेट पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं. हे जहाज एडनच्या आखातात चाचेगिरीविरोधी कारवायांसाठी तैनात करण्यात आलं होतं. आयएनएस कोलकाता जहाजाने प्रक्षेपित केलेल्या ड्रोनचा वापर करून सशस्त्र समुद्री चाच्यांच्या हालचालींची पुष्टी केली होती. सुमारे ४० दिवस चाललेल्या या कारवाईनंतर या चाच्यांनी आत्मसमर्पण केलं.

****

संसदेत प्रश्न विचारण्यासाठी पैसे घेतल्याच्या प्रकरणात, तृणमूल काँग्रेसच्या नेत्या महुआ मोईत्रा यांच्या कोलकातासह अन्य ठिकाणच्या मालमत्तांवर, सक्तवसुली संचालनालय - ईडीनं आज छापे मारले. सीबीआयनं लोकपालाच्या निर्देशानुसार मोईत्रा यांच्याविरोधात प्राथमिक माहिती अहवाल दाखल केला होता. 

****

भारतीय स्वातंत्र्यलढ्यात आपल्या प्राणाची आहुती देणाऱ्या भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांना आदरांजली वाहण्यासाठी आजचा दिवस शहीद दिवस म्हणून पाळला जातो. या तीन महान क्रांतीकारकांना२३ मार्च १९३१ रोजी फासावर चढवण्यात आलं होतं. यानिमित्त आज विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांना अभिवादन करण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट संदेशाच्या माध्यमातून या तिघांना आंदरांजली वाहिली असून, देश त्यांच्या हौतात्म्याचं स्मरण करत असल्याचं म्हटलं आहे.

****

केंद्र सरकारने कांद्यावरची लावलेली निर्यात बंदी पुन्हा अनिश्चित काळासाठी वाढवली आहे. याबाबतची अधिसूचना काल जारी करण्यात आली. याआधी कांदा निर्यात बंदी ३१ मार्च पर्यंत लागू करण्यात आली होती.

****

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक होणार आहे. पंतप्रदान नरेंद्र मोदी, पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उपस्थित राहणार आहेत.

दरम्यान, भाजप लक्षद्वीप इथं लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला पाठिंबा देणार आहे. पक्षाचे राष्ट्रीय महासचिव विनोद तावडे यांनी ही माहिती दिली.

****

अमरावतीची लोकसभेची जागा भाजपा उमेदवार लढवणार हे निश्चित झालं  असून, लवकरच चर्चेअंती उमेदवाराचं नाव घोषित करण्यात येईल, असं पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं. ते आज नागपूर इथं वार्ताहरांशी बोलत होते.

****

छत्रपती संभाजी नगर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या निर्देशानुसार शहरातल्या एसबीओए शाळेच्या वतीने मतदान जनजागृती विषयक तीन स्तरीय उपक्रम राबवले. शाळेच्या वतीने मतदान जागृती विषयक फेरी काढण्यात आली, विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या फलकांनी सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं होत. इयत्ता पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांनी इंग्रजी, मराठी आणि हिंदी भाषेमधून मतदान जागृती विषयी पालकांना आवाहानात्मक पत्रं लिहिली. तसंच शाळेच्या वतीने मतदान जागृती विषयक सेल्फी पॉईंट उभारण्यात आला आहे.

****

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या केंद्रीय संचालक मंडळाची बैठक काल नागपुरात गव्हर्नर शक्तिकांत दास यांच्या अध्यक्षतेखाली झाली. जागतिक आणि देशांतर्गत आर्थिक परिस्थिती, तसंच भू-राजकीय घडामोडी आणि जागतिक आर्थिक बाजारातल्या अस्थिरतेमुळे निर्माण झालेल्या आव्हानांचा आढावा या बैठकीत घेण्यात आला. चालू आर्थिक वर्षात रिझर्व्ह बँकेनं डिजिटल पेमेंट, ग्राहक शिक्षण आणि जागरूकता यांमध्ये केलेल्या प्रगती संदर्भात या बैठकीत चर्चा झाली. बँकेच्या वर्ष २०२४-२५ च्या अर्थसंकल्पाला देखील यवेळी मंजुरी दिली असल्याचं आर बी आयनं जारी केलेल्या प्रसिद्धी पत्रात म्हटलं आहे.

****

उद्या होळी तसंच परवा सोमवारी रंगांची उधळण करणारा धुलीवंदनाचा साजरा केला जाणार आहे. यानिमित्त छत्रपती संभाजी नगर शहरातल्या प्रमुख बाजारपेठांमध्ये विविध रंगांची विक्री करणारी दुकानं सजली आहेत. नैसर्गिक रंग तसंच विविध आकाराच्या  आकर्षित करणाऱ्या पिचकारी खरेदी वर ग्राहकांचा अधिक भर असल्याचं विक्रेत्यांनी सांगितलं.

****

नांदेड जिल्ह्यात सगळी दुय्यम निबंधक तसंच सह जिल्हा निबंधक कार्यालयं २९ ते ३१ मार्च रोजी सुरू राहणार आहेत. संबंधितांनी याची नोंद घ्यावी, असं आवाहन सह जिल्हा निबंधक अधिकारी एस. डी. कल्याणकर यांनी केलं आहे.

****

पिंपरीतल्या मेजर ध्यानचंद मैदानावर सुरू असलेल्या १४व्या हॉकी इंडिया वरिष्ठ महिला राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत यजमान महाराष्ट्र संघ आणि हरियाणाच्या संघानं अंतिम फेरीत धडक मारली आहे. या दोन्ही संघांमध्ये आता अजिंक्यपदासाठी लढत होणार आहे.

****

स्वीस खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष एकेरीत उपान्त्य फेरीचा सामना आज किंदांबी श्रीकांत आणि तैवानच्या लिन चुन यी यांच्यात होणार आहे. काल झालेल्या सामन्यात श्रीकांतनं तैवानच्या खेळाडुचा २१ - १०, २१ - १४ असा पराभव करत उपान्त्य फेरी गाठली आहे.

****

No comments:

Post a Comment