Saturday, 23 March 2024

Text-आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 23.03.2024 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजताचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 23 March 2024

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक२३ मार्च २०२४ सायंकाळी .१०

****

·      लोकसभा निवडणुकीत एक कोटी ८० लाख नवमतदार प्रथमच बजावणार मतदानाचा अधिकार

·      पहिल्या टप्प्यातल्या मतदानासाठी राज्यभरात आतापर्यंत दहा उमेदवारी अर्ज दाखल

·      देशभरात शहीद दिनानिमित्त भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांना आदरांजली

आणि

·      होळी तसंच धुलिवंदन सणांसाठी बाजारपेठा सज्ज

****

लोकसभा निवडणुकीत १८ ते १९ वर्ष वयोगटातले सुमारे एक कोटी ८० लाख नवमतदार मतदान करणार आहेत. केंद्रीय निवडणूक आयोगाकडून ही माहिती देण्यात आली. या मतदारांना मतदानाचा हक्क बजावण्यास प्रोत्साहित करण्यासाठी निवडणूक आयोगाकडून आय वोट फॉर शुअर सारखे विविध उपक्रम समाज संपर्क माध्यमांवर राबवले जात असल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

****

हिमाचल प्रदेशात काँग्रेसच्या अपात्र ठरलेल्या सहा माजी आमदारांसह तीन अपक्ष आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. राज्यसभा निवडणुकीत पक्षादेश झुगारून भाजप उमेदवाराला मतदान केल्यामुळे त्यांच्याविरोधात अपात्रतेची कारवाई करण्यात आली होती. दरम्यान, या सर्व आमदारांच्या मतदार संघात लोकसभा निवडणुकीसोबत पोटनिवडणूक जाहीर झालेली आहे.

****

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातल्या मतदानासाठी राज्यात आतापर्यंत १० जणांनी उमेदवारी अर्ज भरले आहेत. नागपूरमध्ये ५, रामटेकमध्ये १, तर भंडारा-गोंदिया आणि गडचिरोली-चिमूर मतदारसंघात प्रत्येकी दोघांनी उमेदवारी अर्ज भरल्याची माहिती राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी मुंबईत पत्रकार परिषदेत दिली. राज्यात आतापर्यंत २३ कोटी रुपयांची रोकड, १७ लाख लीटर मद्य, सुमारे ७०० किलो अंमलीपदार्थ, ४६ किलो सोनं चांदी आणि मोफत वाटायच्या १ लाखांहून अधिक वस्तू जप्त केल्याची माहिती त्यांनी दिली. यात मुद्देमालाची तपासणी सुरू असून कायदेशीर असलेला मुद्देमाल संबंधितांना परत केला जाईल, असं ते म्हणाले. परवाना नसलेली ३०८ शस्र जप्त केली असून परवाना असलेली ४५ हजार ७५५ शत्र ताब्यात घेणं, जप्त करणं किंवा आवश्यकतेनुसार वापरण्याची परवानगी दिली आहे. राज्यात परवाना दिलेली ७७ हजार १४८ शस्र असून उर्वरित शस्रांची पडताळणी सुरू असल्याचं ते म्हणाले.

गेल्या आठवड्यात निवडणूक जाहीर झाल्यापासून १ लाख ८४ हजार ८४१ मतदारांची राज्यात नोंद झाल्याची माहिती त्यांनी दिली. लोकसभा मतदारसंघात उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या १० दिवस आधीपर्यंत मतदार यादीत नाव नोंदवता येतं. त्यामुळं अधिकाधिक व्यक्तींनी मतदार यादीत नाव नोंदवावं, मतदार यादीतल्या नावाची पडताळणी करावी आणि मतदान करावं असं आवाहन त्यांनी केलं.

****

शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील हे येत्या मंगळवारी २६ मार्च रोजी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. शिरुर लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसकडून त्यांना उमेदवारी मिळेल, असा विश्वास त्यांनी आज मुंबईत अजित पवार यांची भेट घेतल्यानंतर व्यक्त केला. २०१९ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणूकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे यांनी त्यांना ५८ हजार मतांनी पराभूत केलं होतं.

