Sunday, 24 March 2024

Text-आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 24.03.2024 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजताचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 24 March 2024

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक२४ मार्च २०२४ सायंकाळी .१०

****

·      देशभऱ होळीचा सण उत्साहात सुरू.

·      अमरावती जिल्ह्यात बस अपघातात दोन महिलांचा मृत्यू तर २५ गंभीर जखमी.

·      राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाला लोकसभा निवडणुकीत सात जागा अपेक्षित.

आणि

·      आयपीएल स्पर्धेत राजस्थान रॉयल्सचं लखनऊ सुपर जायंटस् समोर १९४ धावांचं आव्हान.

****

आज होळी अर्थात हुताशनी फाल्गुन पौर्णिमा - शिमगा हा सण उत्साहात साजरा होत आहे. आज घरोघरी तसंच सार्वजनिक ठिकाणी होलिका दहन साजरं होत आहे. वाईट गोष्टींचा नाश करुन चांगल्याचा विजयी प्रकाश यानिमित्तानं सर्वत्र पोहचवणं असा या सणाचा उद्देश आहे. यानंतर उद्या रंगांची उधळण असणारा, वसंत ऋतुचं जल्लोषपूर्ण स्वागत करणारा सण अर्थात धुलिवंदनाचा उत्सव देशभरात साजरा होणार आहे. राज्यपाल रमेश बैस यांनी होळी तसंच धुलीवंदनानिमित्त जनतेला हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत. बंधुभावाचं प्रतिक असलेला रंगांचा हा सण सर्वांच्या जीवनात आनंदाचे रंग भरो, देशबांधवांमध्ये असलेली बंधुत्वाची भावना अधिक बळकट करो, ही प्रार्थना, असं राज्यपालांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नागरिकांना होलिकादहन आणि उद्याच्या धूलिवंदनानिमित्त समाजमाध्यमांवरच्या संदेशाद्वारे शुभेच्छा दिल्या आहेत.

****

संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी आज लेहमधे सैनिकांबरोबर होळी साजरी केली. देशाच्या सीमांचं रक्षण करण्यासाठी सैनिक सज्ज असल्यामुळंच देशवासियांचं आयुष्य सुरक्षित असल्याचं ते यावेळी म्हणाले. कर्तव्यपालनासाठी आपल्या कुटुंबापासून दूर राहणारे हे सैनिक प्रत्येक भारतीय कुटुंबाचा भाग आहेत, असंही ते यावेळी म्हणाले.

****

श्री साईबाबा संस्‍थान विश्‍वस्‍त मंडळ, शिर्डीतर्फे श्री गुरुस्‍थान मंदिरासमोर आज होळी पेटवण्‍यात आली. यावेळी संस्‍थानचे प्रभारी मुख्‍य कार्यकारी अधिकारी तुकाराम हुलवळे यांनी सपत्निक विधीवत पुजा केली. संस्‍थानचे अधिकारी, मंदिर पुजारी, शिर्डी ग्रामस्‍थ आणि साईभक्‍त यावेळी मोठ्या संख्‍येनं उपस्थित होते.

****

अमरावतीहून मेळघाट मार्गे मध्य प्रदेशात जाणाऱ्या बसच्या अपघातात आज दोन महिलांचा मृत्यू झाला असून २५ जण गंभीर जखमी झाले आहेत. अमरावती जिल्ह्यातल्या परतवाडा ते धारणी मार्गावर घाटामध्ये बसचालकाचा ताबा सुटून ही बस खोल दरीत कोसळल्याचं आमच्या वार्ताहरानं म्हटलं आहे. आज सकाळी हा अपघात झाला. जखमींना सेनाडोह इथल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आलं आहे.

****

उन्हाळ्यात रुग्णालयांत लागणाऱ्या आगीच्या दुर्घटना टाळण्यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालय आणि राष्ट्रीय आपत्ती प्राधिकरणानं सर्व राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांना त्यांच्या अधिकारक्षेत्रातल्या रुग्णालयांसाठी संयुक्त मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. रुग्णालयांची सर्वसमावेशक अग्निसुरक्षा लेखा परीक्षण आणि प्रत्यक्ष तपासणी करणं, अग्नी धोक्याचा गजर, धूर शोधक यंत्र यासह सर्व अग्निरोधक यंत्रणा उपलब्ध आहे आणि ती पूर्णपणे कार्यरत आहे, याची खात्री करणं या बाबींचा यात समावेश आहे.

