Saturday, 23 March 2024

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर, दिनांक:23.03.2024रोजीचे सकाळी: 11.00 वाजेचे मराठी संक्षिप्त बातमीपत्र

 आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

संक्षिप्त बातमीपत्र

२३ मार्च २०२ सकाळी ११.०० वाजता

****

दोन दिवसांचा भूतानचा यशस्वी दौरा आटोपून पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी थिंपू इथून मायदेशी रवाना झाले.

दरम्यान, भारत आणि भूतानने काल एक संयुक्त निवेदन जारी करुन, राष्ट्रीय हितासंबंधित मुद्द्यांवर एकमेकांशी घनिष्ठ समन्वय आणि सहकार्य सुरू ठेवण्याचं मान्य केलं. उभय देश आपली स्वच्छ ऊर्जा भागीदारी वाढवत राहतील आणि या प्रदेशात ऊर्जा सुरक्षा वाढवण्यासाठी संयुक्तपणे नवीन प्रकल्प विकसित करतील, असं या निवेदनात म्हटलं आहे.

****

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अटकेनंतर विरोधकांनी निवडणूक आयोगाकडे हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे. केंद्र सरकार, विविध सरकारी यंत्रणांचा विरोधी पक्षांविरुद्ध कथित गैरवापर करत असल्याचे पुरावे आपण आयोगाला सादर केले असल्याचं सर्वपक्षीय विरोधी शिष्टमंडळाने सांगितलं.

****

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या केंद्रीय संचालक मंडळाची बैठक काल नागपुरात गव्हर्नर शक्तिकांत दास यांच्या अध्यक्षतेखाली झाली. जागतिक आणि देशांतर्गत आर्थिक परिस्थिती, तसंच भू-राजकीय घडामोडी आणि जागतिक आर्थिक बाजारातल्या अस्थिरतेमुळे निर्माण झालेल्या आव्हानांचा आढावा या बैठकीत घेण्यात आला.

****

डीजीसीए अर्थात नागरी विमान वाहतूक महासंचालनालयानं एअर इंडियाला ८० लाख रुपयांचा आर्थिक दंड ठोठावला आहे. विमान उड्डाणाच्या वेळेची मर्यादा आणि विमान कर्मचाऱ्यांच्या विश्रांती व्यवस्थापन नियमांचा भंग केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली.

****


गैरप्रकार आढळून आल्याच्या कारणावरून, केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ - सीबीएसईनं २० शाळांची, मंडळाशी असलेली संलग्नता काढून घेतली आहे. मंडळानं अचानक केलेल्या तपासणी दरम्यान या शाळा, पटावर खोटे विद्यार्थी दाखवणं, अनियमित नोंदी असे गैरप्रकार करत असल्याचं आढळून आलं.

****

आज जागतिक हवामान दिवस आहे. हवामानशास्त्राबरोबरचं त्यात होणाऱ्या बदलांविषयी लोकांना जागरूक करणं, हा त्यामागील हेतू आहे. 'हवामानविषयक कृतीच्या आघाडीवर' ही यंदाची या दिनाची संकल्पना आहे.

****

सीमाशुल्क विभागानं मुंबई विमानतळावर केलेल्या कारवाईत १० कोटी ६० लाख रूपयांचा मुद्देमाल जप्त केला. यात ५ कोटी ३६ लाखांचं परकीय चलन, ३ कोटी ७५ लाख किमतीचे हिरे, आणि १ कोटी ४९ लाख किमतीचं सोनं जप्त करण्यात आलं.

****

No comments:

Post a Comment