****

कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीकडून छत्रपती शाहू महाराज निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यांना वंचित बहुजन आघाडीने जाहीर पाठिंबा दिला आहे. विधीज्ञ प्रकाश आंबेडकर यांनी आज मुंबईत पत्रकार परिषदेत ही घोषणा केली.

****

भारतीय स्वातंत्र्यलढ्यात आपल्या प्राणाची आहुती देणाऱ्या भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांना आदरांजली वाहण्यासाठी आजचा दिवस शहीद दिवस म्हणून पाळला जातो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट संदेशाच्या माध्यमातून या तीन वीरांना आंदरांजली वाहिली असून, देश त्यांच्या हौतात्म्याचं स्मरण करत असल्याचं म्हटलं आहे.

राज्यपाल रमेश बैस यांनी मुंबईत राजभवन इथं शहिदांच्या प्रतिमांना पुष्पांजली वाहून अभिवादन केलं.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसंच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हुतात्मा भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांना आपापल्या निवासस्थानी पुष्पहार अर्पण करत अभिवादन केलं.

 

बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयातल्या महापौर दालनात शहीद दिनानिमित्त शहीद भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांना अभिवादन करण्यात आलं.

छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी कार्यालयात शहीद भगतसिंग, शहीद राजगुरु, शहीद सुखदेव या तिनही हुतात्म्यांना आज अभिवादन करण्यात आले. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या हस्ते शहीदांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करुन आदरांजली वाहण्यात आली.

 

बीड जिल्हाधिकारी कार्यालयातही आज शहीद दिनानिमित्त भगत सिंग, राजगुरू, सुखदेव यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. यावेळी माहिती अधिकारी अंजु कांबळे निमसरकर यांच्यासह अनेकज यावेळी उपस्थित होते. परभणी इथही भगतसिंह, सुखदेव आणि राजगुरु यांना शहीद दिननिमित्त आज जिल्हाधिकारी कार्यालयात निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी यांनी अभिवादन केलं.

****

आदिवासी विकास विभागांतर्गतच्या शासकीय आश्रमशाळा अतिदुर्गम भागात असल्यानं, तिथे दररोज दूध पुरवठा करणं शक्य होत नाही, त्यामुळे या शाळांना विभागाच्या वतीनं दिल्या जाणाऱ्या सुगंधी दुधाचा टेट्रापॅक द्वारे पुरवठा करण्याचा निर्णय घेतला असल्याचं विभागानं स्पष्ट केलं आहे. यासाठी निविदा प्रक्रिया राबवून उत्पादक निश्चित केला असल्याचं विभागाच्या निवेदनात म्हटलं आहे.

****

संत तुकाराम महाराज बीज सोहळा येत्या २७ मार्च रोजी होणार आहे. या सोहळ्यानिमित्त पुणे जिल्ह्यातल्या देहू इथं मंदिर परिसरात होणारी संभाव्य गर्दी लक्षात घेता प्रशासनाने मंदिर परिसरात फळे-फुले विक्रेते, पानटपऱ्या, खेळणी विक्रेते तसच इतर विक्रेते आणि व्यावसायिकांना हातगाडी लावण्यास बंदी घातली आहे. पिंपरी-चिंचवडचे पोलिस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी याबाबतचे आदेश दिले आहेत.

****

होळी तसंच धुलिवंदन सोहळ्यासाठी सर्वत्र बाजारपेठा सज्ज झाल्या आहेत. उद्या सायंकाळी होलिका दहन तर सोमवारी धुलिवंदनाचा सण साजरा होत आहे. होळीसणासाठी स्थानिक बाजारपेठांमध्ये शेणाच्या गोवऱ्या, साखरगाठ्या आणि इतर साहित्यासह धुळवड खेळण्यासाठी नाना तऱ्हेचे रंग, पिचकाऱ्या आणि इतर साहित्यानं बाजारपेठा सजल्या आहेत. दरम्यान या सणांच्या पार्श्वभूमीवर वृक्षतोड न करण्याचं तसंच पाणी जपून वापरण्याचं आवाहन पर्यावरणवादी संस्था संघटनांच्यावतीनं करण्यात येत आहे.