****

विठ्ठल मंदिरामध्ये सुरू असलेल्या कामामुळे पुढची पाचशे वर्षे हे मंदिर अबाधित राहील, असं पुरातत्व विभागाचे सहायक संचालक विलास वाहणे यांनी या संदर्भातल्या एका बैठकीत आज सांगितलं. पंढरपूरच्या श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरांचं संवर्धन आणि सुशोभीकरणाचं काम सुरू असून ते करताना बेसाल्ट दगड आणि चुन्याचा वापर केला जात आहे. या दगडाचं आयुर्मान अनेक शतकं असतं असं ते म्हणाले. मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, व्यवस्थापक बालाजी पुदलवाड, वास्तुविशारद तेजस्विनी आफळे यांच्यासह इतर सदस्य दुरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून या बैठकीत सहभागी झाले.

****

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या पार्श्वभूमीवर माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या वतीनं तयार करण्यात आलेल्या महाराष्ट्रातील सर्व लोकसभा मतदारसंघांच्या माहितीवर आधारित पूर्वपीठिकेचं प्रकाशन आज दिल्लीत झालं. महाराष्ट्र सदनचे निवासी आयुक्त रूपिंदरसिंग यावेळी प्रमुख उपस्थित होते. लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी पूर्वपीठिकेच्या माध्यमातून महत्वपूर्ण संदर्भ उपलब्ध झाले असून ही संदर्भ पुस्तिका सर्वांसाठीच उपयुक्त ठरणारी असल्याचं त्यांनी यावेळी नमूद केलं.

****

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज दुपारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शासकीय निवसस्थानी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष अजित पवार गटच्या प्रमुख नेत्यांची बैठक झाली. महायुतीमध्ये पक्षाला किती जागा मिळणार, हे अद्याप स्पष्ट झालं नसलं तरी पक्षातर्फे सात जागा लढवण्याची इच्छा दर्शवण्यात आली. या बैठकीला पवार तसंच माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, मंत्री छगन भुजबळ उपस्थित होते.

****

लोकसभा निवडणुकीत प्रत्येक गावातून उमेदवार उभा करण्यापेक्षा जिल्ह्यातून एकच उमेदवार उभा करावा, असं आवाहन मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी केलं आहे. त्यांनी आज जालना जिल्ह्यातल्या अंतरवाली सराटी इथं आपल्या कार्यकर्त्यांची बैठक घेतली, त्यावेळी ते बोलत होते. आपण स्वतः निवडणुकीत सहभागी होणार नाही. कोणत्याही पक्षाचा जो उमेदवार सगेसोयरे कायद्याला पाठिंबा देईल त्याच्याकडून करारनामा घेऊन त्याला पाठिंबा द्यावा किंवा जिल्ह्यातून सर्व जाती धर्मांतून एकच उमेदवार अपक्ष म्हणून द्यावा, असं ते म्हणाले. राज्य सरकारनं मराठा समाजाला दिलेलं दहा टक्के आरक्षण हे आरक्षणाच्या मूळ ५० टक्क्यांच्या आत द्यावं. कार्यकर्त्यांनी गावात जाऊन मराठा समाजसोबत बैठक घ्यावी, उमेदवार कोण द्यायचा हे येत्या ३० तारखेपर्यंत निश्चित करावं, असं जरांगे पाटील म्हणाले.

****

परभणी जिल्ह्यात मराठा समाजाचा इतर मागास वर्ग ओबीसी-प्रवर्गात समाविष्ट करून `सगे सोयरे` या अध्यादेशाची अंमलबजावणी करण्याच्या मागणीसाठी गावागावात साखळी उपोषणं करण्यात आलं. सरकारकडून याला कोणताही प्रतिसाद मिळत नसल्यानं सर्व राजकीय पक्ष बहिरे आहेत असं सांगत आपली मागणी `सगे सोयरे` अशी भित्तीपत्रकं घरा-घरांवर लावून कार्यकर्त्यांकडून आंदोलन सुरू ठेवण्यात आलं आहे.

