Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date –
19 April 2024
Time 18.10
to 18.20
Language
Marathi
आकाशवाणी
छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक
बातम्या
दिनांक
– १९ एप्रिल २०२४ सायंकाळी ६.१०
****
·
लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातल्या उमेदवारांचं भवितव्य मतदान यंत्रात बंद;राज्यातल्या पाच मतदार संघात पाच वाजेपर्यंत सरासरी ५४ टक्के मतदानाची
नोंद
·
तिसऱ्या टप्प्यासाठी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत संपली;उस्मानाबाद इथं ५० अर्ज दाखल
·
चौथ्या टप्प्यात औरंगाबाद इथं आज सहा अर्ज तर जालन्यात एक अर्ज दाखल
आणि
·
दुसऱ्या टप्प्यातलं मतदान आठवडाभरावर;नेत्यांच्या सभा तसंच प्रचार फेऱ्यांना वेग
****
लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या
टप्प्यातल्या उमेदवारांचं भवितव्य आज मतदान यंत्रात बंद झालं. राज्यातल्या नागपूर, भंडारा-गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली-चिमूर आणि रामटेक या पाच मतदारसंघात आज शांततेत मतदान झालं. सकाळी
सात वाजेपासूनच मतदारांनी मतदान केंद्रांवर हजेरी लावली होती. ठिकठिकाणी मतदारांच्या
रांगा दिसून आल्या. दिव्यांग तसंच ज्येष्ठ मतदारांना सुलभपणे मतदान करता यावं,
यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली होती.
गडचिरोली तसंच भंडारा-गोंदिया
मतदार संघातल्या अतिदुर्गम भागात सकाळी ७ ते दुपारी तीन वाजेपर्यंत मतदानाची वेळ होती.
गडचिरोली मतदार संघाच्या दुर्गम भागातून ईव्हीएम आणि मतदान पथकांना हेलिकॉप्टरने गडचिरोली
इथं आणण्यास सुरुवात झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे
इतरत्र सायंकाळी सहा वाजेपर्यंत
मतदान प्रक्रिया सुरू होती. विदर्भातल्या या सर्व मतदार संघात सायंकाळी पाच वाजेपर्यंत
सरासरी ५४ पूर्णांक ५८ टक्के मतदान झालं.
यापैकी सर्वाधिक सुमारे ६५ टक्के
मतदान गडचिरोली-चिमूर इथं तर त्या खालोखाल भंडारा-गोंदिया मतदार संघात ५६ पूर्णांक
८७ टक्के मतदानाची नोंद झाली. चंद्रपूर इथं ५५ पूर्णांक ११ टक्के, मतदान नोंदवलं गेलं. रामटेक इथं ५२ पूर्णांक ३८ टक्के,
तर नागपूर इथं सर्वात कमी सुमारे ४८ मतदानाची नोंद झाली.
****
गोंदिया आणि नागपूरमध्ये काही
मतदान केंद्रांवर इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र बंद पडल्याच्या काही घटना घडल्या. यामुळे
मतदान सुरू होण्यास उशीर झाला. मात्र काही काळातच त्रुटी दूर करून मतदान सुरळीत सुरू
झाल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या
टप्प्यासाठी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत आज संपली. या टप्प्यात ९४ मतदारसंघांमध्ये
सात मे रोजी मतदान होणार आहे. यामध्ये राज्यातल्या उस्मानाबाद, लातूर, रायगड, बारामती,
सोलापूर, माढा, सांगली,
सातारा, रत्नागिरी - सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि हातकणंगले या मतदारसंघांचा समावेश आहे.
लातूर लोकसभा मतदार संघासाठी
महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. शिवाजी काळगे यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. याप्रसंगी
माजी मंत्री अमित देशमुख, राज्यसभेचे खासदार चंद्रकांत हंडोरे
यांची उपस्थिती होती. शहरातील गंजगोलाई ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर पार्क टाऊन हॉल पर्यंत
मिरवणूक काढण्यात आली.
उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातून
महायुतीच्या उमेदवार अर्चना राणा जगजीतसिंह पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी
उपमुख्यमंत्री अजित पवार आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित होते.
या मतदारसंघात उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी ३६ जणांनी ५० उमेदवारी
अर्ज दाखल केल्याची प्राथमिक माहिती जिल्हा निवडणूक प्रशासनाने दिले आहे. लातूर मतदार
संघातही एकूण ५० अर्ज दाखल झाल्याचं वृत्त आहे.
सांगली लोकसभा मतदारसंघासाठी
आज महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रहार पाटील यांनी अर्ज दाखल केला. यावेळी खासदार संजय
राऊत तसंच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र
पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा
मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार भाजपचे नारायण राणे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला.
यावेळी गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते.
****
औरंगाबाद मतदार संघातून आज २५
जणांनी ५३ अर्जांची उचल केली, तर आज सहा उमेदवारी
अर्ज दाखल झाले. यात बहुजन महा पार्टी आणि हिंदुस्तान जनता पार्टी असे दोन तर बाकी
चार अपक्ष उमेदवार आहेत. या मतदारसंघात दोन दिवसात एकूण सात अर्ज दाखल झाले आहेत. आज
संदिपान भुमरे यांच्या नावे दोन तर विनोद नारायण पाटील यांच्या नावे एका अर्जाची उचल
केली.
बीड लोकसभा निवडणुकीसाठी आज
३० उमेदवारांनी ६८ अर्जांची उचल केली.