 

धुळवड तसंच रंगपंचमीसाठी परभणी इथल्या वसंतराव नाईक कृषी विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणावर नैसर्गिक रंग तयार करून त्याची विक्री केली आहे. सामुदायिक विज्ञान विभागातील विद्यार्थ्यांनी हे नैसर्गिक रंग तयार केले आहेत. बीटरूट, पालक, हळद, पळसाची पाने, निळ पावडर, यापासून वेगवेगळे रंग तयार केले असल्याचं विभाग प्रमुख सुनिता काळे यांनी सांगितलं, त्या म्हणाल्या -

आपल्या सगळ्यांना कल्पना आहे, की रासायनिक होळीच्या रंगामुळे शरीरावर अनेक अनिष्ट परिणाम होतात. विशेषतः केस, त्वचा, डोळे याचा फार मोठा विपरीत परिणाम रासायनिक रंगामुळे होतो. त्याला एक पर्याय म्हणून विभागाने होळीचे नैसर्गिक रंग तयार केलेले आहेत. आपल्या आजुबाजुला निसर्गामध्ये जे झाडं दिसतात, त्या झाडांच्या विविध भागांचा, फळांचा त्याचप्रमाणे फुलांचा वापर करून या रंगांची निर्मिती केली जाते.

****

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं नियोजित मुंबई सेंट्रल पार्क संदर्भात महानगरपालिका आयुक्त डॉ. भूषण गगराणी यांनी आज महालक्ष्मी रेसकोर्स इथं प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. तसंच संबंधित खात्यांना योग्य ते निर्देश दिले. या भेटीनंतर मुंबई किनारी रस्ता प्रकल्पाच्या प्रगतिपथावरील कामाचीदेखील त्यांनी पाहणी केली. यावेळी पूर्व उपनगर अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त डॉ. अमित सैनी, उपायुक्त प्रशांत गायकवाड आदी उपस्थित होते.

****

पारदर्शक, निष्पक्ष आणि निर्भय निवडणूकीसाठी कर्मचारी-अधिकारी प्रशिक्षित असणं आवश्यक असल्याचं, छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी म्हटलं आहे. लोकसभा निवडणूक २०२४ च्या कामकाजाची पूर्वतयारी आज छत्रपती संभाजीनगर इथं 'एक दिवस अभ्यासाचा' हा उपक्रम राबवण्यात आला, त्यावेळी स्वामी बोलत होते. जिल्ह्यातल्या सुमारे एक हजारहून अधिक अधिकारी- कर्मचाऱ्यांनी या उपक्रमात सहभाग घेतला.

****

नांदेड जिल्ह्यात सगळी दुय्यम निबंधक तसंच सह जिल्हा निबंधक कार्यालयं २३ आणि २४ मार्च तसंच २९ ते ३१ मार्च रोजी सुरू राहणार आहेत. संबंधितांनी याची नोंद घ्यावी, असं आवाहन सहजिल्हा निबंधक अधिकारी एस. डी. कल्याणकर यांनी केलं आहे.

****

सोलापूर जिल्हा अन्न आणि औषध प्रशासनाने एप्रिल २०२३ ते १९ मार्च २०२४ या कालावधीत जिल्ह्यात सुमारे ४१ ठिकाणी धाडी टाकल्या असून, गुटखा, पानमसाला, सुगंधित तंबाखु या पदार्थाचा सुमारे ६३ लाख ७२ हजार इतक्या किमतीचा साठा नष्ट करण्यात केला.

****

स्वीस खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष एकेरीत उपान्त्य फेरीचा सामना आज किदांबी श्रीकांत आणि तैवानच्या लिन चुन यी यांच्यात होणार आहे.

****

No comments:

Post a Comment