****

लोकसभा निवडणुकीसाठी नाशिक जिल्ह्यात २० मे रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासनाकडून सुमारे ३१ हजार मतदान अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात येत असल्याची माहिती जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी दिली आहे. लोकसभा निवडणुकीसाठी नाशिक जिल्ह्यात एकूण ४ हजार ८०० मतदान केंद्रं आहेत.

****

छत्रपती संभाजीनगर परिमंडळाचे 'उत्तरदायित्व' हे नाटक महावितरणच्या प्रादेशिकस्तरीय आंतरपरिमंडलीय नाट्य स्पर्धेत सर्वोत्कृष्ट ठरले आहे. नागपूर इथं होणाऱ्या राज्यस्तरीय नाट्य स्पर्धेसाठी या नाटकाची निवड झाली आहे. महावितरणमधील कर्मचाऱ्यांच्या कलागुणांना वाव देण्याच्या उद्देशाने आयोजित या स्पर्धेचा समारोप काल तापडिया नाट्यमंदिरात झाला. मुख्य अभियंता डॉ.मुरहरी केळे यांच्यासह परिमंडळाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.

****

अहमदनगर जिल्ह्यातील भटक्यांची पंढरी म्हणून ओळख असलेल्या नाथ सांप्रदायातील कानिफनाथाच्या यात्रा उत्सवाला आजपासून मढी इथं प्रारंभ झाला. कैकाडी समाजाची मानाची काठी कानिफनाथांच्या कळसाला भेटल्यानंतर होळीच्या उत्सवाला सुरुवात होते. कानिफनाथांच्या मढी गडाच्या बांधकामासाठी कैकाडी समाजानं गाढवाद्वारे सामग्री आणण्यासाठी मोलाचं योगदान दिल्याबद्दल कैकाडी समाजाला मान देऊन मानाची काठी मढ़ी इथल्या चैतन्य कानिफनाथांच्या संजीवन समाधीसह कळसाला भेटवण्यात येते. ही काठी भेटल्यानंतर परंपरेनुसार होळीपासून मढी यात्रेला प्रारंभ होईल आणि ही यात्रा गुढीपाडव्यापर्यंत चालणार असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

बुलढाणा जिल्ह्यातल्या सैलानी बाबा यात्रा महोत्सवाला आज होळीपासून सुरुवात होत आहे. देशभऱातील लाखो भाविक या यात्रेत दर्शनासाठी येतात. इथं हजारो नारळांच्या समवेत विविध वस्तू होळीत टाकण्याची परंपरा आजही पाळण्यात आली. भाविकांची यावेळी मोठी उपस्थिती होती.

****

आयपीएल टी ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेत आज राजस्थान रॉयल्स संघानं संजू सॅमसनच्या नाबाद ८२ धावांमुळं लखनऊ सुपर जायंटस समोर २० षटकांत १९४ धावांचं लक्ष्य ठेवलं आहे. जयपूर इथं सुरू या सामन्यात रियान परागनं ४३ धावा केल्या. उत्तरामध्ये थोड्यावेळापूर्वी लखनऊ सुपर जायटंस संघानं पाचव्या षटकांत तीन बाद २६ धावा केल्या होत्या. आजचा दुसरा सामना संध्याकाळी साडे सात वाजेपासून मुंबई इंडीयन्स आणि गुजरात टायटन्स दरम्यान अहमदाबाद इथं खेळवला जाणार आहे.

****

स्टेट बँक ऑफ इंडियातर्फे पर्यावरण जनजागृतीसाठी अहमदाबाद इथं आज सकाळी `ग्रीन फॉर रन` या मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. या स्पर्धेतल्या ४५ वर्षांवरील वयोगटात २१ किलोमीटर मॅरेथॉन स्पर्धेत वाशिम जिल्ह्यातल्या पार्डी इथले भास्कर कांबळे यांनी प्रथम क्रमांक पटकावला.

****

No comments:

Post a Comment