आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
संक्षिप्त बातमीपत्र
२५ मार्च २०२४ सकाळी ११.०० वाजता
****
मध्य प्रदेशात उज्जैन इथल्या महाकाल मंदीराच्या गाभार्यात आज सकाळी भस्म आरती दरम्यान आग लागली. या दुर्घटनेत मंदीराच्या पुजार्यांसह १२ जण जखमी झाले. त्यांना उज्जैन इथल्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलं असून, देवदर्शन पुन्हा सुरु झालं आहे. जिल्हाधिकार्यांनी या दुर्घटनेची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. यासंदर्भात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांच्याकडून माहिती घेतली.
****
रंगांची उधळण करणारा धुळवडीचा सण आज सर्वत्र हर्षोल्हासात साजरा होत आहे.
यवतमाळ जिल्ह्याच्या वागद ईजरा इथं गोरमाटी गाण्याच्या ठेक्यावर लेंगी नृत्याद्वारे होळी साजरी करण्यात आली.
गोंदिया जिल्ह्यात आमगाव इथं पाच हजार १०० शेणपोळ्यांनी होळी सजवण्यात आली आणि त्यावर शुद्ध शेणापासून बनवलेल्या आकर्षक सजावटीसह होलिकेच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. काल रात्री हा होलिका दहन सोहळा पार पडला.
नंदुरबार जिल्ह्यात आदिवासी काठी संस्थानाचा रजवाडी होळी उत्सव आज मोठ्या उत्साहात पार पडला. आदिवासी बांधवांनी बुध्या, बावा आणि मोरख्याचा खास पारंपारीक वेश परिधान करुन नृत्य सादर केलं.
****
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी काल लेहमध्ये सैनिकांबरोबर होळी साजरी केली. देशाच्या सीमांचं रक्षण करण्यासाठी सैनिक सज्ज असल्यामुळेच देशवासियांचं आयुष्य सुरक्षित असल्याचं ते म्हणाले. कर्तव्य पालनासाठी आपल्या कुटुंबापासून दूर राहणारे हे सैनिक प्रत्येक भारतीय कुटंबाचा भाग आहेत, असं त्यांनी सांगितलं.
****
भारतीय भांडवल बाजारात परदेशी गुंतवणुकदारांच्या गुंतवणूकीत या महिन्यात लक्षणीय वाढ दिसून आली. फेब्रुवारीत एक हजार ५३९ कोटी रुपयांच्या गुंतवणुकीच्या पार्श्वभूमीवर, या महिन्यात भारतीय शेअर बाजारांमध्ये ३८ हजार कोटींची गुंतवणूक परदेशी गुंतवणूकदारांनी केली आहे. जागतिक बाजारातली सुधारणा आणि भारतातल्या व्यापक आर्थिक सुधारणांमुळे परदेशी गुंतवणूकदारांचा कल भारतात गुंतवणूक करण्याकडे असल्याचं दिसत आहे.
****
भारतीय नौदलाने पकडलेल्या ३५ सोमालियन चाच्यांना मुंबई न्यायालयाने काल १० दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. सोमालियाच्या किनारपट्टीवर आयएनएस कोलकाताने या चाच्यांना पकडलं होतं.
****
No comments:
Post a Comment