जालना मतदार संघातून आज दुसऱ्या
दिवशी एकूण २४ जणांनी ४९ नामनिर्देशन पत्रांची उचल केली. काल आणि आज या दोन दिवसांत
५८ जणांनी १४६ उमेदवारी अर्ज घेतले आहेत. दरम्यान, आज मंगेश संजय साबळे या अपक्ष उमेदवारानं जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. श्रीकृष्ण
पांचाळ यांच्याकडे आपला उमेदवारी अर्ज सादर केला.
शिर्डी लोकसभा मतदारसंघात आज
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार भाऊसाहेब वाकचौरे यांनी आपला उमेदवारी
अर्ज आज दाखल केला. यावेळी आमदार आदित्य ठाकरे यांच्यासह माजी मंत्री शंकरराव गडाख
उपस्थित होते.
****
निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात
मतदानाचा दिवस आठवडाभरावर आला आहे. प्रचारासाठी अखेरचे काही दिवस शिल्लक असल्यानं, प्रचारसभांना वेग आला आहे.
भाजपचे ज्येष्ठ नेते पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांनी आज वर्धा मतदार संघात तळेगाव इथं महायुतीचे उमेदवार रामदास तडस
तसंच अमरावतीच्या उमेदवार नवनीत राणा यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा घेतली. काँग्रेस
आणि मित्रपक्षांची भूमिका कायम विकासविरोधी, शेतकरी विरोधी असल्याची टीका करत, मोदी यांनी आपल्या
कार्यकाळात केलेल्या विकास कामांचा आढावा घेतला. दरम्यान, मोदी
यांची उद्या २० एप्रिलला नांदेड आणि परभणी इथंही प्रचारसभा होणार आहे.
****
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशवासियांना २०४७ चं स्वप्न दाखवत
आहेत, मात्र ते इतरांची दिशाभूल करत असल्याचा आरोप वंचित बहुजन
आघाडीचे प्रमुख विधीज्ञ प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. ते आज नांदेड इथं वंचित बहुजन
आघाडीचे उमेदवार अविनाश भोसीकर यांच्या प्रचारार्थ नवामोंढा इथं झालेल्या जाहीर सभेत
बोलत होते. आगामी काळात आरक्षणाचा प्रश्न सोडवण्याचं काम वंचित बहुजन आघाडीच करेल असा
विश्वास आंबेडकर यांनी व्यक्त केला.
****
राज्याचे अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी नाशिक
लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याचं, स्पष्ट केलं आहे. आज मुंबई इथं
पक्ष कार्यालयात पत्रकार परिषद घेऊन त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. नाशिक लोकसभा
मतदारसंघातून महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारात
सहभागी होऊन महायुतीची ताकद अधिक वाढवणार असल्याचं भुजबळ यांनी सांगितलं आहे.
****
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी
आज उस्मानाबाद मतदार संघातल्या महायुतीच्या उमेदवार अर्चना राणा जगजीतसिंह पाटील यांच्या
प्रचारासाठी प्रचार फेरी काढत जोरदार शक्तिप्रदर्शन केलं. तत्पूर्वी त्यांनी शमशुद्दीन
ख्वाजा दर्ग्यात जाऊन प्रार्थना केली.
****
नौदल उपप्रमुख, व्हाइस ॲडमिरल दिनेश त्रिपाठी यांची भारतीय नौदलप्रमुख म्हणून
नियुक्ती करण्यात आली आहे. विद्यमान नौदलप्रमुख ॲडमिरल आर हरी कुमार या महिन्याच्या
३० तारखेला निवृत्त होणार आहेत. त्रिपाठी यांनी विनाश, किर्च
आणि त्रिशूल या भारतीय नौदलाच्या जहाजांचं नेतृत्व केलं आहे.
****
धुळे शहरात आज स्वच्छ सर्वेक्षण
२०२४ अंतर्गत १९ प्रभागातील ४१ सफाई कर्मचाऱ्यांचा उत्कृष्ट काम केल्याबद्दल सत्कार
करण्यात आला. आयुक्त तथा प्रशासक अमिता दगडे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जुन्या
महानगरपालिकेत आरोग्य विभागातील कार्यालयात मुख्य स्वच्छता निरीक्षक राजेश वसावे आणि
स्वच्छता निरीक्षक चंद्रकांत जाधव यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र आणि गुलाब पुष्प देऊन
सत्कार करण्यात आला.
****
नांदेड तसंच हिंगोली लोकसभा
मतदार संघासाठी २६ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. निवडणूक कामाशी संबंधित अधिकारी कर्मचाऱ्यांना
नऊ विधानसभा मतदार संघात २४ एप्रिल रोजी नेऊन सोडणं तसंच २६ एप्रिल रोजी मतदान प्रक्रिया
पार पाडल्यानंतर परत आणण्यासाठी १०८ बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे. सर्व मतदान
अधिकारी तसंच कर्मचारी यांनी त्या-त्या मतदार संघात नेमून दिलेल्या केंद्रावर २४
एप्रिल रोजी सकाळी ६ वाजता उपस्थित राहण्याचं आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात
आलं आहे.
****
छत्रपती संभाजीनगर महानगर क्षेत्रामध्ये
बनावट दस्तऐवजांच्या आधारे अकृषिक परवानगी देण्याचे प्रकार होत असल्याच्या अनेक तक्रारी
येत आहेत. याबाबत छत्रपती संभाजीनगर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे महानगर आयुक्त
तथा विभागीय आयुक्त मधुकर राजे आर्दड यांनी आढावा घेतला. दस्तनोंदणी विभागाकडे १५ ऑगस्ट
२०१९ पासूनच्या नोंदणीकृत दस्ताऐवजांची कायदेशीर सत्यता तपासून अहवाल सादर करावा, असे असे निर्देशही त्यांनी यंत्रणेला दिले.
****
No comments:
Post a Comment