आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
संक्षिप्त बातमीपत्र
२४ मार्च २०२४ सकाळी ११.०० वाजता
****
आज असणारी होळी पौर्णिमा तसंच उद्याचं धुलिवंदन यासह सध्या सुरु असलेला पवित्र रमजानचा महिना आणि त्यासोबत आलेल्या सुट्या यामुळं सर्व ठिकाणच्या बाजारपेठांमध्ये उत्साहाचं वातावरण दिसून येत आहे. आजच्या हुताशनी पौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर घरोघरी पारंपारीकरित्या होलीका दहन केलं जाणार असून जागोजागी नागरीकांच्या सहभागातून सार्वजनिक होळीचं आयोजनही करण्यात आलेलं आहे.
****
यंदा होळी पौर्णिमेच्या दिवशी चंद्रग्रहण आलं आहे. हे चंद्रग्रहण भारतात दिसणार नाही, असं खगोलशास्त्रज्ञांनी म्हटलं आहे.
****
राज्याच्या कोकण आणि मध्य महाराष्ट्रात आज आणि उद्या ढगाळ वातावरण राहील अशी माहिती हवामान विभागानं दिली आहे.
****
उन्हाच्या झळां सर्वानाच जाणवू लागल्या असून उन्हाळ्यात वन्यजीवांची पाण्यासाठी भटकंती न व्हावी या साठी वाशिम जिल्ह्यातील वनोजा इथं प्रादेशिक जंगलामध्ये लोकसहभागातून कृत्रिम पाणवठे तयार करण्यात आले आहेत. वनविभागाकडून ह्या पाणवठयांमध्ये टँकरद्वारे पाणी टाकण्यात येत असल्यामुळं शेकडो वन्यजीवांची तहान भागविण्यासाठी मदत होत आहे.
****
बीड जिल्ह्यात आदर्श आचारसंहितेचा भंग होणार नाही तसंच पिण्याच्या पाण्याची कमतरता भासणार नाही याची दक्षता घ्यावी, असे निर्देश जिल्ह्याधिकारी दीपा मुधोळ -मुंडे यांनी दिले आहेत. त्या काल परळी इथं या संदर्भात घेतलेल्या एका आढावा बैठकीत बोलत होत्या.
****
परभणी जिल्ह्यातल्या जिंतूर शहरात काल पोलिसांनी दहा लाख ५८ हजार रुपयांचा प्रतिबंधित गुटखा जप्त केला. रात्रगस्ती पथकानं एका संशयास्पद चारचाकी वाहनाची तपासणी केली असता हा प्रकार उघडकीस आला असून आरोपी चालक वाहन सोडून पसार झाला असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
****
लेबनानमध्ये विश्व टेबल टेनिस फीडर बैरूत स्पर्धेत संमिश्र गटाच्या आज होणा-या अंतिम लढतीत दोन भारतीय जोड्या समोरासमोर असणार आहेत. यात साथियान ज्ञानशेखरन आणि मनिका बत्रा यांचा सामना आकाश पाल आणि पॉयमंती बैस्य सोबत दुपारी चार वाजून चाळीस मिनिटांनी खेळवला जाणार आहे.
****
आयपीएल टी ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेत आज राजस्थान रॉयल्स आणि लखनऊ सुपर जायंटस दरम्यानचा सामना जयपूर इथं दुपारी साडे तीन वाजता सुरू होईल. मुंबई इंडीयन्स आणि गुजरात टायटन्स दरम्यान अहमदाबाद इथं आजचा दुसरा सामना संध्याकाळी साडे सातवाजता होणार आहे.
****
No comments:
Post a Comment